नाशिक कुंभमेळयासाठी अंतर्गत रिंगरोडला मंजूरी

नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्याच आले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधांची समितीने नाशिकमध्ये सहासष्ट किलोमीटर लांबीची अंतर्गत रिंग रोड तयार करण्यास मान्यता दिली आहे.

कुंभमेळ्यासाठी सात मार्गांनी येणाऱ्या भाविकांची वाहतूक सुलभ करणे आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळणे, हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही कामे मार्च ते जून २०२७ या आत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक भू-संपादनासही मान्यता मिळाली आहे. या अंतर्गत रिंगरोडमुळे कुंभमेळ्याच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी मोठी मदत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबईसह नाशिक, पुण्यातील महत्वाच्या प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आले. नाशिक येथे होणा-या कुंभमेळ्यानिमित्त रिंग रोडसह अंतर्गत रिंग रोड उभारणे आवश्यक आहे. कुंभमेळ्यासाठी विविध सात प्रमुख मार्गांनी नाशिकमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची गर्दी शहरात न आणता, त्यांना थेट रिंगरोडने त्यांच्या गंतव्यस्थानाकडे म्हणजेच साधुग्राम आणि त्र्यंबकेश्वरकडे वळवण्यासाठी हा मार्ग उपयोगी ठरेल. या रिंग रस्त्यांची कामे मार्च-जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर या रस्त्यासाठी लागणा-या आवश्यक भूसंपादनासही मान्यता देण्यात आली आहे. हा रिंगरोड शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा ठरणार आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय टळेल आणि भाविकांचा प्रवासही सुकर होईल.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा धार्मिक सोहळा आहे. कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी येतो. नाशिकमध्ये जेव्हा गुरू सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा सिंहस्थ कुंभमेळा भरतो. २०२७ चा कुंभमेळा सुमारे दीड वर्षाचा असणार आहे. गोदावरी नदीकाठी रामकुंड येथे वैष्णव संप्रदायाचे शाही स्नान होते. तर कुशावर्त कुंड येथे शैव संप्रदायाचे शाही स्नान होते. २०२७ च्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तीन प्रमुख शाही स्नान होण्याची शक्यता आहे. शाही स्नानाला या सोहळ्यात विशेष महत्त्व असते. या सोहळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात येत आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारने मिळून पंचवीस हजार कोटी पंच्चावन्न लाख रुपयांचा भव्य विकास आराखडा तयार केला आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे सात हजार चारशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अंतर्गत रिंगरोडसह अनेक नवीन रस्ते बांधणे आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे सहा पदरीकरण करणे. गोदावरी आणि इतर नद्यांवर तेरा नवीन पूल बांधणे आणि रस्त्यांचे रुंदीकरण करणे. नाशिकमध्ये एक हजार एकशे पन्नास एकर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दोनशे पंचवी, एकर जागेवर साधुग्रामसाठी भूसंपादन आणि विकास करणे. पहिल्या टप्प्यात ही कामे सुरु करण्यात आली आहेत. तर ओझर विमानतळाच्या उन्नतीसाठी शहाशे चाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या दरम्यान आठ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. २०२७च्या या कुंभमेळ्यात सुमारे आठ ते नऊ कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे.






22,255 वेळा पाहिलं