सह्याद्री मराठी वाहिनी

Author: सह्याद्री मराठी वृत्त

  • कोथिंबीर शेती

    कोथिंबीर शेती

    कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्‍यात केली जाते. कोथिंबीरीला देशभरात वर्षभर मागणी असते. कोथिंबीरीची लागवड कोणत्‍याही हवामानात करता येते. अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्‍ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येते. उन्‍हाळयात तापमान 36 अंश सेल्सिअसच्‍या वर गेल्‍यास कोथिंबीरीची वाढ कमी होते. कोथिंबीरीच्‍या पिकासाठी मध्‍यम कसदार आणि मध्‍यम खोलीची जमीन निवडावी लागते. सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्‍यास हलक्‍या किंवा भारी जमिनीत कोथिंबीरीचे पीक चांगले येते.

    कोथिंबीरीच्‍या लागवडीसाठी शेत उभे-आडवे नांगरुन घेऊन 3×2 मीटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्‍यावे लागतात. प्रत्‍येक वाफ्यात 8 ते 10 किलो शेणखत मिसळावे लागते. वाफे सपाट करुन बी सारखे पडेल अशा पद्धतीने पेरावे. उन्‍हाळी हंगामात पेरणीपूर्वी वाफे भिजवून घेणे आवश्यक आहे. वाफसा आल्‍यावर बियाणे पेरावे. कोथिंबीरीच्‍या लागवडीसाठी हेक्‍टरी 60 ते 80 किलो बी लागते.

    पेरणीपूर्वी धने फोडून बिया वेगळया कराव्‍यात यासाठी धने चपलेने अथवा लाकडी फळीने रगडून बी वेगळे करावे. पेरणीपूर्वी ते 12 तास पाण्‍यात उबदार जागी ठेवावे आणि नंतर लागवडीसाठी वापरावे. कोथिंबीरीच्या नंबर 65, टी 5365, एनपीजे 16, व्‍ही 1, व्‍ही 2, आणि को-1, डी-92, डी-94, जे 214, के 45 या स्‍थानिक आणि सुधारित जाती जाती आहेत.

    बी उगवून आल्‍यावर 20 ते 25 दिवसांनी हेक्‍टरी 40 किलो नत्र आणि कोथिंबीरीचा खोडवा घ्‍यायच्या असल्‍यास कापणीनंतर हेक्‍टरी 40 किलो नत्र देणे आवश्यक आहे. कोथिंबीरीला नियमित पाणी द्यावे. कोथिंबीरीवर फारसे रोग आणि किडी दिसून येत नाही. काही वेळा मर रोगाचा प्रार्दुभाव होतो. यासाठी पाण्‍यात विरघळणारे गंधक वापरावे. पेरणीपासून दोन महिन्‍यांनी कोथिंबीरीला फुले येण्‍यास सुरुवात होते. हिरवीगार आणि कोवळी असताना कोथिंबीरीची काढणी करावी आणि कोथिंबीरीच्‍या जुड्या बांधून बाजारात विक्रीसाठी पाठवावी.

  • पुण्यातील पाताळेश्वर लेणी

    पुण्यातील पाताळेश्वर लेणी

    राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण,लक्ष्मी,गणेश या देवतांच्याही मूर्ती आहेत.सन १८५७ च्या बंडानंतर येथे एक बाबा बसायला लागले. पाताळेश्वरच्या शेजारील टेकडीवर ते रहायचे. या बाबांचे बालपण सोलापूरजवळील होनमुर्गी या गावी व्यतीत झाले. त्यांना लोक ‘जंगली महाराज’ असे म्हणत. सन १८९० दरम्यान त्यांचे निधन झाले. भक्तांनी त्या टेकडीवर त्यांचे मंदिर बांधले.

    त्यामुळे येथील वर्दळही वाढली आहे. मोठे प्रांगण असलेल्या पाताळेश्वर लेण्याच्या या प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांवर उभा आहे. त्याच्या आत आणखी एक वर्तुळ आहे. तेथे नंदी आहे. लेण्यात प्रवेश केल्यावर समोर तीन गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ नक्षी कोरली आहे. येथे प्रदक्षिणा मार्ग आहे.

    गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागांत कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते. गर्भगृहाव्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतींवरील शिल्पे पूर्णपणे खराब झाली आहेत. त्यातील एक शिल्प श्री शिवाचे आणि एक त्रिपुरासुर वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर एक शिलालेख आहे. पेशवे काळात या मंदिराला दक्षिणा दिल्याचे उल्लेख आढळतात. या भागात आता ‘संभाजी उद्यान’ तयार करण्यात आले आहे. येथे भाविकांसह निसर्गप्रेमी पर्यटकांची पावले आपोआपच वळू लागली आहेत.

  • हर्णे समुद्रकिनारा

    हर्णे समुद्रकिनारा

    महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात रमणीय असा ‘हर्णे समुद्रकिनारा’ आहे. हे मुंबई आणि पुण्यातील रहिवाशांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. हा विस्तारित खडकाळ किनारा आणि स्वच्छ काळ्या वाळूत विशाल पसरलेला आहे. हा समुद्रकिनारा ‘मुरुड हरणाई’ नावाच्या छोट्या शहरात आहे. येथून जवळच दुर्गादेवीचे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात विस्तीर्ण कोरीवकाम असलेले मोठे खांब आहेत. हे मंदिर इसवी सन 18 व्या शतकातील आहे. हर्णे समुद्रकिनार्यांजवळ काही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

    ‘सुवर्णदुर्ग किल्ला’ हा एक एक विशाल किल्ला येथे पाहण्यासारखा आहे. हा सुमारे 8 एकरपर्यंत पसरलेला आहे. ‘आंजर्ले समुद्रकिनारा’ आणि ‘बुरुंडी बीच’ ही इतर आकर्षणाची ठिकाणे आहेत. ही अतिशय नयनरम्य आणि प्रदूषणरहित आहेत. ‘पहाले खाझी’ हे आणखी एक ठिकाण आहे, जिथे किल्ला बनविण्यासाठी कोरलेले प्रचंड पर्वतीय खडक आहेत. हे ठिकाण हर्णेपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे. मुंबई किंवा पुण्याहून प्रवास करत असाल तर, महाराष्ट्र राज्य परिवहनच्या अनेक बसेस हर्णे शहरापर्यंत ‘शटल’ बसेस आढळू शकतात. येथून चिपळूण रेल्वेस्थानक 70 किमी अंतरावर आहे.

  • अंबागड किल्ला

    अंबागड किल्ला

    महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील ‘तुमसर’ तालुक्यात ‘अंबागड’ हा एक सुंदर किल्ला आहे. किल्ल्याचे बांधकाम, त्यावरील वास्तू यांचे पुरातत्त्व खात्याने संवर्धन केल्यामुळे हा किल्ला उत्तम अवस्थेत आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे किल्ल्यावर जाणेही सोपे झाले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात राहण्याची सोय होवू शकेल. किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही. हनुमान मंदिरापासून गडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.

    गोंड राजा बख्त बुलंद याचा सरदार राजखान पठाण याने हा किल्ला इसवी सन १७०० च्या सुमारास हा किल्ला उभारला. पुढे हा किल्ला नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात गेल्यावर त्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्यात आला. पायऱ्यावरुन साधारणपणे आपण अर्ध्या तासात किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पिंपळपान आणि कमलपुष्प कोरलेली आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच देवड्यामधून बुरुजावर जाण्यासाठी जिना आहे. बुरुजावरून किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर आणि किल्ल्याच्या आतील भागावर नजर ठेवता येते. बुरुज पाहून खाली उतरून पायवाटेने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर दिसते.

    त्यात शेंदूर लावलेला एक दगड आहे. हे मंदिर अलीकडच्या काळात बांधलेले असावे, असे वाटते. या मंदिराजवळ चुन्याच्या घाण्याचे तुटलेले चाक पडलेले आहे. देवड्यांकडून किल्ल्यात जाणाऱ्या पायवाटेने पुढे जाताना डाव्या बाजूला एक विहीर आह. उजव्या बाजूला बांधीव तलाव आहे. त्यावर एक पडकी वास्तू आह. पुढे चालून गेल्यावर काही बुरुज लागतात. थोड्या पायऱ्या चढल्यावर चौथा बुरुज लागतो. या बुरुजाच्या उजव्या बाजूला मोठा आयताकृती बांधीव तलाव आहे . या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या तलावाच्या बाजूला वास्तूचे प्रवेशद्वार आहे. ही एक जीर्ण वास्तू आहे. डाव्या कोपऱ्यात आणखी एक इमारत आहे.

    या इमारतीला एकही खिडकी नाही. इमारतीच्या रचनेवरून येथे दारु कोठार असावे, असे वाटते. दारु कोठार पाहून उजव्या बाजूला गेल्यावर एक चौकोनी बांधीव विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. बाजूलाच किल्ल्याची प्रवेशद्वारापासून आलेली तटबंदी आहे. किल्ल्याचा हा भाग पाहून पुन्हा माघारी परतावे.

    बालेकिल्ल्यातील चारही बुरुज चौकोनी आहेत. किल्ल्याच्या टोकाला असलेल्या चौकोनी बुरुजात एक खोली आहे. या खोलीतून बुरुजाच्या बाहेर पडता येते. या किल्ल्यात एक महाल आहे. या महालातून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला नक्षीकाम केलेले कोनाडे असलेली एक भिंत आहे. ही भिंत संपते तेथे एक चौकोनी बुरुज आहे. या बुरुजात चोर दरवाजा आहे. बुरुजात असलेल्या पायऱ्यांवरुन खाली उतरल्यावर आपण किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला येता. येथून किल्ल्याखाली जाणारी वाट आहे. याठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते.

  • मुंबईतील पवई तलाव

    मुंबईतील पवई तलाव

    पवई तलाव हा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावांपैकी सर्वात प्रसिद्ध तलाव असून मुंबईतील एक नितांतसुंदर ठिकाण आहे. या तलावातून मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा केला जातो. तलावाच्या बाजूला जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी लहानसे सुंदर उद्यान आहे. येथे उडणारे कारंजे पाहणाऱ्यांच्या मनास आनंद देणारे आहेत. या तलावाचे क्षेत्रफळ २.१ चौरस किमी आहे. त्याची खोली ३ ते १२ मीटर आहे.
    या तलावावर सरकारने बसण्यासाठी बांधकाम केले आहे. चालण्यासाठी पदपथाची सोय केली आहे. पूर्वी येथे ‘पवई’ नावाचे गाव होते. गावातील झोपड्या हलवून तिथे कृत्रिम तलाव बांधण्यात आला. हळूहळू सभोवतालच्या परिसराला त्याच तलावाचे नाव लाभले. ‘मिठी’ नदी आणि ‘विहार’ सरोवराला लागूनच पवई तलाव आहे.

    पवई गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी मिठी नदीच्या प्रवाहात दोन धरणे बांधण्यात आली. डोंगरावरून वाहत येणारे पावसाचे पाणी साठवून दुष्काळी काळात मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी या धरणाची निर्मिती करावी, असा प्रस्ताव सन १८८९ मध्ये मांडण्यात आला होता. कालांतराने या तलावात सांडपाणी, झाडे, फुले, कचरा आणि मोठ्या प्रमाणात वाहून आणलेला गाळ साचला गेल्याने पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर बंदी घातली गेली. त्यानंतर मासेमारीसाठी या तलावाचा वापर केला जात असे.

    सध्या ज्या जागेवर तलाव आहे, ती जागा तलाव बांधण्यापूर्वी डॉ. स्कॉट यांना वार्षिक भाडेपट्टीवर दिली होती. स्कॉट यांच्या मृत्यूनंतर ती जागा सरकारने आपल्या ताब्यात घेतली. सन १८२६ मध्ये ती पुन्हा एकदा फ्रामजी कावसजी यांना भाडेपट्टीवर दिली. त्यानंतर सन १८९१ मध्ये तिथे तलाव बांधण्यात आला. या तलावाला फ्रामजी कावसजी यांचं नाव दिले गेले. आयआयटी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग (निटी) आणि हिरानंदानी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण इमारती लक्ष वेधून घेतात. रात्रीच्या वेळी तलावाच्या काठावरुन दिसणारा सभोवतालचा प्रकाश फारच सुंदर दिसतो.

    लार्सन अँड टुबरो कंपनीकडून गाडी वळली की पवई परिसराला सुरुवात होते. काहीसे पुढे गेल्यावर मध्येच हा तलाव दिसतो. तलावाला एका बाजूने संपूर्ण तटबंदी बांधण्यात आली असून तिथे बसण्याची, फिरण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी तिथे चालण्यासाठी आलेली कित्येक मंडळी दिसतात. आजूबाजूला लहान-मोठी शिल्पे बांधली आहेत. शांत तलाव आणि दूरवर पसरलेला आसपासचा परिसर नयनरम्य आहे. तलावावर नौकानयनची व्यवस्था आहे. या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत; मात्र मगरींचे वास्तव्य असल्याने पाण्यात उतरण्यास प्रतिबंध आहे. महानगरपालिकेचा कर्मचारी येथे तैनात केलेला असतो. महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईचे सौंदर्य वाढविण्यात हा तलाव मोलाची भूमिका बजावतो.

  • भावंडांमधील प्रेमासाठी

    भावंडांमधील प्रेमासाठी

    भाऊ आणि बहिणीचे नाते सर्वात मौल्यवान आहे. या नात्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकीसोबतच आदराची भावना असणे आवश्यक आहे. अनेकवेळा कळत-नकळत कुटुंबातील वातावरण बिघडून जाते.
    हे सुंदर नाते कटुतेने भरू लागते. जर भाऊ-बहिणींमध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना नसेल, तर ते एकमेकांचे महत्त्व तितक्या गांभीर्याने समजत नाहीत. म्हणूनच लहानपणापासूनच काही सवयी भाऊ-बहिणीत रुजवायला हव्यात. या सवयी अंगीकारून ते या नात्याचा आदर तर वाढवतीलच; शिवाय इतरांसाठी प्रेरणाही बनतील.

    ‘ताई’ किंवा ‘दादा’ बोलण्याची सवय लावा. मुले नेहमी मोठ्यांचे अनुकरण करतात. अनेक घरांमध्ये असे घडते की, घरातील वडिलधारी मंडळी, मुलांना ज्या नावाने हाक देतात, तेच नाव घेण्याची सवय मुलांना लागते.

    तुलना टाळण्याची सवय लावा. घरात दोन मुले असतील तर त्यांची तुलना करणेही घातक ठरू शकते. देखावा, अभ्यास, खेळ यांची कोणतीही तुलना चुकीची आहे. प्रत्येक मूल वेगळे असते, आणि प्रौढांनी हे समजून घेतले पाहिजे. तुलना केल्यास लहानपणापासूनच एखाद्या व्यक्तीमध्ये न्यूनगंड, निराशा आणि राग यासारख्या भावना घर करु शकतात. त्यामुळे भाऊ-बहिणीचे नाते बिघडते. मोठे झाल्यावरही कधी-कधी त्यांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होतो. मुलांना एकमेकांच्या चांगल्या गोष्टींबद्दल सांगा. एकमेकांकडून चांगल्या गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करा.

    कामाच्या वाटपात समानता ठेवा. मुलगा असेल तर तो घरची कामे करणार नाही; आणि मुलगी असेल तर बाहेरचे काम करायला जाणार नाही. या भेदभावामुळे भावंडांमध्ये संघर्ष आणि लैंगिक असमानता निर्माण होऊ शकते. विशेषत: आजच्या वातावरणात जेव्हा मुले केवळ शहरातूनच नव्हे, तर देशाबाहेरही अभ्यास आणि नोकरीसाठी जातात, तेव्हा त्यांना आवश्यक ती सर्व कामे शिकवणे अधिक महत्त्वाचे होते. मुलाने कणीक भिजवणे असो; किंवा मुलीला गाडीची ‘स्टेफनी’ बदलायला शिकवणे असो, हे काम त्यांच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरेल. त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल. थकून घरी आलेल्या भावाला एक ग्लास पाणी देण्याची सवय तुम्ही बहिणीला लावत असाल तर तीच सवय भावालाही लावा.

    प्रेम सारखेच असावे. अनेक घरांमध्ये असे घडते की, मुलीचे लग्न होऊन ती दुसऱ्या घरात जाईल, म्हणून तिला अतिरिक्त सुविधा देऊन तिचे लाड केले जातात. यासाठी भावाला गैरसोय सहन करावी लागली तरी चालेल. दुसरीकडे, अविवाहित भावांना जेव्हा मुलगी लग्नानंतर तिच्या माहेरच्या घरी येते तेव्हा त्यांच्या दिनचर्येशी आणि सोयी-सुविधांसह सर्व प्रकारची तडजोड करण्यास सांगितले जाते. या परिस्थितीमुळे भावंडांमधील अंतर वाढू शकते. मुले एक-दोनदा तडजोडही करतात; पण जेव्हा ही परिस्थिती पुन्हा-पुन्हा उद्भवते, तेव्हा मनात कटुता येऊ लागते. त्यामुळे लहानपणापासूनच दोन्ही मुलांमध्ये समान प्रेमाची सवय लावा. तुमचे प्रेम दोघांसाठी समान आहे, हे त्यांना समजावून सांगा. ज्या काही सुविधा आहेत, त्या दोघांसाठी समान असाव्यात हेही लक्षात ठेवा.

    रक्षाबंधन-भाऊबीज यासारख्या सणांचे महत्व समजावून सांगा. सण हे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक भावनांशी निगडित नसतात. सण माणसाची विचारसरणी, सर्जनशीलता, अभिव्यक्ती तसेच व्यक्तिमत्त्वात सकारात्मकता आणतात. आजच्या धावपळीच्या जीवनात मानवी मूल्यांचा अभाव ही एक मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचे तसेच भाऊबीज या सारख्या सणांचे महत्त्व मुलांना समजावून सांगा. त्यांना सांगा की हा सण केवळ रक्ताच्या नात्याशी जोडलेला नाही तर मानवी मूल्यांशीही जोडलेला आहे. यामध्ये सुरक्षेची आणि नातेसंबंधांची जबाबदारी दोन्ही भावंडांना बरोबरीने पार पाडावी लागते. ही भावना लहानपणापासून मुलांमध्ये ठेवली तर मोठी झाल्यावरही ही भावना मनात ठेवून ते एकमेकांशी जोडले जातील.

  • जपा नखांचे सौंदर्य

    जपा नखांचे सौंदर्य

    हात आणि बोटे सुंदर दिसण्यासाठी महिला नखांवर रंग (नेलपेंट) लावतात. नखांना रंग देऊन सजविण्याचे अनेक प्रकार आजकाल बाजारात दिसतात. निरनिराळ्या प्रकारच्या रंगांचे आजकाल नखांवर प्रयोग केले जातात; मात्र बऱ्याच वेळेस हे रंग चुकीच्या पद्धतीने लावण्यामुळे नखांचे सौंदर्य बिघडते; कारण या रंगांमध्ये हानिकारक रसायने असतात.

    नखांना अशा पद्धतीने सजविताना काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत. नखावरचा जुना रंग काढून नवीन रंग देताना आधीचा रंग पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. बऱ्याचजणींना वेळ नसल्याने आहे त्या रंगावरच त्या रंग देतात. असे करणे नखांसाठी मुळीच चांगले नाही. त्यामुळे नखांचे पोषण होत नाही. यासाठी नखे नेहमी ‘रिमूव्हर’ने स्वच्छ करून घ्यावीत; आणि मगच नवीन रंगाचा साज द्यावा.

    नखावरील रंग काढण्यासाठी नेहमी चांगल्या ‘रिमूव्हर’चा वापर करावा. जर नखांवरील रंग नखांनीच खरडून काढलात तर यामुळे नखांवर ओरखडे उठतात. नखांचे सौंदर्य खराब होतेच; पण नखांची वाढही खुंटते. नखे कायम निरोगी राहण्यासाठी ही चूक कधीच करू नका. नखांना रंग लावल्यानंतर कमीत कमी अर्धा तास कोणतेही काम करू नका. जरी आपला रंग लगेच वाळला तरीही काही मिनिटे हात तसेच ठेवावेत. असे न केल्यास रंग व्यवस्थित वाळत नाही, आणि मग नखांमध्ये आणि त्यांच्याखाली असणाऱ्या कोशिकांमध्ये पसरतो. रंगामधील रसायने नखे आणि कोशिकांचे नुकसान करतात. यासाठी रंग सुकण्याची वाट पहा.

  • पौष्टिक काळा तांदूळ

    पौष्टिक काळा तांदूळ

    तांदूळ हे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट असलेले महत्त्वाचे धान्य आहे. हे जरी खरे असले, तरी पांढरा तांदूळ हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी विषासमान मानला जातो. पांढऱ्या तांदूळामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह हा असा आजार आहे, ज्यामध्ये भरपूर आहार टाळावा लागतो.

    मधुमेहींकरिता एक भात असा आहे, जो तुम्ही बिनदिक्कत ते खाऊ शकतात, तो म्हणजे ‘काळा तांदूळ’ ! ‘काळा तांदूळ’ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ कमी आहे. एवढेच नाही तर काळ्या तांदळात प्रथिने, लोह, अँटीऑक्सिडंट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि आहारात भात आवडत असेल, तर तुम्ही काळा तांदूळ निवडू शकता. तो तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू देणार नाही. तुमच्या हृदयाच्या आरोग्याची देखील काळजी घेईल. काळा तांदूळ कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. म्हणूनच आहारात काळ्या तांदूळाचा नक्कीच समावेश करा. अनेकांना बद्धकोष्ठतेची समस्या असते. जर आपणास ही समस्या असेल, तर आजपासूनच काळ्या तांदूळाचे सेवन सुरू करा. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल आणि पचनाशी संबंधित इतर समस्याही दूर होण्यास मदत होईल.

  • कांदावाली भेंडी

    कांदावाली भेंडी

    साहित्य : अर्धा किलो भेंडी, २ मध्यम आकाराचे कांदे, ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, ४ लसूण पाकळ्या बारीक चिरून, २ चमचे तेल, अर्धा लहान चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ.

    कृती
    भेंडी चांगली धुवून सुती कापडाने पुसून घ्या. आता त्याचे छोटे तुकडे करा. कांदा धुवून सोलून त्याचे जाडसर काप करा. गॅस चालू करा. एका भांड्यात तेल घ्या. तेल गरम झाल्यावर हिरव्या मिरच्या आणि लसूण घाला. थोडे परतून घ्या, नंतर भेंडी घाला. मध्यम आचेवर भेंडी झाकून ठेवा. अधूनमधून ढवळत रहा. भेंडी थोडी परतून झाल्यावर आणि शिजल्यावर त्यात कांदा घालून परता. झाकण ठेवून १ मिनिट शिजवा. गरजेनुसार आच मंद करा. आता त्यात हळद व मीठ टाका. झाकण काढून मध्यम आचेवर भाजून घ्या. भेंडी कुरकुरीत आणि लाल झाल्यावर गॅस बंद करा. ही ‘कांदा वाली भेंडी’ छान चवदार लागते.

  • प्लायवुड उद्योग

    प्लायवुड उद्योग

    लाकडाला पर्याय म्हणून आज जगभरात प्लायवुडचा वापर केला जात आहे. आपल्या देशात शेकडो वर्षांपासून प्लायवुडचा वापर होत आहे. मागील शतकांमध्ये, प्लायवुडचा वापर वस्तू वेष्टनबंद करण्यासाठी केला जात असे. चहाची वाहतूक करताना चहा सुरक्षित रहावा, म्हणून प्लायवूडचा वापर चहा बंद करण्यासाठी प्रथम केला गेला. प्लायवूडचे खोके लाकडी खोक्यांपेक्षा थोडे हलके आणि हाताळण्यास सोपे असतात. वजनाने हलके असल्याने विविध प्रकारच्या वस्तू आणि वस्तू वेष्टनबंद करण्यासाठी प्लायवूडच्या पेट्यांना चांगली मागणी आहे. दैनंदिन जीवनातील मानवी गरजांमध्ये, लाकडापासून बनवलेले फर्निचर किंवा इतर साहित्य हे झाडे तोडण्यावरील निर्बंधांमुळे थोडे महाग झाले आहे.

    औद्योगिक क्षेत्रात प्लायवुडला जास्त मागणी असल्याने उत्पादनाचा वेगही वाढला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मिझोराम, नागालँड ही राज्ये सर्वात जास्त प्लायवुडचे उत्पादन करतात. प्लायवुडचे विविध प्रकार आहेत. उदा. प्रिझर्व्हेटिव्ह प्लायवुड, शटरिंग प्लायवुड, एअरक्राफ्ट प्लायवुड हे प्लायवुडचे प्रकार आहेत. लाकडांऐवजी पूर्णपणे अग्निरोधक प्लायवुड बाजारात आले आहे. यासोबतच पाण्याचा कोणताही परिणाम न होणारे ‘वॉटरप्रूफ प्लायवुड’ घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी उपलब्ध झाले आहे. प्लायवुड शीट उत्पादनाच्या ठिकाणाहून विक्रीच्या ठिकाणी नेत असताना कमी वाहतूक खर्चात देखील वाहतूक केली जाऊ शकते.

    मंद गतीने चालणाऱ्या प्लायवुड शीट्स वजनाने हलक्या असल्याने कमी जागेत जास्त घनफूट प्लायवुड ठेवता येते. वजनाने हलके असल्याने, एकच वाहन लाकडापेक्षा जास्त घनफूट प्लायवुड वाहून नेऊ शकते. कमी उत्पादन खर्च आणि कमी वाहतूक खर्च यामुळे प्लायवुड लाकडापेक्षा कमी किमतीत विकले जाऊ शकते. प्लायवुडपासून बनवलेले सामान, उत्पादने, फर्निचर लवकर खराब होत नाहीत. प्लायवुड वाकत नसल्यामुळे प्लायवुडचा आकुंचन किंवा प्रसरण होत नाही. प्लायवुडदेखील लाकडापेक्षा टिकाऊ आणि मजबूत आहे. प्लायवुडचे एक युनिट लाकूड उत्पादनांच्या 3 युनिट्सच्या बरोबरीचे असते.

    आज सर्वत्र प्लायवुडचा वापर केला जातो. घरातील टेबल, खुर्च्या, दिवाण, बेड, कॅबिनेटपासून ते बँक-कार्यालयापर्यंत सर्व प्रकारच्या कार्यालयांकरिता कार्यालयीन फर्निचर तयार करण्यासाठी प्लायवुडचा वापर केला जातो. प्लायवुडची सर्वाधिक विक्री हार्डवेअरच्या दुकानांमध्ये होते. फर्निचर, दरवाजे आणि खिडक्या बनवणारे सुतार, गवंडी हार्डवेअरच्या दुकानातूनच प्लायवुड खरेदी करतात. प्लायवुडचे घाऊक आणि किरकोळ व्यापारीही आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यालयासाठी प्लायवुड तयार करून मोठमोठ्या औद्योगिक कंपन्यांना त्यांच्या मागणीनुसार देता येईल.

    प्लायवुड उद्योगात प्लायवुडच्या शीट विविध आकारांमध्ये विकल्या जातात. डेलाइट प्रेस, ट्रिमिंग आणि सायझिंग मशीन, क्रॉसकट सॉ मशीन, डॉक्टर रोलर या काही यंत्रसामग्री या व्यवसायासाठी आवश्यक आहेत. याशिवाय ग्लू-स्प्रेडर, पिलिंग मशीन, अनरीलिंग मशीन, हेवी ऑटोमॅटिक क्लिपर, सिझनिंग फर्नेस, बॉयलर, रोटर कट मिलर, डबल ड्रम सेंटर, ब्लेड हीटिंग सिस्टम इ. यंत्रसामग्रीचीही आवश्यकता असते.

  • थंड पेयांचा व्यवसाय

    थंड पेयांचा व्यवसाय

    भारतात सरबत, फळांचा रस, सोडा, गार पाणी यासारख्या पेयपदार्थ विक्रीच्या क्षेत्रात अलिकडच्या वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. ही पेये अल्कोहोल नसणारी आहेत. फळे, काजू, मुळे, औषधी वनस्पतींच्या इतर स्त्रोतांपासून नैसर्गिक ‘फ्लेवर’ तयार केले जातात. भारतातील लोकप्रिय पेयांमध्ये ‘बिस्लेरी’, ‘माझा’, ‘स्प्राइट’ आणि ‘फ्रुटी’ यांचा समावेश आहे. भारताची लोकसंख्या, अर्थव्यवस्थाही वाढत असून परिणामी खाद्यपदार्थ-पेयांचीही गरज भासू लागली आहे. भारतातील पेय उद्योगात वाढ होण्याची मोठी क्षमता आहे. या व्यवसायात सामील होणे हा एक फलदायी उपक्रम आहे.

    सर्वात आधी बाजारपेठेची पाहणी करणे आवश्यक असते. बाजाराची गरज ओळखून नंतर आपण बनवू इच्छित असलेल्या विशिष्ट उत्पादनावर निर्णय घ्या. व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च लागू शकतो, याचा अंदाज बांधावा. भोवतालच्या थंड पेय विक्रेत्यांशी संपर्क साधून उत्पादनासाठी बाजारपेठ आणि विपणन योजना विकसित करा. भारतात थंड पेयनिर्मितीचा कारखाना सुरू करण्यासाठी एकूण रु. 30 लाख ते 1 कोटी इतकी गुंतवणूक आवश्यक असेल. थंड पेयाच्या प्रकारानुसार, पेय तयार करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते. कारखान्यात शुद्ध पाण्याचा पुरेसा पुरवठा असावा लागतो. साखर, संरक्षक, कार्बोनेटेड पाणी आणि कृत्रिम फ्लेवर यासारख्या कच्च्या घटकांची आवश्यकता असते. म्हणून ताज्या फळांचा पुरवठा होण्यासाठी फळांच्या बागा सुविधेजवळ असणे आवश्यक आहे.

    पेय उत्पादन सुविधा स्थापित करताना योग्य जागा निवडणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाला धोका होऊ नये यासाठी बहुतेक कारखाने शहरांच्या बाहेरील बाजूस असतात. या व्यवसायात यंत्रसामग्रीच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नये. उच्च-गुणवत्तेची यंत्रे, अत्याधुनिक साधने आणि उपकरणे कारखान्यांमध्ये वापरली जातात. पेय कंपनीच्या यशासाठी योग्य जाहिरात आणि युक्तीचा वापर महत्त्वपूर्ण आहे. यासाठी आकर्षक ‘लोगो’ वापरला पाहिजे. आपल्याकडे उत्तम विक्री कौशल्य असायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पादनाची किंमत योग्य असणे फार गरजेचे आहे. उत्पादन आणि विक्रीच्या किंमतीमध्ये तफावत असणे महत्त्वाचे आहे.

  • टरबूज लागवड

    टरबूज लागवड

    ‘टरबूज’ हे मूळ दक्षिण आफ्रिकेतील फळ आहे. टरबूजाच्या रसामध्ये प्रथिने, खनिजे आणि कार्बोहायड्रेट्ससह 92% पाणी असते. जपानमध्ये काचेच्या पेटीत टरबूज वाढवतात. टरबूजांची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये केली जाते. टरबूज खोल, सुपीक आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले वाढते. वालुकामय किंवा वालुकामय चिकणमाती जमिनीवर वाढल्यास ते उत्तम परिणाम देते. जमीन नांगरून चांगली मशागत करावी लागते.

    टरबूज चवीला चांगले असण्यासोबतच आरोग्यदायी देखील असते. या फळामध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. टरबूजाच्या सेवनाने शरीराला उष्णतेपासून आराम मिळतो. तसेच टरबूजामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.

    उत्तर भारतात टरबूजाची पेरणी फेब्रुवारी-मार्च महिन्यात केली जाते. ईशान्य आणि पश्चिम भारतात पेरणी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान केली जाते. टरबूज थेट बियाणे किंवा रोपवाटिकेत प्रत्यारोपण केले जाऊ शकते. नंतर मुख्य शेतात लावले जाऊ शकते. उन्हाळी हंगामात दर आठवड्याला पाणी द्यावे लागते. पक्वतेच्या वेळी गरज असेल तेव्हाच पाणी द्यावे. टरबूजाच्या शेतात जास्त पाणी टाळावे. सिंचनाच्या वेळी, वेली किंवा वनस्पतींचे भाग ओले करू नयेत. भारी जमिनीत वारंवार सिंचन टाळावे; कारण ते जास्त वनस्पती वृद्धीला प्रोत्साहन देईल. या फळाला उत्तम गोडपणा आणि चवीसाठी काढणीपूर्वी 3 ते 6 दिवस आधी सिंचन थांबवावे.

    टरबूज फोडताना जर ते पोकळ वाटत असेल, तर ते काढणीसाठी तयार असल्याचे समजावे. अपरिपक्व फळांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. पिकलेल्या फळांची काढणी करण्यासाठी, धारदार छाटणी किंवा चाकू वापरले जातात. टरबूज हे हृदय आणि डोळ्यांसाठी फायदेशीर असते. ते किडणीचे कार्य सुरळीत ठेवते. तुम्ही सकाळी टरबूज खाऊ शकता. रात्री टरबूज खाणे शक्यतो टाळावे. टरबूजामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते पचायला वेळ लागतो. टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी, दूध किंवा लस्सी पिणे टाळावे.

  • गोराईतील विश्व विपश्यना पॅगोडा

    गोराईतील विश्व विपश्यना पॅगोडा

    मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला विश्व विपश्यना पॅगोडा हा जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे. हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास आले आहे. जगभरातून पर्यटक येथे भेट देत असतात. दरदिवशी या पॅगोडाला १.५ ते २ हजार पर्यटक भेट देत असतात. गौतम बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी सन २००० मध्ये हा पॅगोडा बांधण्यात आला आहे. येथे विपश्यना ध्यानधारणेची माहिती दिली जाते. दरदिवशी या पॅगोडाला १.५ ते २ हजार पर्यटक भेट देत असतात. महाराष्ट्रातील हे एक आश्चर्य आहे.

    जून २०१३ मध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी विश्व विपश्यना पॅगोडा हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. पॅगोडामध्ये असलेल्या गौतम बुद्धांच्या स्मृतिचिन्हातून परावर्तित होणाऱ्या तरंग लहरी विपश्यना करणाऱ्या साधकांना त्यांच्या ध्यानधारणेत सहाय्य करुन मनःशांतीच्या शोधात असणाऱ्या साधकांना आध्यात्मिक आनंद देतात. एकाच वेळी ८ ते १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था याठिकाणी आहे. पॅगोडाच्या कळसाची उंची २९ मीटर असून ते भूकंपरोधक आहे. मुंबई परिसरात आज साधारण १५० जवळपास बौद्ध लेणी असली तरी मुंबईला भगवान बुद्धाचा सहवास इथेच लाभला आहे. विपश्यना ही सुरुवातीला फक्त बौद्ध भिक्षूंसाठी होती, पण एस. एम. गोयंका यांनी ती उपासकांपर्यंत पोहचवली.

    गोराईच्या या विश्व विपश्यना पॅगोडामध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी ठेवल्या आहेत. असे म्हणतात, की भगवान बुद्ध इथे त्यांच्या धम्मकायेने राहतात. शरीरधातूरूपात निवास करतात. येथील एका स्तूपाच्या घुमटीत गौतम बुद्धांचे असलेले शरीरधातू म्हणजे गोराईच्या या पॅगोडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. विपश्यना हा एक ध्यान करण्याचा मार्ग आहे. यात साधक पारंगत झाल्यावर निर्वाण मार्गाची शिडी चढू लागतो. येथे विपश्यनेला कुठल्याही जाती-धर्माचे बंधन नाही. पॅगोडाच्या मध्यभागी असलेल्या धर्मचक्रावर गौतम बुद्धांचे शरीर अवशेष ठेवण्यात आले आहेत.

    आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात ‘भट्टिप्रोलु’ या पुरातत्त्वीय स्थळी सन १८९२ मध्ये उत्खनन करताना गौतम बुद्धांचे अवशेष सापडले होते. ते चेन्नईच्या शासकीय वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आले. सन १९२१ मध्ये बोधगयेच्या महाबोधी सोसायटीला हे शरीरधातू हस्तांतरित करण्यात आले. सन २००६ मध्ये यापैकी काही अवशेष गोराईच्या विश्व विपश्यना पॅगोडामध्ये ठेवण्यात आले आहेत. येथे जाण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकावर उतरून गोराईला यावे. तेथील जेट्टीवरून पॅगोडाला जाणाऱ्या बोटीने जावे. पुढे चालत गेल्यावर पॅगोडाला पोहोचता येते.

  • उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा 

    उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा 

    मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा म्हणजे सुट्टीमध्ये बच्चेकंपनीसाठी आनंदाची पर्वणीच! नवी मुंबई, ठाणे जिल्हा, मुंबई शहर – उपनगर इथून अनेक पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला हमखास भेट देतात. पिरवाडी समुद्रकिनारा गाठण्यासाठी उरणपर्यंत सार्वजिनक बस वाहतुकीची सोय आहे. त्याचप्रमाणे रस्तेमार्गे किंवा रेल्वेनेही आपण उरणपर्यंत जाऊ शकतो.

    पिरवाडी समुद्रकिनारा १३०० मीटरचा आहे. हा किनारा खडकाळ आहे. नारळ पोफळीच्या बागा, सुपारीच्या बागा आहेत. उरणमध्ये गोड्या पाण्याच्या विहिरीही आहेत. उरण हे समुद्राने वेढलेले असून पूर्वेला द्रोणागिरी डोंगर, दक्षिणेला रेवस बंदर, पश्चिमेला अथांग पसरलेला समुद्र, तर उत्तरेला मुंबई पसरलेली आहे.

    पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना मनःशांती लाभते. त्यामुळे त्या शांततेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांचा ओढा या समुद्रकिनारी वाढता आहे. टेकडीवरून दिसणारी बंदरे, होड्या या किनाऱ्याचे सौंदर्य अधिक वाढवतात. सकाळी आणि संध्याकाळी मच्छीमारबांधव ताजे मासे घेऊन या किनाऱ्यावर येतात.

    त्याचप्रमाणे पूर्व परवानगी असल्यास उरणमध्ये ओएनजीसी कंपनीचे केंद्र तुम्ही पाहू शकतात. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पालाही भेट देऊ शकतात. उरणच्या जवळच मोरा बंदराजवळ भारतीय नौदलाचा तळही आहे.

  • कांचन किल्ला

    कांचन किल्ला

    अजिंठा सातमाळा रांगेत पूर्व-पश्चिम दिशेने कांचन किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. ‘कांचनबारीची लढाई’ याच किल्ल्याच्या परिसरात झाली होती. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांबरोबर ही लढाई झाली. ‘बारी’ या शब्दाचा अर्थ खिंड असा आहे. या खिंडीमार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘कांचन’ किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी, असे म्हंटले जाते. कांचन किल्ला तीन भागात विभागलेला आहे. दोन मुख्य भाग कांचन व मंचन म्हणून ओळखले जातात. किल्ल्यावर जाण्यासाठी खेळदरी गावातून जावे लागते. गडाच्या पूर्वेकडील कातळ टप्प्याकडे पोहाचवण्यास तीन तास लागतात. उजवीकडे गेल्यावर गुहा पाहायला मिळते.

    माथ्यावर रांगेत खोदलेली पाण्याची ५ टाके आहेत. थोडी तटबंदी शाबूत आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पाण्याचे टाक व गुहा पहायला मिळतात. त्यांच्यापुढे दोन थडगी, उध्वस्त वास्तूचे अवशेष दिसतात. येथे जाण्यासाठी प्रथम नाशिकला जावे. नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानकातून सटाण्याला जाणारी बस पकडून खेळदरी गावात उतरावे. या गडावर राहण्याची, जेवणाची सोय नसून पिण्याचे पाणी आहे.

    या परिसरात झालेले युद्ध प्रसिद्ध आहे. सन १६७० मध्ये सुरतेची दुसऱ्यांदा प्रचंड लुट करुन महाराज बागलाणच्या दिशेने निघाले. त्यानंतर दाऊदखान हा मोगली सरदार बर्‍हाणपूराहून महाराजांच्या पाठलागावर निघाला. चांदवडजवळ पोहोचताच स्वराज्यात जाण्यासाठी सातमाळ डोंगररांग ओलांडणे आवश्यक होते. तेथेच दाऊदखान येण्याची शक्यता गृहीत धरुन महाराजांनी रात्रीच आपल्या १५००० फौजेपैकी पाच हजार पायदळ, लुटीची घोडी व सामान पुढे पाठवून स्वत: १०००० फौजेनिशी मागे राहिले होते. सकाळच्या वेळी युध्दाला सुरूवात झाली. या युध्दात खुद्द महाराजांसह प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव, भिकाजी दत्तो यांनी भाग घेतला. मोगली सेनेचा दारुण पराभव झाला. हे युद्ध मैदानात समोरासमोर झाले.

  • पेंच व्याघ्र प्रकल्प

    पेंच व्याघ्र प्रकल्प

    पेंच व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्राच्या सीमेवरील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून त्याचे मोठे क्षेत्र मध्यप्रदेश राज्यात आहे. मध्यप्रदेशातील ‘छिंदवाडा’ जिल्ह्याचा भाग या राष्ट्रीय उद्यानाने व्यापला आहे. या उद्यानाचे नाव ‘पेंच’ या नदीवरून पडले आहे. या नदीचा प्रवास उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने आहे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याशी हा प्रकल्प संलग्न आहे. पेंच राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांची विपुलता आहे. या द्यानाचा उल्लेख अनेकदा पेंच राष्ट्रीय उद्यान म्हणून केला जातो. ‘पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान’ असेही या उद्यानाला म्हणतात. सन 1977 मध्ये या क्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. सन 1983 मध्ये या अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर सन 1992 मध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ अंतर्गत व्याघ्र प्रकल्प म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. नोंदीनुसार, या राष्ट्रीय उद्यानाला सन 1999 मध्ये भारतातील 25 व्या व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झाला.

    या व्याघ्र पकल्पात 210 हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांना पर्यटक भेट देऊ शकतात. ज्यामध्ये अनेक स्थलांतरित प्रजातींचा समावेश आहे. याच प्रकल्पाने रुडयार्ड किपलिंग याला ‘द जंगल बुक’ लिहिण्यास प्रोत्साहित केले, ज्यामध्ये ‘मोगली’ हा मुख्य पात्र होता. अनेक साहसी पर्यटकांना रोमांचित करणारे हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत. पेंच नदी आलोंडून ‘तोतलाडोह’ येथे बांधलेल्या ‘मेघदूत’ धरणाने ७२ चौकिमीचा एक मोठा जलसाठा तयार केला आहे. या जलसाठ्याचा ५४ चौकिमीचा भाग मध्यप्रदेश आणि उर्वरित महाराष्ट्र लगतच्या राज्यात येतो. बंगाली वाघ, सांबर, लांडगे, आळशी अस्वल, भारतीय बिबट्या, चितळ, गवे,नीलगाय, चौसिंग असे अनेक प्राणी येथे पहायला मिळतात.

    वनस्पतीमध्ये सागवानाच्या वेगवेगळ्या प्रजाती, बांबूची वने तसेच गवताळ कुरणे ही जास्त प्रमाणात आढळतात. पर्यावरणीयदृष्ट्या पेंच हे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने असलेले ठिकाण आहे. येथे जायचे असल्यास विमान मार्गाने गेलात तर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पेंचला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. विमानतळ पेंचपासून अंदाजे 105 कि.मी. अंतरावर आहे. रेल्वेने गेल्यास पेंचला जाण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानक हे सर्वात जवळचे रेल्वेस्थानक आहे. पेंचपासून ते 105 किमी अंतरावर आहे. हे भारतातील सर्व प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे.

    रस्त्याने गेल्यास नागपूरातून ते राज्य परिवहन बसगाड्यांनी चांगले जोडले आहे. येथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे. अलीकडे शासनामार्फत पर्यटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. आता वन विभागाने ‘पेंच’ नदीतून पर्यटकांसाठी बोट सफारी सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. ही सफर पेंच नदीतून केली जाणार आहे. यामुळे पाणी पिण्यासाठी येणारे प्राणी पर्यटकांना दिसणार आहेत.

  • मार देण्यापेक्षा प्रेम द्या

    मार देण्यापेक्षा प्रेम द्या

    मुले ऐकत नाहीत, हट्ट करतात, अभ्यास नीट करीत नाहीत, उलटून बोलतात म्हणून आई-बाबांचा संताप होतो. त्या संतापातून मुलांना मारले जाते. मुले तात्पुरती ऐकतात, हट्ट सोडतात.. पण म्हणून मुलांना मारल्याने शिस्त लागली असे होत नाही. मुलांना मारण्याचे परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊन त्याचा परिणाम मुलांच्या वर्तनावर, त्यांच्या विकासावर आणि सामाजिक वर्तनावर होतो; म्हणून तज्ज्ञ मंडळी मुलांना मारण्याऐवजी प्रेमाने समजून सांगण्याचा, समजून घेण्याचा सल्ला देतात.

    तज्ज्ञ म्हणतात, मुलांना मारणे हा कुठल्याच समस्येवरचा उपाय नाही. याचा चांगला परिणाम होणे दूरच राहते. दुष्परिणामच जास्त होतात. मुलांना मारुन, त्यांच्यावर चिडून-ओरडून त्यांना शिस्त लावता येते, हा चुकीचा समज आहे. उलट मुलांना मारुन, त्यांच्यावर ओरडून पालक मुलांना असेच वागण्याचा जणू परवाना देत असतात. मुलांना आपल्या लहान भावंडांना मारण्याची सवय लागते. छोट्या चुका झाल्या तरी मुले आई-बाबा मारतील या शंकेने घाबरतात; आणि लहान भावंडांना मारुन, मारण्याची भीती दाखवून घाबरवतात. काही झाले की मारणे हाच योग्य पर्याय आहे, असा समज मुलांंच्या मनावर पक्का होतो आणि मुले मारकुटी, भांडकुदळ होतात.

    मुलांना मारण्याचा परिणाम केवळ शारीरिक पातळीपुरताच मर्यादित राहत नाही; तर त्याचा मानसिक आणि भावनिक परिणामही होतो. मुलांकडून काहीही चुका झाल्यास पालक मुलांना मारत असतील, तर मुलांना आपण वाईट मुलगा अथवा वाईट मुलगी असल्याची जाणीव होते. या जाणिवेचा परिणाम म्हणजे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. मुलांचा आत्मविश्वास कमी होतो.

    मारल्यानंतर मुले ऐकतात, हा पालकांचा गैरसमज आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मुलांना मारले गेले तर मुले स्वत:ला दोषी समजायला लागतात, पालकांना घाबरतात. त्यांना छोट्या-छोट्या गोष्टी सांगण्याचे टाळतात. मुलांना मारल्याचा परिणाम नात्यावर होतो. मुले आणि पालक यांच्यात दुरावा निर्माण करतो. मुलांना सतत शारीरिक शिक्षा केल्याने मुले काही काळ घाबरतात, दबकून राहतात. पण आई-बाबा काहीही झाले तरी मारतातच, असा समज करुन कोडगी होतात. थोडे मोठे झाल्यावर आई-बाबांना विरोध करणे, त्यांचे काहीच न ऐकणे , घरात-बाहेर चुकीचे वागणे अशा भूमिकेतून एक प्रकारचा विद्रोह पुकारतात. ही विद्रोही भूमिका मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करते.

    मुलांना मारल्या ने त्यांच्यात नकारात्मक भाव निर्माण होतात. आई-बाबा मारतात म्हणून आतल्या आता चडफडतात. सतत मनात राग साचत राहिल्याने हा राग नकारात्मक पध्दतीने बाहेर काढतात. मुले सतत मार खाऊन चिडचिडी आणि रागीट होतात.

  • राणीहाराची परंपरा आजही कायम

    राणीहाराची परंपरा आजही कायम

    महिलांच्या सुंदरतेमध्ये भर घालतात ते म्हणजे दागिने ! चेहर्‍यावरील मेकअप, केशरचना आणि साड्यांसह दागिन्यांमुळे स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलून येते. प्रत्येक महिलेकडे वेगवेगळ्या पद्धतीचा दागिन्यांचा ‘सेट’ हा असतोच. कोणत्या कार्यक्रमात कसे दागिने वापरायचे हेदेखील ती ठरवत असते. तसे तर आज काल बाजारात विविध प्रकारचे आकर्षक दागिने दिसून येतात; परंतु काही पारंपरिक दागिने मात्र आजही आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. सगळ्यात लक्ष वेधून घेणारा दागिना म्हणजे ‘राणीहार’ ! अर्थात ‘राणीहार’ म्हटले की आपल्यासमोर पूर्वीच्या राण्यांच्या प्रतिमा उभ्या राहतात. आजही अनेक नववधू लग्नामध्ये ‘राणीहार’ घालण्याला प्राधान्य देतात.

    हा ‘राणीहार’ कोणत्याही सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानातून विकत घेऊ शकता. ‘राणीहार’ हा खरे तर राजस्थानी संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करतो. राजस्थानच्या राजघराण्यातील महिला आपल्या श्रृंगारात या हाराचा समावेश करून घेत होत्या. कोणत्या शतकात या हाराची निर्मिती झाली अथवा कोणत्या राणीने सर्वात पहिल्यांदा या हाराचा उपयोग केला, हे सांगणे तसे कठीण आहे; मात्र, आजही राजपूत घराण्यात अशा पद्धतीचे ‘राणी हार’ घालण्याची परंपरा कायम आहे. अनेक घरात पिढ्यानपिढ्या हा हार जपत असल्याचे दिसून येते. पूर्वीच्या काळी हा हार राणी घालत असल्यामुळेच याला ‘राणी हार’ असे नाव प्राप्त झाले. मोती अथवा रत्नांनी हा हार पूर्वीपासून तयार करण्यात येतो. किमान तीन ते चार लड असणारा हा ‘राणीहार’ अत्यंत सुंदर दिसतो आणि मोठा असतो.

    आजच्या काळात यामध्ये अनेक बदलही झालेले दिसून येतात. मुख्यत्वे आता केवळ श्रीमंत घराण्यातील महिलाच नाही, तर अगदी मध्यमवर्गीय महिलाही अशा पद्धतीचा ‘राणीहार’ आपल्या दागिन्यांमध्ये समाविष्ट करून घेतात. आता यातही नवे ‘ट्रेंड’ येताना दिसतात. तुम्हाला ‘चोकर’ सह जास्त लड असणारा ‘राणीहार’ मिळू शकतो. तसेच तुम्ही एखाद्या भरजरी साडी अथवा भरजरी लेहंग्यावर याचा वापर करू शकता . 5 लड असणारा ‘राणीहार’ही उपलब्ध असतो. हा तुम्ही ‘व्ही’ नेकलाईनच्या ब्लाऊजवर घालू शकता. साधारणतः 3-5 लड असणारे ‘राणी हार’ तुम्हाला सोनाराच्या दुकानात अथवा बाजारात ‘इमिटेशन ज्वेलरी’मध्ये उपलब्ध होतात. जे तुम्ही भरजरी साड्या अर्थात ‘कांजीवरम’ साडी, ‘बांधणी’ अथवा ‘बंधेज’ साडी, ‘लहरिया’ साडी, लेहंगा यासह परिधान करू शकता.

    राणीहार हा रत्न, मोती आणि वेगवेगळ्या खड्यांनी तयार करण्यात येतो. याची मूळ किंमत ही लाखोंच्या घरात असते. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने ‘राणीहार’ तयार करून घेऊ शकता. तुम्हाला ‘आर्टिफिशियल’ अथवा ‘इमिटेशन’ राणीहार हवा असेल, तर तो बाजारामध्ये साधारणतः 500 रूपयांपासून ते तुमच्या खिशाला परवडेल अशा किंमतीपर्यंत मिळू शकतो. तुम्हाला वेगवेगळ्या ‘डिझाईन्स’ आणि तुमच्या आवडत्या खड्यांमध्येही राणीहार मिळू शकतात. तुम्ही तुमच्या लेहंगा आणि साडीच्या रंगाप्रमाणे याची खरेदी करू शकता.

  • आरोग्यवर्धक लिंबू पाणी

    आरोग्यवर्धक लिंबू पाणी

    लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. लिंबू पाणी मुळातच चवदार असते. या पाण्यात अनेक पोषकतत्त्वे असतात. हे पाणी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. लिंबू पचनासाठीही खूप प्रभावी मानले जाते. लिंबामध्ये जीवनसत्व-सी भरपूर प्रमाणात आढळते. वजन कमी करण्यासाठीही लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेकजण सकाळची सुरुवात या पेयाने करतात.

    लिंबाच्या रसामध्ये असलेले जीवनसत्व आणि खनिजे पचनक्रिया व्यवस्थित ठेवतात. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून ते रिकाम्या पोटी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकते. यामुळे जळजळ कमी होते, वजन कमी करण्यासोबत अपचनाच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

    लिंबामध्ये जीवनसत्व-सी जास्त असते. लिंबाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फोलेट, जीवनसत्व-बी सारखे पोषक घटक आढळतात. हे घटक तणावामुळे होणारा तीव्र दाह टाळण्यास मदत करतात. यामध्ये असलेले जीवनसत्व-सी अन्नातून लोह शोषण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारते.

    लिंबू पाण्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्याही कमी होऊ शकतात. लिंबू पेयामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. रक्तदाब कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतात. लिंबू पाण्यात कॅल्शियम आणि पोटॅशियम हे दोन्ही घटक मुबलक प्रमाणात आढळतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहेत.
    लिंबू पाण्याचे हे लाभ लक्षात घेऊन वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याचे नियमित सेवन करण्यास हरकत नाही.

  • तर्री पोहे

    तर्री पोहे

    पोह्यांसाठी साहित्य : पोहे २ कप, तेल १ मोठा चमचा, मोहरी १ लहान चमचा, जिरे १ लहान चमचा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या १-२, शेंगदाणे पाव कप, कांदा अर्धा कप (उभा चिरलेला), हळद अर्धा लहान चमचा, साखर १ लहान चमचा, मीठ चवीनुसार, उकडलेल्या एका बटाट्याचे मध्यम आकाराचे तुकडे, लिंबाचा रस १ लहान चमचा, कोथिंबीर १ मोठा चमचा.

    तर्रीसाठी साहित्य : हरभरा २ कप (भिजवलेलेला), मीठ चवीनुसार, तेल, खोबरे अर्धा कप, कांदे २-३ मध्यम आकाराचे (चिरलेले), टोमॅटो २-३, लसूण ५-६ पाकळ्या, आले १ इंच तुकडा, दालचिनी १ इंच, हिरवी वेलची ३-४, काळी वेलची १-२, लवंग ४-५, काळे मिरे – ४-६, तमालपत्र २-३, आमचूर पावडर – १ लहान चमचा, मोहरी १ लहान चमचा, जिरे १ लहान चमचा, हिंग १ लहान चमचा, हळद अर्धा लहान चमचा, लाल तिखट ४ मोठे चमचे, कोथिंबीर ,जिरा पावडर १ लहान चमचा, काळा मसाला – २ लहान चमचा, मीठ चवीनुसार, पाणी

    कृती : सर्वप्रथम तर्री बनवण्यासाठी आदल्या रात्री हरभरा भिजत घाला. दुसऱ्या दिवशी ते चांगले धुवून घ्या आणि कुकरमध्ये ठेवा. आता त्यात चवीपुरते थोडे मीठ आणि पाणी टाकून शिजवा. कुकरच्या २ ते ३ शिट्या करा. कुकर थंड झाल्यानंतर त्यातील हरभरे काढून घ्या. त्याचे पाणी फेकू न देता ते एका बाजूला ठेवा. आता तर्री बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात खोबरे टाकून ते तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात कांदा, आले, लसूण टाका. हे नीट शिजल्यानंतर सर्व खडा मसाला टाका. २ मिनिटे मध्यम आचेवर नीट भाजून घ्या. आता गॅस बंद करून हे थंड होऊ द्या. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेवून बारीक वाटण करा.

    आता त्याच पॅनमध्ये अजून अर्धा कप तेल घ्या. तेल गरम करा आणि त्यात जिरे, मोहरी, तमालपत्र आणि हिंग घाला. आता त्यात तयार केलेले वाटण घाला. सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. आता गॅस कमी करा आणि त्यात तिखट, हळद, मीठ घालून छान मिसळून घ्या. मसाल्यातून तेल वेगळे होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता त्यात शिजलेले चणे, ताजी चिरलेली कोथिंबीर घालून २-३ मिनिटे शिजवा. त्यात हरभऱ्याचे पाणी आणि थोडे अजून पाणी घाला. उकळी येईपर्यंत शिजवा. तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. नंतर आमचूर पावडर घाला, मिसळून घ्या, उकळी आणा. मध्यम आचेवर किमान २०-२५ मिनिटे शिजवा. कोथिंबीरीने सजवा.

    नेहमीचे कांदे पोहे बनवता तसे कांदे-पोहे बनवा. एका प्लेटमध्ये कांदे पोहे घ्या. त्यावर ही तयार केलेली तर्री टाका. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून सजवा. सोबत लिंबाची फोड देऊन खाण्यास द्या.

  • सीएफएल दिव्यांची निर्मिती

    सीएफएल दिव्यांची निर्मिती

    प्रत्येक घरात विद्युत उपकरणे अत्यावश्यक आहेत. प्राचीन काळी रॉकेलचे दिवे प्रकाशासाठी वापरले जायचे. तंत्रज्ञान बदलामुळे आज प्रत्येक घरात विविध उपकरणांसाठी वीज वापरली जाते. विजेचा वापर केवळ घरातील दिवा लावण्यासाठी केला जात नाही, तर विजेवर चालणाऱ्या अनेक उपकरणांसाठी केला जातो.

    गेल्या काही वर्षांत सरकारने वीजनिर्मिती वाढविण्याकडे लक्ष वळविले. आज ज्याठिकाणी अपारंपरिक स्रोतांपासून वीज किंवा ऊर्जानिर्मिती केंद्रे उभारली जात आहेत, तेथे राजकीय किंवा सामाजिक विरोधामुळे त्या प्रकल्पांना विरोध होत आहे. पुरवठा आणि उत्पादनात मोठी तफावत असल्याने विजेवर चालणाऱ्या उपकरणांसाठी विजेचा प्रश्न निर्माण होऊ लागला. ग्रामीण भागात काही ठिकाणी 10 ते 15 तास विजेची बचत होते. विजेअभावी लोक शेतीला पाणी देऊ शकत नाहीत; परिणामी कृषी उत्पादनात घट होते. रात्री वीज नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. रेशन दुकानातून घासलेट गायब झाले आहे. या सर्वांवर पर्याय म्हणून विजेची बचत करण्यासाठी नवीन सुधारित दिव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. प्राचीन काळी, आपण आपल्या घरांमध्ये वापरलेले बल्ब साधारणपणे साठ वॅटचे होते. ट्यूब चाळीस वॅट्सची होती. साधारणपणे 4 ते 5 खोल्यांच्या घरांना 300 ते 400 वॅट वीज लागते.

    घरातील दिवे वर्षातून 4 ते 5 वेळा बदलावे लागत होते. सीएफएल दिवे किमान एक वर्ष खराब होत नाहीत. त्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्याही अशीच हमी देतात. याचा अर्थ सीएफएल दिवे 10 ते 15 वॅट्स अतिशय तेजस्वी आणि स्वच्छ प्रकाश देतात. विजेची खूप बचत होते. सीएफएल दिवे, ट्युब आणि चोकच्या उत्पादनास मोठी मागणी आहे. प्रत्येक घरात दिवे आणि ट्यूबची गरज असल्याने प्रत्येक घराला ग्राहक मानून घरोघरी मार्केटिंग केले जाते. सीएफएल दिवे-ट्यूब उत्पादने विकणारे विशेष घाऊक विक्रेते असतात. इलेक्ट्रिकल दुकाने, स्टेशनरी, मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्येही या उत्पादनांना चांगली मागणी आहे. सीएफएल दिवे, ट्युबची छोटी दुकाने तसेच रस्त्याच्या कडेला बसून विक्रेते चांगला व्यवसाय करताना दिसतात.

    या उद्योगासाठी तांब्याचा पत्रा, एम.एस. शिट, हीटर निक्रोम वाई, ग्लासवूल, व्हायलेट कॅम्प, बी.एस. पाईप, थर्मोस्टॅट, ओले पाईप इत्यादी कच्चा माल वापरला जातो. लोह, सोल्डर, पेस्ट, कटर, कंपास, पीसीबी बोर्ड, सोल्डरिंग वायर, स्लीव्ह ॲल्युमिनियम, पीव्हीसी होल्डर व्हाइट, सिमेंट, चिपको, रील स्टँड, टेस्टिंग बोर्ड, कम्प्लीट टूल किट, ॲल्युमिनियम वायर, कॉपर वायर इ. एचपी मोटर, हँड प्रेस, फोर कॉइल विंडिंग मशीन रंग इ. साहित्य आवश्यक असते.

  • लोणचे व्यवसाय

    लोणचे व्यवसाय

    लोणचे बनविण्याचा व्यवसाय हा घरगुती पातळीपासून ते मोठ्या उद्योगापर्यंत करता येणारा महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे. लोणचे हा भारतीयांचा सर्वात आवडता पदार्थ आहे. लोणचे जेवणातील स्वादिष्टता वाढवते. बाजारातील प्रचंड मागणीवर आधारित असणारा हा व्यवसाय सोपा आणि अधिक फायदेशीर आहे. तुम्ही फक्त रु. 10000 च्या माफक गुंतवणुकीत लोणच्याचा व्यवसाय सुरू करू शकता. घरगुती लोणचे हे ग्राहकाला अधिक भावते.

    लोणचे व्यवसायासाठी तुम्हाला फक्त कच्चा माल लागेल. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले वेष्टन आणि ब्रँडिंग असते. आपले उत्पादन जितके चांगले आणि वेष्टन जितके आकर्षक असेल, तितकेच जास्त तुमचे उत्पादन बाजारात विकले जाईल. साधारणपणे, लोणचे बनवण्याच्या व्यवसायासाठी 900 चौरस फूट क्षेत्र आवश्यक आहे. याठिकाणी लोणचे तयार करणे, लोणचे सुकवणे, लोणचे वेष्टनबंद करणे इत्यादींसाठी मोकळी जागा लागते. लोणचे जास्त काळ खराब होऊ नये म्हणून स्वच्छतेबरोबर देखभालीकडेही लक्ष द्यावे लागते.

    तरुणांनी स्वतःचा रोजगार निर्माण करावा. स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करावे, यासाठी सरकारनेही अनेक योजना राबविल्या आहेत. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही या सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, कोणत्याही व्यवसायाचा नफा हा त्याचे विपणन आणि विक्रीवर अवलंबून असतो.

  • खजूर शेती

    खजूर शेती

    खजुराची लागवड प्रामुख्याने अरब देश, इस्राइल आणि आफ्रिका या देशांमध्ये केली जाते. इराण हा खजूरांचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहे. गेल्या दशकांपासून भारत सरकार खजूर लागवडीसाठी खूप मेहनत घेत असून लागवडीखालील क्षेत्र वाढवत आहे. भारतात राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि केरळ ही खजूर पिकवणारी प्रमुख राज्ये आहेत.

    कोणत्याही जमिनीत खजुरची लागवड करता येते. चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी चांगल्या निचऱ्याची, खोल वालुकामय चिकणमाती आवश्यक आहे. माती भुसभुशीत असावी लागते. क्षारयुक्त आणि क्षारीय माती देखील लागवडीसाठी योग्य आहेत. जमीनीची 2 ते 3 वेळा नीट नांगरून चांगली मशागत करावी लागते. माती समतल केल्यानंतर उन्हाळ्यात 1मी x 1मी x 1मी आकाराचे खड्डे खणावेत. हे खड्डे 2 आठवडे उघडे ठेवावेत. नंतर चांगले कुजलेले शेणखत आणि सुपीक मातीने भरावेत. खजुरांचा प्रसार शोषकांच्या सहाय्याने केला जातो; कारण बियाण्यांनी प्रसार होत नाही. मातृ वनस्पतीपासून शोषक निवडावा लागतो.

    लागवडीनंतर चौथ्या किंवा पाचव्या वर्षापासून शोषक मिळतात. शोषकांचे वजन 15-20 किलो असावे लागते. या पिकास उन्हाळ्यात 10-15 दिवसांच्या अंतराने आणि हिवाळ्यात 30-40 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते. फळांच्या संचानंतर नियमित अंतराने सिंचन केले जाते. लागवडीनंतर 4 ते 5 वर्षांनी खजुराची झाडे पहिल्या कापणीसाठी तयार होतात. खलाल किंवा डोका (ताजी फळे), मऊ किंवा पिकण्याची अवस्था (पिंड किंवा तामर) आणि कोरडी अवस्था (चुहारा) अशा 3 टप्प्यांवर फळांची काढणी केली जाते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी काढणी पूर्ण करतात.

  • सोनुर्लीचे श्री देवी माऊली मंदिर

    सोनुर्लीचे श्री देवी माऊली मंदिर

    सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात सोनुर्ली नावाचे एक गाव आहे. या गावची स्थानिक देवता श्री देवी माऊली फार प्रसिद्ध आहे. देवीच्या कृपाकटाक्षाने फार पूर्वीपासून आत्तापर्यंत लाखो लोक पावन झाले आहेत. या पवित्र स्थानाला ‘दक्षिण कोकणचे पंढरपूर’ असे म्हणतात. देवीचे तेजस्वी रुप मन हरखून नेणारे आहे. दरवर्षी होणारा सोनुर्ली माऊली देवीचा जत्रोत्सव ‘लोटांगणाची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध आहे. श्री देवी माऊली देवस्थान हे जिल्ह्यासह राज्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. देवीच्या या वार्षिक जत्रोत्सवासाठी राज्यभरातून लाखो भाविक उपस्थित राहून देवी माऊलीचे दर्शन घेतात. मुंबई, गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी आदी भागातून हजारो भाविक या यात्रेसाठी येतात.

    जत्रोत्सवासाठी माऊली मंदिराची व परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या काही मोठ्या जत्रा आहेत, त्यांची सुरुवात सोनुर्लीच्या जत्रेपासून होते. कोजागिरी पौर्णिमेच्या जागराने जत्रोत्सवाची चाहूल लागते. या जागरांची सुरुवात कार्तिक पौर्णिमेला होते.

    सुमारे पाचशे वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेले हे मंदिर आहे. सोनुर्ली हे गाव लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यात आहे. सावंतवाडीतून या गावी जाण्यासाठी एस टी बसेस असतात. सावंतवाडी शहरापासून हे गाव साधारण १८ किमी. अंतरावर असून जवळपास २५०० इतकी लोकसंख्या आहे. अलीकडेच या मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून सुंदर प्रशस्त मंदिर मनोवेधक आहे. माऊलीचा जत्रोत्सव ‘लोटांगणाची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध आहे. देवीला भाविक लोटांगणाचा नवस बोलतात. नवस पूर्ण होऊन मनोकामना पूर्ण झाल्यानंतर लोटांगण घालून नवसफेड केली जाते. रात्री उशिरापर्यंत हा सोहळा सुरू असतो.

    देवीची प्रचिती अनेकांना आहे. त्यामुळे येथे भाविक लोटांगण, तुलाभार करण्याचा नवस बोलतात. जत्रेदिवशी रात्री महिला उभ्या राहून संपूर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात. पुरुष भाविक जमिनीवर झोपून लोटांगण घालतात. ही लोटांगणे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी तुलाभार केला जातो. ज्या व्यक्तीविषयी नवस बोलला गेला असेल, त्या व्यक्तीला तराजूच्या एका पारड्यात बसवून दुसऱ्या पारड्यात त्याच्या वजनाइतक्या वस्तू घालून त्या देवस्थानास देणगी स्वरूपात प्रदान केल्या जातात. सोनुर्लीतील हे मंदिर पाहण्यासाठी, देवीचे दर्शन घेण्यासाठी एरव्हीसुद्धा आवर्जून पर्यटक व भाविक येत असतात. हे देखणे मंदिर पाहताक्षणी मन वेधून घेते.

  • विजयदुर्ग समुद्रकिनारा

    विजयदुर्ग समुद्रकिनारा

    ‘विजयदुर्ग समुद्रकिनारा’ हा महाराष्ट्रातील सर्वात अप्रतिम नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा किनारा म्हणजे या जिल्ह्याचे वैभव आहे. फेसाळणारा अरबी समुद्र, समोरील आकर्षक सौंदर्य आणि अन्य प्रमुख स्थानांव्यतिरिक्त ‘विजयदुर्ग’ हे महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सनाच्या १७ व्या शतकात बांधलेला ‘विजयदुर्ग किल्ला’ पाहण्यासाठी येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. यामुळे विजयदुर्ग समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. त्याचे सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात आवर्जून येतात.

    विजयदुर्ग हा कोकणातील एक मनोहर समुद्रकिनारा आहे. येथे भरपूर हिरवाई आणि निसर्गसौंदर्य आहे. शांतता आणि सुखदायक वातावरणासोबतच विजयदुर्ग किनारा पर्यटकांना अनेक जलक्रीडांचा आनंद देतो. विजयदुर्ग किनाऱ्यावर वॉटर सर्फिंग, स्काइंग, स्कूबा डायव्हिंग, पोहणे आणि पॅरासेलिंग यांसारखे अनेक मनोरंजनात्मक खेळ उपलब्ध आहेत. पर्यटक त्यांचे ओझे भरलेले जीवन आणि व्यस्त वेळापत्रक येथे येऊन निसर्गाच्या कुशीत न्हाऊन निघतात. त्यांना विजयदुर्ग किनाऱ्यावरील स्वच्छ पाण्यात जलचर प्राणी पाहण्याचा आनंद मिळतो.

    विजयदुर्ग किल्ला अनेक स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करीत असल्याने पर्यटक पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतात. विजयदुर्ग किनारा प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यास लावणारा एक किनारा आहे. येथे नैसर्गिक सौंदर्य विपुल प्रमाणात आहे. विजयदुर्ग किनारा आणि किल्ल्याला भेट दिल्यानंतर पर्यटकांना खूप ताजेतवाने आणि शांत वाटते. येथे पर्यटक आराम करतात, फिरतात, बसतात, सूर्यप्रकाशात स्नान करतात आणि सूर्योदय – सूर्यास्ताच्या दृश्यांचे साक्षीदार होतात.

    विजयदुर्ग समुद्रकिनाऱ्याच्या अनुपम सौंदर्याने सर्वजण मंत्रमुग्ध होतात. नारळाची झाडे आणि हिरवीगार झाडे निसर्गाची श्रीमंती वाढवितात. विजयदुर्ग किल्ल्याचे सौंदर्य, तर डोळ्यात आयुष्यभरासाठी भरून राहते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे विजयदुर्गला समशीतोष्ण हवामान आहे. येथे हिवाळा फार थंड नसतो. उन्हाळासुद्धा आनंददायी असतो. विजयदुर्ग किनारा हे असे ठिकाण आहे जिथे व्यक्तीला ऊर्जा मिळते. शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा आणि समुद्रावरील वाऱ्यांमुळे पर्यटकांना चैतन्य मिळते. तथापि, विजयदुर्ग किल्ल्यावर भरपूर पाऊस पडतो. जे पर्यटक खेळांचा आनंद लुटण्यासाठी, मनोरंजनासाठी जाऊ इच्छितात त्यांनी हवामानाचा अंदाज आधीच घेतलेला बरा! येथील पर्यटन सफर प्रसन्नता देणारी आहे.