नाशिक व अमरावती जिल्ह्यांना नवसंशोधन प्रशिक्षण केंद्रांची मंजुरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून नाशिक आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्यांना ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर झाले आहे. महाराष्ट्राला उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात अग्रस्थान मिळवून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. कंपनीकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर या दोन्ही केंद्रांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

या नव्या केंद्रांमुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील युवकांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जागतिक दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण मिळणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, आणि कौशल्य विकासाशी संबंधित प्रशिक्षण आता स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ सहज मिळेल, नवउद्योगांना चालना मिळेल आणि स्थानिक युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रांमुळे उद्योगक्षेत्राला प्रशिक्षित, कुशल आणि तांत्रिक दृष्ट्या समर्थ युवकांची मोठी फौज तयार होईल. या केंद्रांच्या माध्यमातून नवउद्योग स्थापनेला प्रोत्साहन मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी येईल आणि जिल्ह्यांतील उद्योगविकासाला नवे परिमाण मिळेल. युवकांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान आत्मसात करण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

राज्यातील युवकांना रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करून ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळ देण्याचा उपक्रम म्हणून या केंद्रांना मोठे महत्त्व आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औद्योगिक जिल्ह्यांना कौशल्य विकासाचे केंद्रस्थान बनविण्याचा संकल्प केला असून या निर्णयामुळे त्या दिशेने ठोस पाऊल उचलले गेले आहे.

या केंद्रांमध्ये विद्यार्थी आणि उद्योगक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रोबोटिकी, वस्तूंचे इंटरनेट, आकडे विश्लेषण, विद्युत वाहन तंत्रज्ञान, स्वयंचलन आदी आधुनिक क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांतील ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्रे ही राज्याच्या औद्योगिक आणि कौशल्य विकासाच्या प्रवासातील एक ऐतिहासिक पायरी ठरतील. या माध्यमातून ‘कौशल्यसंपन्न महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने राज्याने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे.






18,059 वेळा पाहिलं