सह्याद्री मराठी वाहिनी

Author: सह्याद्री मराठी वृत्त

  • चप्पल उद्योग

    चप्पल उद्योग

    ‘चप्पल’ खरेदीची हौस अनेकांना असते. प्रत्येक कपड्याच्या प्रकाराप्रमाणे, सोहळ्याप्रमाणे आपण चप्पलांची निवड करतो. कोणत्या प्रकारच्या वेशभूषेवर कोणती चप्पल शोभून दिसणार याकडेही प्रत्येकाचे लक्ष असते. चला तर मग सर्वांच्या आवडत्या अशा ‘चप्पल उद्योगा’बद्दल आज सविस्तर जाणून घेऊया.

    कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल की सर्वांत प्रथम परवान्यांची आवश्यकता भासते. उद्योग सुरू करताना उद्योग आधार नोंदणी, जीएसटी नोंदणी आणि दुकान कायदा परवाना किंवा ना हरकत प्रमाणपत्र गरजेची असतात. उद्योगाची सुरुवात करताना जर आपण परवाने काढले, तर पुढे आपल्याला कोणत्याच समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

    पादत्राणे म्हणजेच चप्पल उद्योगास आपल्याला सोल कटिंग यंत्र, ग्राइंडिंग यंत्र, स्क्रिन प्रिंटींग यंत्र, ड्रिल यंत्र, पट्टा यंत्र आणि 3 ते ९ क्रमांपर्यंतचे डाय म्हणजेच पायाच्या आकाराचे साचे ही यंत्रे महत्त्वाची आहेत. त्याचप्रमाणे चप्पल बनवण्यासाठी रबराची शीट आणि पट्टा एवढाच कच्चा माल लागतो.

    हा व्यवसाय अगदी घरातूनही सुरू करता येणे सहज शक्य आहे. पण जर एखादी जागा घेऊन उद्योग सुरू करण्याच्या विचारात असाल, तर किमान ६५० स्वे. फूटांची जागा मिळाल्यास चप्पल उद्योग कारखाना आणि विक्री केंद्र हे एकाच ठिकाणी सुरू करणे सहज शक्य होईल.

    चप्पलांचा उद्योग सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक गरजेची आहे. चप्पल बनविणारे कारागिरही आवश्यक आहेत. तुम्ही तयार केलेल्या चप्पला ऑनलाइनही विकू शकतात. त्याचप्रमाणे ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन चप्पलांची निर्मिती केल्यास उत्पन्नात अधिक वाढ होणेही शक्य आहे. केलेली गुंतवणूक वळती झाल्यावर तुम्हांला प्रत्येक चप्पलेच्या जोडामागे किमान ३० ते ५० टक्के नफा मिळवता येऊ शकतो.

  • ड्रायक्लीनिंग व्यवसाय

    ड्रायक्लीनिंग व्यवसाय

    शहरांमध्ये ड्रायक्लीनिंगचा व्यवसाय जोरात सुरू असतो. हा व्यवसाय शहरी आणि निमशहरी भागात व्यवस्थित चालतो, परंतु ग्रामीण भागात जिथे शाळा, महाविद्यालये, कंपन्या, कारखाने आहेत, तिथे हा व्यवसाय जोरात चालतो. बरेच लोक आपले कपडे घरी धुतात. तरीही लोकांचा एक वर्ग आहे, जे कपडे धुण्यासाठी बाहेर देतात. शहरीकरणामुळे किंवा रोजगाराच्या शोधात नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरांकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नोकरी किंवा शिक्षण घेत असताना, कपडे धुण्यासाठी किंवा इतर कामासाठी फारसा वेळ मिळत नाही. मग कपडे धुण्यासाठी किंवा कोरड्या साफसफाईसाठी लॉन्ड्रीमध्ये पाठवले जातात.

    ड्रायक्लीनिंग यंत्र मोठ्या आणि छोट्या बाजारपेठेतही उपलब्ध आहेत. तुमच्या व्यवसायाची क्षमता आणि दररोज किती कपडे ड्रायक्लीनिंगसाठी येतात यावर आधारित यंत्रसामग्री खरेदी करा. एकावेळी चार किंवा दहा कपडे सुकविण्यासाठी कमी-जास्त क्षमतेची यंत्रे उपलब्ध आहेत. ड्रायक्लीनिंग यंत्रे स्वयंचलित असून विजेवर चालतात. विजेची कोणतीही हमी नसल्यास आणि तुम्हाला वेळेवर कपडे परत करायचे असल्यास कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हाताने चालणारे हँड प्रेस ड्रायक्लीनिंग यंत्रदेखील घ्या. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय ड्रायक्लीनिंग यंत्र वापरणे शक्य आहे. यंत्रामध्ये जेवढे कपडे ड्रायक्लीन करण्याची क्षमता आहे, तेवढेच कपडे यंत्रामध्ये ठेवा. यंत्रामध्ये सौम्य स्टीलचा वापर होत असल्याने मशीन सुरू केल्यानंतर मोठा आवाज येत नाही. मशीनच्या पुढच्या अथवा वरच्या भागात असलेल्या पारदर्शक काचेमुळे कपडे बाहेरून धुतलेले दिसतात. कपड्यांमधील घाण, काजळी काढून टाकली जाते. दहा-पंधरा मिनिटांत कपडे स्वच्छ होतात.

    कपडे थोडे कोरडे केल्यावर त्यांना इस्त्री करावी. कपडे स्वच्छ होऊन चमकतात. या कोरड्या साफसफाईच्या प्रक्रियेत, ज्या कपड्यांवर खूप घाण असते आणि ग्रीस किंवा तेलसारखे अदृश्य डाग असतात ते पूर्णपणे साफ होत नाहीत. त्यामुळे कपडे ड्रायक्लीनिंग करताना त्यांच्यासोबत काही रसायनांचा वापर केला जातो. जेणेकरून कपड्यांवरील डाग निघून जातात. कपड्यांच्या ड्राय-क्लीनिंग उद्योगात बेंझिनचा सर्वाधिक वापर केला जातो. पेट्रोलियम पदार्थांपासून बेंझिन तयार होत असल्याने ते ज्वलनशील असते. जर यंत्र गतीने चालवले जात असेल तर ते जळण्याची शक्यता असल्याने सावधगिरीने वापरावे लागेल. बेंझिनमुळे जे डाग काढता येत नाहीत ते बेंझॉल वापरून काढले जातात. कॉटन, टेरीक्लॉथ, रेशमी कपडे, शर्ट, पॅन्ट, कोट, साड्या इत्यादी धाग्यांपासून बनवलेले कपडे धुताना वेगवेगळी रसायने वापरली जातात. यंत्र खरेदी करताना निर्माता-वितरक त्याची संपूर्ण माहिती देतात.

    वर्दळीच्या ठिकाणी ड्रायक्लीनचे दुकान सुरू केले तर स्थानिक ग्राहक कपडे धुण्यासाठी येतात. कपड्यांनुसार किंमत घेऊन तुम्ही उत्पादन घेऊ शकता. स्थानिक रुग्णालये, वसतिगृहे, शासकीय-खासगी कार्यालये, बँका, निवासी वसतिगृहे त्यांचे कपडे ड्रायक्लीनिंग करून घेऊ शकतात. या व्यवसायासाठी बेन्झिन, कार्बन टेट्राक्लोराईड, बेंझॉल, सॉल्व्हेट, व्हाईट स्पिरीट, नॅप्था, क्लोरीन हायड्रोकार्बन, पाणी, कपडे धुण्याचा साबण, कॉस्टिक सोडा इत्यादी कच्चा माल लागेल. स्वयंचलित ड्रायक्लीनिंग मशीन, हँड प्रेस मशीन, स्टीम आयर्न, अशी यंत्रसामग्री आणि टेबल्स, शोकेस, हँगर्स, पॅकिंग बॅग, टाकाऊ कागद आणि साहित्य आवश्यक असेल.

  • वांग्याची लागवड

    वांग्याची लागवड

    ‘वांगी’ पिकाची लागवड वर्षभर खरीप आणि रब्‍बी हंगामात व अगदी उन्‍हाळ्यातही करता येते. कोरडवाहू शेतीत, तर कधी मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. पांढरी वांगी मधुमेही व्यक्तींसाठी गुणकारी असतात. वांग्‍यामध्‍ये खनिजे, ‘अ’,‘ब’, ‘क’ ही जीवनसत्त्‍वे; तसेच लोह, प्रथिने यांचे पुरेसे प्रमाण पुरेसे असते. महाराष्‍ट्रात अंदाजे 28, 113 हेक्‍टरी क्षेत्र वांगी लागवडीखाली आहे.

    वांगी पिकाला पाऊस आणि पावसाळी हवामान मानवत नाही. कोरड्या आणि उष्‍ण हवामानामध्‍ये वांग्‍याची वाढ चांगली होते. सरासरी 13 ते 21 सेल्सिअस तापमानामध्ये वांग्‍याचे पीक चांगले येते.

    सर्व प्रकारच्‍या जमिनीत हे पीक घेता येते. ‘मांजरी गोटा’, ‘वैशाली’, ‘प्रगती’, ‘अरूणा’ या वांग्याच्या जाती आहेत. सुपीक आणि पाण्‍याचा निचरा होणाऱ्या मध्‍यम काळया जमिनीमध्‍ये वांग्‍याचे झाड जोमाने वाढते. त्याचप्रमाणे नदीकाठच्‍या गाळसदृश जमिनीत वांग्‍याचे उत्‍पादन चांगले येते. मुख्‍य शेतात रोपांची लागवड करण्‍यापूर्वी जमीन नांगरून भुसभुशीत करावी. दर हेक्‍टरी 30 – 50 गाडया शेणखत जमिनीत मिसळावे. वांग्‍याच्‍या शेतीतील खुरपणी करून तण काढणे, कोळपणी करणे, पिकाला भर देणे ही कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्‍यक आहे. त्‍याकरिता आवश्‍यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्‍यावे, तसेच झाडाला मातीची भर द्यावी. काही तणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारुनही करता येतो. वांगी पिकांमध्‍ये आंतरपीक म्‍हणून पालक, मेथी, कोथिंबीर इ. पालेभाज्या घेता येतात.

    वांग्याच्या पिकावर मर, शेंडा आणि फळे पोखरणारी अळी, तुडतुडे, मावा या किड व रोगांचा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी वेळोवेळी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.रोप लावणीनंतर अंदाजे 10 ते 12 आठवडयांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण वाढून टवटवीत आणि चमकत असतानाच काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्‍यास उत्‍पादनात घट होते. तसेच जुन झालेली फळे गिऱ्हाईकांकडून नाकारली जातात. 4 ते 5 दिवसांच्‍या अंतराने 10 ते 12 वेळा वांग्‍याची तोडणी करता येते. वांग्‍याची काढणी साधारणपणे तीन ते साडेतीन महिने चालू राहते. जाती परत्‍वे वांग्याचे सरासरी हेक्‍टरी उत्‍पादन 100 ते 250 क्विंटल पर्यंत येते.

  • गणपतीपुळेतील श्री गणेश मंदिर

    गणपतीपुळेतील श्री गणेश मंदिर

    गणपतीपुळे हे कोकणातील एक प्रसिद्ध आणि जागृत क्षेत्र आहे. हे समुद्रकिनाऱ्यावरील श्री गणेश मंदिर पर्यटकांमध्ये सुपरिचित आहे. रत्नागिरी शहरापासून हे २५ किलोमीटर व मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर हे क्षेत्र आहे. गणपतीपुळ्याचे हे गणेशस्थान पेशवेकालीन अतिप्राचीनस्थान आहे. येथे पूर्वी केवड्याचे वन होते. त्याठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. संकटाचे निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन, असा निश्चय करुन त्यांनी मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या वनात मुक्काम केला. त्यांनी अन्नपाणी वर्ज्य केले. एके दिवशी भिडेंना दृष्टांत झाला की, मी याठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी गणेशगुळे येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरुप धारण करुन प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरुप डोंगर हे आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजा कर, तुझे संकट दूर होईल.

    त्याच कालखंडात खोत भिडे यांच्या गाईने दूध देणे बंद केले. गुराख्याने तिच्यावर बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दूधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला. त्यांनी तात्काळ सर्व परिसराची सफाई केली. त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर करुन त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरु केली. हे मंदिर समुद्रकिनाऱ्याकडे दिसणाऱ्या एका छोट्या टेकडीवर आहे. ते भारतातील सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गसौंदर्याव्यतिरिक्त, गणपतीपुळे हे ‘पॅराग्लायडिंग’, ‘कयाकिंग’ आणि ‘स्नॉर्कलिंग’ यांसारख्या विविध साहसी खेळांसाठी देखील प्रसिद्ध आहे. पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर लांब फिरण्यासाठी देखील जाऊ शकतात; किंवा आराम करू शकतात. शहरातील जीवनाच्या गजबजाटापासून दूर, शांततापूर्ण आणि आरामदायी समुद्रकिनारा शोधणाऱ्यांसाठी गणपतीपुळे हे एक योग्य ठिकाण आहे.

    गणपतीपुळे येथील मूर्ती स्वयंभू आहे, अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात ही नैसर्गिक मूर्ती विराजमान आहे. जवळच पश्चिमेला समुद्र असल्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि झाडांमुळे अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची अतिशय गर्दी पहावयास मिळते. हा भारताच्या कोकण किनारपट्टीवर रत्नागिरीत असलेला एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. शांत परिसर, पांढरे वाळूचे किनारे आणि स्वच्छ निळ्या पाण्यासाठी हा ओळखला जातो. हा समुद्रकिनारा हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला आहे. गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे.

  • लाडघर समुद्रकिनारा

    लाडघर समुद्रकिनारा

    रत्नागिरीतील दापोलीमध्ये लाडघर हा एक रोमांचक असा समुद्रकिनारा आहे. हा किनारा दापोलीपासून आठ किमी अंतरावर आहे. येथे जलक्रीडा, शांतता अनुभवत मजा लुटता येते. ‘लाडघर’ समुद्रकिनाऱ्याचा उत्तरेकडील भाग खडकाळ आहे, येथील बहुतेक भागात बारीक वाळू आणि दक्षिणेकडील भागात खडबडीत वाळू आहे. लाडघरला भरपूर हॉटेल्स आहेत.

    त्रितारांकित हॉटेल्स रिसॉर्ट्सपासून घरच्या निवासापर्यंत विस्तृत श्रेणी आहे. लाडघर किनारा सूर्यास्ताच्या वेळी उमटणाऱ्या आकाशातील रंगांसाठी प्रसिद्ध आहे. आकाशातील केशरी-लाल रंगाचे मिश्रण समुद्राच्या पाण्याला देखील तेजस्वी रंग देते, त्यामुळे हा समुद्रकिनारा ‘तामस तीर्थ’ म्हणूनही ओळखला जातो. या किनाऱ्यावर जलक्रीडा आणि साहसी सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय येथे तांदळाची भाकरी, सोलकढी असे विविध प्रकारचे स्थानिक लोकप्रिय पदार्थ मिळतात. ज्यामुळे ते खाद्यप्रेमींसाठी एक परिपूर्ण ठिकाण बनते.

  • मोरागड किल्ला

    मोरागड किल्ला

    नाशिक जिल्ह्यातील ‘मोरागड’ आहे, जणू काही हा मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच आहे. किल्याल्चा गडमाथा म्हणजे एक पठारच आहे. पठारावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. गडमाथ्यावर चढताना दुसऱ्या दरवाजाजवळ एक गुहा आहे. दोन-तीन वाड्यांचे उद्ध्वस्त अवशेष दिसतात. येथे माथ्यावर एक सुंदर बांधीव तलाव आहे. याव्यतिरिक्त गडावर आणखी काही नाही. या गडावरून मुल्हेरचे पठार-माची, हरगड, मांगीतुंगी, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमान टेकडी पाहता येते.

    मोरागडावर जाणारी एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावरून जाते. येथून भडंगनाथांच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणाऱ्या वाटेने जावे लागते. या वाटेने थोडे वर गेल्यावर मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून गडावर जाण्यासाठी अर्धा तास पुरतो. गडावर जाताना तीन दरवाजे लागतात. मोरागडावर राहण्याची सोय नाही. गडावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत, मात्र त्यांना उन्ह्याळ्यात पाणी नसते.

  • अनेर धरण अभयारण्य

    अनेर धरण अभयारण्य

    महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अनेर धरण अभयारण्य आहे. अनेर धरण अभयारण्य नाशिक प्रशासकीय विभागात येते. अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ सुमारे ८३ चौ. कि. मी. क्षेत्रात हे वसलेले आहे. सातपुडा समृद्ध आणि दुर्मीळ अशा वनराईचे दर्शन या अभयारण्यात होते. पूर्णा, तापी नद्यांच्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवताळ झुडूपे असल्यामुळे अनेक तृणभक्षीय प्राणी येथे आढळतात. शिरपूरपासून 16 कि.मी अंतरावर मुंबई-आग्रा रस्त्याला लागून हे अभयारण्य आहे. येथे साग, अंजन, पळसाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. ‘अरूणावती’ नदीच्या पाणलोट क्षेत्रानजीकचे हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाने सन 1986 मध्ये ‘अनेर डॅम वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित केले.

    शुष्क पानगळीच्या आणि खुरट्या काटेरी वनांसाठी हे अभयारण्य ओळखले जाते. या अभयारण्यात ‘हरियाल’ देखील आढळते. या अभयारण्यातील ‘कडरागड’ येथे अखंड दगडात कोरलेल्या गुंफा आपले लक्ष वेधून घेतात. अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी सप्टेंबर ते फेब्रुवारी असा आहे. धुळे येथून शिरपूर येथे जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बस सेवा उपलब्ध आहे. नक्षत्र वन, चिरंजीव वनही पाहण्यासारखे आहे. पर्यटकांसाठी नौकांची सुविधाही उपलब्ध आहे. येथील बगीचा मनोहर आहे. येथे नौकानयनची सुविधा आहे. येथून सुर्यास्ताचे होणारे दर्शन विलोभनीय असते.

    या अभयारण्यात प्रामुख्याने बाभूळ, हेंकळ, चिंच, मोहा, आवळा, साग, अंजन, पळस, धावडा, आपटा, सलई या वृक्ष प्रजाती आढळतात. जैवविविधतेने संपन्न असा हा प्रदेश आहे. कोल्हा, भेकर, खार, मोर, चिंकारा, सुगरण, कोकिळा, घुबड, ससा, तित्तर, बटेर, गिधाड, सुतारपक्षी, मैना, मुंगूस, कोब्रा, सायाळ, घोरपड, मन्यार, सरडा, लांडगा, अस्वल, हॉर्नबिल, पानकोंबडी, रानडुक्कर, बगळे, तडस अशा प्राणी व पक्ष्यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी येथे मोठ्या संख्येने पाहण्यास मिळतात.

  • कुटुंबातील नोकरदार महिला

    कुटुंबातील नोकरदार महिला

    चूल आणि मुल या साचेबंदातून मुली बाहेर पडल्या आहेत. त्यातही पत्नी म्हणून नोकरी करणाऱ्या मुलीचा विचार आजकालचे तरुण करीत असल्यास स्वतः घरातील सगळी कामे करण्यासाठी त्यानी तयार रहायला शिकले पाहिजे. घरातील इतर माणसांनीही तिला समजून घेतले पाहिजे. विशेषतः सासूने तिच्याकडून कामाची किती अपेक्षा ठेवायची याचा विचार केला पाहिजे. जसे पुरुष दिवसभर काम करून रात्री घरात येत असतात, तशीच स्त्री सुद्धा काम करून रात्री घरी येत असते. त्यामुळे प्रत्येक काम तिनेच करावे असे म्हणणे चुकीचे आहे. पत्नी जर नोकरी करत असेल तर घरची सगळी कामे परंपरेने तिने एकटीनेच करावीत हा पतीचा अट्टाहास सर्वस्वी चुकीचा आहे. त्याने तिला घरच्या कामात मदत केली पाहिजे.

    पतीच्या आयुष्यात, घरात एक नवीन व्यक्ती आली आहे. ती तुमची नोकर नाही त्यामुळे कामे वाटून घ्या. असे केल्याने नोकरी करणार्यान पत्नीशी तुमचे संबंध नेहमीच चांगले राहू शकतात. मुलाची जबाबदारी दोघांनीही एकत्रितपणे उचलावी. बहुतेक पुरुष मुलांना सांभाळण्यास सक्षमता दाखवीत नाहीत. पण पत्नीदेखील दिवसभर काम करून घरी येत आहे, हे लक्षात ठेवायला हवे. सासू सासऱ्यांनीही बाळाला प्रेमाने सांभाळले पाहिजे. अर्थात, पती आणि पत्नीने सासू सासऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. अनेक वेळा असे घडते की पुरुष नोकरी करणाऱ्या महिलांशी विवाह करतात. कालांतराने तिला काम सोडण्यास सांगतात. असे केल्याने महिल्यांना त्यांच्या स्वप्नांचा त्याग करावा लागतो. त्यांना अपमानित करू नका. प्रेमासोबत त्यांचा आदरही करा. लग्न झाल्यावर अनेक गोष्टी बदलतात. त्यामुळे कोणताही निर्णय एकट्याने घेऊ नये. यामुळे वाद होऊ शकतात. कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत तिला सहभागी करून घ्यावे

  • ओठांसाठी लिप बाम

    ओठांसाठी लिप बाम

    अनेकजणांचे ओठांच्या कोरडेपणामुळे ओठ फाटतात. कधी-कधी अशा ओठातून रक्तही येऊ लागते. हिवाळ्याच्या दिवसात तर लोक या समस्येने फारच त्रस्त असतात. कडक उन्हाळ्यातही ओठ कोरडे होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी फाटलेल्या ओठांवर लिप बाम लावला जातो, आणि ते योग्य आहे. पण लिप बाम फक्त बाहेर जातानाच लावणे योग्य नाही. तो आपल्या ओठांच्या स्थितीनुसार कधी आणि कितीवेळा लावायचा हे निश्चित करून लावायला हवा.

    फाटलेल्या ओठांवर तुम्ही लिप बाम लावू शकता. हा लावताना लक्षात ठेवा की ज्यांचा तुम्हाला त्रास होणार नाही, असे लिप बाम वापरायला हवेत. तुम्ही लिप मॉइश्चरायझर देखील वापरू शकता. फाटलेल्या ओठांना सुस्थितीत आणण्यासाठी दिवसातून अनेक वेळा आणि झोपण्यापूर्वी लीप बाम लावा. जर ओठ खूप कोरडे पडले असतील, आणि फाटलेले असतील तर लीप बामचा जाड थर लावा. सकाळी आंघोळीनंतर लगेच लिप बाम लावा, जेणेकरून ओठांवर ओलावा येईल. लीप बाम ओठांचे संरक्षण करतो.

    दिवसभर ओठ हायड्रेशनसाठी तयार करतो.रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा लावा.दिवसातून 4 ते 5 वेळा फाटलेल्या ओठांवर लिप बाम लावू शकता. खूप उष्ण, थंड किंवा वारा असेल तर तिथेही ओठ चांगले ठेवण्यासाठी अनेक वेळा लिप बाम लावावा लागेल.

  • केशरचे सेवन लाभदायक

    केशरचे सेवन लाभदायक

    केशर ही सर्वात शक्तीशाली औषधी वनस्पतीपैकी एक आहे. केशरच्या सेवनाने आरोग्याला अगणित फायदे मिळतात. यामध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. केशरमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. ही शरीराला ऊर्जा देतात. प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि अँटिऑक्सिडंट्ससारख्या खनिजांचा खजिना आहे. केशरच्या सेवनाने सर्दी आणि खोकल्याचा उपचार करण्यात मदत होते, मानसिक आरोग्य सुधारते, पचनशक्ती सुधारते, रक्तदाब नियंत्रित होतो. त्वचेची त्वचा दूर करण्यास मदत होते. रक्त शुद्ध करण्याबरोबरच लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. केशर अनेकदा दुधासोबत किंवा विविध पदार्थांसोबत सेवन केले जाते. पण केशर चहा देखील बनवता येतो.

    पुरस्कार विजेते पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा असे सांगतात, की केशर चहा प्यायल्याने आरोग्याला चांगले फायदे होतात. केशरमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. केशर चहा प्यायल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते. म्हणजेच याच्या सेवनाने कर्करोग टाळता येऊ शकतो. केशरमध्ये ‘क्रोसिन’ आणि ‘क्रोसेटिन’ ही दोन रसायने असतात. ही रसायने मेंदूच्या कार्याला चालना देतात. शिकण्यास आणि स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

    केशर हे ‘रिबोफ्लेविन’च्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. यात जीवनसत्व बी आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. केशरमध्ये ‘अँटिऑक्सिडंट्स’ आणि ‘फ्लेव्होनॉइड्स’ दोन्ही भरपूर प्रमाणात असतात. ‘अँटिऑक्सिडंट्स’ शरीराला हानिकारक पदार्थांपासून वाचविण्यास मदत करतात. ‘फ्लेव्होनॉइड्स’ ही वनस्पतींमध्ये आढळणारी रसायने आहेत, जी वनस्पतींना बुरशी आणि रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. केशर चहा महिलांना लाभकारक आहे. अचानक मूड बदलणे, चिंताग्रस्त होणे किंवा चिडचिड होणे, थकवा किंवा झोप न लागणे, पोटदुखी, डोकेदुखी अशा समस्यांसाठी हा चहा गुणकारी आहे. तथापि, ही फक्त सामान्य माहिती आहे. हा कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. वैद्यकीय तज्ज्ञांना सल्ला घेऊनच याचा वापर करावा.

  • मसाला दूध

    मसाला दूध

    कोजागरी पौर्णिमा, यादिवशी विशेषकरुन आपण घरी मसाला दूध बनवितो. पौर्णिमेच्या पिठूर चांदण्यात ते प्राशन करण्याचा आनंदच वेगळा, नाही का?
    मसाला दूध बनविण्यासाठी साहित्य : 1 लिटर दूध, 100 ग्रॅम साखर, अर्धा लहान चमचा वेलची पावडर, काजू-बदाम-पिस्त्याचे काप, चारोळी, १ चिमूटभर जायफळ पावडर, 5-6 केशर काड्या.

    कृती :
    सर्वप्रथम एका स्वच्छ भांड्यात दूध घ्या. गॅसच्या मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवा. दुध आटुन अर्धे होईल इथवर आटण्यासाठी गॅसवर ठेवा. मध्ये-मध्ये नीट ढवळत राहा, जेणेकरून ते जळणार नाही. भांड्याला चिकटणार नाही. दूध आटुन कमी झाल्यावर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि साखर घालून मिसळून घ्या. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले काजू, बदाम, पिस्ता, काही चारोळ्या आणि केशरच्या काड्या घालून आणखी पाच मिनिटे उकळा. दूध तयार झाल्यानंतर एका ग्लासमध्ये काढा. काही वेळ चंद्राच्या प्रकाशात ठेवा. त्यानंतर मसाला दुधाचा आस्वाद घ्या.

  • बाप-लेकीचे गोड नाते

    बाप-लेकीचे गोड नाते

    बाप-लेकीचे नाते फार गोड असते. वडील हे मुलींसमोरील आदर्श असतात. वडील म्हणजे आपली सुरक्षा, विश्वास आणि प्रेम असल्याचे त्यांच्या मनानेच ठरविलेले असते. जेव्हा वडील मुलीच्या शिक्षणात, मुलीच्या कोणत्याही गोष्टीत रस घेतात तेव्हा तिचा विश्वास दुणावतो. करिअरच्या बाबतीतही वडिलांची साथ मिळाल्यास मुलींना प्रगती करणे शक्य होते. प्रेमळ वडील मुलीला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देतात.

    मुलगी वयात येत असताना वडील आणि मुलीमध्ये लहानसहान गोष्टींवरून वादविवाद निर्माण होऊन दुरावा येण्याची शक्यता असते. अशा वेळी वडिलांनी संवाद साधणे आणि मुलीला विश्वासात घेऊन तिला योग्य निर्णय घेण्यास मदत करणे गरजेचे असते. याच वयात मुलीस लाभणाऱ्या संगतीबाबत वडिलांनी जागरूक असायला हवे. मुलीला तिच्या आयुष्यात महत्त्व देणारे कोणीतरी आहे, याची जाणीव वडिलांचे नाते करून देत असते. अशा मुली वागण्यात आणि संवादाच्या बाबतीही आत्मविश्वास असणाऱ्या असतात.

    ज्या मुलीचे वडिलांसोबतचे नाते खेळकर असते, त्यांना आयुष्यातील समस्या सोडविताना कोणताही त्रास होत नाही. त्यांच्यात भीती आणि एखाद्या समस्येला टाळण्याची वृत्ती कमी असते. मुलीच्या मानसिक आणि भावनिक विकासात आईप्रमाणेच बाबांचाही तेवढाच वाटा असतो. लग्न ठरताना किंवा करिअर निवडताना तिला आईसोबत वडिलांचीही सगळ्यात जास्त गरज असते. मुलीचे लग्न ठरविताना वडिलांची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची असते. चांगल्या नात्यांमुळे मुले नेहमीच प्रगतशील बनतात. आपल्या मुलीला योग्य जोडीदार निवडण्यासाठी मदत करणे किंवा त्याबाबत योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असते.

    आईवडिलांचे नाते खेळकर, सामंजस्याचे असेल तर मुलीचे वैवाहीक जीवनही चांगला आकार घेते. घटस्फोट किंवा आईवडिलांमधील दुरावा यामुळे नकळतपणे मुले पालकांपासून दूर जाऊ शकतात. वडिलांशिवाय मुली कमी आत्मविश्वास असणाऱ्या, स्वतःचे महत्त्व न समजणाऱ्या आणि अबोल होतात. आपल्या लाडक्या लेकीला सासरी पाठविताना वडीलांनाही फार त्रास होत असतो.

  • केसांना शाम्पू लावताना

    केसांना शाम्पू लावताना

    केसांच्या समस्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी केसांना शाम्पू लावला जातो. त्याचा उचित फायदा मिळण्यासाठी या शाम्पूचा योग्य वापर कसा करायचा, हे माहीत करून घ्यायला हवे. चुकीच्या पद्धतीने शाम्पू लावल्याने त्यात असलेल्या रसायनांचा प्रभाव अधिक होतो. ते केसांची टाळू आणि केसांचा पोत बिघडवू लागतात. प्रसिद्ध केस तज्ज्ञ जावेद हबीब यांनी त्यांच्या समाजमाध्यमावर काही मौलिक सल्ले दिले आहेत.

    केस धुताना तळहातावर शाम्पू घेतला जातो, आणि तो थेट केसांवर चोळला जातो. या पद्धतीमुळे केसांचे नुकसान होते. शाम्पू वापरण्यापूर्वी आधी पाण्यात मिसळावा आणि मगच वापरावा. असे केल्याने तो थेट केसांवर आणि मुळांवर लागू होणार नाही. त्यातील रसायने केसांना हानी पोहोचवू शकणार नाहीत.

    शाम्पू करण्यापूर्वी केसांना तेल लावणे आवश्यक आहे. असे केल्याने केस कमकुवत होत नाहीत. त्यांची ताकद टिकून राहते. केस कोरडे होत नाहीत. केस रसायनांच्या प्रभावापासून सुरक्षित राहतात. केसांचा रंग चांगला राहतो. शाम्पू केल्यानंतर ते मऊ राहतात. जेव्हाही तुम्हाला शाम्पू करायचा असेल तेव्हा आधी डोक्याला कोणत्याही केसांच्या तेलाने मसाज करावे. 10 मिनिटांनंतर शाम्पू पाण्यात मिसळून केसाना चोळावा. त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. यामुळे शाम्पूचा योग्य प्रभाव केसांवर राहील.

  • शाकाहारी खाण्याचे फायदे

    शाकाहारी खाण्याचे फायदे

    चांगल्या आरोग्यासाठी शरीराला सर्व पोषकतत्वांची गरज असते, अशा परिस्थितीत फक्त शाकाहारी पदार्थांच्या मदतीने शरीरातील सर्व जीवनसत्त्वांची कमतरता दूर करता येते. ताजी फळे, भाज्या खाल्ल्याने आपण तंदुरुस्त रहाल. जाणून घेऊया शाकाहारी खाण्याचे फायदे !

    अति मांसाहार करण्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो. शाकाहारी अन्नाचे सेवन हृदयाच्या आरोग्याला चालना देण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ जसे की संपूर्ण धान्य, शेंगदाणे, शेंगा इ. आवश्यक असते. कोलेस्टेरॉलच्या समस्यांवर नियंत्रण ठेवून ते हृदयाचे रक्षण करतात.

    अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, ते शाकाहारी आहाराचे पालन करून उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतात. शाकाहारी अन्नामध्ये फॅट्स आणि सोडियमचे प्रमाण कमी असते, जे रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, शाकाहारी पदार्थांमध्ये समाविष्ट असलेली अनेक फळे आणि भाज्यांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

    शाकाहारी असणाऱ्यांना हाडांशी संबंधित आजारांचा धोका कमी असतो. वास्तविक, दूध, चीज, नट, टोफू, सोयाबीन आणि हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर ‘व्हेज डाएट’ पाळणे गरजेचे आहे. साधे अन्न वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. चिकन, मासे इत्यादी मांसाहारी पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. मधुमेहाच्या रुग्णांनी शाकाहारी आहार घ्यावा. साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी कडधान्ये आणि हिरव्या भाज्यांचा आहाराचा समावेश करा

  • कुट्टु करी

    कुट्टु करी

    हा एक केरळचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे.
    साहित्य
    उकडलेले बटाटे – २ (चौकोनी तुकडे करून), लहान कांदे (कापलेले) – १०, आले-एक इंचाचा तुकडा, लसूण, भिजवलेली उडीद डाळ (वडे बनविण्यासाठी) – अर्धा कप, हिरव्या मिरच्या – ३, लाल तिखट – १ चमचा, धणे पावडर – २ चमचे, हळद – अर्धा चमचा, मिरी पावडर – अर्धा चमचा, गरम मसाला पावडर – अर्धा चमचा, मोहरी – १ चमचा, नारळाचे दूध – अर्धा कप, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल, मीठ – चवीपुरते


    कृती :
    लहान कढई घेऊन त्यात थोडे तेल तापवा. भिजलेली उडीद डाळ पाणी न घालता बारीक वाटून घ्या. या वाटणात वडे बनविण्यासाठी मीठ घाला. तेल गरम झाल्यावर एक चमचा मिश्रण तापलेल्या तेलात घाला. चांगले तळून घ्या. वडे एका भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवा. आता कढईत तीन चमचे तेल तापवा. मोहरी आणि कढीपत्ता घाला. तडतडल्यावर आले, लसूण, कांदे आणि हिरव्या मिरच्या घाला. थोडे परता. आता बटाटे चौकोनी कापून यात घाला. थोडा वेळ परता. त्यावर धणे पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि मिरी पावडर घालून एकत्र परता. आता त्यात एक कप पाणी घाला. मीठ घालून ढवळा. भांडे झाकून चांगले शिजवा. पाणी पूर्ण उडून गेले की नारळाचे जाड दूध घाला. थोडे ढवळा. आता त्यात तळलेले वडे घाला. थोडा वेळ उकळू द्या. चांगले मिसळून कोथिंबीर घाला. ‘कुट्टू करी’ तयार आहे. भाताच्या प्रकारांबरोबर ही चांगली लागते.

  • कागद उद्योग

    कागद उद्योग

    भारतातील कागद उद्योग हा एक कृषी-आधारित उद्योग आहे. जागतिक स्तरावर ‘भारतीय कागद उद्योग’ उच्च स्थानावर आहे. देशातील पहिली कागद गिरणी इसवी सन 1812 मध्ये सेरामपूर-बंगाल येथे स्थापन झाली; परंतु कागदाच्या मागणीअभावी ती अयशस्वी झाली. सन 1870 मध्ये कोलकाता जवळील ‘बालीगंज’ येथे हा उपक्रम पुन्हा सुरू झाला. भारत सरकार कागद उद्योगाला ‘गाभा उद्योग’ म्हणून परिभाषित करते. कागद उद्योग कच्चा माल म्हणून लाकडाचा वापर केला जातो.

    आपण सर्वजण दररोज कागद वापरतो. कागद बनविण्याकरिता काही प्रकारची तंत्रे आहेत. कागद व्यवसाय करण्यासाठी कागद कसा बनविला जातो, याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. झाडांपासून कागद बनविला जातो. आपल्याकडे असलेल्या झाड आणि लाकडाच्या प्रकारानुसार त्याचा कागद बनविता येतो का, हे ठरविले जाते. लाकडाचे स्वरूप आणि त्याची मागणी यावर अनेक प्रकारचे उपयोग अवलंबून आहेत.

    तंत्रज्ञानाचा वापर जागतिक स्तरावर होत असला तरीही जगभरात कागदाचा बराच मोठा वापर अजूनही आहे. वर्तमानपत्र, पुठ्ठा,खोके, पुस्तके, वह्या यासाठी कागदाची आवश्यकता असते. कागद लिहिण्यास, छपाईस वा वेष्टनासाठी वापरले जाणारे एक साहित्य आहे. लाकूड, बांबू, चिंध्या, गवत इत्यादीच्या ओल्या सेल्युलोजच्या लगद्याचे तंतू विशिष्टरीत्या दाबून वाळवले की मग कागद तयार होतो.

    पाण्यात वेगवेगळे पदार्थ मिसळून मऊसर, ओलसर तयार केलेला पदार्थ म्हणजे ‘लगदा’ होय. कागद तयार करण्याच्या पद्धतीत लगदा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लगदा हा मुख्यत: 3 प्रकारचा असतो. लगद्याच्या पहिल्या प्रकारात लाकडाच्या भुशामध्ये फक्त पाणी घालून तो तयार करतात. लाकडातील लिग्निन, हेमीसेल्यूलोजसारखे नैसर्गिक पदार्थ आणि अनावश्यक पदार्थ लगद्यातून काढून टाकले जात नाहीत. कोणतेही रासायनिक पदार्थ यात घातले जात नाहीत. या प्रकारचा लगदा हा ‘यांत्रिक लगदा’ होय. लगद्यावर यांत्रिक प्रक्रिया करून कागद तयार केला जातो. हा कागद वर्तमानपत्राच्या छपाईसाठी वापरतात.

    दुसऱ्या प्रकारचा लगदा तयार करण्यासाठी लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या हे पदार्थ वापरले जातात. सुरुवातीला कापडाच्या चिंध्या रंगीत असतील तर क्लोरिन वायूने त्या चिंध्या धुतात. लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या या वनस्पतीजन्य पदार्थामध्ये सेल्यूलोजचे तंतू असतात. शिवाय लिग्निन, रेझीन, मेण, असे इतर पदार्थसुद्धा असतात. यातील लिग्निन, रेझीन, मेण हे पदार्थ लगद्यामधून बाहेर काढावी लागतात. त्यासाठी सर्व लगदा पापडखाराच्या पाण्यात टाकून शिजवितात. पापडखारात शिजवल्यामुळे लगद्यातील मळ निघून जातो. हा ‘अर्ध रासायनिक लगदा’ होय. या लगद्यापासून मिळणारा कागद मध्यम प्रतीचा असतो. या कागदाचा कारखान्यातील काही वस्तूंची बांधाबांध करण्यासाठी होतो.

    तिसऱ्या प्रकारच्या लगद्याला ‘रासायनिक लगदा’ म्हणतात. रासायनिक लगद्यामधील रसायनांमुळे लिग्निन हा पदार्थ विरघळतो. या प्रक्रियेला ‘पाचन क्रिया’ म्हणतात. या प्रक्रियेत कपडय़ाचे तुकडे, गवत, झाडाच्या साली सर्व एकत्र करून कॉस्टिक सोडा आणि सोडियम सल्फाइड यांच्या द्रावणांमध्ये पाचक यंत्रात 3 तास शिजवितात. पाचक यंत्रामध्ये शिजवलेला लगदा काळा असतो. हा लगदा पहिल्यांदा पाण्याने आणि नंतर क्लोरिन या विरंजकांनी स्वच्छ धुतात. या क्रियेनंतर स्वच्छ पांढरा लगदा मिळतो. रसायनांचे प्रमाण जास्त झाले तर सेल्यूलोजचे तंतू तुटतात. त्याचा परिणाम कागदाच्या गुणवत्तेवर होऊन तो ठिसूळ होतो. रासायनिक लगद्यापासून तयार झालेला कागद लिहिण्यासाठी वापरतात. कागद कारखान्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या लगद्यामुळे वेगवेगळ्या प्रतीचे कागद मिळतात.

    कागदाला बाजारात मोठी मागणी आहे. अलीकडे कागदपत्रे डिजीटल होऊ लागल्यामुळे कागद कमी लागत असला तरीही कागदाचे महत्त्व आजही तेवढेच आहे. हा उद्योग करायचा झाल्यास त्याबाबतचे प्रशिक्षण घ्यायला हवे. कुशल मनुष्यबळ, भांडवल, कच्चा माल या सगळ्याचा अभ्यास आणि नियोजन करायला हवे.

  • खासगी बँकांमधील नोकरी

    खासगी बँकांमधील नोकरी

    आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात बँकिंग क्षेत्राला खूप महत्त्व आले आहे. खासगी बँकांनी बँकिंग क्षेत्रात स्वत:चा लक्षणीय ठसा उमटवला आहे. या बँकांमध्ये विविध प्रकारच्या अनेक नोकऱ्या उपलब्ध असतात. खासगी बँकेत नोकरी मिळविण्यासाठी योग्य पात्रता असणे आवश्यक असते. वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतलेल्या मुलामुलींच्या मनात या नोकरीचे आकर्षण असते. बँकांना सर्व प्रकारच्या सुट्ट्या असतात. याबरोबरच कामाची निश्चित वेळ आणि आकर्षक वेतन असल्याने अर्थातच ही नोकरी सर्वांना हवीहवीशी वाटणारी असते. या बँकांमध्ये व्यवस्थापक, लिपीक,शिपाई, लेखापाल, वसुली अधिकारी, इत्यादी प्रकारच्या जागा भरायच्या असतात.

    खासगी बँकेत नोकरी मिळविण्यासाठी काही महत्त्वाचे निकष पूर्ण करणे आवश्यक असते. या नियमांचे पालन करण्यापूर्वी, व्यक्तीमध्ये सक्रीयता आणि प्रयत्न करण्याची जिद्द असणे आवश्यक आहे. खासगी बँकांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी, तुमच्याकडे किमान पदवी असणे आवश्यक आहे. बँकांमधील बहुतेक पदांसाठी, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदोन्नती असणे आवश्यक असते. तुमच्या पदवीचा विषय बँकिंग, वित्त, व्यवसाय, अर्थशास्त्र, गणित, संगणक विज्ञान किंवा इतर कोणत्याही संबंधित क्षेत्राचा असू शकतो.

    उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळण्यासाठी पदवी अभ्यासक्रमात सामान्य शाखेच्या पदवीची आवश्यकता असते. खासगी बँकांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी तुमच्याकडे विहित वयोमर्यादा असायला हवी. ही मर्यादा बँकेच्या नियमांनुसार बदलू शकते. साधारणपणे, किमान वयोमर्यादा 21 वर्षे असते. कमाल वयोमर्यादा 30 ते 35 वर्षे असते. बहुतांश खासगी बँकांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी अनुभव आवश्यक असतो. हा अनुभव तुम्हाला बँकिंग क्षेत्रात यश मिळवून देणारी वैशिष्ट्ये प्रतिबिंबित करतो. तुमच्याकडे बँकिंग किंवा वित्त संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक असते.

    खासगी बँकांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी तुमच्याकडे चांगले परिचालन आणि व्यवस्थापन कौशल्ये असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे चांगला संवाद, समूहाने काम करण्याची क्षमता, ग्राहक सेवा आणि लोकांशी चांगले संबंध ठेवण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. इतर व्यवसाय कौशल्यांमध्ये जसे की लेखा, वित्तीय व्यवस्थापन आणि संगणक कौशल्ये यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. खासगी बँकांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी बँकेच्या परीक्षा आणि मुलाखती द्याव्या लागतील. या परीक्षांच्या तयारीसाठी, तुम्ही काही प्रश्न आणि विभागांचा अभ्यास केला पाहिजे. मुलाखतीदरम्यान तुम्हाला तुमची क्षमता, व्यक्तिमत्व आणि बँकिंग क्षेत्रातील तुमचा अनुभव दाखविण्याची संधी मिळते. या नोकरीमुळे व्यक्तीचे जीवन समृद्ध होण्यास हातभार लागतो.

  • मेथीची लागवड

    मेथीची लागवड

    महाराष्ट्रात मेथी ही पालेभाज्यांमधील लोकप्रिय पालेभाजी आहे. मेथी पीक म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. दैनंदिन आहारात मेथीचा वापर आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे या पिकाला वर्षभर चांगली मागणी असते.

    मेथी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते काळी आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत मेथीचे पीक चांगले येत नाही. रोटरच्या मदतीने नांगरणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी लागते.

    मेथी या पिकाची लागवड वर्षभर करता येते. जास्त पाऊस झाल्यास, उन्हाळ्यात जास्त उन्हामुळे मेथीची वाढ कमी होते. भाजीचा सतत पुरवठा होत राहावा यासाठी टप्प्याटप्प्याने मेथी पिकाची लागवड करून वर्षभर मेथी पिकाची उपलब्धता करता येऊ शकते.

    मेथी पिकाच्या मुख्य पीक म्हणून 1 हेक्टर लागवडीसाठी किमान तीन किलो बियाणे लागते. तसेच आंतरपीक घेताना गरजेनुसार बियाण्यांचे प्रमाण घ्यावे लागते. बियाणे पेरताना एकसारखे सोडावे. बीजप्रक्रिया करताना बुरशीनाशक ३ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बियाण्यांना लावावे. ‘फुले कस्तुरी’ आणि ‘कस्तुरी सिलेक्शन’ ही मेथी वाण नावाजलेली आहेत.

  • पुण्यातील बालाजी मंदिर

    पुण्यातील बालाजी मंदिर

    दक्षिणेकडील तिरुमला, तिरुपती येथील प्रसिद्ध असलेले श्री बालाजी मंदिर प्रतिकृती पुण्यात आहे. नारायणपूरजवळ केतकवळे येथे हे मंदिर आहे. हे गाव पुरंदर किल्ल्याच्या परिसरात वसलेले असून निसर्गरम्य क्षेत्रात आहे. येथे जाणारा मार्ग हिरव्यागर्द शेतांतून जातो. नदीनाले आणि अनेक लहान-मोठ्या धबधब्यांचे यावेळी दर्शन होते. लोक याला ‘प्रति बालाजी मंदिर’ आणि ‘मिनी बालाजी मंदिर’ असेही म्हणतात. पुणे-बेंगळुरु महामार्गाच्या बाजूला नारायणपूर जवळ हे मंदिर आहे. पुणे रेल्वेस्थानक आणि बसस्थानकापासून सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. या मंदिराचा परिसर सुमारे २३ एकराचा आहे.

    या मंदिरात शुध्दी आणि एकांतसेवा विधी दररोज होतात. दर शुक्रवारी मंदिरात अभिषेक आणि उंजल-सेवा केली जाते. येथे भाविक अन्नदान, मिठाई खरेदी करुन देवाला अर्पण करू शकतात. मोफत महाप्रसादाचा आनंद देखील घेऊ शकतात. वेंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्टने सन 1996 ते सन 2003 या काळात हे मंदिर बांधले. या मंदिराच्या बांधकामासाठी 27 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या बालाजी मंदिरातील सर्व पूजा आणि सेवा तिरुपती बालाजी मंदिरातील पुजारी करतात. भाविकांना प्रसाद म्हणून लाडू मिळतात. या मंदिरात रामनवमी, विजया दशमी आणि दीपावली सारखे सण देखील साजरे केले जातात. वैकुंठ एकादशी, कानू पोंगल आणि गुढीपाडवा देखील येथे साजरा केला जातो.

    एप्रिल आणि मे हे या प्रदेशातील सर्वात उष्ण महिने आहेत. जेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. येथे हिवाळा कडक असतो. रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते. पुणे जंक्शन हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. येथून मंदिरात टॅक्सीने जाता येऊ शकते. पुण्यापासून बालाजी मंदिरात जाण्यासाठी अनेक प्रकारची खासगी वाहने उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे बसनेही प्रवास करून सहज पोहोचता येते. विमानाने प्रवास करीत असल्यास सर्वात जवळचे पुणे विमानतळ आहे.

  • मोरजी समुद्रकिनारा

    मोरजी समुद्रकिनारा

    आकर्षक समुद्रकिनाऱ्यांमुळे गोव्याचे जगभरात नाव झाले आहे. एवढेच नाही, तर गोव्यातील काही किनारे विदेशातील काही देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. असाच उत्तर गोव्यातील मोरजी समुद्रकिनारा आहे, जो रशियामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. रशियातील लाखो पर्यटक दरवर्षी येथे आवर्जून येतात. मोरजी किनारा हा उत्तर गोव्यातील शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. रशियाच्या पर्यटकांमध्ये मोठ्या लोकप्रियतेमुळे ‘लिटल रशिया’ म्हणूनही तो ओळखला जातो.

    या किनाऱ्याचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथे ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन केले जाते. कासव संवर्धन केंद्र म्हणूनही हा किनारा मोलाची भूमिका बजावतो. या किनाऱ्यावरुन गोव्यातील सूर्योदयाचे सर्वोत्तम दृश्य अनुभवता येते. अशा प्रकारे, सुंदर सूर्योदयाचा आनंद घेण्यासाठी आणि पहाटे किनाऱ्यावरुन चालण्याचा आनंद घेण्यासाठी लवकर उठून अनेक पर्यटक येथे येत असतात. मोरजी समुद्रकिनाऱ्यावरील ‘शॅक्स’ वर उत्तम प्रकारे नाश्ता मिळतो. यामध्ये पारंपरिक खाद्यपदार्थांसह देशी-विदेशी पदार्थही असतात. ही ‘शॅक्स’ सकाळी खूप लवकर उघडतात.

    ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांच्या लुप्तप्राय प्रजाती येथे संवर्धित केल्या जातात. ही कासवे येथे पाहता येतात. गोव्यातील हा सर्वात अनोखा अनुभव आहे. हा किनारा पहायला गेल्यावर आसपास अन्य काही आकर्षित करणारी स्थळे आहेत. ती पाहू शकता. ‘शापोरा’ नदीवरील पर्यटन पाहू शकता. ही गोव्यातील प्रसिद्ध नदी आहे. या नदीवर १ ते २ तास किंवा अर्धा दिवस किंवा रात्रभर हाऊसबोट क्रूझचा आनंद लुटू शकता. येथे सूर्यास्त समुद्रपर्यटन देखील उपलब्ध असते. मोरजी किनारा आणि लगतची शापोरा नदी ही पक्षीप्रेमींसाठी आकर्षणाची ठिकाणे आहेत. किंगफिशर, कोकिळा, सँडपायपर्स, बे-बॅक्ड श्राइक आणि सँड प्लोव्हर यासह अनेक पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात.

    मोरजीमध्ये निवासाचे अनेक पर्याय आहेत. यामध्ये हॉटेल्स, रिसॉर्ट्स, कॉटेज आणि गेस्ट हाऊस यांचा समावेश आहे. बहुतेक हॉटेल्स समुद्राला समांतर वाहणाऱ्या रस्त्यावर वसलेली आहेत. त्यापैकी काही नदीकाठी वसलेली आहेत. येथून ‘शापोरा’ची दृश्ये देतात. मोरजीमध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि लक्झरी दोन्ही श्रेणीतील हॉटेल्स उपलब्ध असतात. या किनाऱ्याला ऑक्टोबर ते मार्च दरम्यान भेट द्यावी. यावेळी हवामान आल्हाददायक असते, पाऊस नसतो. त्यामुळे समुद्रही शांत असतो. या परिसरात देखणी मंदिरे, स्थानिक उद्यानेही आहेत. येथे जायचे झाल्यास विमानप्रवास असल्यास मोपा विमानतळावर उतरावे. हे विमानतळ आणि हा किनारा एकाच पेडणे तालुक्यात आहेत. रेल्वे प्रवास केल्यास पेडणे रेल्वेस्थानक, थिवी रेल्वेस्थानक जवळ आहेत.

  • मणिकपुंज किल्ला

    मणिकपुंज किल्ला

    डोंगरमाथ्यांवरील गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. सह्याद्री, सातपुडा, अजिंठा-सातमाळा अशा पर्वतरांगांमध्ये अनेक किल्ले आहेत, जे शेकडो वर्षे होऊनही इतिहासाची साक्ष देत आजही उभे आहेत. नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस व औरंगाबाद जिल्ह्यास लागून असलेल्या अजिंठा-सातमाळा रांगेत ‘मणिकपूंज’ एक लहानसा प्राचीन किल्ला आहे. या गडावर देवीची मूर्ती असलेले लेणे पहायला मिळते. हे लेणे कातळात खोदलेले आहे. आत देवीच्या मुर्तीची स्थापना केलेली दिसते. लेण्याच्या वरच्या टप्प्यावर एक पाणी नसलेले टाके आहे.

    त्याच्याही वर माथ्यावर चढून गेल्यावर आणखी एक सुकलेले टाके व पीर दिसतो. किल्ल्यावर एवढ्याच गोष्टी शिल्लक राहिल्या असून याव्यतिरिक्त कुठलेही अवशेष नाहीत. किल्याचावर पिण्याच्या पाण्याची अथवा खाण्याची कोणतीही सोय नाही. येथे जाण्यासाठी मनमाड – भुसावळ रेल्वेने जाऊन नांदगाव स्थानकात उतरावे. त्यानंतर नांदगाव – औरंगाबाद रस्त्यावरील कासारबारी या गावात जावे. ‘मणिकपुंज’ला जाण्यासाठी या गावातून रस्ता आहे. येथून गडावर जाण्यास अर्ध्या तासाचा वेळ लागतो.

  • नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य

    नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य

    नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य विलोभनीय आहे. पक्षी निरीक्षकांना मनासारखी दृश्ये टिपता यावीत, म्हणून वन विभागाने येथे खास निर्मिती केली आहे. या परिसरात पक्ष्यांना बसण्यासाठी लाकडी दगडी उंचवटे निर्माण केले आहेत. नांदूरमधमेश्वर हे ठिकाण नाशिक-निफाड रस्त्यावर आहे. सन १९८२ मध्ये ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी नांदूर मधमेश्वरला भेट दिली. त्यावेळी हे ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ असल्याचे उद्गार त्यांनी काढले. हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्याची विनंती केली. पुढे सन १९८६ मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला.

    या अभयारण्यात स्पूनबिल, कॉमन क्रेन, फ्लेमिंगो, डक, यांसारख्या विविधरंगी विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य असते. कडवा व गोदावरी नदीच्या संगमावर नांदूरमधमेश्वरला एक धरण बांधले आहे. येथील जलाशय या पक्ष्यांची तहान भागवितो. ओरियन्टल, हनी बझार्ड, इंडियन रोलर, किंग फिशर, पाईड किंगफिशर, मार्शल हेरियर, स्पूनबिल, कुट, कॉमन टिल, पिग्मीगुस, ग्रेटर फ्लेमिंगो, कॉमन क्रेन, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, इंडियन सिलव्हर बिल, ग्रीन बिटर, लॅपविंग, व्हाईट नेक्ड स्टॉर्क, ओपन बिल स्टॉर्क, व्हिललिंग डक, मलार्ड पोचार्ड, गढवाल, नॉर्दन शाऊलर, मिनटेल, रेड क्रिस्टेड पोचार्ड, रिव्हर टर्न, चक्रवाक, स्पॉड बिल डक, ब्राह्मणी डक व्हाईट आय बीज, कोम डक, जिकाना, लेसर, तरंग, वैष्णव, हळदीकुंकू, चांदवा, नयनसरी, तलवार, पांढरा शरारी, मोरशरारी मुग्धबलाक, चिमण्या, पर्लल मुरेन, जांभळी पाणकोंबडी, जांभळा बलक, लाल डोक्याची टिटवी खंड्या असे अनेक पक्षी येथे वास्तव्यासाठी असतात.

    अनेक विविध रंगांचे, आकारांचे, आवाजांचे हजारो पक्षी येथे दिसतात. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान विविध रंगांचे, मंजुळ आवाजाचे दुर्मिळ पक्षी अनेक देशांमधून या अभयारण्यात हजर होतात. कडाक्याच्या थंडीत येथे पर्यटकांची वर्दळ वाढते. शेकडो पक्षीप्रेमी कॅमेरे व दुर्बीणी घेऊन पक्षी निरीक्षणासाठी येथे जातात. निसर्गात मुक्तपणे विहार करणारे विविध पक्षी येथे येणाऱ्यांना प्रचंड आनंद देतात. येथील जलाशयाभोवतीही विविध पक्षी पाहता येतात. हे पक्षी पाहणे, त्यांचा मंजुळ आवाज ऐकणे, हा अनुभव अतिशय विलक्षण असतो. या अभयारण्यात युरोप, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, पाकिस्तान या भागांतून हजारो किलोमीटर अंतर कापून पक्षी येतात. आतापर्यंत अशा 250 वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांची नोंद केली गेली आहे. येथे पर्यटन हंगामात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते.

  • घटस्फोट घेताय मुलांनाही समजून घ्या

    घटस्फोट घेताय मुलांनाही समजून घ्या

    अलीकडे पती-पत्नीमधील घटस्फोटाची प्रकरणे सध्या सामान्य झाली आहेत. विभक्त होण्याचा वाईट परिणाम केवळ जोडप्यांवरच होत नाही, तर मुलांवरही होतो. अशा प्रसंगी आई-वडिलांनी मुलांनाही त्यांच्या भावनांशी समरस होऊन हाताळण्याची गरज आहे; अन्यथा ते तणाव व नैराश्याचे बळी ठरू शकतात. त्यांच्या भावना समजून घ्या. मुले समजूतदार असतील तर घटस्फोटाचा जास्त विचार करू लागतात. त्यामुळे त्यांच्या वागण्यात अनेक बदल दिसून येतात. अशा वेळी त्यांना ओरडण्यापेक्षा त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःला त्यांच्या जागी ठेवून त्यांना सध्या कसे वाटत असेल, याची कल्पना करुन बघा. यामुळे त्यांना समजावणे सोपे जाईल.

    घटस्फोटानंतर एकल पालकांवरही बऱ्याच जबाबदाऱ्या येतात. त्यांचे व्यवस्थापन करणे खूप कठीण होऊन जाते. अशा वेळी पालकांना संयमाने घ्यावे लागेल. मुलांसोबत पूर्वीपेक्षा थोडा जास्त वेळ घालवावा लागेल; जेणेकरून त्याचा मुलावर वाईट परिणाम होणार नाही. मुलांशी आपले नाते खेळीमेळीचे, विश्वासाचे, आपुलकीचे ठेवण्यासाठी मुलांसोबत वेगवेगळ्या उपक्रमात भाग घ्या. यामुळे मुले व्यस्त राहतील. ती जास्त विचार करणार नाहीत. असे केल्याने तुम्ही मुलांना मोठ्या प्रमाणात आधार देऊ शकता. त्यांच्यावर कोणताही निर्णय लादू नका.

    घटस्फोटानंतर जर मूल एका पालकाची खूप आठवण काढत असेल, परंतु आपण त्या व्यक्तीवर रागावत असाल, किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे संभाषण करण्याची इच्छा नसेल तर हा निर्णय तुमचा आहे, तो मुलांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. सर्वप्रथम, आपल्या घटस्फोटामुळे मूल दुःखी आहे. तुमची ही जबरदस्ती त्याला अधिक त्रास देऊ शकते, हे लक्षात ठेवा. जर मुलाला पालकांपैकी एकासह थोडा वेळ घालवायचा असेल तर त्याला मनाई करू नका. मुलाला हाताळण्याचा हा योग्य मार्ग आहे. घटस्फोटानंतर दांपत्य मोकळी होऊ शकतात, अधिक आनंदी राहू शकतात, आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ शकतात; परंतु जर तुम्ही पालक असाल तर घटस्फोटानंतर मुलांच्या मानसिक स्थितीचाही विचार आपण करायला हवा. त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देऊ नये.

  • अकाली वृद्धत्व टाळा

    अकाली वृद्धत्व टाळा

    नेहमी तरुण दिसावे अशी व्यक्तीची इच्छा असते. आजकाल लोक वेळेआधी म्हातारे होत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बदललेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी ! जर एखाद्या व्यक्तीचे अन्न आणि जीवनशैली चांगली असेल तर त्याचा थेट परिणाम त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर दिसून येतो. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ नेहमी सांगतात की तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर सकस अन्न सेवन करावे.

    अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी साखरेकडे दुर्लक्ष करा. पांढऱ्या साखरेपासून बनविलेल्या वस्तू किंवा शुद्ध साखरेपासून बनविलेले पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतात. पांढरी साखर त्वचा आणि केस दोघांसाठी खूप धोकादायक आहे. जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते. ज्याचा परिणाम चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो.

    भारतात अनेकांना तेलकट आणि तळलेले पदार्थ खायला आवडतात. बरेच लोक ते शिजवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तेल वापरतात. तेल वारंवार गरम करून त्याचा वापर केल्याने आरोग्याची हानी होते. घरी असो किंवा बाहेर, जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. यामुळे हृदयविकार तर होतोच, पण चेहऱ्यावर वयही दिसू लागते.

    बर्गर, फ्रेंच फ्राईज, समोसे, पकोडे, डीप फ्राईड चिकन यांसारख्या पदार्थांपासून शक्य तितके लांब रहावे. या पदार्थांमुळे सुरकुत्या आणि पिंपल्सची समस्या सुरू होते. दारू आणि सिगारेट हे समाजासाठी वाईट मानले जाते. आरोग्याच्या दृष्टीनेही ते वाईट आहे. या दोन्हीच्या अतिसेवनामुळे त्वचेला इजा होऊ लागते. उन्हाळ्यात तहान शमविण्यासाठी लोक जास्त शीतपेये पितात. बरेच लोक भरपूर शीतपेये तसेच उर्जावर्धक पेये पितात. त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. उसाचा रस, ताज्या फळांचा रस, लस्सी, भाज्यांचा रस अशी नैसर्गिक पेये प्यायल्यास त्वचा चमकदार राहते.

  • पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण मेथी

    पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण मेथी

    हिवाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात, ज्या पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. त्यांचा वापर करून अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. हिवाळ्यात मेथीची भाजी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. हिवाळ्यात लोक पुरी किंवा पराठ्यात मेथीचा वापर करतात. याशिवाय लोकांना बटाटा आणि मेथीची भाजीही खायला आवडते. मेथी आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून तुमचे रक्षण करण्यास मदत करते. मेथीची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये असलेले गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी सामान्य करण्यात मदत करतात. आपण मधुमेहाचे रुग्ण असाल तर आपल्या आहारात मेथीच्या पानांचा समावेश करा. मेथी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. वजन कमी करण्यासाठी आपण आहारात मेथीच्या पानांचा समावेश करू शकता. ही छोटी जादूची पाने वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. आहारात यांचा समावेश केल्याने चयापचय वाढते. वजन कमी होण्यास मदत होते.

    या भाजीच्या सेवनामुळे पचन चांगले होते. आरोग्य सुधारते. बदलत्या ऋतूमध्ये पचनाच्या समस्या सामान्य होत असतात. या ऋतूत मेथीची पाने आपणांसाठी खूप प्रभावी ठरू शकतात. मेथीची हिरवी पाने अपचन आणि सूज यासारख्या समस्या कमी करण्यास मदत करतात. मेथीच्या पानांपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने आतड्याच्या हालचालींमध्ये आराम मिळतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास मदत करतात. हिवाळ्यात मेथी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे सर्दी, खोकला किंवा इतर संसर्गापासून बचाव होतो. हृदयाच्या आरोग्याला चालना मिळते. ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांच्यासाठी मेथीची पाने खूप प्रभावी ठरू शकतात. हे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. याशिवाय या पानांमध्ये जीवनसत्व सी आणि फ्लेव्होनॉइड्ससारखी अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका टाळता येतो. ही भाजी हाडांसाठी फायदेशीर आहे. मेथीच्या पानात कॅल्शियम भरपूर असते, जे हाडांचे आरोग्य वाढवते. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम देखील आढळते, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.