रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर परदेशी सीगल पक्ष्यांचे आगमन
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, राजापुर आणि गणपतीपुळे या समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात परदेशी सीगल पक्ष्यांचे थवे दिसू लागले आहेत. या सुंदर पांढऱ्या पक्ष्यांच्या गर्दीमुळे किनाऱ्यांचे दृश्य मंत्रमुग्ध करणारे झाले आहे. दरवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली की, हे पक्षी हजारो किलोमीटरचा लांब प्रवास करून कोकणात दाखल होतात.
सतत पडणाऱ्या पावसामुळे या वर्षी थंडी उशिरा जाणवली. परंतु या पक्ष्यांच्या मोठ्या झुंडी दिसू लागल्याने आता हवामानात गारवा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. कोकणातील नागरिक आणि पर्यटक या सुंदर दृश्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. समुद्राच्या लाटांवर तरंगणाऱ्या सीगल पक्ष्यांचे थवे आणि त्यांच्या किलबिलाटाने किनाऱ्यांवर जणू निसर्गाचा उत्सव सुरू झाल्याची अनुभूती मिळते आहे.
या सीगल पक्ष्यांचा प्रवास साधारण पाच ते सहा हजार किलोमीटरचा असतो. ते सायबेरिया, रशिया आणि उत्तर हिमालय प्रदेशातून भारतात येतात. या प्रवासादरम्यान कोकणाचा किनारा त्यांच्यासाठी सुरक्षित निवारा ठरतो. येथे त्यांना पुरेसा अन्नसाठा, समुद्री मासे आणि शांत वातावरण मिळते, म्हणूनच ते दरवर्षी या भागाला पसंती देतात.
हर्णे बंदर, कोलथरे आणि गणपतीपुळे किनाऱ्यांवर त्यांच्या उडण्याने आणि पाण्यात डुबकी मारण्याने एक वेगळे निसर्गचित्र तयार झाले आहे. अनेक फोटोग्राफर आणि पक्षीप्रेमी या क्षणांचे टिपण करण्यासाठी किनाऱ्यांकडे धाव घेत आहेत. या दृश्यांमुळे कोकणातील पर्यटनालाही नवसंजीवनी मिळत आहे.
पर्यावरणप्रेमींच्या मते, परदेशी पक्ष्यांचे नियमित आगमन हे कोकणाच्या सागरी परिसंस्थेच्या आरोग्याचे लक्षण आहे. जैवविविधतेचा हा समतोल टिकवण्यासाठी किनारी भागातील प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेप कमी ठेवणे गरजेचे असल्याचे तज्ञ सांगतात आहेत. या पक्ष्यांच्या आगमनाने थंडीचा हंगाम खऱ्या अर्थाने सुरू झाल्याची चाहूल आता कोकणभर लागली आहे.