पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच आशियाई बाल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
पिंपरी-चिंचवड शहरात यंदा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. आयएफएससी आशियाई किड्स स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन पिंपळे सौदागर येथील योगा पार्कमध्ये नव्याने उभारलेल्या अत्याधुनिक स्पोर्ट क्लायम्बिंग क्रीडा केंद्रामध्ये करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक 1 ते 4 नोव्हेंबरदरम्यान होणार असून पिंपरी-चिंचवड महापालिका, इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशन आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लायम्बिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत तेरा देशांतील सुमारे दोनशे खेळाडू सहभागी होणार आहेत. तेराव्या ते पंधराव्या वयोगटातील मुले आणि मुली या स्पर्धेत तीन प्रमुख प्रकारांमध्ये वेग चढाई, दोरी चढाई आणि खडक चढाई यात आपले कौशल्य आजमावतील. प्रत्येक प्रकारात खेळाडूंना वेग, संतुलन आणि मानसिक एकाग्रतेची परीक्षा द्यावी लागणार आहे.
स्पर्धेचे मूल्यांकन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित परीक्षकांकडून करण्यात येणार आहे. आयएमएफ आणि आयएफएससी या संस्थांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण स्पर्धा पार पडणार असून, प्रत्येक फेरीत तांत्रिक अचूकता, शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक धैर्य या निकषांवर खेळाडूंचे गुणांकन केले जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला उच्च दर्जाची मान्यता लाभणार आहे.
पिंपरी-चिंचवड सुसज्ज शहर उपक्रमा माध्यमातून उभारलेले हे क्लायम्बिंग क्रीडा केंद्र आधुनिक सुविधा, मजबूत सुरक्षा आणि प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सोयींनी सज्ज आहे. त्यामुळे देशभरातील तसेच आशियातील तरुण खेळाडूंना स्पर्धेचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळणार आहे. हा उपक्रम शहरातील क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या वतीने या स्पर्धेला सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, नागरिकांनी या अनोख्या क्रीडास्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी केले आहे. या स्पर्धेमुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर झळकणार असून, स्थानिक तरुणांना जागतिक स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.