सह्याद्री मराठी वाहिनी

Author: सह्याद्री मराठी वृत्त

  • आजारी व्यक्तीला सांभाळताना

    आजारी व्यक्तीला सांभाळताना

    तरुणपणी मनुष्याला कुणाची गरज लागत नाही, परंतु जीवनाच्या एका टप्प्यावर नाती आठवू लागतात. अलीकडे आजारांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, यात केवळ वैद्यकीय उपचार करून होत नाही, तर पूर्ण विश्रांती घ्यावी लागते. सेवा करणारी माणसे भोवताली असावी लागतात. काही वेळा मृत्यू समोर आल्याचे दिसत असते. दरम्यानचा काळ चांगला जाण्यासाठी जवळची माणसे भोवती असावी लागतात. या माणसांना त्या व्यक्तीची सेवा ही करावीच लागते. अपवाद वगळता अजूनही भारतात ही व्यवस्था चांगली आहे.

    घरात अंथरुणावर असलेली आजारी व्यक्ती असल्यास वैद्यकीय उपचाराबरोबरच त्यांच्या इतर गरजांनाही प्राधान्य द्यावे. उदा. कोणी आप्तेष्ट भेटायला आले असतील तर त्यांना भेटण्याची मोकळीक द्यावी. वैद्यकीय उपचारासाठी हा आनंद हिरावू घेऊ नये. आपण त्यांना वेळ देत नसू, पण इतर कोणी आप्तेष्ट, मित्रपरिवार देत असतील तर त्यांना रोखू नये. वैद्यकीय उपचार हे केवळ पूरक असतात. त्या व्यक्तीच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे काय आहे, याची दखल आधी घेतली पाहिजे.

    औषधांपेक्षासुद्धा जास्त महत्त्वाचे त्या व्यक्तीविषयी सहानुभूती आणि ममत्व असते. आपल्या आप्तेष्टांमध्ये अशी आजारी व्यक्ती असल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही ओल्या सहानुभूतीची गरज असते, हे लक्षात ठेवावे.
    आजारी व्यक्तीची वेळच्या वेळी स्वच्छता, त्यांना अन्न भरवणे, मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. घरात दुर्गंध पसरत असेल, तर तो टाळण्यासाठी धूप, उदबत्ती वगैरेचा उपयोग केला पाहिजे. अंथरुणावर दिवसरात्र पडून राहिल्याने व्यक्तीच्या शरीरावर जखमा होऊ शकतात. त्या वाढत जातात.

    म्हणून हवेच्या किंवा पाण्याच्या गादीवर व्यक्तीला झोपवावे. दर 15 ते 20 मिनिटांनी कूस बदलल्यास रक्तप्रवाह सुरळीत ठेवला जाऊ शकतो. यासाठी प्रशिक्षित परिचारिका नसली, तर स्वत: या गोष्टी शिकून घेता येतात. स्त्रियांनीच या गोष्टी केल्या पाहिजेत असे नाही, पुरुषही हे काम करू शकतात. आहारातील पदार्थ चावून खाणे शक्य नसेल, तर पातळ पदार्थ भरवून पहावे.
    आजारी व्यक्तीच्या आजूबाजूला आयुष्यभर सोबत असणारी त्याच्या जवळची माणसे असली की, त्या व्यक्तीचा अंतिम काळदेखील समाधानाने जातो.

  • पाणी प्या सुंदर बना

    पाणी प्या सुंदर बना

    आपण कधीही वृद्ध होऊ नये, कायम तरूण दिसावे असे प्रत्येकालाच वाटते. नेहमी तरूण, सुंदर दिसावे, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते, नाही का?अनेक अभिनेते, अभिनेत्री वयाची पन्नाशी उलटल्यानंतरही पंचविशीत असल्यासारखे दिसत असतात. यामागे त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायाम याची महत्वाची भूमिका असते.
    शरीरातील सर्व क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पाणी महत्वाचे आहे.

    सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्या. सकाळी १ ते २ ग्लास गरम पाणी प्यायल्याने आतडे स्वच्छ राहते. पोट साफ होण्यास मदत होते. याशिवाय आजारांचा धोका टळतो. त्वचा चमकदार राहते. थंड पाणी पिणे टाळा. उन्हाळा असो किंवा हिवाळा थंड पाणी पिऊ नका. थंड पाणी सतत प्यायल्याने मेंदू व हृदयाच्या नसांवरही परिणाम होतो. अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. जेवल्यानंतर पाणी पिऊ नका.

    आयुर्वेदीक तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर लगेचच थंड पाणी पिऊ नका. जेवल्यानंतर अन्न पचविण्यासाठी वेळ द्यावा लागतो. जर तुम्ही लगेचच पाणी प्यायलात तर जठराग्नी थंड पडतो. यामुळे अन्न पचण्याची क्रिया थंड होते. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी पिणे उत्तम ठरते.

    कायम तरूण दिसण्यासाठी आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने नव्हे तर पाण्याने करा. याचे कारण असे की पाण्यामुळे त्वचेच्या ऊतींची भरपाई होण्यास मदत होते. रोज बदाम आणि अक्रोड खा. यामध्ये असलेले ‘ई’ जीवनसत्व त्वचेचे पोषण करते.प्रथिनयुक्त अन्न जेवा. ते खराब झालेल्या ऊतींना बरे करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते. नियमित प्राणायाम- योगासने करा.

  • अ जीवनसत्वाचे महत्त्व

    अ जीवनसत्वाचे महत्त्व

    ‘अ’ जीवनसत्व शरीरासाठी फार आवश्यक आहे. ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांची दृष्टी कमी होते. रातांधळेपणा होतो. हा अभाव जर खूपच असेल, तर त्यामुळे कायमचे अंधत्वही येऊ शकते.
    ‘अ’ जीवनसत्वाची कमतरता असलेल्या मुलांमध्ये अंधत्व एकदम येत नाही. निदान लवकर झाल्यास ‘अ’ जीवनसत्वाने समृध्द असा आहार देऊनही समस्या दूर करता येते. भारतात ‘अ’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे दरवर्षी 30,000 मुलांची दृष्टी जाते. 1 ते 5 वर्षे वयाच्या मुलांमध्ये ही कमतरता अधिक असल्याचे दिसून येते.

    यामुळे रातांधळेपणासुद्धा येतो. मुलांना कमी उजेड असताना किंवा अंधारात काही दिसत नाही. ही लक्षणे दिसल्यानंतर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीच उपचार न केल्यास ही स्थिती कायमच्या अंधत्वात रुपांतरित होऊ शकते.

    यासाठी ‘अ’ जीवनसत्व भरपूर असलेले अन्न सेवन करावे. दूध, अंडी, मासे, तेल यात ‘अ’ जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. पालेभाज्या, हिरव्या भाज्या, गाजर, पपई, आंबा ही फळे ‘अ’ जीवनसत्वाने समृध्द असतात.

    कुपोषणामुळे मुले खूपच अशक्त असतात. प्रारंभिक टप्प्यात मुलांना अतिसार होतो. त्यांची त्वचा कोरडी होते. उष्मांक, जीवनसत्व आणि प्रथिने यांनी समृद्ध असलेला पोषक आहार मुलांना पुरेशा प्रमाणात दिला पाहिजे. गर्भवती महिलांनी ‘अ’ जीवनसत्व असलेले पोषक अन्न घ्यावे. त्यामुळे गर्भाला आईकडून ते मिळण्यात मदत होते. वाढीच्या वयातील मुलांना पोषक आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.

  • कांदा भजी

    कांदा भजी

    साहित्य : १ वाटी बेसन, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी लांब चिरलेला कांदा, 2 लहान चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा मिरची पावडर, अर्धा लहान चमचा धणे-जिरेपूड, पाव लहान चमचा हळद, पाव लहान चमचा हिंग, तेल.

    कृती : कांदे उभे चिरून घ्यावेत. आता त्यात तांदळाचे पीठ, बेसन आणि मीठ घालून मिसळून घ्यावे. त्यावर एक झाकण ठेवून 30 मिनिटे झाकून ठेवावेत. असे केल्याने कांद्याने सोडलेले पाणी बेसन आणि तांदळाच्या पिठात शोषले जाते. आता बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि सर्व मसाले घालून मिसळून घ्यावे. जर ते खूप कोरडे वाटत असेल, तर 2-3 चमचे पाणी घालावे. पीठ तयार आहे. तेल गरम करत ठेवावे. नंतर त्यात थोडे-थोडे मिश्रण घालून भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावी. आता कांदा भजी तयार आहे. ती गरमागरम चहासोबत खाण्यास द्यावीत.

  • खोके निर्मिती उद्योग

    खोके निर्मिती उद्योग

    कोणत्याही उत्पादनाचे वितरण आणि वाहतूक करताना व्यापारी आणि उत्पादकांना छोट्या-मोठ्या खोक्यांची सर्वात जास्त गरज असते. ‘कोरुगेटेड’ पेट्या वजनाने खूप हलक्या आणि लाकडी खोक्यांपेक्षा स्वस्त असतात. टिकाऊ आणि कमी किंमतीमुळे खोक्यांना व्यापारी आणि उत्पादक प्राधान्य देतात. खोके लाकडाच्या लगद्यापासून तयार केले जातात, परंतु यामध्ये 20 ते 25 टक्के लाकडाचा वापर केला जातो. हा एक मोठा उद्योग आहे. त्यासाठी भांडवल गोळा करून, अभ्यास करून, देखरेख केल्यानंतर आर्थिक नियोजनाने प्रकल्प सुरू करता येईल. यासाठी तज्ज्ञांची मदत आणि सल्ला घेणे योग्य ठरेल. पुस्तकात किंवा संकेतस्थळावर वाचून एवढा मोठा प्रकल्प सुरू करणे शक्य नाही.

    तयार पत्र्यांचे गठ्ठे आणून हे खोके बांधण्याचा उद्योग सुरू केला तर तो लघुउद्योग होऊ शकतो. ‘कोरुगेटेड बॉक्स कंपनी’ उत्पादकांकडून वेष्टनाचे तयार पत्रे खरेदी करेल. ग्राहकांच्या मागणीनुसार योग्य आकाराच्या खोक्यांची निर्मिती करून हे काम करेल. बंडल तयार करताना बंडलचे तयार पत्रे घेऊन क्रिझिंग मशीनच्या सहाय्याने खोक्याच्या आकाराचे तुकडे तयार करावेत. खोके तयार करताना तुम्हाला कुठे फोल्ड करायचे आहे ते चिन्हांकित करावे.

    आकारानुसार कापलेले तुकडे फोल्ड करून खोके तयार करावेत. प्रत्येक व्यापारी, कंपनी, कारखानदार, लहान-मोठे दुकानदार, लघुउद्योजक यांना त्यांचा माल वेष्टनबंद करण्यासाठी खोक्यांची गरज असते. हे खोके वजनाने हलके असतात, दिसायला सुंदर असतात आणि ते जलरोधक देखील असू शकतात. या पेट्यांना स्ट्रॅपिंगची आवश्यकता नसते. उत्पादक खोक्यावर त्याच्या मालाच्या उत्पादनाची जाहिरात करू शकतो. हे खोके वाहतुकीसाठी सोयीचे असून उत्पादनांना सुरक्षितता देखील देतात. कमी जागेत अधिक सामग्री ठेवू शकतात.

    ज्या उद्योजकांना कमी भांडवलात खोके बांधण्याचा उद्योग करायचा आहे आणि मोठा व्यवसाय करायचा आहे, त्यांनी ‘कॉसरोटेड बॉक्स’ निर्मिती प्रकल्पाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व प्रकारचे उद्योगपती, उत्पादक, व्यापारी, विक्रेते ते वापरू शकता. ‘कोरुगेटेड बॉक्स’ ला चांगली मागणी आहे. जवळची औद्योगिक वसाहत, तेथील कंपन्या, कारखाना, उत्पादकांना भेटावे. त्यांना खोक्यांचे नमुने दाखवावे. त्यांना हवा तसा खोका तयार करून द्यावा.

    यासोबतच विक्री प्रतिनिधी, चहाचे व्यापारी, स्वीट मार्ट, कापड व्यापारी, इलेक्ट्रिक उपकरणे, नाजूक काचेच्या वस्तू, तंबाखू उत्पादने, खेळणी, दुग्धजन्य पदार्थ, औषधे, खाद्यपदार्थ, बिस्किटे, माचिस, अन्न-प्रक्रिया उद्योग यांच्यासाठीही खोके बनवू शकता. जर मालाचा दर्जा चांगला असेल तर तुम्हाला सर्व चांगली मागणी मिळत जाईल. क्रिझिंग मशीन, स्टिचिंग मशीन, कोरुगेटेड मशीन, स्लिटिंग मशीन, बोर्ड कटर मशीन, शीट प्रेसिंग मशीन, बॉक्स स्टिचिंग मशीन, इलेक्ट्रिक मोटर इ. यंत्रसामग्री यासाठी आवश्यक असते.

  • पाणीपुरी व्यवसाय

    पाणीपुरी व्यवसाय

    प्रत्येकाला पाणीपुरी खायला आवडते. त्यामुळे पाणीपुरी व्यवसाय प्रत्येक ठिकाणी चालतो. सध्या संपूर्ण देशात असे एकही ठिकाण नाही जिथे पाणीपुरी बनविण्याचा व्यवसाय होत नाही. विशेषतः उत्तर भारतातील लोक मोठ्या चवीने खातात. ‘गोलगप्पा’, ‘फुचका’, ‘फुलकी’ इत्यादी नावांनी पाणीपुरी संबोधली जाते. या मसालेदार पदार्थाचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरीचा व्यवसाय कमीत कमी भांडवलात सुरू करता येतो. विशेष नफा मिळवता येतो. जर तुम्हाला स्टॉल लावायचा नसेल आणि फक्त पाणीपुरीचे घाऊक विक्रेते म्हणून काम करायचे असेल तर तुम्ही या प्रणालीमध्येही सहज व्यवसाय करू शकता. येथे या व्यवसायाशी संबंधित काही खास गोष्टी सांगितल्या जात आहेत.

    पाणीपुरी बनवण्यासाठी फारसा कच्चा माल लागत नाही. यासाठी साधारणपणे मैदा, रवा आणि पाणी लागते. पाणीपुरी बनवण्यासाठी दोन यंत्रे आहेत. या दोन यंत्रांपैकी एक मशीन मैदा मिसळण्याचे काम करते. दुसरे यंत्र पाणीपुरी बनवण्याचे काम करते. यासाठी आणखी एक यंत्र आहे, ते म्हणजे पाणीपुरी बनविण्याचे यंत्र होय. मैदा मिसळणाऱ्या यंत्राची किंमत 27,000 रुपये आणि पाणीपुरी बनविणाऱ्या यंत्राची किंमत 55,000 रुपये आहे. कच्चा माल कोणत्याही किराणा दुकानातून सहज उपलब्ध होतो. तुम्हाला हे साहित्य ऑनलाईनही मिळू शकते. यासोबतच ही यंत्रेसुघ्दा ऑनलाइन मिळू शकतात. सर्वप्रथम तुमच्या गरजेनुसार मैदा आणि रव्याचे मिश्रण यंत्रामध्ये ठेवा. यानंतर, यंत्र चालू करा आणि आवश्यकतेनुसार त्यात थोडे पाणी घाला.

    तुम्ही ठेवलेले पीठ हळूहळू घट्ट मळून घ्या. यानंतर हे मळलेले पीठ पाणीपुरी बनवण्याच्या यंत्रामध्ये ठेवा. या यंत्राद्वारे पाणीपुरीच्या पुऱ्या पूर्णतः गोल आकारात बाहेर येतात. या गोल पुऱ्या नंतर तळल्या जातात. लक्षात ठेवा की तळताना पुऱ्या तुटू नयेत, कारण या पुऱ्या खूप कडक असतात. अशा प्रकारे या पुऱ्या तयार केल्या जातात.

    प्रति किलो रव्याच्या पाणीपुरीची संख्या सुमारे 100 ते 110 आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाणीपुरीच्या 4000 पुऱ्या तयार करायच्या असतील, तर त्या बनविण्यासाठी एकूण 38 किलो रवा लागेल. या व्यवसायात तेलाची किंमत, रव्याची किंमत, विजेचा वापर इत्यादी सर्व गोष्टी जोडल्या तर एकूण खर्च 2,500 रुपये येतो. या यंत्राच्या मदतीने तुम्ही एका तासात एकूण 4000 पाणीपुऱ्या बनवू शकता. तासाला 4000 पाणीपुऱ्या बनवून एकूण 800 रुपयांचा नफा या व्यवसायात मिळवता येतो. अशा प्रकारे, कमी मेहनत आणि कमी खर्चाचा वापर करून या व्यवसायात दिवसाचे 8 तास काम करून सुमारे 6,000 रुपये कमावता येतात.

  • गवती चहा

    गवती चहा

    गवती चहा ही मुख्यतः युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका खंडातील उष्णकटिबंधीय तृणवर्णीय वनस्पती आहे. भारतात केरळ, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये गवती चहाचे पीक घेतले जाते. गवती चहा बारमाही प्रकारातील एक आरोग्यदायी गवत आहे. हलक्या ते भारी जमिनीत हे पीक घेतले जाते. पाणी साचून जमिनीचा निचरा होत नसेल अशा जमिनीत हे पीक घेऊ नये. या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी काळी रेताड जमीन योग्य ठरते. या पिकास उबदार आणि उष्ण हवामान मानवते. समप्रमाणात पडणारा पाऊस व भरपूर सूर्यप्रकाश या पिकास पोषक असा ठरतो.

    गवती चहाची एकदा लागवड केल्यानंतर हे पीक ४ ते ५ वर्षापर्यंत जमिनीत राहते. लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी. जमीन चांगली नांगरून भुसभूशीत करून घ्यावी. शेवटच्या नांगरणीवेळी जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. पाण्याची उपलब्धता असल्यास गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. गवती चहाची लागवड बिया किंवा गवती चहाच्या आलेल्या नवीन फुटव्यापासून करता येते. एका वर्षानंतर गवती चहास अनेक फुटवे येतात. सीकेपी -२५, ओडी-१९, ओडी-२३, ओडी-४४०, ओडी-२५, आरआरएल- १६,प्रगती,कावेरी, कृष्णा आणि निमाया या गवती चहाच्या काही जाती आहेत.

    उन्हाळ्यात पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. जमिनीत पाणी टिकून राहिल्यास पिकांवर अनिष्ट असा परिणाम होतो. पहिली कापणी लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांनी करावी. नंतर सर्व कापण्या २ ते ३ महिन्यांनी फुलोऱ्याआधी कराव्यात. गवती चहाच्या पिकाची कापणी धारदार विळ्याच्या साहाय्याने करतात.

    पहिल्या कापणीत प्रति एकर उत्पादन कमी मिळते. दुसऱ्या कापणीपासून मात्र उत्पादनात वाढ होते. पहिल्या वर्षी प्रति एकर ७ ते ८ टन आणि दुसऱ्या वर्षी १० ते १२ टन उत्पादन मिळते. तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी १५ ते १८ टनपर्यंत उत्पादन मिळते. नंतरच्या काळात उत्पादन कमी-कमी होत जाते.

  • रेडीचा स्वयंभू द्विभूज श्री गणेश

    रेडीचा स्वयंभू द्विभूज श्री गणेश

    सिंधुदुर्ग हा तळकोकणातील एक निसर्गसंपन्न जिल्हा आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची समृद्धी या जिल्ह्यास लाभली आहे. जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात रेडी हे असेच लोकप्रिय गाव आहे. लोहखनिजांच्या खाणींनी संपन्न असलेल्या या गावाचा लौकिक येथील स्वयंभू द्विभूज श्री गणेश मंदिरामुळे वाढला आहे. रेडीच्या या देवस्थानातील श्री गणेशमूर्ती स्वयंभू आणि द्विभुज आहे. देशभरात अगदी मोजक्याच ठिकाणी द्विभुज गणेशाच्या मूर्ती आढळतात. म्हणूनच रेडी येथील गणेश मंदिराचे महत्त्व अधिक आहे.

    या मंदिराशेजारी अरबी समुद्राचा अथांग विस्तीर्ण किनारा, उंच नारळाची झाडे असे निसर्गरम्य चित्र आहे. हे शांत वातावरण भाविकांसह पर्यटकांचा ठाव घेणारे आहेत. महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील लाखो भक्तांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या द्विभुज गणेशाचा इतिहास ५० वर्षापूर्वीचा आहे.

    सन १९७३ मध्ये १८ एप्रिलला रेडी येथील लोहखनिजाच्या खाणीवर ट्रकचालक म्हणून कामाला असणारे सदानंद कांबळी रात्री काम संपवून ट्रक लावला. थोड्या वेळाने ट्रक नेहमीच्या जागी लावून ते घरी जाण्याच्या विचारात होते; पण ट्रक काही केल्या सुरू होईना. खूप वेळ प्रयत्न करूनही यश येत नव्हते. मग ते ट्रकमधेच झोपी गेले. रात्री त्यांना एक स्वप्न पडले. ‘मी इथे आहे, मला बाहेर काढ,’ असा दृष्टांत स्वप्नात गणपतीने दिला. सदानंदना जाग आली, तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. गावात जाऊन माहिती देण्यासाठी ते उठले. रात्रभर अनेकदा प्रयत्न करूनही सुरू न झालेला ट्रक क्षणार्धात सुरू झाला.

    दुसऱ्या दिवशी गावात त्यांनी हा सारा प्रकार सांगितला. ग्रामदेवता श्री माऊलीचा कौल घेण्यात आला. स्वप्नात संकेत मिळालेल्या जागी खोदकाम सुरू झाले. आठ फूट खोल खणल्यावर १ मे १९७६ ला संपूर्ण मूर्ती दिसू लागली. ती स्वयंभू अन द्विभुज होती. नंतर या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रेडी येथील गणेश मंदिरातील ही मूर्ती जांभ्या दगडात कोरलेली आहे. मूर्तीच्या बाहेर मकराकृती कोरीवकाम केले आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. मूर्तीला दोन हात असून एका हातात मोदक आहे. दुसरा हात आशीर्वाद देतो. मूर्तीच्या समोर मोठा उंदीर आहे. हा उंदीरही गणेश मूर्ती मिळाल्यानंतर सव्वा महिन्याने तिथूनच अर्ध्या किलोमीटरवर सापडल्याचे सांगतात.
    सावंतवाडी, वेंगुर्ल्याच्या साप्ताहिकांनी, दैनिकांनी दखल घेतली. पुढे महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा येथे हे वृत्त पसरले. रेडी येथील गणेश मंदिराच्या स्थापनेनंतर गणेश जयंती, वर्धापन दिन, संकष्टी, अंगारकी असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. प्रत्येक संकष्टीला हजारोंच्या संख्येने तिथे भाविक येतात. अंगारकीला ही संख्या हजारोंच्या घरात असते. पर्यटनस्थळ म्हणून हे नावारुपास आलेले ठिकाण आहे.

  • आवास समुद्रकिनारा

    आवास समुद्रकिनारा

    अलिबागमधील आवास समुद्रकिनारा हा सर्वात कमी गर्दीचा आहे. येथे संपूर्ण शांतता आणि निर्मळता अनुभवता येते. शहरी जीवनातील त्रासापासून हा किनारा दूर आहे. जर तुम्ही गर्दीत जाणे टाळत असाल तर हे एक अप्रतिम ठिकाण आहे.

    येथे मनसोक्त फिरू शकता. सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. आवास समुद्रकिनारा अजूनही फारसा प्रसिध्दीस पावलेला नाही. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करू शकतील अशा गोष्टी येथे नाहीत. या वालुकामय समुद्रकिनाऱ्यावर एकांतात दर्जेदार वेळ घालवणे हे पर्यटकांना आकर्षित करण्यासारखेच आहे. तुम्ही येथे आराम करू शकता आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता. आवास किनारा हा किहिम किनाऱ्याजवळ आहे. कनकेश्वर देवस्थान मंदिर हे येथून जवळचे एक आकर्षण आहे. हे जुने शिवमंदिर डोंगराच्या माथ्यावर आहे. चढाई काहींसाठी दमछाक करणारी असली तरी, तेथे पासेहोचल्यावर तुम्ही सगळा शीण विसरुन जाल.

    अलिबाग शहरातून तुम्हाला आवास किनाऱ्यावर जाण्यासाठी वाहने असतात. पुणे आणि मुंबई ही अलिबागच्या जवळची 2 प्रमुख शहरे आहेत.

  • मल्हारगड (सोनोरी)

    मल्हारगड (सोनोरी)

    महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून ‘मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. पुण्याहून सासवडला जातांना लागणार्‍या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इ. स १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते.

    ‘मल्हारगड’ हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धा – पाऊण तास पुरतो. किल्ल्याची तटबंदी, बुरूज यांची काही ठिकाणी पडझड झाली असली, तरी बर्‍याच ठिकाणी ती शाबूत आहे. याशिवाय सोनोरी गावात असलेली पानसे यांची गढी, श्री लक्ष्मी – नारायणाचे मंदिर, श्री मुरलीधराचे मंदिर ही पाहण्यासारखी मंदिरे आहेत. ही सर्व ठिकाणे मुंबई – पुण्याहून एका दिवसात पाहून होतात.

    मल्हारगडावर आपल्याला प्रामुख्याने २ वाटांनी जाता येते. सासवड आणि झेंडे वाडीतून असे दोन मार्ग आहेत. सासवडपासून ६ किमी वर ‘सोनोरी’ हे गाव आहे. या गावाला एसटीने जाण्याची सोय आहे. सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो. सोनोरी गावातून कच्च्या रस्त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात. वाहनाने पायथ्यापर्यंत जाता येते.

    पुण्याहून सासवडला जाताना दिवे घाट संपल्यावर ‘झेंडेवाडी’ गावाचा फाटा लागतो. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगर रांगांमध्ये दिसणार्‍या खिंडीत जावे लागते. या खिंडीत पोहोचल्यावरच मल्हारगडाचे आपल्याला होते. तटबंदींनी सजलेल्या मल्हारगडावर जायला आपल्याला पुन्हा डोंगर उतरावा लागत नाही. खिंडपार करून किल्ल्यावर जाण्यास साधारणपणे दीड तास लागतो.
    गडावर राहण्याची, जेवणाची, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने येथे मुक्कामास राहू नये.

  • पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

    पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

    महाराष्ट्रातील पुणे शहरात कात्रज येथे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आहे. पुणे महानगरपालिकेने पर्वती पायथ्याजवळ सन १९५३ मध्ये ‘पेशवे पार्क’ची स्थापना केली. येथे पूर्वी पेशव्यांचे स्वत:चे प्राणिसंग्रहालय होते. अवघ्या ७ एकर जागेत बंदिस्त पिंजऱ्यांमध्ये पर्यटकांना प्राणी पाहता येत असत. केवळ लोकांचे मनोरंजन हा याचा एकमात्र उद्देश होता.
    सन १९९२ मध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची स्थापना झाली. त्यानंतर प्राणिसंग्रहालयांची स्थिती पूर्णपणे बदलून शास्त्रीय पद्धतीने वन्य प्राणी संवर्धन होऊ लागले. सन १९९६ मध्ये कात्रज येथील १३० एकर जागेत प्राणी प्रजोत्पादन, वन्यजीव संवर्धन, शिक्षण व संशोधन करण्यासाठी नवीन प्राणिसंग्रहालयाचा विकास करण्यात आला. त्यानंतर ‘राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र’ असे नामकरण करून नवीन प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. सुरूवातीला येथे हरीण, माकड, अस्वल, वाघ, हत्ती इत्यादीसाठी नैसर्गिक आभासाचे निवारे बांधण्यात आले.


    येथे प्राण्यांवर उपचार करण्यासाठी विविध साधनांनी युक्त असे हॉस्पिटल आहे. प्राण्यांवर प्रतिबंधात्मक उपचारही केले जातात. या प्राणीसंग्रहालयास दरवर्षी १८ लाखांपेक्षा अधिक लोक भेट देतात. पर्यटकांच्या सोयीसाठी बसण्याकरिता सावली, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, सूचना फलक, व्हीलचेअर इ. गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्राणिसंग्रहालयाच्या आवारात फिरण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटक आणि विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरिता मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

    सन १९८६ साली स्थापन करण्यात आलेले जुने सर्पोद्यान देखील या नवीन प्राणिसंग्रहालयात समाविष्ट करण्यात आले. इ.स. १९८६ मध्ये नीलम कुमार खैरे यांनी ते वसवले. ते सर्पोद्यानाचे पहिले संचालक होते. सर्व जातींचे सर्प, सरपटणारे प्राणी आणि प्राणिजगतातील अनेक जीवांना येथे संरक्षण देऊन त्यांचे संवर्धन केले जाते. सापासारख्या प्राणघातक समजल्या जाणाऱ्या प्राण्यांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण त्यांचे प्रबोधन करण्यासाठी ही संस्था अनेक कार्यक्रम आयोजित करते.

    काही माशांच्या प्रजाती आणि माशांची शिकार करून राहणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात. तसेच इतर पक्ष्यांमध्ये गरुड, ससाणा, घार, जंगली कोंबडी पहायला मिळतात. शिकारी प्राण्यांमध्ये सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे आहेत. चौशिंगा, चितळ, हरिण, ठिपके असलेले हरिण, अस्वल, नीलगाय, आशियाई हत्ती, गवा, चिंकारा असे प्राणी बघायला मिळतात. विविध विषारी, बिनविषारी सरपटणारे प्राणी, पक्षी आणि अनेक जंगली प्राणी येथे पहायला मिळतात. तेथे बसने किंवा खासगी वाहनाने जाता येते. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत भेट देऊ शकता.

  • मुलांपासून दूर जाऊ नका

    मुलांपासून दूर जाऊ नका

    आपल्या मुलांशी सख्य जोडण्यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत. आपल्या मुलासाठी काही वेळ राखून ठेवा. त्यांना वेळ द्या. ती निश्चितच आनंदी होतील आणि तुम्हालाही आनंद,समाधान मिळेल.
    मुलांसोबत खेळण्याची सवय करून घ्या. मोकळ्या वेळातील आराम सोडून त्यावेळी मुलांसोबत खेळा. मुलांना काय खेळायचे आहे ते विचारा. हे नियमितपणे केले पाहिजे. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करा.

    सकाळी उठल्यावर मुलांना जवळ घ्या. तो किंवा ती तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे सहजपणे बोलून जा. रात्री झोपण्यापूर्वी मुलांशी 10 मिनिटे बोला. तिला किंवा त्याला त्यांच्या दिवसाबद्दल विचारा. त्यांचेही एक विश्व आहे, हे लक्षात असू द्या. आजच्या काळात त्याला काय आवडते आणि काय नाही हे त्याच्याकडून जाणून घ्या. आपल्या मुलांसोबत आपण एक मूल व्हा. धावा, विनोद सांगा, मजेदार गाणी गा, गोष्ट सांगा आणि मोठ्याने हसा. यामुळे तुमचाही उत्साह वाढेल आणि तुम्ही मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवाल.

    दिवसातून किमान 3 वेळा मुलांच्या चांगल्या कृत्यांची स्तुती करा. परंतु ही स्तुती अनावश्यक नसावी. त्याला सकारात्मक प्रतिक्रिया देत रहा.तुमच्या मुलांसोबत संगीत ऐका किंवा गाणी गा.दिवसातून किमान 10 मिनिटे तुमच्या मुलांसोबत बाहेर जा. खरेदी करा.जेवताना मुलांजवळ बसा. तुमच्या मुलांना पुस्तके द्या. त्यांच्यासोबत तुम्ही देखील वाचा. आपल्या जवळ बसवा. मिठीत घ्या.

    आपल्या मांडीवर बसवून कथा आणि कविता वाचून दाखवा. तुमच्या मुलांना घरातील छोट्या छोट्या कामांबद्दल शिकवा. हे केवळ तुम्हाला मदत करेल असे नाही, तर जबाबदारीची जाणीव देखील देईल. मुलांच्या चुकांना कधीही पोटात ठेऊन फाजील लाड करू नका. त्यांना वेळीच चूक समजून सांगा. फक्त त्याच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.

  • केसांसाठी उपयुक्त मेथीदाणे

    केसांसाठी उपयुक्त मेथीदाणे

    मेथीदाण्यात फॉलिक अ‍ॅसिड, जीवनसत्व ए, सी आणि के यासारख्या पोषकतत्वांचा समावेश असून केसांची वाढ आणि केसांशी संबंधित समस्यांवर ती गुणकारी ठरतात. मेथीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण अधिक असते. जे शरीराला आतून आणि केसांना बाहेरून पोषण प्रदान करतात.

    केसांच्या समस्यांमधून सुटका मिळण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा हे प्रत्येकाला माहीत नसते. केस गळती होत असेल तर मेथी दाण्याचे फायदे होतात. २ चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्यानंतर भिजलेले मेथी दाणे त्याच पाण्याचा वापर करून मिक्सरमधून वाटून बारीक करून घ्यावे. हे वाटण केसांना लावावे. साधारण २० मिनिटे तसेच ठेवून त्यानंतर शाम्पूने धुवावेत. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून २ वेळा याचा वापर करावा.

    कोंड्यासाठी मेथी दाण्याचा अधिक चांगला वापर करता येऊ शकतो. याकरिता दोन चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी बारीक करून घ्यावेत. त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा. हे मिश्रण केसांना लावावे आणि ३० मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर केस शाम्पूने धुवावेत. असे केल्याने कोंडा लवकर निघून जाईल.
    केसांना मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठीही मेथी दाण्याचा उपयोग करता येतो. तसेच यामुळे केसगळतीही थांबते.

    केसांचे आरोग्य सांभाळण्यासाठी एक चमचा मेथीचे वाटण आणि १ चमचा नारळाचे दूध मिसळून घ्यावे. हे मिश्रण केसांना मुळापासून लावावे. मिश्रण लावताना बोटांचा वापर करावा.२० मिनिटे तसेच ठेवून मग थंड पाणी आणि शाम्पूने धुवावेत. मेथीतील लोह रक्तप्रवाह चांगला ठेवते आणि केसांची वाढ होण्यास तसेच केस अधिक सुंदर आणि मजबूत होण्यास मदत करते. केसांच्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी आहारामध्येही याचा समावेश करू शकता. मेथी दाण्याचे पाणी पिणेही सोयीस्कर ठरते. हे उपचार वैद्यकीय सल्ल्याने करणे योग्य आहे.

  • डाएटिंग करा पण विचारानेच

    डाएटिंग करा पण विचारानेच

    बदललेली जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे लोकांमध्ये वजनवाढीची समस्या दिसून येत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक डाएटिंग करू लागले आहेत. डाएटिंगचे शरीरावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. डाएटिंगमुळे शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचते.

    व्यक्ती पुरेसे अन्न खात नाही, उपाशी राहते त्यावेळेस शरीराला ऊर्जा मिळत नाही. थकवा येतो. अशक्तपणा जाणवू लागतो. बहुतांश लोकांच्या स्वभावात चिडचिडेपणा येतो. रक्तातील साखरेची पातळीही कमी होते. स्नायूंमध्ये सैलपणा येऊन शरीराचा आकार बिघडू शकतो. पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. पचनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. अनेकदा उलट परिणाम दिसू लागतो. व्यक्तीचे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते.

    त्यामुळे डाएटिंग करताना वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करावे. शरीरास पोषक असणारे कोणते पदार्थ आहारात घ्यावेत, हे विचारून त्याप्रमाणे आहार ठेवावा. योगासने करावीत. प्राणायाम करावा. सकाळ-संध्याकाळी मोकळ्या हवेत चालण्यास जावे. शरीराची हालचाल ठेवावी.

  • ओलन

    ओलन

    हा केरळचा प्रसिद्ध पदार्थ आहे.
    साहित्य : कोहळा – 1 मध्यम (याला केरळमध्ये ‘कुंबलंग’ म्हणतात.), भोपळ्याचे तुकडे – 1 कप, हिरव्या मिरच्या (अर्ध्या कापलेल्या) – 6, नारळाचे दूध – 1 कप, लाल चवळी – शिजवलेली पाव कप (याला केरळमध्ये ‘वान पायर’ म्हणतात.), वालाचे दाणे आवडीनुसार, कढीपत्ता, मीठ, खोबरेल तेल – 3 चमचे.

    कृती
    कढईत शिजवलेली लाल चवळी घ्या. त्यात कोहळा आणि भोपळ्याचे चौकोनी तुकडे घाला. यात वालाचे दाणे आणि हिरव्या मिरच्या घाला. थोडे ढवळून त्यात थोडे पाणी घाला. भांडे झाकून पाच मिनिटांपर्यंत शिजू द्या. झाकण काढा. हळुवार ढवळा. आता मीठ आणि कढीपत्ता घाला. थोडे ढवळा. यात नारळाचे दूध घालून चांगले मिसळा. थोडे तेल घाला. पुन्हा ढवळा. आस्वाद घेण्यासाठी ‘ओलन’ तयार आहे.

  • देवगडमधील श्री देव रामेश्वर मंदिर

    देवगडमधील श्री देव रामेश्वर मंदिर

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला एक तालुका आहे. अत्यंत निसर्गरम्य असा हा भाग पर्यटकांच्या मनात भरणारा असाच आहे. तालुक्यातील ‘वेळगिवे’ या गावात श्री देव रामेश्वर मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. कुणकेश्वर मंदिरासारखेच लेणे असलेले श्री रामेश्वर देव मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. हे मंदिर फार सुंदर व आकर्षक आहे. श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला येथे भाविकांची गर्दी असते. प्राचीन कलाकृतीचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर आजही उत्तम स्थितीत आहे. येथील लोकांचे ते श्रध्दास्थान आहे.
    खरे पाहता ‘वाघिवरे’ व ‘वेळगिवे’ या गावांच्या सीमेवरील जांभ्या दगडात हे रेखीव मंदिर खोदले आहे.

    सद्यस्थितीत मंदिराचा कळस सिमेंट लावून रंगवला असल्याने हे देऊळ पटकन लक्षात येते. खिंडीतील पायऱ्या उतरून या मंदिराकडे जावे लागते. या मंदिराला फारशी उंची नाही. जांभ्या दगडात खोदलेल्या या मंदिरात छोटासा सभामंडप आहे. दोन्ही बाजूंना खोल्या व श्री देव रामेश्वरचा गाभारा अशा प्रकारचे हे मंदिर आहे. मंदिराच्या आत नेहमीच थंडावा असतो. बाहेर कितीही उष्मा असला तरीही मंदिरात मात्र थंडावा जाणवतो, हे खास वैशिष्ट्य आहे. थंडावा असल्यामुळे मंदिरात वटवाघळे आढळतात. या मंदिराजवळ आलोबाचे जागृत देवस्थान आहे.

    मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे या गावापासून अवघ्या 8 कि. मी. अंतरावर ‘वेळविले’ हे गाव आहे. अतिशय निसर्गसंपन्न असल्याने हे गाव फार सुंदर आहे. तेथे जाण्यासाठी चांगला रस्ता आहे. हे मंदिर पांडवकालीन असून एका खडकात कोरलेले आहे. या मंदिराला मोठे सहा दगडी खांब आहेत. आतील भागात शिवलिंग आहे. या मंदिराची रचना भुयारी स्वरूपाची आहे. या गावातील ग्रामस्थांच्या म्हणण्यानूसार, हे एक पांडवकालीन लेणे आहे. पांडव अज्ञातवासात असताना त्यांना या मंदिराचे काम एका रात्रीत पूर्ण करावयाचे होते; मात्र काम करीत असतानाच पहाट झाल्यामुळे मंदिराचे उर्वरित काम अर्धवट सोडून पांडव तेथून निघून गेले. देवगड हे तालुक्याचे गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर विसावलेले आहे.

    देवगडमध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. हे एक छोटे बंदर आहे. येथील देवगड किल्ल्यावर सन १९१५ साली बांधलेले एक दीपगृह आहे. देवगड तालुक्यातील दुसरा किल्ला विजयदुर्ग अर्थात घेरिया हा शिलाहार राजघराण्यातील राजा भोज द्वितीय याने बांधला. त्यानंतर आदिलशाह, शिवाजी महाराज यांनी त्यावर राज्य केले. ब्रिटिश राज्यकर्त या किल्ल्याला त्याच्या अभेद्यपणासाठी ‘पूर्वेकडचे जिब्राल्टर’ असे म्हणत. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले हे गाव देवगडमध्ये पाहता येईल. सागरकिनारा, निसर्गसंपन्नता याशिवाय अन्य कित्येक ठिकाणे पर्यटकांना देवगडमध्ये पाहता येतील.

    देवगडला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कणकवली हे आहे. कणकवली येथून देवगडला जाण्यासाठी ऑटो-रिक्षा किंवा राज्य परिवहन बसगाड्या मिळू शकतात.विमानाने जायचे असल्यास सिंधुदुर्गातील चिपी व गोव्यातील मोपा ही जवळची विमानतळे आहेत.

  • खवणे सागरकिनारा

    खवणे सागरकिनारा

    महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरापासून जवळ खवणे समुद्रकिनारा हा एक स्वच्छ, निळाशार समुद्रकिनारा आहे. हा किनारा डोंगराळ प्रदेशाने वेढलेला आहे. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा आणि नारळाच्या झाडांचा सुंदर मिलाफ हे या किनाऱ्याचे खास आकर्षण आहे. हा समुद्रकिनारा मात्र अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे. ज्यांना मनासाठी एकांत आणि विश्रांतीची गरज आहे, अशांसाठी हे ठिकाण अशा लोकांसाठी सर्वोत्तम आहे.

    येथे जायचे झाल्यास सर्वात जवळचे विमानतळ सिंधुदुर्गातील चिपी, गोव्यातील मोपा ही आहेत. सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कुडाळ आहे. अमाप निसर्गरम्यता लाभलेले, वर्दळहीन असलेले हे ठिकाण म्हणजे मनास शांती देणारे उत्तम ठिकाण आहे. मात्र येथे वर्दळ कमी असल्याने येथे जाताना आपणास हवे अलेले कोरडे खाद्यपदार्थ आपण सोबत नेलेले केव्हाही चांगले !

  • आंबोलीतील नारायणगड

    आंबोलीतील नारायणगड

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. आंबोलीतील ‘कावळेसाद पॉंईंट’ या पर्यटन ठिकाणाच्या विरुद्ध बाजूस ‘नारायणगड’ हा किल्ला आहे. पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘नारायणगड’ हा किल्ला बांधण्यात आला.नारायणगडाच्या पायथ्याशी ‘गेळे’ गाव असून याच गावातून गडावर जावे लागते. आंबोली घाटाच्या परिसरात असल्यामुळे पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर गडावर जाता येते.

    ‘गेळे’ गावातून गडावर जातांना फारसा चढाव नसून सरळ वाट आहे. या भागात वावर नसल्यामुळे आजूबाजूला घनदाट अरण्य आहे. ‘नारायणगड’ सावंतवाडी संस्थानाच्या फोंड सावंतांनी बांधला. किल्ल्यावर सातेरीदेवीचे स्थान आहे. एका झाडाखाली काही घडीव दगड पडलेले आहेत; पण या जागी मूर्ती नाही. तसेच गडावर घराच्या जोत्यांचे काही अवशेष पहायला मिळतात. गडावरून पश्चिमेला मनोहर-मनसंतोष गड, पूर्वेला ‘कावळेसाद पॉंईंट’ दिसतो. नारायण गडाच्या बाजूला ३ सुळके असलेला डोंगर दिसतो. याला स्थानिक लोक ‘गंगोत्री लगीनवाडा’ म्हणतात

    . सुळक्यांमधील मोठ्या सुळक्याला ‘म्हातारीचा गुंडा’ म्हणतात. त्याहून लहान सुळक्यांना नवरा आणि नवरी म्हणतात.
    नारायणगड एका खिंडीमुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सावंतवाडीपासून ३२ किमी अंतरावर आहे. सावंतवाडीहून एसटीने आंबोलीला जाता येते.

    आंबोलीपासून गेळे हे नारायणगडाच्या पायथ्याचे गाव ७ किमी अंतरावर आहे. गडावर जाण्यासाठी माहितगार सोबत असणे आवश्यक आहे. गेळे गावातून नारायण गडावर जाण्यासाठी १ तास लागतो. पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर गडावर जाता येते.

    आंबोलीत वर्षा पर्यटन दरवर्षी उल्हासित स्वरूपाचे असते. दाट धूक्यात लपेटलेल्या गारव्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आवर्जून उपस्थित असतात. ‘कावळेसाद पॉईंट’ हा तर आंबोली पर्यटनातील प्रमुख आकर्षण आहे. मात्र, नारायणगड या किल्ल्याविषयी मात्र कित्येकांना माहिती नाही. हा ऐतिहासिक ठेवासुद्धा पर्यटकांनी पाहणे गरजेचे आहे. आंबोली पावसाळ्यात तर पर्यटकांनी फुलून गेलेली असते. काळ्या कपारीतून कोसळणारे धबधबे, घनदाट निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी देशाच्या विविध भागातून पर्यटक येत असतात; परंतु त्यामध्ये नारायणगडाकडे जाणारे अत्यंत कमी म्हणण्यापेक्षा नसतातच ! यासाठी या गडाकडे जाणारी वाट प्रशासनाने व्यवस्थित करणे आवश्यक आहे. त्याकरिता याबाबत शासन स्तरावरही गडाची डागडुजी होणे गरजेचे आहे.

  • महाडमधील चवदार तळे

    महाडमधील चवदार तळे

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या रायगड~ या किल्ल्याच्या लगत असलेले महाड एक शहर आहे. या शहराची लोकसंख्या 27,536 इतकी आहे. या शहराच्या मध्यभागी चवदारतळे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने या शहराची भुमी पावन झाली आहे. हे तळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे जागतिक स्तरावर प्रसिध्द आहे. या तळ्याचे अंदाजे क्षेत्रफ़ळ 2.5 एकर आहे.

    अनेक पर्यटक दरवर्षी आवर्जुन या तळ्यास भेट देत असतात. महाड नगरपरिषदेने या चवदार तळ्याचे सौदर्यीकरण पूर्ण केले आहे. या तळ्याच्या सौदर्यीकरणाचे काम व या सौदर्यीकरणाचा उद्घाटन सोहळा दिनांक 2 जुन 1992 रोजी संपन्न झाला आहे. सद्यस्थितीत चवदारतळ्याच्या चारही बांजुंनी सुशोभित कठडे बांधण्यात आले आहेत. तळ्याच्या सभोवताली विजेचे खांब उभारुन त्यावर विद्युत दिवे लावण्यात आले आहेत. चवदार तळ्याच्या पश्चिमेकडील भिंतीपासुन सुमारे 100 फ़ुटावर पाण्यामध्ये चौथरा बांधला असून या चौथऱ्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडे दहा फ़ुट उंचीचा पुर्णाकृती ब्रॉझचा पुतळा उभारण्यात आला आहे.

    त्याठिकाणी जाण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. पुतळ्याच्या चबुत-यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार कोरलेले आहेत.चवदार तळ्याच्या पश्चिमेकडे एक बहूउद्देशीय सभागृह बांधण्यात आले आहे. सभागृहाच्या तळमजल्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील महत्वाच्या घटनांबाबत स्मृतीचित्र आहे. या सभागृहाचा उपयोग विविध सभा, कार्यक्रम इ. साठी करण्यात येतो.

    सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर वाचनालय आहे. सभागृहाच्या समोरील जागेमध्ये आकर्षक बगीचा करण्यात आला आहे.महाड शहर ‘सावित्री’ नदीच्या किनारी वसलेले आहे. मुंबई ते महाड हे अंतर 175 कि.मी. आहे. पुणे ते महाड हे अंतर 110 कि.मी तर महाड ते किल्ले रायगड हे अंतर 24 कि.मी. आहे. या शहराच्या हद्दीलगत मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग आहे.

  • अनोळखी मुलीशी मैत्री करताना

    अनोळखी मुलीशी मैत्री करताना

    एखाद्या मेजवानीमध्ये, महाविद्यालयामध्ये तुम्हाला कधी एखादी मुलगी आवडते. तुम्हाला तिच्यासोबत बोलायची इच्छा असते पण, हिंमतच होत नाही. मुलींशी काय बोलावे? कसे बोलावे समजत नाही? मग चिंता करू नका. तुम्हाला जर एखादी मुलगी आवडली तर तिच्याशी मैत्री कशी करावी याविषयी एक हितगुज !
    कोणत्याही मुलीसोबत बोलण्यास सुरुवात करण्याआधी पहिल्यांदा तिची आवड जाणून घेणे योग्य ठरेल. मुलींना त्यांच्याबाबतच्या सर्व गोष्टी मुलांनी लक्षात ठेवायला हवे, असे वाटत असते. त्यामुळे कोणीतरी त्यांचा विचार करीत आहे, याची जाणीव होते.
    प्रत्येक मुलीविषयी मनात चिरंतन आदर व सन्मान असू द्या.

    मैत्री हलकीफुलकी आनंदी ठेवण्याचा दृष्टीकोन ठेवा.
    कोणत्याही मुलीसोबत बोलण्याची सुरूवात करताना ‘हॅलो’ म्हणा. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेऊन ‘हॅलो’ म्हणा. स्वत:चे नाव सांगा आणि मुलीस तिचे नाव विचारा, तुम्हाला हे शक्य नसेल तर काही काम किंवा एखादा प्रश्न विचारून तुम्ही बोलायला सुरुवात करू शकता. तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीच्या मुलीशी मैत्री करण्याचा प्रयत्न करता तेव्हा स्वत:ची ओळख गमावू नका. मुलींना खोट्या पद्धतीने वागणारी मुले अजिबात आवडत नाहीत. तुम्ही जर खूप पादर्शन मांडलेत, तर मुली तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकतात.

    मुलींना प्रश्न विचारून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. खोटी प्रशंसा करू नका.
    कोणत्याही मुलीसोबत मैत्री करण्यापूर्वी तिला तुमच्यामध्ये रुची आहे की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. तुमचे बोलणे तिला आवडते का याचा अंदाज घ्या.
    जेव्हा मुलगी तुमच्यासोबत सुरक्षित असेल तेव्हाच तुमची मैत्री होईल. त्यानंतर तुम्ही तिच्या कुटंबाबाबत जाणून घेऊ शकता; आणि आपल्या कुटुंबाबाबत बोलू शकता.

  • दातांचे सौंदर्य

    दातांचे सौंदर्य

    दरवर्षी २० मार्च हा दिवस ‘जागतिक दंत आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी या दिवसाची संकल्पना ‘तुमच्या तोंडाचा अभिमान बाळगा’ अशी आहे. दातांच्या समस्यांबद्दल बोलायचे झाले तर दात पिवळे पडणे, हिरड्या दुखणे, दातदुखी आणि दात कमकुवत होणे अशा अनेक समस्या खूप त्रास देतात.

    आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने आपण आपले दात पांढरे आणि चमकदार बनवू शकता. वडाच्या फांदीचा वापर आपण दात साफ करण्यासाठी देखील करू शकता. वडाची मुळे तुरट असतात, जी केवळ दात पांढरे करीत नाहीत, तर दात आणि हिरड्यांचे आरोग्य देखील सुधारतात. तुळशीचा अनेक प्रकारे आपण वापर करू शकतो. हा उपाय करण्यासाठी तुळशीची पाने सुकवून त्याची भुकटी बनवावी. ही भुकटी दात घासण्यासाठी वापरावी. तुळशीची हिरवी पाने दातांची स्वच्छता सुधारतात, आणि दात पांढरे होतात. हे ‘पायोरिया’ सारख्या दंत समस्यांवर देखील उपचार करू शकते.

    पांढरे निरोगी दात मिळविण्यासाठी कडुलिंब हा पारंपरिक उपाय आहे. कडुलिंबाच्या फांद्या आजही अनेक भारतीय ‘टूथब्रश’ म्हणून वापरतात. कडुलिंबाच्या तेलामध्ये तुरट आणि जंतुनाशक गुणधर्म असतात, जे श्वासाची दुर्गंधी रोखतात, दातांमधील जंतू नष्ट करतात. दात पांढरे करण्यासाठी आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्रिफळा वापरू शकता. त्यामुळे तोंडाचे व्रण कमी होण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी त्रिफळा पाण्यात उकळवा. थंड होऊ द्या. कोमट झाल्यावर या पाण्याने दात स्वच्छ धुवा.

  • हृदयाचे आरोग्य जपावे

    हृदयाचे आरोग्य जपावे

    अलीकडे हृदयविकाराचे प्रमाण खूप वाढलेले आहे. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात कडधान्य असणे खूप महत्त्वाचे आहे. रोजच्या आहारात गव्हापासून बनविलेली लापशी ते नाचणी, बाजरी यासारख्या गोष्टींचा समावेश करा. ब्रेड आणि पास्ता खाणे पूर्णपणे टाळा. धान्यांमध्ये फायबर तसेच खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. ते कोलेस्ट्रॉल, रक्दाब नियंत्रित करतात. खाण्यामध्ये जवस असू द्या. जवस खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. दररोज सुमारे 4 चमचे जवसाच्या बिया खाल्ल्याने उच्च रक्तदाब कमी होतो.

    बदाम, शेंगदाणे, अक्रोड हे पदार्थ आहारात असावेत. यांच्यात ‘अनसॅच्युरेटेड फॅट’ असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. यातील फायबर कोलेस्ट्रॉलला रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते.
    सोया दूध, सोया बडी यामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याची क्षमता असते. अभ्यासानुसार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेत सोया दुधात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सोया दूधाला फुल फॅट दुधाऐवजी घेतले जाऊ शकते. अर्थात, हे प्रयोग वैद्यकीय सल्ल्यानुसार करावेत.

  • तीयल

    तीयल

    लागणारे साहित्य : वांगी (लहान) – 4, लहान कांदे – 10, लाल तिखट – 1 चमचा, धणे पावडर – 2 चमचे, हळद – अर्धा चमचा, ठेचलेली मिरी – अर्धा चमचा, चिंचेचे पाणी – अर्धा कप, मोहरी – 1 चमचा, नारळ (खोवलेला) – 1 कप, मेथी – 1 चमचा, खोबरेल तेल- 3 चमचे, कढीपत्ता, मीठ – चवीपुरते, लाल मिरच्या.

    कृती : एका कढईत थोडे तेल गरम करा. त्यात खोवलेले खोबरे घालून तांबूस होईपर्यंत परता. आता मेथी घालून परतत रहा. धणे पावडर, लाल तिखट, ठेचलेली मिरी आणि हळद घाला. चांगले परता. लहान कांदे घालून पुन्हा परता. या सगळ्याचे वाटण बनवा आणि बाजूला ठेवा.

    दुसरी कढई घेऊन त्यात 2 चमचे तेल गरम करा. यात वांग्याचे तुकडे आणि चिरलेला कांदा घालून चांगले परतून घ्या. भांडे झाकून थोडा वेळ मंद आचेवर ठेवा. आता झाकण काढून थोडे ढवळून घ्या. पुन्हा झाकण ठेवून थोडा वेळ शिजवा. थोड्या वेळाने पुन्हा झाकण काढून चिंचेचे पाणी घाला. सुरुवातीला केलेले वाटण घाला. त्याला उकळी येऊ द्या. यात थोडॆ पाणी घाला. हळूवार ढवळून घ्या. चवीनुसार मीठ घाला. पुन्हा ढवळा. आता या ‘तीयल’ साठी फोडणी तयार करा. थोडे तेल गरम करून त्यात मोहरी, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घाला. ही फोडणी ‘तीयल’ वर घालून गरमागरम वाढा.

  • प्लास्टिक उद्योग

    प्लास्टिक उद्योग

    माणसाच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. लोक सकाळी झोपेतून उठल्याबरोबर दात घासताना ब्रश घेतात. आपल्या दैनंदिन जीवनाची पहाट प्लास्टिकच्या वापराने सुरू होते. भारतात वर्षभरात 20 लाख टन प्लास्टिक तयार होते. कंगवा, बादल्या, नळ, चप्पल, टेबल, खुर्च्या, इलेक्ट्रिक फिटिंगचे साहित्य, वाहनांचे भाग, शालेय वस्तू, खेळणी, पाणी पुरवठ्याच्या पाइपलाइन, फाइल्स, डायरीची कव्हर, रेनकोट सारख्या गोष्टी, कॅरी बॅग, धागे इत्यादी प्लास्टिकपासून बनविल्या जातात आणि त्यांना मोठी मागणी आहे.

    प्लास्टिक उद्योगांमध्ये शेकडो गोष्टींची निर्मिती करता येत असल्याने तुम्ही तुमच्या भांडवलाच्या नियोजनानुसार तुम्हाला हव्या त्या वस्तूंचे उत्पादन करुन विक्री करू शकता. प्लास्टिक उद्योग हा रासायनिक प्रक्रियेचा उद्योग असल्याने शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन उद्योग सुरू करावा लागतो. प्लास्टिक उद्योगांना औद्योगिक परवानगी सोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही परवानगी घ्यावी लागणार आहे.

    प्लास्टिक उद्योगाविषयी माहितीसाठी लेखक सुबोध जावडेकर यांचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले ‘प्लास्टिक की मेजवानी’ हे पुस्तक जरूर वाचावे. प्लास्टिकच्या शोधापासून ते आजच्या काळापर्यंतची सर्व माहिती तुम्हाला या पुस्तकात मिळेल. ज्यात प्लास्टिक कसे तयार करावे, याची माहिती मिळेल. प्लास्टिकच्या विघटन न करता येणाऱ्या स्वरूपामुळे एकदा वापरल्यानंतर ते खराब होते, तुटलेले प्लास्टिक पुन्हा वितळवून त्यावर प्रक्रिया करून नवीन प्लास्टिकमध्ये मिसळून ते पुन्हा वापरता येते.

    आज अनेक घरगुती वस्तू प्लास्टिकपासून बनवल्या जातात. भांडी, बांगड्या ,छत्रीचे खांब, इ. प्रकारच्या वस्तू तुम्ही स्वत: तयार करून बाजारात आणू शकता. ‘समृद्धी प्लास्टिक’सारख्या कंपन्यांची अनेक उत्पादने आज बाजारात लोकप्रिय आहेत. अशी उत्पादने उच्च दर्जाची असतात, आणि ती टिकाऊ उत्पादनांपासून बनविली जातात.

    उच्च-क्षमतेची उष्णता आणि आर्द्रता यासाठी आवश्यक असते. सामग्री तयार करण्यासाठी विशेष प्लास्टिकचा वापर केला जातो. प्लास्टिक वापरताना आणि उत्पादन करताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागते. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये जशी प्लास्टिक कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे, तशीच प्लास्टिक कचऱ्याची समस्या भारतातही निर्माण होत आहे. प्लास्टिक कचरा नैसर्गिक प्रक्रियेत विघटित होत नसल्याने ती मानवी समाजासमोरील समस्या देखील आहे. झोपडपट्टीपासून उच्चवर्गीय वस्तीपर्यंत प्रत्येक घरातील लोक प्लास्टिकचे ग्राहक आहेत. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत प्रत्येक घर, दुकान, कार्यालय, कारखाना, बाजारपेठ अशा विविध ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तूंना मागणी आहे. नवीन उद्योग सुरू करताना, शक्यतो स्थानिक बाजारपेठेत मागणी असलेल्या वस्तूंचे उत्पादन करा, प्रत्येक बाजारपेठेत प्लास्टिकचे मोठे घाऊक विक्रेते आणि वितरक आहेत.

    घरोघरी फिरून प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन आणि विक्री करता येते. तुम्ही काय उत्पादित करता त्यावर तुमची बाजारपेठ ठरवली जाईल. कच्चे प्लास्टिक, पॉलिमर, रबर, बुटाडीन आणि निओप्रीन, नैसर्गिक रबर, नॅप्था, फिनॉल व फॉर्मल्डिहाइड, राळ इत्यादी कच्चा माल या उद्योगासाठी आवश्यक असतो. इंजेक्शन मोल्डिंग मशीन, एअर कॉम्प्रेसर, मोल्डिंग लिफ्टिंग मशीन, स्क्रॅप कटर, टूल्स आणि इतर किरकोळ सुटे भाग वापरण्यात येतात.

  • प्लास्टिक बाटल्यांची निर्मिती

    प्लास्टिक बाटल्यांची निर्मिती

    औद्योगिक आणि इतर क्षेत्रात प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे प्लास्टिकच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. खुर्च्या, टेबल, फर्निचरपासून ते स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंपर्यंत सर्व काही प्लास्टिकचे बनवले जात आहे. आकर्षक, वापरण्यास सुलभ, कमी वजन आणि कमी किमतीमुळे प्लास्टिकच्या वस्तू ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिक उत्पादनांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे आहेत.

    आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे स्ट्रेच ब्लो मोल्डेड पद्धतीने बाटल्या तयार केल्या जातात. या व्यवसायात ‘पॉलिव्हिएल क्लोराईड’ आणि ‘पॉलिएथिलीन टेरिफ्टालेट’ हे साहित्य ‘स्ट्रेच ब्लो मोल्डेड’ पद्धतीने वापरले जाते. भारत हा एक विकसनशील देश आहे. विकसित देशांमध्ये या बाटल्यांची सार्वत्रिक मागणी असल्याने भारतात या ‘स्ट्रेच ब्लो मोल्डेड’ प्लास्टिकच्या बाटल्यांना खूप मागणी आहे. अत्यंत पारदर्शक, घर्षण-प्रतिरोधक, अल्कली, वायू-प्रतिरोधक आणि मजबूत असल्याने शीतपेयांसाठीही बाटल्यांना सर्वाधिक मागणी आहे.

    ‘पीईटी’, ‘पीपी’ आणि ‘पीव्हीसी’ बाटल्यांसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल फक्त आपल्या देशात उपलब्ध आहे. पॉलिमर कच्च्या मालापासून या बाटल्या तयार केल्या जातात. हे प्लास्टिक फेकून देऊनही त्याचे नव्या स्वरूपात रूपांतर करता येते. रासायनिक प्रक्रियेमुळे कच्च्या मालाची कमतरता नाही. प्लॅस्टिक उद्योगातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार, अनुभवासह आणि विकसित केलेल्या सूत्रांच्या आधारे उत्पादन केले जाते.

    हा रासायनिक प्रक्रिया उद्योग असल्याने प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याची जागा रहिवासी भागापासून दूर असावी. निश्चित सूत्र तयार करून कुशल मनुष्यबळासह उत्पादन तयार करावे लागते. रासायनिक उद्योगांसाठी शासनाचे कडक नियम असतात. सर्व नियमांचे पालन करून कायदेशीर मान्यता घेऊन तज्ज्ञांच्या अधिकाराखाली उत्पादन सुरू करावे.सौंदर्यप्रसाधने पॅकिंग, खाद्यतेल, रंग आणि शीतपेये वेष्टनबंद करण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. प्राचीन काळी मालाची वाहतूक करण्यासाठी लोखंडी डब्यांचा वापर केला जात होता. आज त्यांची जागा प्लास्टिक कंटेनरने घेतली आहे.

    माणसाच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्लास्टिकचा वापर वाढत आहे. कोल्ड ड्रिंक्स, बिअर, खाद्यतेल हे बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बंद केलेले असतात. कोल्ड ड्रिंक्सपासून ते ‘बिस्लेरी एक्वा’ पाण्यापर्यंत सर्व काही बंद करण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केला जातो. पाणी आणि शीतपेय प्यायल्यानंतर आपण नेहमी इकडे-तिकडे बाटल्या विखुरलेल्या पाहतो. भंगार विक्रेते या बाटल्या गोळा करतात आणि भंगार विक्रेत्यांना विकतात. ज्यामध्ये बाटल्यांचा पुनर्वापर करून त्या पुन्हा विक्रीसाठी वापरल्या जातात. खाद्यतेलासाठी बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केला जातो. वनस्पती तूप, स्क्वॅश, जाम, सरबत आदी पेये, वाहनांसाठी लागणारे महागडे तेल हे सर्व आज केवळ प्लास्टिकच्या बाटल्यांमधून विक्रीसाठी येते. प्लास्टिकच्या बाटल्या तयार करण्याचा प्रकल्प आर्थिक आणि औद्योगिक दृष्टिकोनातून एक मोठा प्रकल्प आहे.

    तज्ज्ञांच्या सल्ल्याने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू करावा. आर्थिक मदतीसोबतच बाजाराचा चांगला अभ्यास करून आणि नफा-तोट्याची पूर्ण कल्पना घेऊन प्रकल्प सुरू करावा.प्लास्टिक बाटल्यांचे सर्वात मोठे ग्राहक हे शीतपेय आणि खाद्यतेल उत्पादक आहेत. अशा उत्पादकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या मालाच्या पॅकिंगसाठी आवश्यक डिझाइनच्या बाटल्या तयार करू शकता. दुग्धजन्य पदार्थ, औषध उत्पादक, सौंदर्य प्रसाधने उत्पादकांना देखील वस्तूंचा पुरवठा करू शकता. हे साहित्य स्टेशनरीच्या दुकानात पाण्याच्या बाटल्यांच्या स्वरूपात विकले जाऊ शकते. कंपनीच्या मॉडेलनुसार वस्तूंचे उत्पादन आणि वितरण करू शकतात. पॉलिमर, कच्चे प्लास्टिक, पीव्हीसी, पीईटी, पॉलिथिलीन, रासायनिक रंग इ. स्ट्रेच ब्लो मोल्डिंग मशीन, इंजेक्शन मोल्डिंग मशीन, वॉटर कूलिंग मशीन, एक्सट्रूजन मशीन, लिफ्टिंग मशीन, स्क्रॅप कटर मशीन इ. यंत्रसामग्री या व्यवसायासाठी आवश्यक आहे.