सह्याद्री मराठी वाहिनी

Author: सह्याद्री मराठी वृत्त

  • मधुमेह असल्यास जीवनशैली बदला

    मधुमेह असल्यास जीवनशैली बदला

    बदलत्या जीवनशैलीमुळे लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. मधुमेह ही अशीच एक समस्या आहे, जी जगभरातील अनेक लोकांना प्रभावित करते. भारतातही काही काळापासून मधुमेहाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मधुमेह हा एक असाध्य आजार आहे. हा आजार औषधे आणि जीवनशैलीत काही बदल करून आटोक्यात ठेवता येतो. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा अन्नपदार्थाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर रुग्णांना देतात. याशिवाय मधुमेही रुग्ण त्यांच्या दिनक्रमात काही बदल करून स्वत:ला निरोगी ठेवू शकतात. सकाळच्या दिनचर्येमध्ये काही बदल करुन आपण मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतो. यामुळे आपली रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल.

    मधुमेही रुग्णांनी आपली झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवावी. नेहमीप्रमाणे सुट्टीच्या दिवशीही त्याच वेळी उठण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी दिवसभर स्थिर ठेवण्यास मदत होईल. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळचा नाश्ता सकस असणे आवश्यक आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. दिवसभर उर्जेने परिपूर्ण राहता येते.

    निरोगी राहण्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर दिवसभर पुरेसे पाणी प्या. पुरेसे पाणी तुमची रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यात देखील मदत करते. जर आपण मधुमेहाचे रुग्ण असाल, तर व्यायामाला आपल्या दिनचर्येचा एक भाग बनवा. दररोज सकाळी व्यायाम केल्याने रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवता येते. तुम्हाला दिवसभर ताजेतवानेही वाटेल.

  • पालक-बेसन पोळी

    पालक-बेसन पोळी

    साहित्य : बेसन – 3 चमचे, तांदूळ पीठ – 2 चमचे, रवा – 1 मोठा चमचा, लाल मिरची पावडर – 1 लहान चमचा, दही – 2 चमचे, हळद पावडर – पाव लहान चमचा, चिरलेला पालक – १ कप, चवीनुसार मीठ, तेल – गरजेनुसार, पाणी.

    कृती : प्रथम एक मोठे पातेले घ्यावे. त्यात पालक व पाणी वगळता सर्व साहित्य चांगले मिसळावे. आता गॅसवर पॅन ठेवावे. त्यात 1 मोठा चमचा तेल घालून गरम करावे. यानंतर गरम तेलात जिरे, हिंग आणि मोहरी घालून चांगली फोडणी द्यावी. आता त्यात पालक टाकून मध्यम आचेवर साधारण २ मिनिटे परतून घ्यावे. नंतर गॅस बंद करावा. हा पालक चांगला मॅश करुन घ्यावा. आता त्यात बेसन घालावे. पाव कप पाणी घालून सर्व साहित्य नीट मिसळून आणि जाडसर पीठ तयार करावे. त्यानंतर, पॅन मोठ्या आचेवर ठेवावे. त्यात 3 ते 4 चमचे तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यावर हे तयार मिश्रण घालून खरपूस भाजून घ्यावे. दोन्ही बाजूंनी परतून सोनेरी-तपकिरी रंगावर छान खरपूस भाजावे. पूर्ण शिजल्यावर थाळीत ठेवून खाण्यास द्यावे.

  • दक्षिण इराकमधील तरंगती घरे

    दक्षिण इराकमधील तरंगती घरे

    दक्षिण इराकमधील एक आर्द्र प्रदेश वैशिष्ट्यपूर्ण वास्तूकलेसाठी प्रसिद्ध आहे. या प्रदेशाला ‘तरंगत्या घरांचे शहर’, ‘ईडन गार्डन’, ‘मेसोपोटेमियन व्हेनिस’ किंवा ‘मदान’ अशा विविध नावांनी ओळखले जात होते. या प्रदेशात खरोखरच तरंगती घरे होती, ज्यांना ‘मुदिफ’ असे म्हणत. या घरांचे बांधकाम तीन दिवसांपेक्षा कमी कालावधीत होत होते. कोणतेही खिळे, काच किंवा लाकूड न वापरता बांधली गेलेली घरे वैशिष्ट्यपूर्णच होती.

    हजारो वर्षांपासून वापरात असलेली ही प्राचीन बांधकाम पद्धत राजकीय परिस्थितीमुळे नाहीशी होऊ लागली. 1991 मध्ये देशात उठाव झाले. या उठावात सद्दाम हुसेनला पाठिंबा दिल्याबद्दल ‘ मुदीफ’ मध्ये राहणाऱ्या लोकांना शिक्षा करण्यासाठी दक्षिण इराकमधील ही दलदलीची जमीन कोरडी केली गेली. परिणामी, हे ‘मेसोपोटेमियन व्हेनिस’ वाळवंटात बदलले गेले; कारण येथील गावे जळून खाक केली. येथील रहिवाशांना इराणी निर्वासित छावण्यांमध्ये जावे लागले.

    ‘मदान’मध्ये अनेक जमातींचा समावेश होता, ज्यांनी एक सुंदर, पर्यावरणास अनुकूल संस्कृती विकसित केली होती. ती दलदलीच्या नैसर्गिक संसाधनांवर केंद्रित होती. त्यांच्या जीवनशैलीतील खरोखर प्रशंसनीय पैलूंपैकी एक म्हणजे त्यांची सुंदर विस्तृत निवासस्थाने – तरंगणारी घरे ही पूर्णपणे पाण्यातून काढलेल्या ‘रीड्स’ पासून बनलेली होती.

    सुदैवाने, 2003 मध्ये जेव्हा स्थानिक समुदायांनी अमेरिकेच्या इराकवरील आक्रमणानंतर सद्दाम हुसेनच्या धोरणांचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली, तेव्हा गोष्टींनी चांगले वळण घेतले. पुनर्संचयित प्रकिया सुरु झाली. त्यांनी दलदलीच्या जीर्णोद्धाराचे काम केले आणि त्याच वर्षी चार वर्षांचा दुष्काळही संपुष्टात आला. त्यांनी ‘टायग्रेस’ आणि ‘युफ्रेटीस’ला धरून ठेवलेली धरणे नष्ट केली, आणि मग मूळ दलदलीच्या क्षेत्राच्या किमान एक चतुर्थांश भागात पुन्हा पूर आला. अरबांची ही परिसंस्था पुनर्संचयित होण्यास बराच वेळ लागेल.

    तरीही, ही प्राचीन कला जिवंत होणे अत्यंत गरजेचे आहे. काही अरबांनी परत येथे जाण्याचा निर्णय घेतला, तरीही त्यांना खराब स्वच्छता आणि शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा किंवा शिक्षण सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागेल. दलदल आणि तिथून कमी होत चाललेला समुदाय वाचवण्यासाठी फार थोडे लोक आपला जीव धोक्यात घालण्यास तयार असतात.

    तथापि ‘नेचर इराक’ ही इराकी-अमेरिकन अभियंत्याने स्थापन केलेली संस्था आहे. हा एक आशेचा किरण आहे. ही संस्था इतर देशांच्या आर्थिक सहाय्याने मार्श अरबांना त्यांच्या घरी पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत आहे. संस्थेने अलीकडेच एक पारंपरिक ‘रीड मुदिफ’ पुन्हा बांधले. हे दाखवून दिले की प्राचीन स्थापत्य पद्धत आजही वापरली जाऊ शकते.

    ‘नेचर इराक’ मदानच्या जुन्या परंपरेचा सन्मान करण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यांनी नेहमीच गरजूंना आश्रय दिला आहे. ‘रीड मुदिफ’ आता ‘गेस्ट हाऊस’ म्हणून काम करत आहे, स्थानिक लोक, प्रवासी आणि दलदलीच्या भविष्याबद्दल चर्चा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी निवासाची व्यवस्था करत आहे.

  • खिळे बनवण्याचा उद्योग

    खिळे बनवण्याचा उद्योग

    ‘खिळा’ ही वस्तू माहिती नसणारी व्यक्ती जगाच्या पाठीवर तरी शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाच्या घरात, कार्यालयात किमान १ खिळा तरी नक्कीच असतो. खिळ्याला असलेली मागणी ही सतत वाढत जाणारी आहे. लघुउद्योगातून महिन्याला किमान २४ लाख खिळे तयार होतात. खिळे बनवण्याची प्रक्रिया ही यंत्रांवर आधारित आहे. त्यामुळे तिथे मनुष्यबळ हे तुलनेने कमी लागते. एखाद्या लघुउद्योगामध्ये खिळे बनवण्यासाठी किमान ४ कर्मचारी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे कर्मचारी, उत्पादन क्षमता, यंत्रांसाठीची जागा लक्षात घेता किमान १००० चौ. फूट जागेची आवश्यकता असते.

    वायर नेल मेकिंग यंत्राच्या सहाय्याने आपण खिळ्यांची निर्मिती करू शकतो. या यंत्राद्वारे तयार करण्यात आलेले खिळे पॉलिश करण्याची गरज असते. खिळे पॉलिश करून ते बाजारात विक्रीसाठी उतरवले जातात. खिळे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची अंदाजे किंमत ५ ते ७ लाखांपर्यंत असते. त्यावर आपण वेगवेगळ्या आकाराचे खिळे तयार करू शकतो.

    चांगला कच्चा माल वापरला की खिळे हे चांगल्या प्रतीचे तयार होतात. खिळे खराब होऊ नयेत म्हणून त्यांना विशिष्ट प्रकारे बांधणी करून ठेवणेही आवश्यक असते. खिळे बनवण्याचा उद्योग सुरू करण्यासाठी शासकीय परवान्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे या व्यवसायाची लघुउद्योगामध्येही तुम्ही नोंदणी करू शकतात. जर तुमच्याकडे परवाना असेल, तर या उद्योगासाठी कर्ज सुविधाही उपलब्ध आहे.

  • गादी बनविण्याचा व्यवसाय

    गादी बनविण्याचा व्यवसाय

    अल्प उत्पन्न गट ते श्रीमंत यांच्याकडे आढळणारी एक सामायिक गोष्ट म्हणजे ‘गादी’! गादीचे प्रकार वेगवेगळे असतील, पण किमान एक गादी सद्यःस्थितीत तरी आपल्याला प्रत्येकाच्या घरात आढळते. काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरात कापूस पिंजून देऊन आपल्या घरासमोरच बसून गादी शिवून देणारा व्यक्ती यायचा. आता वाढत्या शहरीकरणात एखाद्या गावात असा कापूस पिंजून गादी शिवून देणारा व्यक्ती आपल्याला दिसू शकतो. शहरात मात्र गादीच्या दुकानात जाऊन गादी शिवून घ्यावी लागते किंवा मोठ्या ब्रँडच्या दुकानातून तयार गादी विकत घ्यावी लागते. जागतिकीकरण मानवाच्या प्रत्येक गरजेपर्यंत पोहचलेले आहे याचंच हे प्रतीक आहे.

    गादी व्यवसाय सुरु करण्यासाठी किमान ४५० स्वे. फूट जागा असणे आवश्यक आहे. कापूस थेट शेतकऱ्यांकडून घेतल्यास तो चांगल्या प्रतीचा आणि स्वस्त उपलब्ध होऊ शकतो. कापसाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यातील ग्राहकांच्या गरजेप्रमाणे तुम्ही उपलब्ध करून देऊ शकतात. कापूस खरेदी केल्यावर तो पिंजून त्यातील बिया आणि अन्य कचरा वेगळा करणे, कापूस स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. अंदाजे ८ ते १० किलो कापसापासून एक गादी आणि जर जोडगादी हवी असेल तर १२ ते १६ किलो कापूस गरजेचा असतो.

    गादी व्यवसायासाठी मुख्यतः चांगल्या प्रतीच्या कापसाचे विविध प्रकार, कापूस पिंजण्याचे यंत्र, शिलाई यंत्र, वजन काटा, इलेक्ट्रिक मोटर, कात्री, सुई, धागा आणि गादीचे कापड यांची आवश्यकता असते. किमान २ मजूर हे एक गादी बनवण्यासाठी लागतात. गादी बनवणारा मजूर हा कुशल हवाच असे नाही. त्याला फक्त शिलाईचे तंत्र माहिती असेल, तर तो गादी शिवण्यात कुशलता मिळवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे गादीचे कापड आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. जेणेकरून ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना गादी शिवून देणे शक्य होईल.

    गादी व्यवसाय हा काही रोज नवीन गाद्यांची मागणी मिळवणारा व्यवसाय नाही. महिन्यातून किमान १० ते १२ गाद्यांची मागणी येऊ शकते. पण मग बाकीच्या वेळी काय करायचा असा प्रश्न निर्माण झाला, तर बऱ्याचदा ग्राहकांकडे जुनी गादी असते तिच्या कापसापासूनच नवीन गादी तयार करायला सांगतात किंवा कधीकधी ग्राहकांच्या घरी जाऊन गादीचे कापड विरलेले असल्याने ते बदलायचे कामही मिळते. त्यामुळे गादी व्यवसाय हा बारा महिने सुरू राहणारा व्यवसाय आहे. गादी व्यवसाय करताना आपण ग्राहकांना उशी, चादर, गोधडी किंवा ब्लँकेट्स सुद्धा विकू शकतो.

    त्याचप्रमाणे सरकारी निवासस्थाने, वसतीगृह, राहण्याची सोय असलेली ठिकाणे, रुग्णालये यांच्याकडून तर दर महिन्याच्या मागणी किंवा गादी डागडुजीची कामेही आपल्याला मिळू शकतात. हल्ली खूप ठिकाणी सोफा असतो, तर सोफ्यासाठी आवश्यक गाद्याही आपण तयार करून देऊ शकतो. हा व्यवसाय आपण शहरी भागात १ लाख रुपयांची प्राथमिक गुंतवणूक करून सुरू करू शकतो.

  • लिची लागवड

    लिची लागवड

    उष्णकटिबंध प्रदेशातील ‘लिची’ची लागवड भारतात अनेक ठिकाणी केली जाते. हे मूळ ‘चीन’मधून आलेले फळ आहे. चीनच्या खालोखाल लिची उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जम्मू – काश्मीर, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये लिचीची लागवड प्रामुख्याने केली जाते. आता हळूहळू लिची उत्पादन घेण्यासाठी इतर राज्येही पुढे येत आहेत.

    लिचीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे भारतात उन्हाळ्याच्या दिवसांत लिची हमखास बाजारपेठांमध्ये दाखल होते. लिचीमध्ये ‘बी ६’ जीवनसत्त्व, ‘क’ जीवनसत्त्व, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी खनिजेही आढळतात. लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आपले शरीर थंड ठेवायला मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, अतिसार टाळता येतो, उष्माघातापासून रक्षण होते, पचनसंस्था सुद्धा निरोगी राहते.

    लिचीची लागवड पावसाळ्यानंतर नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांच्या कालावधीत करतात. हवामान कोरडे असताना लिचीची लागवड केल्यास तिला फळे जास्त लगडतात. एप्रिलमध्ये वातावरणातील आर्द्रता सामान्य असल्याने फळाला भरीव असा गर येतो आणि अधिक गुणवत्ता असलेली फळे आपल्याला मे महिन्याच्या आसपास चाखायला मिळतात.

    लिचीला पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. लिचीची साधारपणपणे २ वर्षांची झाडे लागवडीसाठी निवडली जातात. लिचीची झाडे एकमेकांपासून 10 x 10 अंतर राखून लावली जातात. रोपाला आकार देण्यासाठी सुरुवातीच्या काळात कापणी आवश्यक असते. त्यानंतर विशेष कापणी करावी लागत नाही. फळ काढल्यानंतर नवीन फांद्या तयार करण्यासाठी हलकी छाटणी आवश्यक असते.

    लिचीच्या झाडाची संपूर्ण वाढ होऊन फळ लागायला सुरुवात होण्यासाठी किमान ७ वर्ष लागतात. त्यामुळे त्या दरम्यान तुम्ही शेतात आंतरपीक घेऊ शकतात.

    लिचीची फळे तोडताना ती डहाळ्या आणि पानांसकट तोडली जातात. लिची हे फळ जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे पूर्ण पिकल्यानंतर ते तोडतात; पण जर निर्यात करायची असेल, तेव्हा मात्र फळ गुलाबी झाल्यावरच झाडावरून उतरवले जाते. सुरुवातीला लिचीपासून अत्यल्प नफा मिळतो. झाडाचे वय १५ ते २० वर्ष झाल्यावर दरवर्षी १०० किग्रॅ. फळे आपल्याला मिळतात. ‘ए’ दर्जाची १० किलो लिची अंदाजे १७०० रुपयांपर्यंत विकली जाते.

  • पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर

    पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर

    पुण्यातील अनेक धार्मिक वास्तू प्राचीन असून प्रेक्षणीय आहेत. त्या पाहण्यासाठी येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. असेच एक टेकडीवर विसावलेले चतु:श्रृंगी देवीचे मंदिर आहे. पुणे शहरातील श्री चतु:श्रृंगी देवी ही पार्वतीचा अवतार असलेल्या श्री दुर्गादेवीचे रुप मानले जाते. हे मंदिर पुण्यातील सेनापती बापट मार्गावर आहे. चतु:श्रृंगी याचा अर्थ चार शिखरे असलेला डोंगर किंवा पर्वतावर विराजमान झालेली असा होतो. हे देवीचे मंदिर अशाच एका टेकडीवर असून वर जाण्यासाठी सुमारे १७० पायऱ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे मंदिर बांधले गेले, असे मानले जाते. मंदिराची उंची अंदाजे 90 फूट आणि रुंदी अंदाजे 125 फूट आहे.

    या मंदिराबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते. त्यानुसार धुर्लबशेठ पितांबरदास महाजन नावाचे एक व्यापारी होते. ते वाणी येथील श्री सप्तश्रृंगी देवीचे निस्सीम भक्त होते. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ते वणीला दर्शनासाठी जात असत. पुढे वृद्धापकाळामुळे त्यांना मंदिरात जाता येणे अशक्य होऊ लागले. आपल्या आवडत्या देवीचे दर्शन होत नसल्याने ते व्यथीत होते. ते नित्यनेमाने श्री दुर्गादेवीची प्रार्थना करीत. एके दिवशी, श्री दुर्गादेवीने त्यांना स्वप्नात येऊन सांगितले, की ती स्वतऱ् येऊन त्यांना दर्शन् देईल. पुण्याच्या उत्तर-पश्चिम बाजूस तिने एक जागा दाखवून तिथ आपण असल्याचे सांगितले. स्वप्नातून जागे आल्यावर या व्यापाऱ्याने त्याठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली. जमिनीत उत्खनन केले असता त्यांना तिथे श्री दुर्गादेवीची स्वयंभू मूर्ती मिळाली.

    त्याच टेकडीवर या व्यापाऱ्याने देवीचे मंदिर बांधले. तेच हे मेदिर, असे भाविक सांगतात. देवीच्या मुख्य गाभार्यात श्री दुर्गा देवीच्या .एक सोनेरी रंगाची आणि दुसरी चांदीची अशा दोन मूर्ती आहेत. येथे श्री गणेशाचे गर्भगृह देखील आहे. याशिवाय अष्टविनायकाच्याही लघु मूर्ती आहेत. मुख्य गाभाऱ्यातील देवीला चतु:श्रृंगी आणि श्री अंबरेश्वरी असेही म्हणतात. तिला श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वतीचे रूप मानले जाते.

    या मंदिरात नवरात्री तसेच देवीशी संबंधित सर्व सण भक्तिभावाने साजरे केले जातात. मंदिराच्या पायथ्याशी जत्रा भरवली जाते. विजयादशमीच्या दिवशी चांदीच्या मूर्तीची चांदीच्या रथावरुन मिरवणूक काढली जाते. दिवाळी, होळी आणि गणेश चतुर्थी हे मंदिरात साजरे होणारे इतर सण आहेत. वटपौर्णिमेच्या वेळी महिला मंदिराच्या आवारात असलेल्या वटवृक्षाची पूजा करतात. या मंदिराचा कारभार चतु:श्रृंगी मंदिर ट्रस्टद्वारे केला जातो. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुले असते. पुणे शहरातून लोकल बस, तसेच रिक्षाने या मंदिरापर्यंत सहज जाता येते.

  • उनभाट सागरकिनारा

    उनभाट सागरकिनारा

    उनभाट सागरकिनारा हा कोकणातील एक लहानसा समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा हिरवेगर्द डोंगर आणि स्वच्छ निळ्या पाण्याने वेढलेला आहे. येथे पर्यटकांची गर्दी किंवा गोंगाट नसतो. उनभाट किनारा हा पोहण्यासाठी, सूर्यस्नान करण्यासाठी आणि आराम करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. जवळच काही लहान रेस्टॉरंट्स आणि कॅफे देखील आहेत. जर आपण शांततापूर्ण आणि आरामदायी गेटवे शोधत असाल तर उनभाट हे एक उत्तम ठिकाण आहे. हा एक सुंदर समुद्रकिनारा आहे. उनभाट किनारा हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आहे. हा किनारा मुंबईपासून 106 किलोमीटर आणि ठाण्यापासून 79 किलोमीटर अंतरावर आहे.

    उनभाट बीचवर जाण्याचा सर्वोत्तम मार्ग कार ने आहे. समुद्रकिनाऱ्यावर थेट पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचे कोणतेही पर्याय नाहीत. उनभाट किनाऱ्याजवळ काही छोटी रेस्टॉरंट आणि कॅफे आहेत. काही अतिथीगृहे आणि हॉटेल्स देखील आहेत, जिथे आपण राहू शकता. येथे भेट देण्याची सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी आहे. यावेळी हवामान उबदार असते. गर्दी कमी असते. उनभाट बीच हा एक छोटा, निर्जन समुद्रकिनारा आहे, त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर कोणत्याही सुविधा नाहीत. आपले स्वतःचे अन्न आणि पेये सोबत न्यावीत.

  • तारापूरचा किल्ला

    तारापूरचा किल्ला

    महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर तालुक्यात तारापूर हा एक नयनरम्य ऐतिहासिक किल्ला आहे. आता किल्ल्यावर अवशेष शिल्लक आहेत. परंतु येथून आजूबाजूचा परिसर फार मनमोहक दिसतो. या किल्यायाचे मुंबईपासूनचे अंतर सुमारे १०० किलोमीटर आहे. हा किल्ला सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. पोर्तुगीजांच्या काळात हा किल्ला ‘सॅंटो एस्टेव्होचा किल्ला’ म्हणून परिचित होता.

    हा किल्ला पोर्तुगीज कारवायांसाठीचा या प्रदेशातील महत्त्वाचा तळ होता. याचा उपयोग व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवून शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी केला जात असे. मराठ्यांनी या किल्ल्याचे नाव बदलून ‘तारापूरचा किल्ला’ असे ठेवले. तारापूर किल्ला हा आयताकृती किल्ला आहे. या किल्ल्यास चार बुरुज आहेत. हा किल्ला सुमारे १० मीटर उंच भिंतींनी वेढलेला आहे. किल्ल्यामध्ये अनेक विहिरी देखील आहेत. हा किल्ला एका टेकडीवर बांधलेला असून तेथून आजूबाजूचा परिसर दिसतो. तारापूर किल्ला आता मोडकळीस आला आहे.

    अठराव्या शतकात मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. किल्ल्याजवळ अनेक हॉटेल्स आणि अतिथीगृहे आहेत. हा किल्ला सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत खुला असतो. गडावर जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसते. या किल्ल्याभोवती हिरवीगार झाडे आहेत. या निसर्गरम्य किल्ल्यावर पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक विहिरी आहेत. सहलींसाठी हा किल्ला योग्य ठिकाण आहे. त्यामुळे येथे पर्यटक आवर्जुन येतात. या किल्ल्याजवळ अनेक रेस्टॉरंट्स आणि कॅफे देखील आहेत, जेथे पर्यटक सीफूड आणि इतर स्थानिक पदार्थांचा आनंद घेऊ शकतात. तारापूर किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक वाणगाव आहे. हे किल्ल्यापासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. जवळचे बसस्थानकसुद्धा वाणगाव हेच आहे.

  • सुधागड अभयारण्य

    सुधागड अभयारण्य

    पुण्यापासून साधारण 135 कि.मी अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुधागड अभयारण्य वसलेले आहे. येथे असलेल्या सुधागड या गडावरुन हे नाव देण्यात आले आहे. गडाच्या सभोवतालचे 76.88 चौ.कि.मी. क्षेत्र सन 2014 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. सुधागडच्या या परिसरात दाट वनश्री आहे. सुधागड परिसरात हजारो वर्षांपूर्वीची ठाणाळे लेणी आहेत. येथे अनेक तलाव आहेत. या अभयारण्यात अनेक औषधी वनस्पती आणि प्राणीसंपदा आहे. येथे भोराई देवीचे मंदिर आहे. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना केली, असे म्हणतात. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत. एकूणच, हे अभयारण्य पर्यटकांना आवडेल असेच आहे.

    पर्वतकस्तूर, युवराज, स्वर्गीयनर्तक, चंडोल, सर्पगरूड,हळद्या, कुरटूक, निखार, शमा, नवरंग, टकाचोर, मोरघार हे पक्षी या वनात विहार करतांना दिसतात. महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असलेल्या ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराबरोबर अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरे येथे आहेत. वैभव, कारवी, करवंद, धायटी, रामेठा, मुरूडशेंग, फापट, कुडा, दिंडा सारखी झुडूपे आढळतात. उक्षी, पिळुकी, मालकांगोणी, खाज कोयली, वाटोळी, ओंबळ, पहाडवेल, घोटवेल, कडुकारंदा, आंबगुळी, तोरण, कुसर, बेडकीचा पाला, कर्टुली अशा वेली येथे मुबलक प्रमाणात आहेत. साग, खैर, काटेसावर, बीजा, कुंभा, आष्टा, अंजनी, जांभूळ, पिसा, वारस, आसाना, ऐन, बेहडा, पारजांभूळ, नाना असे मोठे वृक्ष येथे पहायला मिळतात. हे वन निम्न सदाहरित, सदाहरित आणि आर्द्र पानझडीचे वन या प्रकारातील आहे.

    येथे बिबट्या, भेकर, उदमांजर, रानमांजर, खवल्या मांजर, मुंगूस, साळींदर, वानर, शेकरू हे वन्यजीव पहायला मिळतात. अजगर, नाग, धामण, चापडा, हरणटोळ, कवड्या दिवड, व घोरपड हे सरपटणारे प्राणीही येथे आहेत. सुधागड अभयारण्य मुंबई-पुण्यापासून जवळ आहे. येथे वृक्ष,प्राणी व पक्षी पाहता येतातच; शिवाय ऐतिहासिक किल्लाही पाहता येतो. या किल्याक्वर बरीच ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेत. गडावर असलेल्या टकमक टोकावरुन समोर धनगड, कोरीगड तेलबैला दिसतो. येथील पंच सचिवांचा वाडा व भोराई देवी मंदिरात 50 ते 60 लोकांची निवास व्यवस्था आहे.

  • पाल्य – पालकांमधील तुटलेला संवाद

    पाल्य – पालकांमधील तुटलेला संवाद

    तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आपण मोकळा संवाद साधायला विसरत चाललो आहोत. अगदी आपला घरातील संवादही हरवत चालला आहे. त्यामुळे पाल्याच्या मनात येणारे प्रश्न पालकांपर्यंत पोहचतच नाहीत. त्यामुळे कुटुंबावर होणारे परिणामही आपण पाहत आहोत.पाल्य आणि पालकांनी दिवसभरातील एखादी ठराविक वेळ ही एकमेकांसोबतच्या संवादासाठी राखून ठेवली पाहिजे. जेणेकरून त्यावेळेत संवाद, चर्चा घडतील. मुलांच्या मनावरील ओझे पालकांना कळल्यास पालक त्यांना स्वानुभवातून काही मार्ग सांगू शकतात, पण त्यासाठी संवाद होणे आवश्यक आहे.

    कोविड नंतर ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरी बसून काम करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात रूढ झाली. त्यामुळे आई – बाबा हे दोघेही दिवसभर मोबाईल आणि लॅपटॉपसमोर बसायला लागले. मुलांची शाळाही ऑनलाइन असल्याने मुलेही दिवसभर आभासी जगात वावरत होती. पण आता ही परिस्थिती बदलली आहे. मुलांच्या शाळा सुरू झाल्याने त्यांचे इतर विद्यार्थ्यांत मिसळणे, खेळणे, भांडणे पुन्हा एकदा सुरू झाले आहे. विदेशी कंपनीमध्ये काम करणाऱ्या पालकांचे मात्र ऑनलाइन काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे बऱ्याचदा पाल्य बाहेरून आल्यावरही पालकांचे त्याच्याकडे लक्ष नसते. ते नाराज आहे की आनंदी आहे ते बघायला वेळ नसतो. त्यामुळे पाल्यही पालकांशी संवाद साधायला जात नाही. ते मनातल्या मनात घुसमटत राहते.

    काही पालक इतर पालकांच्या तक्रारीतून आपल्या पाल्याचीच चूक आहे असा समज करून घेतात. त्यामुळे आपले मूल आपल्याला काय सांगत आहे हे समजून न घेता घडलेल्या प्रसंगात आपल्याच पाल्याची चूक कशी झाली असणार हे सतत त्याच्यावर लादतात. त्यामुळे काहीही घडल्यावर आई – वडील पाल्याला ओरडतात हा समज तयार होतो आणि पाल्य – पालक संवाद तुटतो. त्यामुळे पालकांनी सर्वांत प्रथम आपल्या पाल्याची बाजू ऐकून घेऊन त्यावर विश्वास ठेवून मग चर्चा केली पाहिजे.

    या तुटत चाललेल्या संवादावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे एकमेकांना वेळ द्या. एकमेकांची मते जाणून घेऊन त्यावर विचार करा. कुटुंबात चर्चा घडू द्या. त्यातून तुटलेल्या विसंवादाला संवादाचे स्वरुप प्राप्त होईल. तंत्रज्ञानाच्या जाळ्यातून माणुसकीच्या संवादात्मक जाळ्यात एकमेकांना अडकवण्याची वेळ जवळ आली आहे.

  • काळजीपूर्वक करावे नेल एक्स्टेंशन

    काळजीपूर्वक करावे नेल एक्स्टेंशन

    हे फॅशनचे युग आहे ! प्रत्येकजण आपला ‘लूक’ आणि सौंदर्याची विशेष काळजी घेताना दिसतो. मुलगा असो किंवा मुलगी, आजकाल याबाबत खूप जागरूक झाले आहेत. विशेषत: महिला प्रत्येक प्रसंगात आकर्षक दिसण्यासाठी फार मेहनत घेतात. त्यांच्या पोशाखांपासून ते केशभूषा, पादत्राणे या सर्व गोष्टी महिलांना परिपूर्ण हव्या असतात. नखे हा सुद्धा सौंदर्याचा एक भाग आहे. आकर्षक नखांमुळे हातांचे सौंदर्य खुलते. स्वच्छ-सुंदर, सरळसोट नखे सर्वांनाच हवी असतात. नखे सजविण्यासाठी ब्युटिशियनकडे अनेक उपाय असतात. मुली नखांना छान आकार देतात. शिवाय असे नवनवे ‘ट्रेंड’ सहजपणे स्वीकारतात. आजकाल बऱ्याच मुली नखांना ‘परफेक्ट लूक’ देण्यासाठी ‘नेल एक्स्टेंशन’चा अवलंब करताना दिसतात.

    पावसाळ्यात नखांचे सौंदर्य वाढविण्यासाठी ‘नेल एक्स्टेंशन’ करतात; म्हणजेच नखे वाढवली जातात आणि त्यांना आकर्षक आकार देऊन ती डिझाईनने सजवली जातात; जेणेकरून ती फार सुंदर दिसतील. आता हे सर्वसामान्य झाले आहे. आपण जर ‘नेल एक्स्टेंशन’ करण्याचा विचार करीत असाल, तर एक आठवड्यासाठी दररोज तेल किंवा ‘मॉइश्चरायझर’ ने नखांना मसाज करा. यासाठी तुम्ही नारळ, बदाम तेल वापरू शकता.

    जर तुम्ही नखावरचे ‘नेल एक्स्टेंशन’ काढून टाकले असेल, तर नक्कीच काही दिवस नखांना ‘नेल पेंट’ वापरू नका. गरजेसाठी ‘नेलपेंट’ लावल्यास रात्री झोपण्यापूर्वी काळजीपूर्वक काढून टाका. हे करणे आवश्यकच असते; कारण नखे वाढवल्यामुळे, नखांना हवा उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत ‘नेल पेंट’ लावल्यास नखे नैसर्गिक हवेच्या संपर्कात येऊ शकणार नाहीत.

    ‘नेल एक्स्टेंशन’ केल्यामुळे नखे पातळ आणि कमकुवत होतात. त्यामुळे जर तुम्ही ‘नेल एक्स्टेंशन’ करीत असाल, तर त्यानंतर नखांवर ‘नेल स्ट्राँगर’ लावा. तसेच ‘नेल पेंट’ लावण्यापूर्वीही त्याचा वापर करा, जेणेकरून नखे मजबूत राहतील.नखे सुंदर दिसण्यासाठी आधुनिक कलात्मकता गरजेची आहे. अलीकडे नखे सजविण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुली या पर्यायांचा अवलंब करतात. सौंदर्यप्रसाधनाचे हे उपाय करीत असताना त्याचे विपरित परिणाम शरीराच्या त्या अवयवावर होऊ नयेत, याची दक्षता घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठीच कोणताही उपाय काळजीपूर्वक केलेलाच कधीही चांगला असतो.

  • हिरड्यांचे आरोग्य जपावे

    हिरड्यांचे आरोग्य जपावे

    काहीजणांच्या हिरड्यांमधून ब्रश करताना रक्तस्राव होतो. त्याकडे ते दुर्लक्ष करतात. कधीकधी ब्रश करताना हिरड्यांना दुखापत झाल्यामुळे किंवा हिरड्या खूप कठीण झाल्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो; परंतु कधीकधी हिरड्यांमधून रक्त येणे हे गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास भविष्यात त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. अशी समस्या असेल तर वेळीच सावध व्हा. हिरड्यांमधून रक्त येणे यामागे इतर अनेक कारणे असू शकतात. हार्मोनल असंतुलन, जीवनसत्वाची कमतरता आणि अगदी तणाव हे देखील याचे कारण असू शकते.

    हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव थांबविण्यासाठी ब्रश बदलून घ्या. ब्रश विकत घेताना त्याचे ब्रिस्टल्स मऊ आहेत का हे पहा. ब्रिस्टल्स कठोर असल्यास हिरड्यांना दुखापत होऊ शकते. त्यामुळे योग्य ब्रश निवडा. दातांमध्ये असलेल्या घाणीमुळे हिरड्यांवरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मुखस्वच्छता फार गरजेची आहे. दिवसातून दोनदा ब्रश आणि फ्लॉस करा. यामुळे दातांमध्ये साचलेली घाण साफ होईल. हिरड्या निरोगी राहतील.

    ‘क’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ‘क’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा त्रास होऊ नये हे महत्त्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे ‘स्कर्वी’ आजारही होऊ शकतो, ज्यामध्ये हिरड्यांमधून रक्त येते. संत्री आणि किवी या फळांना आपल्या आहाराचा भाग बनवा. तोंडाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमितपणे दंतवैद्याकडे जाणे आणि तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे; जेणेकरून काही समस्या असल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतील. कोमट पाण्यात मीठ टाकून चूळ भरणे हेसुद्धा हिरड्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कोमट पाण्याने चूळ भरल्याने हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या टाळता येते.

  • मूगडाळीचे लाडू

    मूगडाळीचे लाडू

    साहित्य : २ कप मूगडाळ, ३ कप तूप, 1 कप साखर, 1 लहान चमचा वेलची पावडर, २ चमचे ड्रायफ्रुट्स, २ कप दूध.

    कृती : लाडू बनविण्यासाठी प्रथम एका कढईत तूप गरम करा. त्यात मूग डाळ सोनेरी होईपर्यंत तळा. आता ही डाळ एका प्लेटमध्ये ठेवून थंड करा. मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यानंतर कढईतील तुपात मूगडाळीचे पीठ घालून चांगली परतून घ्या. आता दूध गरम करुन घ्या. त्यात मुगडाळीचे पीठ, साखर,ड्रायफ्रुटस आणि वेलचीपूड टाकून चांगले मिसळा. आपल्या गरजेप्रमाणे तूप कमी-जास्त करु शकता. यानंतर हाताला थोडे तूप लावून लाडू बनवायला सुरुवात करा. मूग डाळीचे लाडू तयार आहेत.

  • घासणी उद्योग

    घासणी उद्योग

    भांड्यांची स्वच्छता करण्यासाठी घासणी म्हणजेच स्क्रबरचा वापर सगळीकडे केला जातो. जेव्हा घासणीचा शोध लागला नव्हता, तेव्हा नारळाच्या शेंडीचा वापर घासणीसारखा केला जायचा. घासणीमुळे तेलकट – तूपकट झालेली भांडी लख्खं होतात. चकाकू लागतात. घासणी उद्योगामध्ये कमी गुंतवणूक आणि जास्त नफा दडलेला आहे. हा लघुउद्योग घरच्या घरी सुरू करण्यासाठी जास्तीत जास्त रु. ३०,०००/- पर्यंत गुंतवणूक करावी लागते.

    लघुउद्योगाच्या दृष्टीने घासणी व्यवसायाकडे पाहिल्यास आपल्याला ३ ते ४ कामगारांची गरज आहे. किमान १००० स्वे. फूट जागा या व्यवसायासाठी आवश्यक आहे. घासणी बनवण्यासाठी कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसते. या उद्योगासाठी बँकेकडून कर्जही मिळते. या उद्योगामध्ये स्क्रबर बनवण्याचे यंत्र, कंप्रेसर मशीन, स्क्रबर पॅकेजिंग मशीन आणि बॅच कोडिंग मशीन यांची तुम्हांला गरज आहे. त्याचप्रमाणे स्टेनलेस स्टील वायर, ब्लिस्टर कॅप, कॅरल पेपर, एचिंग केमिकल हा कच्चा माल आवश्यक आहे.

    अगदी छोट्या बाजारांपासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत, ऑनलाइन विक्री दुकानांमध्येही आपल्याला घासणी विक्रीसाठी ठेवता येऊ शकते. ज्यामुळे भरपूर नफा मिळवता येतो. घासणी बनवण्यासाठी ४ रुपयांचा खर्च येतो आणि ती घासणी घाऊक बाजारात तब्बल ६५ रुपयांपर्यंत विकली जाते, तर किरकोळ विक्रेते १०० रुपयांपर्यंत विकतात. एकूण गुंतवणूक आणि मिळणारा नफा यांचा विचार केल्यास गुंतवणूकीच्या ३० टक्के नफा आपल्याला या उद्योगात मिळतो. घासणी व्यवसायात तोटा तुम्हांला फक्त कच्च्या मालाचा दर्जा घसरल्याने होऊ शकतो. त्याचप्रमाणे ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन त्यांच्या सल्ल्याने जर आपण आपल्या उत्पादनात बदल करत गेलो, तर उत्पादन विक्रीत वाढ होईल.

  • दंतचिकित्सा व्यवसाय

    दंतचिकित्सा व्यवसाय

    दंतचिकित्सा हा एक स्वतंत्र व्यवसाय असून आरोग्य सेवांचा एक महत्त्वाचा विभाग आहे. दंतचिकित्सा व्यवसायासाठी तोंडाची रचना, दातांची उत्पत्ती, विकास आणि कार्यप्रणाली आणि इतर अवयव, औषधे, शस्त्रक्रिया आणि यांत्रिक उपचारांचे योग्य ज्ञान आवश्यक आहे. विकसनशील देशांमध्ये दंत व्यवसाय करणे हे अधिकाधिक सामान्य होत चालले आहे. परिणामी उपचार शुल्क कमी होते, तसेच गुणवत्ताही काही प्रमाणात कमी होते. ‘पहिली छाप ही शेवटची छाप; ही जुनी म्हण अजूनही दंत व्यवसायासाठी खरी आहे. हा व्यावसाय सुरू करताना रिसेप्शनिस्ट अर्थात फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह हे क्लिनिकचा चेहरा आहेत, हे लक्षात घ्यावे. आपल्या येथे उपचार सुरू ठेवायचे की नाही हे रुग्णाच्या निर्णयाबरोबरच या छाप पडण्यावरही अवलंबून असते.

    त्यामुळे दंतचिकित्सकांनी त्यांच्या रूग्णांना चांगला अनुभव देण्यासाठी दवाखान्यात पायाभूत सुविधा द्याव्यात. प्रशिक्षित कर्मचारी नेमावेत. नजीकच्या भविष्यात, भारतातील दंत व्यवसायाची स्थिती निश्चितच अधिक चांगली होईल. प्रत्येक रुग्णाला उच्च दर्जाचे उपचार प्रदान केले जातील. अशा प्रकारे, भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये दंतचिकित्सा व्यवसायाची भरभराट होण्याची खात्री आहे. सध्याच्या युगात जवळजवळ सर्वच उद्योग हळूहळू डिजिटलायझेशनच्या दिशेने वाटचाल करत असताना दंत उद्योग अपवाद असणार नाही. दंतचिकित्सामधील ‘3डी’ प्रिंटिंगमध्ये डिजिटलायझेशनची प्रचंड क्षमता आहे. भविष्यात दंत उद्योगाची भरभराट होण्यास मदत होईल. 3 डी प्रिंटिंगला एक विघटनकारी तंत्रज्ञान म्हणून पाहिले जाते, जे उत्पादनात परिवर्तन घडवून आणेल.

    हे तंत्रज्ञान रुग्णांसाठी दंतचिकित्सा अधिक परवडणारे आणि सोयीस्कर बनविण्यात मदत करेल. दंतवैद्यांकडे तुमचे दात स्कॅन करण्यासाठी 3डी स्कॅनरसारखी डिजिटल कांडी असू शकते. ती डिजिटल फाइल प्रदान करेल. रुग्णाच्या गरजेनुसार डिझाइन सानुकूलित करण्यासाठी या डिजिटल फाइलवर 3डी सॉफ्टवेअरद्वारे प्रक्रिया केली जाईल. अंतिम एक्झिक्युटेबल फाइल तयार केली जाईल. हा व्यवसाय अलीकडे लहान लहान शहरांमध्येही वाढताना दिसत आहे. समाजाची ती गरजही आहे.

  • सुरण लागवड

    सुरण लागवड

    ‘सुरण’ ही उष्णकटिबंधीय भागातील कंदमूळ गटातील वनस्पती आहे. आशिया आणि आफ्रिका खंडात उत्पादन घेतले जाते. विशेषतः भारतातील केरळ, तामिळनाडू, गुजरात या राज्यांत आणि श्रीलंकेत सुरणाची शेती केली जाते. महाराष्ट्रात तुलनेने सुरणाची शेती मर्यादित स्वरुपात आढळते.

    हे पिकाची वाढ उष्ण प्रदेशात, उबदार आणि ओलसर हवेत चांगली होते. हे पीक जास्त पाऊस सहन करू शकते. या पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. जमिनीतील आधीचे पीक निघाल्यानंतर सुरणाचे पीक घेण्यापूर्वी जमीन नांगरून त्यात शेणखत मिसळले जाते आणि मग कुळवाच्या २ ते ३ उभ्या आडव्या पाळ्या देऊन जमीन लागवडीसाठी तयार करतात.

    सुरण चार हंगामानंतर म्हणजेच ४ वर्षांनी तयार होते. त्यामुळे सुरण लागवड ही सलग चार वर्ष योग्य अंतराने केली जाते. तर उत्पन्नात सातत्य राहते. सुरणाची लागवड करताना जमिनीत खड्डे करून व कोंब वरच्या बाजूस ठेवून एका ठिकाणी एकच कंद लावतात.

    आवश्यकतेनुसार पिकाला ३ ते ४ वेळा खुरपणी करावी. लागवडीनंतर अंदाजे ३ महिन्यांनी मातीची भर द्यावी. त्यामुळे कंद झाकून जातात. कंदाला आधार मिळतो आणि यानंतर पुन्हा आंतर मशागत करण्याची गरज भासत नाही. या पिकाची लागवड केल्यावर लगेच पाणी दिले जाते. पण त्यानंतर मात्र जमिनीच्या पोताप्रमाणे ७ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते.

    सुरणाचे पीक तयार होत आहे हे ओळखण्याची अगदी सोपी पद्धत आहे. पीक तयार होताना सुरणाची पाने पिवळी पडतात. पाने पिवळी पडल्यावर पीक आपोआप वाळून जमिनीवर पडते. त्यानंतर सुरणाचे कंद कुदळीने खणून काढले जातात. त्यावरील माती आणि मुळे स्वच्छ करून काही सुरणाचे गड्डे बियाण्यांसाठी म्हणून साठवून ठेवले जातात. बाकी गड्डे विक्रीला पाठवतात.

  • पंढरपुरजवळील विष्णूपद मंदिर

    पंढरपुरजवळील विष्णूपद मंदिर

    पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूरजवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरास ‘विष्णूपद’ म्हणून ओळखले जाते. युगानुयुगे कर कटेवर ठेऊन विटेवर उभा असलेला विठूराया दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील या विष्णूपद मंदिरात विश्रांतीसाठी वास्तव्यास असतो. यावेळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. गोपाळपूर जवळील नदीपात्रात ‘पुष्पावती’ आणि ‘चंद्रभागा’ नदीच्या संगमावर हे पुरातन मंदिर आहे. ७ फूट उंचीच्या जोत्यावर १२ फूट उंचीचे तसेच १६ दगडी खांबांवरचे २४ कमानींवर हे दगडी मंदिर उभारलेले आहे. यापैकी दोन खांबांवर विष्णू व श्रीकृष्ण प्रतिमाही कोरल्या आहेत.

    येथे पंढरपूरातील एक नेते बबनराव बडवे यांचे समाधीस्थळ आहे. जवळच येथे नारदमुनींचे मंदिरही आहे. मुर्तीप्रमाणे इथे मुर्ती नसून भगवंताच्या चिखलात रूतलेल्या पदचिन्हांची पुजा करण्यात येते. भगवान श्रीकृष्णाची याठिकाणी समचरण आणि देहुडा चरण दोन्ही पदचिन्हे आहेत. तेथे लोण्याची वाटी, मुरली ठेवल्याच्या खुणा तसेच गाईंच्या खुराच्याही खुणा या पदचिन्हांच्या शेजारी आहेत. येथे कोनी दगडी कठडा असून पाणी वाहून जाण्यासाठी मोरीही आहे. एवढेच नाही तर सोबतच्या गोपाळांचीही पाऊले येथे उमटलेली दिसतात. याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. जेव्हा देवी रूक्मिणी देवावर रूसून दिंडीर वनात आली, तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल ज्याठिकाणी पंढरपुरात प्रथम आले. ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक ‘विष्णूपद’ आहे. याठिकाणी एका मोठ्या शिळेवर देवाच्या पाऊलखुणा, काठी ठेवल्याची खूण आणि काल्याच्या वाडग्याची खूणसुद्धा आहे. याठिकाणी विठूरायाने आपले सवंगडी आणि गाईसह क्रीडा केल्या.

    विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलांमुळे या खडकावरील ठिकाणास ‘विष्णूपद’ असे नाव मिळाले. मार्गशीर्ष महिन्यात देव याठिकाणी रहायला येतात, असे मानले जाते. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात याठिकाणी भाविकांची दर्शनास गर्दी होते. अनेक भाविक नौकानयनाचा आनंद घेत विष्णूपदावर पोहोचतात. अनेक भाविक येथे दर्शन घेऊन नंतर वनभोजनाचा आनंद लुटतात. मार्गशीर्ष अमावस्येला देव परत पंढरपुरातील मंदिरात परततात. त्यादिवशी संध्याकाळी स्थानिक शेतकरी ज्वारीची ताटे वगैरे लावून रथ सुशोभित करतात. विष्णूपदावर अभिषेक केला जातो. त्यानंतर वाजतगाजत रथ पंढरपुरात जातो. संपूर्ण मार्गशीर्ष महिना पंढरीचा विठूराया या मंदिरात असतो.

  • आश्वे समुद्रकिनारा

    आश्वे समुद्रकिनारा

    आश्वे समुद्रकिनारा हा उत्तर गोव्यातील एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. राजधानी पणजीच्या उत्तरेला असलेला हा समुद्रकिनारा नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे. उत्तर गोव्यातील आश्वे समुद्रकिनारा ‘शापोरा’ नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यापासून तेरेखोल नदीजवळील केरी समुद्रकिनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे. हा समुद्रकिनारा राजधानी पणजीपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे. उत्तर गोव्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या कळंगुटपासून सुमारे 19 किमी अंतरावर हा किनारा आहे.

    गोव्यातील पर्यटन हंगाम ऑक्टोबर ते मार्च हा असतो. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत येथे पर्यटकांची गर्दी असते. पोहण्याबरोबरच इतर जलक्रीडांसाठी हे ठिकाण आल्हाददायक आहे. जास्तीत जास्त पर्यटक या समुद्रकिनाऱ्यांवर येतात. मार्च ते जून या उन्हाळ्याच्या महिन्यात येथील हवामान अत्यंत उष्ण असते. तरीही समुद्रकिनारे गजबजलेले असतात. आश्वे समुद्रकिनारा हा गर्दीपासून दूर आहे. या किनाऱ्याच्या सभोवताली निसर्गरम्यता आहे.

    येथे आरामदायी आयुर्वेदिक मसाजसाठी जवळच्या रिसॉर्ट्समध्ये स्पा घेऊन आपण आराम करू शकता. या भागातील आयुर्वेदिक मसाज अतिशय उच्च दर्जाचे म्हणून ओळखले जातात. आश्वेच्या किनाऱ्यावर अनेक समुद्र किनाऱ्यावरील शॅक आणि रिसॉर्ट्स आहेत. येथे मध्यान्ह भोजन दिले जाते. परिसरात राहण्यासाठी ते योग्य आहेत. शॅक सामान्यत: नारळाचे तळवे आणि बांबूपासून बनविलेले असतात. ते गोव्याच्या स्वादिष्ट पदार्थांसाठी ओळखले जातात. आश्वे समुद्रकिनारा सौंदर्यासाठी आणि एकांतासाठी ओळखला जातो. कलंगुट आणि बागासारख्या इतर समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे येथे जलक्रीडांचा आनंद घेता येत नाही.

  • हरगड किल्ला

    हरगड किल्ला

    नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर गावात गेल्यावर हरगड दिसतो. मुल्हेर गावातून तीन किल्ले दिसतात. समोर मुल्हेर, डावीकडे मोरागड आणि उजवीकडे हरगड किल्ला दिसतो. हरगडाचा माथा प्रशस्त आहे. गडावर प्रवेश करताना लागणाऱ्या सगळ्या दरवाजांची आता पडझड झालेली आहे. दरवाजा असल्याच्या खुणा तेवढ्या तेथे अस्विाावा त आहेत. शेवटच्या दरवाजाने गडावर प्रवेश केल्यावर समोर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरासमोर चार दगडी तोफगोळे पडलेले आहेत. या किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे.

    मंदिरासमोरुन डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे एक टाके लागते. तेथे घरांचे व वाड्याचे अवशेष दिसतात. पाण्याच्या टाकीखालून जाणाऱ्या वाटेने खाली उतरल्यावर एक तळे दिसते. या तळ्याच्या मागील बाजूला एक गुप्त दरवाजा आहे. उजवीकडच्या वाटेने गेल्यावर एक १४ फ़ूट लांबीची तोफ़ पडलेली दिसते. या गडावरुन मुल्हेर गडाची माची, मोरागड, न्हावीगड, मांगीतुंगी आणि साल्हेर असा सगळा परिसर दिसतो. हा गडमाथा फ़िरण्यास २ तास पुरेसे आहेत.

    हरगड किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असून त्या मुल्हेरवाडी गावातूनच जातात. मुल्हेरवाडीमध्ये पोहोचण्यासाठी नाशिकमार्गे ९५ किमी वरील सटाणा गाव गाठावे लागते. सटाण्याहून २५ किमी.वर असलेल्या ताहाराबादला जावे लागते. ताहाराबाद गावातून मुल्हेरवाडीला जाण्यासाठी एसटी किंवा जीप मिळतात. गावात गेल्यावर गड चढण्यासाठी असणाऱ्या वाटा समजतात. गावातून हरगडावर जाण्यास ३ तास लागतात. या किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

  • साताऱ्यातील ठोसेघर धबधबा

    साताऱ्यातील ठोसेघर धबधबा

    पावसाच्या रिमझिम सरी बरसू लागल्यावर डोंगरांच्या उंच कपारीतून जमिनीच्या दिशेने झेपावणारे सफेदशुभ्र धबधबे दिसतात. अर्थातच, धबधब्यांचे आकर्षण प्रत्येकाला असते. धबधब्यांखाली मनमुराद आंघोळ करण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत, जे माणसांची गर्दी खेचून आणतात. पावसाळी पर्यटन हंगामात या धबधब्यांवर गर्दी होते. कास पठारासाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यात ठोसेघर धबधबा आहे, जो पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवितो.

    पावसात फिरण्यासाठी सातारा हे एक उत्तम ठिकाण आहे. ठोसेघर धबधबा बघायला गेल्यास त्याच वेळी या जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला, कास पठार, भांबवली धबधबा अशी अन्य मनमोहक ठिकाणे पहायला मिळतात. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना माणूस अक्षरश: बेभान होतो. येथील रंगीबेरंगी रानफुले मन मोहित करतात. याठिकाणी दोन धबधबे आहेत. एक ११० मीटर उंचीवरून कोसळणारा आणि दुसरा साधारण ३५० मीटर उंचावरून कोसळणारा धबधबा आहे. हा धबधबा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. हा धबधबा बघण्यासाठी येथे निरीक्षण मनोरा बांधलेला आहे. तेथून धबधब्याची वेगवेगळी रुपे पहायला मिळतात.

    ठोसेघर धबधबा साताऱ्यापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे. दरवर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यांत हा धबधबा कोसळत असतो. या धबधब्याचे पाणी अतिशय स्वच्छ असते. या धबधब्याकडील निसर्गसंपदा मस्त अनुभूती देते. हा धबधबा पाहण्यासाठी जाताना सुरुवातीला प्रवेशद्वार लागते. आत गेल्यावर निसर्ग माहिती केंद्र मिळते. या केंद्रावर सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नैसर्गिक ठिकाणांची माहिती प्रोजेक्टरद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाते. धबधब्याच्या मागे गुहा असून तीसुद्धा मनाला आनंद देणारी आहे. हा धबधबा महाबळेश्वरपासून ७७ किलोमीटर, पुण्यापासून १४० व मुंबईपासून २९० किलोमीटर अंतरावर आहे. ठोसेघर धबधब्याला पर्यटक आवर्जुन भेट देतात. हा धबधबा पाहण्यासाठी प्रतिव्यक्ती शुल्क आकारले जाते.

  • मैत्री ठेवावी जपून

    मैत्री ठेवावी जपून

    आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी असतात. त्यातील एक किंवा दोनच खास असतात. आपली खास मैत्री जपून ठेवणे आयुष्यात फार गरजेचे असते. मैत्रीला मोठे महत्त्व आहे. ती जपून ठेवली पाहिजे. एकमेकांच्या सहकार्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी मैत्री हवीच ! मैत्री जपून ठेवण्यासाठी मित्र किंवा मैत्रिणीस कधीतरी घरी बोलवा. किंवा बाहेर कुठेतरी भेटण्यास सांगा. स्वत:च्या हातांनी छानसा पदार्थ बनवा. टेबल सुंदरपणे सजवा. मग हसतखेळत, मस्करी करत जेवणाचा आनंद घ्या. कधीतरी जिवलग मित्र किंवा मैत्रिणीसोबत दिवसभर बोहर जाण्याची योजना आखा. यामुळे तुमचे मैत्रीचे बंध आणखी मजबूत होतील.

    संगीत हा भावना आणि आठवणी जागृत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मैत्रीशी संबंधित गाण्यांची यादी बनवा. मित्र-मैत्रिणीसोबत बसून बोलण्यासोबतच संगीताचाही आनंद घ्या. मित्रासोबत छायाचित्रे घ्या. तुमच्या मैत्रीच्या प्रवासाचे चित्रण करा. तुमचा जिवलग मित्र एका शहरात नसून दुसऱ्या शहरात असेल तर संपर्कात रहा. मित्र किंवा मैत्रिणीला तुमच्या आयुष्यात किती अर्थ आहे ते कधीतरी सांगा. त्याच्या उपस्थितीत कधीही एकटेपणा जाणवू देवू नका. मित्रत्व हे आयुष्यभर मनुष्याच्या सोबतीला असते, हे लक्षात असू द्या.

  • चमकदार चेहऱ्यासाठी झेंडूची फुले

    चमकदार चेहऱ्यासाठी झेंडूची फुले

    चमकदार त्वचेसाठी तुम्ही चेहऱ्यावर झेंडूच्या फुलांचा वापर करु शकता. झेंडूच्या फुलांपासून बनवलेले लेप, मुरुम आणि डाग दूर करण्यासाठी मदत करतात. झेंडूच्या फुलामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंटसारखे गुणधर्म त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. झेंडूचा ‘फेस पॅक’ कसा बनवायचा ते येथे जाणून घ्या.

    झेंडूच्या फुलापासून बनवलेला लेप चेहऱ्यावरील डाग देखील दूर करण्यासाठी काम करतो. तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला ‘फेस पॅक’ बनवण्यासाठी झेंडूचे फूल, मध, दुधाची साय आणि हळद लागेल. या सर्व गोष्टी नीट मिसळून हा लेप बनवा. हा लेप चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा नीट धुवा. नंतर हा लेप लावा. काही वेळ तसाच राहू द्या. नंतर चेहरा स्वच्छ करा. मुरुमे घालविण्यासाठी तुम्ही हा लेप लावू शकता.

    जर तुम्हाला मुरुमांचा त्रास होत असेल तर झेंडूची फुले आणि दही मिसळून लेप तयार करा. यासाठी झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या चांगल्या प्रकारे बारीक करून त्यात दही घालावे. हा लेप काही वेळ चेहऱ्यावर लावा. जेव्हा ते सुकेल तेव्हा ते ओले करा आणि नंतर मसाज करताना चेहरा स्वच्छ करा.

  • अतिखाण्यावर नियंत्रण हवे

    अतिखाण्यावर नियंत्रण हवे

    अनेकांना पूर्ण जेवण घेतल्यानंतर काहीतरी गोड खावेसे वाटते. काहीजणांना पोट भरलेले असूनही ‘फास्ट फूड’ किंवा ‘जंक फूड’ खावेसे वाटते, आणि मग ते खातात. भूक लागणे ही चांगली गोष्ट आहे. पण पोट भरलेले असतानाही अति खावेसे वाटणे ही चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ आपल्यात काही शारीरिक कमतरता असण्याची शक्यता असते. सतत भूक लागते. त्यावेळी आपण अमर्यादपणे खातो. परिणामी, आपले वजन वाढू लागते. मग अनेक आजार त्रास देऊ लागतात. अशा परिस्थितीत स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि अन्नाच्या लालसेपासून वाचण्यासाठी आरोग्यदायी सवयी अंगीकारणे हाच उत्तम उपाय आहे.

    अन्नाच्या अतिलालसेपासून आपण सुटका मिळवू शकतो. यासाठी आपला आहारतक्ता नेहमी पौष्टिक असावा. याने पोट नेहमी भरलेले राहते. पोट भरल्यावर जास्त खाण्याची इच्छा होत नाही. याकरिता अन्न नेहमी ताजे असावे. नेहमी काहीही गोड खाण्याची इच्छा असते. अशा परिस्थितीत, स्वतःची भावनिक परिस्थिती संतुलित ठेवावी. तणाव टाळावेत. सर्वप्रथम, स्वतःला शांत ठेवावे. कोणत्याही प्रकारच्या चिंता आणि तणावापासून दूर रहावे.

    झोप कमी असली तरीही अतिपदार्थ खाण्याचा मोह होतो. त्यामुळे रोज ७-८ तासांची पुरेशी झोप घ्या. नेहमी गोड पदार्थांनीच खायला सुरुवात करा. आहारात देशी तूप असणेही चांगले असते. कोरड्या आल्याचा (सुंठ) आहारात नक्की समावेश करावा. साखरयुक्त पेयाऐवजी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. पूर्ण जेवण घेतल्यानंतर किमान दोनशे पावले चाला. जेवणानंतर बडीशेप, छोटी वेलची, लवंग चावून खावे. अर्थातच दिवसभरात खूप पाणी प्यावे.

  • केरळची प्रसिद्ध भाजी – एरिशेरी

    केरळची प्रसिद्ध भाजी – एरिशेरी

    साहित्य : पिकलेल्या भोपळ्याचे तुकडे – 1 वाटी, कच्च्या केळ्याचे तुकडे – 1 वाटी, सुरणाचे तुकडे – 1 वाटी, लाल चवळी – 1 वाटी, हळद – 1 लहान चमचा, जिरे – 1 लहान चमचा, लसूण – 2 पाकळ्या, हिरव्या मिरच्या – 3, मिरी – 1 लहान चमचा, कढीपत्ता, खोवलेला नारळ – 1 वाटी, मोहरी – 1 लहान चमचा, उडीद डाळ – 1 लहान चमचा, लाल मिरच्या – 4, मीठ व तेल.

    कृती:
    एका प्रेशर कुकरमध्ये भिजवलेली लाल चवळी,सुरण, केळे व भोपळ्याचे तुकडे घालून. चांगले ढवळा. त्यात पाणी घालून दोन शिटट्या काढून शिजवून घ्या. खोवलेला नारळ, हळद, जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या आणि मिरे मिक्सरमध्ये वाटून घ्या. प्रेशर कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा. वाटलेले वाटण त्यात घालून चांगले ढवळून घ्या. चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून एक उकळी आणा. आता फोडणीसाठी एक कढई घेऊन त्यात गरजेएवढे तेल गरम करा. तेल तापल्यावर त्यात लाल मिरच्या, मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता घाला. फोडणी तडतडेपर्यंत प्रेशर कुकरमधील सारण एका बाऊलमध्ये काढा. आता वरुन ही तुम्ही फोडणी या भाजीवर घालून झाकण ठेवा. आपली भाजी तयार आहे. याला केरळमध्ये ‘एरिशेरी’ म्हणतात.