सह्याद्री मराठी वाहिनी

Author: सह्याद्री मराठी वृत्त

  • माणकेश्वर मंदिर

    माणकेश्वर मंदिर

    महाराष्ट्रात अनेक ठिकाणी देखणी व अप्रतिम शिवमंदिरे आहेत. काही शिवमंदिरे तर प्राचीन असून ती उत्तम कलाकृतीचे दर्शन घडवितात. धाराशिवमध्ये असेच एक माणकेश्वर हे एक सुंदर शिवमंदिर आहे. शिव दर्शनाबरोबरच मुद्दामहून हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. या जिल्ह्यातील भूम तालुक्यात हे मंदिर असून मंदिराचे कोरीवकाम उत्कृष्ट आहे. मंदिराच्या वास्तुकलेमधील विविध कलाकृती लक्षवेधी आहेत. हे मंदिर विश्वकर्मा नदीच्या एका सुंदरशा वळणावर शांतपणे उभे आहे. या मंदिरात महादेवाची मोठी पिंड आहे. सोमवारी तसेच महाशिवरात्रीला येथे भाविकांची गर्दी असते. मंदिरासमोर नंदीमंडप असून त्यात असलेला मोठ्या आकारातील नंदी आकर्षक आहे. या मंदिराचे बांधकाम चालुक्य काळात झाले असल्याचे अनुमान काढले जाते.

    महाराष्ट्रातील जी आणखी काही प्राचीन मंदिरे आहेत. त्या पंक्तीत अंबरनाथ-बदलापुरचे शिवमंदिर, खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर, औंढ्याचे नागनाथ मंदिर असून पारंडा तालुक्यातील माणकेश्वर मंदिर एक आहे. या मंदिरांतील अप्रतिम शिल्पे, उत्कृष्ट प्राचीन बांधकाम यामुळे ही मंदिरे विशेष आहेत. माणकेश्वर मंदिर बाराव्या शतकातील आहे, असे सांगतात. या मंदिरात जाण्यासाठी औरंगाबाद-धाराशिव रस्त्यावरील कुंथलगिरीतून जावे लागते. येथे जाणारा रस्ता निसर्गरम्य वातावरणातून जातो. मार्गावर टेकड्या, हिरवळ, तलाव असे सुंदर दृश्य दिसते. या रस्त्याने ‘भूम’पर्यंत जावे लागते. तेथून 11 किलोमीटर अंतरावर माणकेश्वर गाव आहे. या मंदिराचे धाराशिवपासून सुमारे ५५ किमी व भूमपासून जवळपास १९ किमी अंतर आहे. येथे पोहोचल्यावर शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला मिळते. धाराशिव तसेच भूम येथून या मंदिराकडे जाण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध असते.

  • कोंडुरा किनारा

    कोंडुरा किनारा

    ज्येष्ठ साहित्यिक आरती प्रभू यांच्या लेखणीने अजरामर केलेला शांत, सुखद समुद्रकिनारा म्हणजे सिंधुदुर्गातील कोंडुरा किनारा आहे. वेंगुर्ला तालुक्यात माडांच्या सावलीत अलगद विसावलेला हा किनारा म्हणजे निसर्गरम्यतेची मस्त अनुभूती आहे. हा किनारा वेंगुर्ला तालुक्यात आहे. या किनाऱ्यावर पांढरीशुभ्र वाळू, आणि अजस्त्र लाटांनी अणकुचीदार झालेले मोठे- मोठे खडक पहायला मिळतात. वेंगुर्ला तालुक्यापासून बारा किलोमीटरच्या अंतरावर हा किनारा आहे. नारळाची उंचच उंच झाडे असलेला हा स्वच्छ किनारा असून येथे भगवान शंकरांचे सुंदर देवालय आहे.

    कोंडुऱ्याच्या समुद्राकडे जायला कोंडुरावाडीहून एक पाणंद आहे. पाणंदीच्या बाजूला आंब्याची झाडे आहेत. पाणंद उतरुन गेल्यावर सागराचे निळेशार पाणी मन लुब्ध करते. या किनाऱ्यावर माडाची उंच झाडे उभी आहेत. पूर्वी समुद्राच्या भरतीचे पाणी वेगाने कोंडुऱ्यात घुसायचे. त्योवळी मोठा आवाज यायचा. तो दूरवर ऐकायला यायचा. याला ‘कोंडुऱ्याची गाज’ म्हणतात. येथील मंदिराकडे कमालीची शांतता आहे. येथील माडांच्या झाडातून पुढे गेल्यावर कोंडुऱ्याची गुहा दिसते. अशा लहानमोठ्या अनेक गुहा तेथे आहेत.

    या किनाऱ्यावर दगडांवर समुद्राने केलेले कोरीवकाम पहायला मिळते. समुद्राच्या लाटांनी दगड फोडून विवर बनवली आहेत. हे दगड अतिशय अणकुचीदार बनले आहेत. विस्तीर्ण समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा, बागेतून वाहणारा गोड्या पाण्याचा झरा आणि लिंगेश्वराचे देऊळ हे दृश्य फारच सुंदर आहे. येथे जाण्यासाठी विमानप्रवास करीत असाल तर गोव्यातील मोपा विमानतळ जवळ आहे. वेंगुर्ला शहरातून येथे जाण्यास रिक्षा उपलब्ध असतात.

  • कंधारचा किल्ला

    कंधारचा किल्ला

    महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी कंधारचा किल्ला एक आहे. नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यात हा किल्ला आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास, सुरुवातीला राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने या किल्ल्याच्या बांधकामास सुरूवात केल्याचे समजते. राष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. पुढील काळात हा किल्ला जिंकणारे राजे या किल्ल्याच्या बांधकामात भर घालत गेले. कंधारचे पूर्वीचे नाव ‘पंचालपुरी’ असून पांडवांचा द्रौपदीबरोबर विवाह याच स्थळी झाला, अशी आख्यायिका आहे. मलिक अंबर यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण करुन त्या बांधल्या असल्याचे लक्षात येते. मुहम्मदी मशिदीवर त्याचाही शिलालेख आहे. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात नसरत सुलतान याचे नाव आहे. हा शिलालेख इ.स. १३३६ सालातील आहे.

    इ.स. १४०३ साली कंधार तुघलकाच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली होती. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदिलशहा याने बांधल्या असल्याचे समजते. या किल्ल्यावर सुंदर बगीचा होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख ‘बाग-ए-रश्के कश्मीर’ असा आहे.धनबुरुजावर ‘अंबारी’ नावाची तोफ आहे. पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले. सुमारे १५ एकर जागेत असलेल्या या किल्ल्याभोवती खंदक आहे. या किल्ल्यावर एक टेहळणी बुरूज आहे. अनेक तोफा अजून चांगल्या स्थितीत आहेत. कंधारच्या किल्याअसवर जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्या उपलब्ध आहेत. याशिवाय खासगी वाहनानेही जाता येते. किल्ल्याचे अंतर नांदेडहून ५० किलोमीटर एवढे आहे.

  • येलदरी धरण

    येलदरी धरण

    परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी महत्व्णपूर्ण असणारे येलदरी धरण हे पर्यटकांसाठी एक मनमोहक ठिकाण आहे. हे धरण पूर्णा नदीवर बांधले आहे. पूर्णा ही गोदावरीची एक प्रमुख उपनदी आहे. महत्वाचे म्हणजे या धरणामुळे परभणी, जिंतूर, वसमत व हिंगोली जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटला आहे. या धरणाजवळ पर्यटकांसाठी दोन कोटी 99 लाख रुपये खर्चून मोठ्या उद्यान निर्मितीचे काम चालू आहे. लहान मुलांसह अनेक पर्यटक या उद्यानास भेट देण्यासाठी जातात. या उद्यानात खेळणी, प्राण्यांचे पुतळे असे विविध प्रकारचे साहित्य आहे. मात्र या परिसरात राहण्याची चांगली व्यवस्था नाही. जेवणासाठी छोटी हॉटेल्स आहेत.

    जिंतूर तालुक्यातील येलदरी या गावाजवळ हे धरण असून हिंगोलीच्या वायव्येला हिंगोली-जिंतूर मार्गावर येते. शेतीसाठी पाणी पुरवून वीजनिर्मिती करण्यासाठी या धरणाची उभारणी करण्यात आली; परंतु आता परभणी आणि हिंगोलीतील अनेक शहरे पिण्याच्या पाण्यासाठी या धरणावर अवलंबून आहेत. येलदरीच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण आहे. ते भरले की येलदरी धरणात पाणी सोडण्यात येते. सन 1958 मध्ये सुरू झालेले येलदरी धरणाचे बांधकाम सन 1968 मध्ये पूर्ण झाले. एकूणच, या बांधकामास तब्बल दहा वर्षे लागली. आता या धरणाच्या दिशेने पर्यटकांची पावले आपोआप वळतात. लहान मुलांसह मोठ्या माणसांची येथे गर्दी असते. त्यामुळे हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येत आहे.

  • मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा

    मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा

    अलीकडे मुलांची विद्युत उपकरणांशी जवळीक वाढली आहे. कुटुंबात रमणे, नातेवाईकांशी वेळ घालविणे, संवाद साधणे या गोष्टी अभावाने दिसू लागल्या आहेत. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही हे सर्व मुलांच्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत. आपल्या दिवसातील अनेक तास मुले स्क्रीनकडे बघत घालवतात. मुले फोन आणि लॅपटॉप पाहण्यात बराच वेळ घालवतात. केवळ मनोरंजनच नाही तर अभ्यास, खेळ या सर्व गोष्टी या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर होतात. पण, मुलाच्या आरोग्यासाठी एवढा स्क्रीन वेळ चांगला आहे का? याबाबत आई-वडिलांनी सतर्क असणे गरजेचे आहे. अलीकडेच काही अभ्यासांचे विश्लेषण केल्यावर असे आढळून आले की, स्क्रीनचा अतिप्रमाणातील वापर आणि मुलांच्या मेंदूच्या कार्यप्रणालीचा खोलवर संबंध आहे.

    मुलांनी स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्यामुळे त्यांच्या मेंदूचे कार्य बिघडते. त्याचा विकासावर परिणाम होतो. अभ्यासानंतर जास्त वेळ स्क्रीन पाहिल्यामुळे मुलांचा विकास योग्यरित्या होत नाही. या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, लहान मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करण्याची गरज आहे, परंतु आजच्या काळात ते खूप कठीण आहे. ज्याच्या मदतीने आपण मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करू शकतो, अशा उपायांचा अवलंब केला पाहिजे. जेवताना मुलांना फोन किंवा टीव्ही पाहू देऊ नका. जेवताना मन विचलित होऊन उपयोगाचे नाही. त्यामुळे त्यांना यावेळी फोन, टॅब इत्यादी वापरू देऊ नका. एकत्र बसून जेवण्याचा किंवा मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना कंटाळा येणार नाही. अधूनमधून सुट्टीच्या दिवसात बाहेर फिरायला जा. नातेवाईकांकडे जा. स्नेहसंमेलनात सहभागी व्हा. मुलांना नवनव्या गोष्टी दाखवा.

    फोन, टॅबलेट, लॅपटॉप इत्यादी साधने बेडरूमच्या बाहेर ठेवा. या गोष्टी झोपेच्या ठिकाणी ठेवल्याने मुलांचे लक्ष पुन्हा-पुन्हा आकर्षित होईल. तसेच, मुलांना झोपेच्या एक तास आधी फोन इत्यादी वापरू देऊ नका. मुलांना व्हिडिओ गेम खेळण्यास देण्याऐवजी बाहेर जाऊन खेळण्यास प्रोत्साहित करा. यामुळे मुलांचा स्क्रीन वेळ कमी होईल. शारीरिक हालचाली केल्याने त्यांचे आरोग्यही सुधारेल. याव्यतिरिक्त कोडी, बोर्ड गेम इत्यादींसारखे खेळ आपण खेळू शकता. अन्यथा मुले एकलकोंडी होऊ शकतात.

  • भुवयांच्या सुंदरतेसाठी

    भुवयांच्या सुंदरतेसाठी

    ज्याला सुंदर दिसणे आवडत नाही, असा क्वचितच कोणी असेल. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकजण आपल्या लूकची विशेष काळजी घेताना दिसतात. भुवया आपल्या लूकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. घरगुती उपायांनी आपण आपल्या भुवया जाड करू शकता.

    आजच्या नव्या युगात जाड भुवयांचा ट्रेंड खूप वाढला आहे. त्यामुळे चेहरा सुंदर दिसतो. भुवया चेहऱ्याकडे सर्वाधिक लक्ष वेधून घेतात. आपले डोळेदेखील हायलाइट करतात. एखाद्याच्या भुवया आधीच नैसर्गिकरित्या जाड असतील, तर त्याला पार्लरमध्ये योग्य आकार देणे आवश्यक असते. जर भुवयांची वाढ कमी झाली असेल तर ते बऱ्याच लोकांसाठी विशेषतः मुलींसाठी त्रासाचे कारण बनते. आपण आपल्या भुवयांच्या कमी वाढीमुळे त्रस्त असाल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने भुवयांची वाढ कमी वेळात करु शकता.

    बदामाचे तेल केसांच्या वाढीसाठी फार पूर्वीपासून ओळखले जाते. आपल्या बोटांनी या तेलाच्या काही थेंबांनी भुवयांना मसाज करावे. काही तास तसेच ठेवून नंतर चेहरा धुवावा. कांद्याचा रसही भुवयांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित वापराने तुम्हाला वेळेत चांगले परिणाम मिळू शकतात. यासाठी कांद्याचा रस काढावा. कापसाच्या साहाय्याने भुवयांवर लावावा. कांद्याचा रस कमीत कमी 15 ते 20 मिनिटे राहू द्यावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

    जाड भुवयांसाठी मेथी पोषक आहेत. यामध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. यासाठी एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत. सकाळी बारीक करून पेस्ट तयार करावा. आपल्या भुवयांवर लावून 30 मिनिटे तसेच राहू द्यावे. नंतर कोमट पाण्याने धुवावे. निर्जंतुकीकरण तेल अर्थात एरंडेल तेल देखील भुवयांच्या केसांची वाढ करण्यात महत्वाची भूमिका बजावते. दाट भुवया मिळविण्यासाठी त्यावर एरंडेल तेल लावू शकता. रोज रात्री लावून सकाळी धुवावे.

  • पाठदुखीला दूर पळवा

    पाठदुखीला दूर पळवा

    मान आणि पाठदुखी ही अलिकडची सार्वत्रिक समस्या झाली आहे. पूर्वी साधारण वयाच्या चाळीशीनंतर या समस्येने अनेकजण त्रस्त असत. आजकाल किशोरवयीन मुलांपासूनच या तक्रारी सुरू होतात. हे दुखणे थंडीमुळे असेल, असा अंदाज बांधला जातो. परंतु यामागे हवामानापेक्षाही स्वत:चे चुकीचे वागणे जास्तकरुन कारणीभूत आहे. कामाच्या ठिकाणी कार्यालयांमध्ये एका खुर्चीवर एकाच अवस्थेत बसल्याने मानदुखी आणि पाठदुखी होणे हे सामान्य आहे, परंतु काळजी न घेतल्यास हे दुखणे वाढू शकते. यापासून आराम मिळवण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. कंबर आणि मान दुखण्याचे मुख्य कारण दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे हे आहे. अशा परिस्थितीत जास्त वेळ एकाच ठिकाणी न बसण्याचा प्रयत्न करावा. कार्यालयात असाल, तर क्षणभर विश्रांती घेऊन पाय मोकळे करा. एकाच आसनात बसल्याने मणक्यावर जास्त दाब पडतो, त्यामुळे मान आणि कंबरदुखीची समस्या उद्भवते.

    आपण जेव्हा झोपता तेव्हा आपली स्थिती योग्य असावी. केवळ पालथे झोपणे, एकाच दिशेने झोपणे हेदेखील चुकीचे आहे. जर आपणास मानदुखीचा त्रास होत असेल तर तो जाड उशीमुळे देखील असू शकतो. विशेषत: झोपताना डोक्याखाली उंच उशी ठेवणे टाळले पाहिजे. वारंवार पाठदुखीचा त्रास होत असेल, तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी आपण भुजंगासन करून पाहू शकता. योगामुळे शरीराची लवचिकता वाढण्यास मदत होत असल्याने या आसनांच्या मदतीने आपल्या स्नायूंवर आलेला ताणही दूर करू शकता.

    अति दारूचे सेवन केल्याने हाडे कमजोर होतात. त्यामुळे यापासून दूर राहून किमान ८ तासांची झोप घ्या. यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल. तसेच तुमच्या आहारात जंक फूडचा समावेश नसावा, हेही लक्षात ठेवा. त्याच वेळी, गर्भाशयाच्या समस्या असल्यास नौकासन आणि भुजंगासनाची मदत घेऊ शकता. मान आणि पाठदुखीच्या बाबतीत, आपल्या आहारात जीवनसत्व ‘डी’ आणि कॅल्शियमचा समावेश करावा. दूध, दही, चीज आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते. हाडांच्या वाढीसाठी हे खूप महत्वाचे आहे.

  • कारल्याचे काप

    कारल्याचे काप

    साहित्य : कारले (पातळ काप)-2 कप, खोबऱ्याचे पातळ काप – अर्धा कप, हिरव्या मिरच्या (लांब चिरलेल्या) -4, लाल तिखट – 1 चमचा, हळद-अर्धा चमचा , तळण्यासाठी खोबरेल किंवा तिळाचे तेल,मीठ.


    कृती:
    कारल्याचे पातळ काप पाण्यात धुवून घ्यावेत. त्याचे पाणी काढून टाकावे. लाल तिखट, हिरव्या मिरच्या, नारळाचे तुकडे, हळद आणि मीठ घालावे. हाताने चांगले मिसळून घ्यावे. काही मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर कारली मंद आचेवर गुलाबी रंगाची होईपर्यंत कुरकुरीत तळावीत. ही भाताबरोबर खायला छान लागतात.

  • निळ्या समुद्राचे पांढरे रक्षक

    निळ्या समुद्राचे पांढरे रक्षक

    ज्याची समुद्रावर सत्ता तोच खरा सम्राट असं युद्धनीती सांगते. शिवाजी महाराज देखील हे मानायचे म्हणूनच त्यांनी सशक्त आरमार उभं केलं. म्हणूनच भारतीय नौदल छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना “भारतीय नौदलाचे जनक” मानते. भारतीय नौदलाने ही आपल्या वकुबाला साजेशी कामगिरी आजवर केली आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने बेधडक कारवाई करीत भारतीय नौदलाच्या नौका थेट कराचीच्या किनाऱ्याला भिडवल्या होत्या़. विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. विक्रांत या विमानवाहू नौकेवरील विमानांनी तर शत्रूवर बॉम्बगोळ्यांचा भडिमार केला होता़. या युद्धात ‘गाझी’ ही पाकिस्तानची पाणबुडीही भारतीय नौदलाने उद्ध्वस्त केली होती़. या कामगिरीचं नाव होतं ‘ऑपरेशन ट्रायडण्ट’. नौदलाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. ४ डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. तेव्हा पासून ४ डिसेंबर हा ‘भारतीय नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
    नौदलाच्या लष्करी कारवाईचं याहूनही ताजे उदाहरण घ्यायचं, तर श्रीलंकेच्या कारवाई अर्थात ऑपरेशन पवनअंतर्गत भूदलाला केलेल्या साहाय्याचे घेता येईल़ तसेच ‘ऑपरेशन कॅक्टस’अंतर्गत नौदलाने ताब्यात घेतलेल्या एमव्ही प्रोग्रेस लाइटमुळे मालदीवमधील बंड शांत करण्यातही मोठे साहाय्य झाले होत़े.


    १९३४ साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची स्थापना केली. तेव्हापासून अनेक युद्धनौका आणि पाणबुड्या यांनी नौदलाची शान वाढवली आहे. स्वदेशी बनावटीची अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेली पहिली आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ ही २६ जुलै २००९ रोजी भारतीय नौदलात सामील झाली. हिची निमिर्ती कलपक्कम येथील ‘इंदिरा गांधी सेंटर फॉर अँटोमिक रिसर्च’ येथे ‘भारतीय नौदल’ आणि ‘संरक्षण संशोधक आणि विकास ऑर्गनायझेशन’ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे. आयएनएस विराट आणि आयएनएस विक्रमादित्यमुळे भारतीय नौदल जगात पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय नौसेनेकडे एकूण ५५ युद्धनौका, ९ विध्वंसक, १५ नौका, न्यूक्लिअर हल्‍ला करणारी एक पाणबुडी, १४ पारंपारिक पाणबुड्यांसह आधुनिक शस्त्रं आहेत. नौदलाकडे १५५ युद्धनौकांचा ताफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत धृव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे ही नौदलाचे भाग आहेत. १९५३ मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि इ.स. १९६७ मध्ये पाणबुड्या ताफ्यात समाविष्ट झाल्या. युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवा म्हणून माझगाव गोदीमध्ये १९६६ साली लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजतागायत ८० युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे.


    अन्य राष्ट्रांच्या विनंतीवरून भारतीय नौदल त्या त्या राष्ट्रांच्या समुद्रसीमेतही तैनात होऊ लागले. इतर राष्ट्रांच्या बंदरांना भेटी, संयुक्त कवायत, प्रशिक्षण व आपत्कालीन मदत याद्वारे मैत्रीचे संबंध बळकट करण्यात आले आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, रशिया, चीन आदी राष्ट्रांबरोबर नौदलाने संयुक्त कवायतींमार्फत ज्ञानाचे आदानप्रदानही केले आहे. २००४ साली त्सुनामी संकटात श्रीलंका, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांना तात्काळ मदतीचा हात दिला.
    पारंपरिकरीत्या देशाच्या संरक्षणाबाबत नौदल लष्करी कारवाया करणे, रखवालदारी आणि धोरणात्मकता या तीन भूमिका़ बजावत़े. याशिवाय मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारण़ ह्या जबाबदार्‍याही आता नौदलाकडे आह़ेत. आपली सागरी मालमत्ता, किनारपट्टी यांचे रक्षण करणे, एवढय़ापुरतीच नौदलाची लष्करी भूमिका मर्यादित नाही; तर प्रत्यक्ष युद्धप्रसंगांत देशाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी साहाय्य करणे, हीसुद्धा नौदलाची जबाबदारी आह़े .१९९९ साली कारगीलच्या युद्धात आणि त्यानंतर ‘ऑपरेशन पराक्रम’ या मोहिमेच्या वेळी नौदलाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानी युद्धनौकांना त्यांच्या नाविक तळातून बाहेर पडणंही अवघड झालं होतं.


    पांढर्‍या शुभ्र गणवेशातील नौदल सैनिकांना निळ्या समुद्रावर कायदेशीर आणि विधायक उपक्रमांना साहाय्य करत असताना समुद्रात अनेक बेकायदेशीर गोष्टीही पाहायला मिळतात़. जशा की, चाचेगिरी, शस्त्र- अमली पदार्थ यांची अवैध वाहतूक, मानवी तस्करी, अनधिकृत मासेमारी, समुद्रतळातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा अवैध उपसा, विध्वंसक शस्त्रास्त्रांचा प्रसार आणि समुद्रोद्भव आतंकवाद अशी काही समुद्रात चालणाऱ्या बेकायदेशीर गोष्टींची उदाहरणे आहेत़. ऑक्टोबर २००८ पासून एडनच्या आखातात भारतीय नौदल चाचेगिरीविरोधात घेत असलेले श्रम हा ‘रखवालदार’ म्हणून नौदल बजावीत असलेल्या कामगिरीचे उत्तम उदाहरण आह़े.

    त्यांनी दोन हजारांहून अधिक नौकांची समुद्र प्रवासात सुरक्षेसाठी सोबत केली आह़े. मोठय़ा संख्येने चाच्यांना ताब्यात घेतलं आह़े. तसेच सोमालियन चाच्यांकडून त्यांचे प्रभावक्षेत्र वाढविण्याचे होणारे प्रयत्नही आम्ही सातत्याने हाणून पाडले आहेत. ज्या भारतीय नौदलाकडे १९४७ साली अर्ध्या डझनापेक्षाही कमी गलबतं होती, तेच नौदल आज जगातील मोठय़ा नौदलांपैकी एक झालं आहे आणि म्हणूनच भारतीय नौदल प्रगतिपथावर असलेल्या भारताचा महत्त्वाचा घटक आह़े.

  • नोकरी सोडून शेतीतून लाखोंचा नफा

    बदललेले तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोग करून पाहण्याची हौस याच्या जोरावर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खेमराज भुते या तरुणाने कोरफडीचे उत्पादन घेतले. खेमराज औषध निर्मिती कंपनीमध्ये नोकरीला होता. नोकरी करताना वडिलोपार्जित जमिनीत काहीतरी नवीन करून बघण्याच्या इच्छेने त्याने कोरफडीची लागवड केली. त्यातील नफा बघता त्याने नोकरी सोडली आणि गावातच कंपनी काढली.

    त्याने उत्पादित केलेल्या कोरफडीचा रस, जेल, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने यांना फक्त भारतातूनच नव्हे, तर जगभरातून मागणी आहे. या कोरफडीच्या शेतीत खेमराज यशस्वी ठरला. अनेक नवनवीन कंपन्या या थेट त्याच्याकडे उत्पादन घ्यायला येऊ लागल्या.

    पारंपरिक शेतीपिके न घेता खेमराजने उचललेले कोरफड शेतीचे पाऊल खरोखरच नाविन्यपूर्ण म्हणायला हवे. फक्त शेतीतून उत्पादन न घेता स्वतःचा लघुउद्योग स्थापन केल्याने गावातील १५ ते २० जणांना रोजगार मिळाला. खेमराजने कोरफडीपासून तयार केलेल्या उत्पादनांची किंमतही सामान्य माणसाच्या खिश्याला परवडेल अशी ठेवलेली असल्याने भारतभरातूनच नव्हे, तर जगभरातून त्याच्या उत्पादनांना मागणी आहे.

    साडेतीन एकराच्या जमिनीत कोरफडीसाठी अंदाजे ६५ हजार रुपये गुंतवून आज खेमराज तब्बल ३ लाख रुपयांचा नफा कमावत आहे. पहिला प्रयोग यशस्वी झाल्याने खेमराजने गावातील एकरभर जमीन भाड्याने घेतली असून त्यातही त्याने कोरफडीची लागवड केली आहे.

  • चप्पल उद्योग

    चप्पल उद्योग

    ‘चप्पल’ खरेदीची हौस अनेकांना असते. प्रत्येक कपड्याच्या प्रकाराप्रमाणे, सोहळ्याप्रमाणे आपण चप्पलांची निवड करतो. कोणत्या प्रकारच्या वेशभूषेवर कोणती चप्पल शोभून दिसणार याकडेही प्रत्येकाचे लक्ष असते. चला तर मग सर्वांच्या आवडत्या अशा ‘चप्पल उद्योगा’बद्दल आज सविस्तर जाणून घेऊया.

    कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल की सर्वांत प्रथम परवान्यांची आवश्यकता भासते. उद्योग सुरू करताना उद्योग आधार नोंदणी, जीएसटी नोंदणी आणि दुकान कायदा परवाना किंवा ना हरकत प्रमाणपत्र गरजेची असतात. उद्योगाची सुरुवात करताना जर आपण परवाने काढले, तर पुढे आपल्याला कोणत्याच समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

    पादत्राणे म्हणजेच चप्पल उद्योगास आपल्याला सोल कटिंग यंत्र, ग्राइंडिंग यंत्र, स्क्रिन प्रिंटींग यंत्र, ड्रिल यंत्र, पट्टा यंत्र आणि 3 ते ९ क्रमांपर्यंतचे डाय म्हणजेच पायाच्या आकाराचे साचे ही यंत्रे महत्त्वाची आहेत. त्याचप्रमाणे चप्पल बनवण्यासाठी रबराची शीट आणि पट्टा एवढाच कच्चा माल लागतो.

    हा व्यवसाय अगदी घरातूनही सुरू करता येणे सहज शक्य आहे. पण जर एखादी जागा घेऊन उद्योग सुरू करण्याच्या विचारात असाल, तर किमान ६५० स्वे. फूटांची जागा मिळाल्यास चप्पल उद्योग कारखाना आणि विक्री केंद्र हे एकाच ठिकाणी सुरू करणे सहज शक्य होईल.

    चप्पलांचा उद्योग सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक गरजेची आहे. चप्पल बनविणारे कारागिरही आवश्यक आहेत. तुम्ही तयार केलेल्या चप्पला ऑनलाइनही विकू शकतात. त्याचप्रमाणे ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन चप्पलांची निर्मिती केल्यास उत्पन्नात अधिक वाढ होणेही शक्य आहे. केलेली गुंतवणूक वळती झाल्यावर तुम्हांला प्रत्येक चप्पलेच्या जोडामागे किमान ३० ते ५० टक्के नफा मिळवता येऊ शकतो.

  • बॉलपेन निर्मिती

    बॉलपेन निर्मिती

    आज प्रत्येक घराची आणि प्रत्येक माणसाची पेन ही गरज आहे. व्यक्तीला दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणाने पेनची गरज असते. प्राचीन काळी लेखणीने लेखन केले जात असे. त्यानंतर दौत आणि टाक आले. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी शाईचे पेन वापरात होते. शाईचे भांडे, निप्पल, झिप असे साहित्य शाई पेनसाठी वापरले जायचे. आज त्याची जागा बॉलपेनने घेतली आहे. शाई पेनची शाई संपली की ती पुन्हा भरावी लागे. शाई भरताना अनेक वेळा कागदावर आणि कपड्यांवर शाईचे डाग पडत असत. पेनाची निप्पल आणि झिप तुटायची. बॉलपेनमुळे या त्रासातून सुटका झाली. बॉलपेन वापरण्यास अत्यंत सोपे, सोयीस्कर असल्यामुळे आज शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत, बँकांचे कर्मचारी, इत्यादी सर्वजण बॉलपेन वापरतात.

    बाजारातील मागणीनुसार डिझाईन्सची विविध पेने बाजारात विक्रीसाठी आणल्यास तुमच्या मालाला अधिक मागणी येईल. शक्य असल्यास, या पेनांना नावे देऊन तुमच्या उत्पादनांचे ‘ब्रँड नाव’ तयार करा. जर मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार असाल, तर जवळच्या मोठ्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार माल तयार करून पाठवा. मालाचे उत्पादन कमी प्रमाणात होत असेल तर तयार मालाचे स्वतः विपणन करून विक्री करा. स्थानिक बाजारपेठेतील स्टेशनरी दुकाने, किराणा दुकाने, मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स अशा ठिकाणी रोखीने वस्तू विकू शकता. एखादा विक्री प्रतिनिधी नियुक्त करा. या व्यवसायासाठी पॉली पॉलीप्रॉपिलीन, निळी शाई, नोझल्स, प्लास्टिक पावडर, वेष्टनासाठी प्लास्टिक पेपर कव्हर इ., स्क्रीन प्रिंटिंग मशीन, शाई भरण्याचे मशीन, ओव्हन, बॉल पेन इ. कच्चा माल गरजेचा असतो. तसेच हँडमोल्डेड, मशीन, नोझल बनविण्याचे यंत्र, आदी यंत्रसामग्री आवश्यक असते.

    आजच्या युगात शिक्षणाचा व्यापक प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे लोकांना शिक्षणाचे महत्त्व चांगलेच पटले आहे. चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे ग्रामीण भागात राहणाऱ्या पालकांनाही समजत असल्याने मुलांचे दहावीच्या आधी शिक्षण कोणीही थांबवत नाहीत. प्रत्येक घरातील मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकजण किमान दहावीपर्यंत शिक्षण घेताना दिसत आहे. सरकारनेही मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बॉलपेन ही गरज झाली आहे.

  • कागदी लिंबू शेती

    कागदी लिंबू शेती

    कागदी लिंबांना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. कागदी लिंबे आकाराने लहान, 40 ते 45 ग्रॅम वजनाची असतात. या फळाची साल अगदी पातळ असते. त्याच्या रसाला मागणी जास्त आहे. झाडाला काटे जास्त असून झाडे वर वाढतात. काही लिंबे आकाराने मोठी असतात. वजन सुमारे 50 ते 70 ग्रॅम असते. ही लिंबे लोणच्यासाठी वापरली जातात. या झाडाला काटे असले तरी ते अगदी लहान असतात. काही लिंबांचा आंबटपणा कागदी लिंबाच्या तुलनेत किंचित कमी आहे. कागदी लिंबू हे महत्त्वाचे लिंबूवर्गीय फळ असून महाराष्ट्रात या फळपिकाखाली ३०,३२८ हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्राचे अनुकूल हवामान, योग्य जमीन आणि ओलिताची उपलब्धता लक्षात घेता या फळपिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे. कागदी लिंबू या फळपिकास उष्ण आणि कोरडे हवामान पोषक आहे. कमी ते मध्यम पर्जन्यमान असलेल्या भागात या झाडाची यशस्वीपणे लागवड करता येते. कागदी लिंबू बहुवर्षायू फळझाड असल्याने जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी व ६.५ ते ८.० सामू असलेली जमीन लिंबू लागवडीकरिता निवडावी. अतिभारी, पाणथळ, चोपण, रेताड व खडकाळ जमीन लिंबू लागवडीसाठी योग्य नाही.

    महाराष्ट्रात ‘कागदी लिंबू’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक जातीचीच लागवड केली जाते. लिंबू प्रजातीच्या लागवडीसाठी जून, जुलै आणि डिसेंबर, जानेवारी ही योग्य वेळ आहे. ‘कागदी काला’ ही खूप जुनी जात आणि ‘पुसा लिंबू वन’ ही अलीकडची जात आहे. जुलै आणि ऑगस्ट हे महिने लागवडीसाठी सर्वोत्तम काळ मानले जातात. या झाडाच्या लागवडीसाठी एक घनमीटरचा खड्डा खणणे आवश्यक आहे. त्यानंतर 10-15 दिवस सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर चांगले कुजलेले शेणखत खड्ड्यात मिसळून ते भरावे. जुलैचा पहिला पाऊस येताच सुमारे 4 ते 4.5 मीटर अंतरावर ही रोपे लावावीत. सुरुवातीच्या एक ते दोन वर्षात लिंबाबरोबर अन्य पिकेही घेऊ शकता. दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पन्न मिळण्यासाठी लिंबाच्या झाडांचे खोड मजबूत होणे आवश्यक आहे. झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी व हवा खेळती राहण्यासाठी झाडांना वळण देणे आवश्यक आहे.

    पहिली दीड वर्षे कसलीच छाटणी करू नये. रोपे दोन वर्षांची झाल्यावर वळण द्यावे. त्यासाठी आवश्यक तेवढीच छाटणी करावी. रोपांना नियमित पाणी द्यावे. तसेच औषध फवारणी करावी. लिंबाच्या लागवडीसाठी सिंचन अत्यंत महत्वाचे आहे. विशेषत: एप्रिल आणि मे महिन्यात फळे तडकायला लागतात, आणि पाने जळू लागतात. लिंबू लागवड करताना एप्रिल-मे महिन्यात गवत पूर्णपणे काढून टाकावेत. लिंबाची झाडे तयार झाली की एका झाडापासून वर्षभरात 1400 ते 1500 फळे घेता येतात. वर्षातून दोनदा काढणी केली जाते. जुलै ते ऑगस्ट महिन्यात आणि दुसरी काढणी फेब्रुवारी-मार्च महिन्यात करावी. यातून वर्षाला सुमारे 1.5-2 लाख रुपये कमवू शकता.

  • परभणीतील पारदेश्वर मंदिर

    परभणीतील पारदेश्वर मंदिर

    परभणी शहरातील पारदेश्वर मंदिर हे एक प्रसिद्ध शिवशंकरांचे मंदिर आहे. हे मंदिर संगमरवरी आहे. श्री स्वामी सच्चिदानंद सरस्वती यांनी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिरातील शिवलिंगास बारा ज्योतिर्लिंगाचे महत्व आहे. परभणीतील नांदखेडा रस्त्यावरील बेलेश्वर महाविद्यालयासमोर हे ठिकाण आहे. शिवपुराणामध्ये भगवान महादेव स्वतःच्या मुखातून देवी पार्वती यांना पारदचे गुप्त ज्ञान देतात. ते म्हणतात, की ‘मम बीजं तू पारदः’ म्हणजे पारद ही माझी बीज शक्ती आहे. पारद हा धातु आहे. असे हे पारदेश्वर लिंग येथे आहे. श्री पारदेश्वर महादेवांच्या या मंदिराचा मुख्य दरवाजा दर्शनीय आहे.

    पृथ्वीतलावरील केदार, पशुपतीनाथ अशी द्वादश ज्योर्तिलिंगे असून त्यांच्या दर्शनातून जे पुण्य प्राप्त होते, तेवढे पुण्य या पारद शिवलिंगाच्या दर्शनाने प्राप्त होते, अशी मान्यता आहे. श्री पारदेश्वर महादेवांचे नामस्मरण करण्याने जन्मजन्मांतराच्या पापापासुन लवकर मुक्ती मिळते. या मंदिरात जायचे झाल्यास जवळचे विमानतळ नांदेड येथे आहे. नांदेडपासून परभणी ७० कि.मी. अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्गाने तेलंगाणा आणि महाराष्ट्र यांना जोडणारे परभणी हे शहर आहे. येथे जाण्यासाठी एसटी परिवहन महामंडळाच्या अनेक बसगाड्या आहेत. या मंदिरात महाशिवरात्री तसेच सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.

  • तोंडवली-तळाशील किनारा

    तोंडवली-तळाशील किनारा

    सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सागरकिनाऱ्यावर विसावलेला एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात गडकिल्ले, जलदुर्ग तसेच अप्रतिम आणि सुबक अशी पुरातन मंदिरे आहेत. अशा या सौंदर्यसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सौंदर्य देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेला तोंडवली-तळाशील किनारा अप्रतिम आहे. येथे डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य आणि चालण्यासाठी रुपेरी वाळू आहे. तोंडवली हे गाव मालवण तालुक्यात कालावल खाडी आणि अरबी समुद्रामध्ये आहे. हे मालवणपासून सुमारे २५ किमी आणि कणकवलीपासून ४५ किमी अंतरावर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय ओरोसवरून २८ किलोमीटरच्या अंतरावर, मालवणपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. मालवण-आचरा रस्त्यावरून तोंडवली फाट्यावरून आत गेल्यावर एका वळणावर समुद्राचे दर्शन होते.

    सिंधुदुर्गातील गड नदी तोंडवलीकडे समुद्राला भेटायला येते. तळाशीलपर्यंत ती समुद्राला समांतर वाहते. तळाशीलला नौकेची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली की, पुढे ओसाड बेट आहे. गडनदी समुद्राला मिळते ती जागा फार सुंदर आहे. तोंडवली ते तळाशीलचा सागरकिनारा दोन ते तीन किलोमीटरचा सुंदर आणि स्वच्छ आहे. तळाशील समुद्रकिनाऱ्याच्या पुढे सर्जेकोट किल्ला आणि सर्जेकोट बंदर पहायला मिळते. सर्जेकोट बंदरापासून तळाशील बोटीनेसुद्धा पर्यटक प्रवास करू शकतात. तेथील स्थानिक आकर्षणे दाखविण्यासाठी पर्यटकांसाठी बोटीची सुविधा असते. तळाशील समुद्राच्या मध्यभागी एक लहानसे बेट असून त्याला ‘शिंपला पॉईंट’ असे म्हणतात. या किनाऱ्यावर डॉल्फिनचे सुद्धा दर्शन होते. तोंडवली गावातील सुरूचे बन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुरू होते. या बनाचे निसर्गसौंदर्य पाहताना खूप मजा येते. या सुरूच्या बनामध्ये पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात. त्यामुळे पर्यटकांना आनंद देणारा हा किनारा आहे.

  • नळदुर्ग किल्ला

    नळदुर्ग किल्ला

    नळदुर्ग हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात आहे. हा भुईकोट किल्ला आहे. विलक्षण सौंदर्य असलेला हा किल्ला अप्रतिम आहे.तो पाहण्यासाठी पर्यटकांची फार गर्दी दिसते. किल्ल्याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरली असून तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे या किल्ल्याचा ताबा आहे. पुणे-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर हा किल्ला आहे. सोलापूरकडून हैदराबादकडे जाताना ४८ कि.मी. अंतरावर नळदुर्ग किल्ला मिळतो. पूर्वी या किल्याादचे नाव ‘आलीयाबाद’ असे होते. हे नाव निजामशाही काळात दिले होते. नंतर नळराजाने हा किल्ला काबीज करुन हे नाव बदलले, व त्यास ‘नळदुर्ग’ हे नाव दिले.

    सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याभोवती संरक्षणासाठी लांब खंदक आहे. आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर ‘रणमंडळ’ नावाचा तटबंदीने युक्त असा भाग आहे. येथील खंदकात नदीचा प्रवाह अडवून तो वळवून आणण्यात आला. या खंदकामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून राहते. त्यामुळे या बाजूने शत्रूला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही.

    या किल्याण्वर टेहळणीचा बुरूज, त्यावरील लांब तोफ, धबधबा व दरवाजाचा वक्राकार मार्ग आहे. आतमध्ये बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे. हैद्राबाद महामार्गाच्या बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरूज आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणाऱ्या बंधाऱ्यामध्ये जलमहाल आहे. हा बंधारा १९ ते २० मीटर उंच आहे. बंधाऱ्यामध्ये चार मजले आहेत. भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधाऱ्यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले आहेत.

  • रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय

    रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय

    संग्रहालये ही इतिहासाची सर्वंकष माहिती देणारी जिवंत दालनेच असतात, असे म्हणायला हरकत नाही ! या संग्रहालयांना इतिहासप्रेमी पर्यटक आवर्जून भेट देत असतात. देशासह विदेशातील संग्रहालये पाहणारे पर्यटकही अनेक आहेत. इतिहास जागविण्यासाठी संग्रहालये असणे गरजेचे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे ऐतिहासिक रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय आहे. या संग्रहालयात तेर गावातील रहिवासी रामलिंगअप्पा लामतुरे व त्यांचे सुपूत्र भागवतप्पा लामतुरे यांनी संग्रहीत केलेल्या पुरातन वस्तू संवर्धित केल्या आहेत. मुळात या वस्तुंचे जतन लामतुरे या पिता-पुत्रांनी केले होते. रामलिंगअप्पा लामतुरे यांनी सन १९६१ मध्ये हा संग्रह शासनाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. सन १९६७ मध्ये महाराष्ट्र शासनाने हा संग्रह घेण्याचे ठरविले. त्यानंतर सन १९७१ मध्ये लामतुरे यांनी हा संग्रह शासनाकडे प्रदान केला. उस्मानाबादपासून तेर हे गाव २२ किमी अंतरावर आहे.

    हे संग्रहालय पहायचे झाल्यास आत तीन दालने आहेत. या दालनांमध्ये सुमारे पंचवीस हजार वस्तू पहायला मिळतात. लामतुरे संग्रहालयात हस्तिदंताच्या स्त्रीमूर्ती आहेत. या मूर्ती त्यावेळी आरशाच्या मुठी म्हणून वापरल्या जात. स्त्रीमूर्तीच्या माथ्यावर भोक आहे. त्यात चकचकीत तांब्याच्या पत्र्याचे आरशाचे दांडे अडकवले जात.अर्थात आरशाची प्रतिमा म्हणून या मूर्ती वापरल्या जात. या संग्रहालयात हस्तिदंतावर कलाकुसर केलेल्या वस्तू, शंखांच्या वस्तू, हाडांच्या वस्तू, मातीच्या वस्तू, खापरे, मणी, दगडांच्या मूर्ती, शाडूच्या मुर्ती तसेच वेगवेगळ्या स्त्री प्रतिमा पहायला मिळतात. येथे सातवाहनकालीन व इतर राजघराण्यांची नाणी आहेत. नाण्यांच्या मातीच्या प्रतिकृती आणि नाण्यांचे साचेसुद्धा पहायला मिळतात. या वस्तुसंग्रहालयात अनेक प्रकारच्या वस्तू आहेत.

  • बाळाच्या रडण्याची कारणे ओळखा

    बाळाच्या रडण्याची कारणे ओळखा

    जर आपली मुले वारंवार रडत असतील, तर नवीन आईंनी काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आई होणे ही एक वेगळीच अनुभूती असते. लहान मुलाच्या आवाजाने आईचे आयुष्य उजळून निघते. जेव्हा तेच मूल रडते तेव्हा आईलाही काळजी वाटू लागते. लहान मुले रडूनच आपल्या वेदना व्यक्त करतात. मूल पुन्हा-पुन्हा का रडत आहे, हे नवीन आईला कळत नाही. कधी-कधी आईला असे वाटते की, मुलाने लंगोट भिजवला असेल, ज्यामुळे तो रडत आहे. पण मुलाच्या रडण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

    नवजात बाळ फक्त आईचे दूध पित असते. आईच्या चुकीच्या खाण्याच्या सवयीदेखील बाळाच्या समस्यांचे कारण असू शकतात. आईने पोटात गॅस निर्माण करणारे किंवा खूप मसालेदार अन्न खाल्ल्यास बाळाला त्रास होऊ शकतो. यामुळे आईला तसेच मुलांना अपचन, पोटदुखी आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. अनेक वेळा नवीन आई मुलाचा हात झटक्याने पकडते. ज्यामुळे हाड निखळू शकते. अशा स्थितीत मुले रडायला लागतात. त्यामुळे त्यांचा हात धरताना नेहमी काळजी घ्यायला हवी.

    बाळाने परिधान केलेले कपडे देखील रडण्याचे कारण असू शकते. जर एखाद्या मुलास खूप घट्ट किंवा अंगाला टोचणारे कपडे घातले तर त्याला समस्या येऊ शकतात. यामुळे, बाळाच्या शरीरात टोचणे जाणवू शकते. अशा परिस्थितीत, मुलाला नेहमी हलके आणि मऊ कपडे घालायला लावा. याशिवाय हिवाळ्यात त्यांना खूप घट्ट कपडे घालणे टाळा. अनेक वेळा नवीन आई बाळाला खूप अन्न देते किंवा खूप दूध देते. जास्त दूध प्यायल्याने किंवा काहीही खाल्ल्यानेही मुलाची प्रकृती बिघडू शकते. जास्त खाल्ल्याने मुलाचे पोट फुगायला लागते. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागते. मग मूल रडायला लागते. जर तुमचे बाळ एकाच वेळी मुख्यतः संध्याकाळी रडत असेल, तर त्याला पोटशूळ देखील असू शकतो. या आजारात, मुलाच्या पोटात तीव्र वेदना होतात. काहीही खाण्यापिण्याची इच्छा नसते. हा आजार 3 महिन्यांपर्यंत बाळांना खूप त्रास देतो. कालांतराने तो आपणच बरा होतो.

  • चमकदार त्वचेसाठी फळे लाभदायक

    चमकदार त्वचेसाठी फळे लाभदायक

    प्रदूषण, अस्वास्थ्यकर आहार, निष्क्रिय जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे आपल्या त्वचेची चमक कमी होऊ लागते. या सगळ्याशिवाय हिवाळ्यात आपली त्वचा अधिक कोरडी आणि निर्जीव बनवते. त्यामुळे आपण आपल्या त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्वचेच्या काळजीमध्ये आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. काही खाद्यपदार्थ आहेत, ज्यांचा आहारात समावेश केल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येऊ शकते. काही खाद्यपदार्थ आपली त्वचा चमकदार बनवू शकतात. बीटरूट : ही लाल रंगाची कंदमुळांची भाजी तुमचे गाल नैसर्गिकरित्या गुलाबी बनवू शकते. आपली त्वचा सुधारू शकते. बीटरूटमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आढळतात. ते त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात. यामुळे रक्त शुद्ध होण्यासही मदत होते. त्यामुळे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर जातात, आणि मुरुमांची समस्या कमी होते.

    बदामामध्ये अनेक पोषकतत्वे असतात, जी त्वचा चमकदार बनविण्यास मदत करतात. बदामामध्ये जीवनसत्व ई आढळतात. ते सुरकुत्या आणि काळे डाग कमी करण्यास मदत करतात. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड्सदेखील आढळतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात. त्वचेची आर्द्रता कमी करण्यास मदत करतात. वृद्धत्वाच्या समस्या कमी होतात. अँटी-ऑक्सिडंट्स फ्री रॅडिकलचे नुकसान आणि काळे डाग कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत.

    गाजरामध्ये जीवनसत्व ‘ए’ असते. हे नवीन पेशी तयार करण्यासाठी आणि जुन्या पेशी काढून टाकण्यासाठी आवश्यक असते. गाजर कोलेजन तयार करण्यास देखील मदत करते. ज्यामुळे वृद्धत्वाची समस्या कमी होऊन त्वचा चमकते. गाजर त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. मुरुमांपासून देखील संरक्षण करते. संत्री, मोसंगी, लिंबू इत्यादी लिंबूवर्गीय फळांमध्ये जीवनसत्व सी मुबलक प्रमाणात आढळते. ते आपल्या त्वचेला ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवते. याव्यतिरिक्त, अँटी-ऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे ही फळे आपली त्वचा उजळ करण्यास, नवीन पेशी निर्माण करण्यास आणि मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

  • मुलांना ‘ड’ जीवनसत्वाची गरज

    मुलांना ‘ड’ जीवनसत्वाची गरज

    जीवनसतव् ‘ड’ हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात आवश्यक पोषकतत्वांपैकी एक आहे. याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. हे जीवनसत्व चरबीमध्ये विरघळणारे पोषकतत्व आहे, ते शरीरात अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावते. लहान मुलांसाठी तर हे अधिक महत्त्वाचे आहे. याची शरीरातील कमतरता मुलांच्या वाढीत अडथळा आणू शकते. त्यामुळे मुलांना ‘ड’ जीवनसत्व दिले पाहिजे. वास्तविक, ड जीवनसत्व हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या जन्माच्या वेळी ‘डी’ जीवनसत्व खूप कमी प्रमाणात असते, जे गरोदरपणात आईच्या माध्यमातून बाळाला मिळते. गरोदरपणात आईमध्ये या जीवनसत्वाची कमतरता असेल तर मुलांमध्ये देखील त्याचे प्रमाण कमी होते, परंतु आईचे दूध, पूरक आहार आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने जीवनसत्व ‘डी’ची पातळी वाढवता येते.

    याच्या कमतरतेमुळे मुलांना मुडदूस होतो. त्यामध्ये हाडे कमकुवत आणि वाकडी होतात. रोगप्रतिकारक शक्तीच्या चांगल्या कार्यासाठी ‘ड’ जीवनसत्व आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे मुले सहजपणे आजारांना बळी पडतात. त्यामुळे ‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेपासून मुलांचे रोगांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. ‘ड’ जीवनसत्व मेंदूच्या पेशी विकसित करण्यास मदत करते, या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुलांच्या मेंदूचा पूर्ण किंवा चांगल्या पद्धतीने विकास होत नाही. जीवनसत्व ‘ड’मुळे हाडे तसेच स्नायू मजबूत होण्यास मदत होते. मजबूत स्नायूंच्या कमतरतेमुळे मूल चालणे, खेळणे इत्यादींमध्ये इतर मुलांपेक्षा मागे राहू शकते. त्यामुळे स्नायूंच्या विकासासाठीदेखील हे जीवनसत्व खूप महत्त्वाचे आहे.

  • कडला करी

    कडला करी

    साहित्य : हरभरे – 1 कप, छोटे कांदे चिरुन -1 कप, नारळाचे खोबरे -1 कप, हळद- अर्धा चमचा, गरम मसाला-अर्धा चमचा, मीठ, तेल, मोहरी, लाल मिरच्या, आले-लसूण पेस्ट, नारळाच्या खोबऱ्याचे चौकोनी तुकडे पाव कप, धणेपूड-2 चमचे, लाल तिखट -1 चमचा, टोमॅटो कापून-पाव कप, कढीपत्याची पाने, कोथिंबीर.

    कृती :
    सकाळी करी करायची असल्यास आदल्या दिवशी रात्री हरभरे पाण्यात भिजत घालावेत. या पाण्यात मीठ घालावे. त्यानंतर हे हरभरे मऊ शिजवून घ्यावे. एका भांड्यात एक चमचा तेल गरम करावे. या तेलात खोबरे, धणेपूड, लाल तिखट आणि गरम मसाला घालून छान मिसळावे. हे सर्व मिश्रण तांबूस होईपरियंत भाजून घ्यावे. करपू देऊ नये. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घ्यावे. आता या रिकामी झालेल्या भांड्यात फोडणी करावी. प्रथम थोडे खोबरेल तेल गरम करावे.

    आपण कोणतेही खाद्यतेल वापरु शकता. त्यात थोडी मोहरी आणि लाल मिरच्या घालाव्यात. त्या चांगल्या तडतडू लागल्या की त्यात चौकोनी तुकडे केलेले नारळाचे तुकडे घालावेत. थोडा वेळ ढवळून त्यात आले-लसूण पेस्ट, कांदे, टोमॅटो आणि थोडी कढीपत्त्याची पाने चुरून घालून छान परतून घ्यावे. कांदा-टोमॅटो चांगला मऊसर शिजल्यावर त्यात शिजवलेले हरभरे घालून पुरेसे पाणी ओतावे. गरजेनुसार मीठ घालून ढवळावे. यामध्ये मिक्सरच्या भंड्यात वाटलेले वाटण घालून छान मिसळून घ्यावे. गरजेप्रमाणे पाणी ओतून ही करी उकळून घ्यावी. व्यवस्थित उकळल्यावर वरुन चिरलेली कोथिंबीर घालून झाकून ठेवावी.

  • चारठाणातील मंदिरे

    चारठाणातील मंदिरे

    महाराष्ट्राच्या अनेक भागांमधील मंदिरांची वास्तुरचना खरोखरच डोळे दिपविणारी अशी आहे. परभणीतील जिंतूर तालुक्यात अशी काही सुंदर मंदिरे पहायला मिळतात. त्यात चारठाणा गावाचा उल्लेख करता येईल. येथे अनेक मंदिरे असून ती पुरातन असल्याने पाहण्यासाठी पर्यटकही आवर्जून जातात. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती आहे. चारठाणा हे एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे. येथे पर्यटकांना शिवमंदिर, गोकुळेश्वर, काशीविश्वेश्वर, श्री नृसिंहतीर्थ मंदिर, दगडी बांधकामाची अष्टकोनी बारव, झुलता मनोरा ही महत्त्वाची स्थळे पहायला मिळतात.

    गावातील ‘चारुशयना’ नदीच्या काठावर नृसिंहतीर्थ मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. नदीकाठी असलेल्या दगडी पायऱ्यांचे काही अवशेष आता दिसतात. एका प्रशस्त आवारात हे मंदिर आहे. मंदिरासमोर सभामंडप आहे. हा सभामंडप १६ खांबांवर उभा असल्याने हे मंदिर ‘सोळा खांबी नृसिंह मंदिर’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मंदिरासमोरील नदीच्या पात्रात काही ठिकाणी खोल डोह झाले आहेत. असे म्हणतात की, तिथे प्राचीन नाणी सापडतात. येथेच एक जोड मंदिर आहे. त्यातील एक देवीचे व दुसरे महादेवाचे मंदिर आहे. देवीच्या देवळाचा सभामंडप महादेवाच्या देवळापेक्षा वेगळा आहे.

    मंदिरात जास्त कोरीव काम केलेले नसले तरी हे मंदिर देखणे आहे. ही मंदिरे पाहण्यासाठी भाविक आवर्जून भेट देतात. श्री काशीविश्वेश्वर आणि रेणुका देवीची मंदिरे जोडलेली आहेत. याच गावात गोकुळेश्वर मंदिर असून प्रथमदर्शनी ते एका भव्य वाड्यासारखे दिसते. या गावचे ग्रामदैवत असणारे हे हे शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. हे मंदिरही आकर्षक आहे. या गावात जुनी कौलारू घरे पहायला मिळतात. चारठाणा हे गाव जिंतूरपासून २० किमी आणि परभणीपासून ६२ किमी अंतरावर वसलेले आहे. येथे जरयचे झाल्यास ‘सेलु’ हे सर्वात जवळील रेल्वे स्थानक आहे. सेलुपासुन चारठाणा अवघ्या २० किमीवर आहे.

  • आगोंद समुद्रकिनारा

    आगोंद समुद्रकिनारा

    आगोंद समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील एक शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. ज्यांना किनाऱ्यावरील शांततापूर्ण वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल, गर्दी, गडबड-गोंगाटापासून दूर वेळ घालवायचा असेल अशा पर्यटकांसाठी हे चांगले ठिकाण आहे. गोव्यातील हा समुद्रकिनारा जवळजवळ दोन मैलांपर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर उत्कृष्ट खाद्यपदार्थ आणि पेये मिळतात.

    आगोंद किनारा पोहण्यासाठी योग्य आहे. येथे बोटीतून प्रवास करण्याचा मनसोक्त अनुभव घेता येतो. या किनाऱ्याजवळ कपडे आणि वेगवेगळ्या आकर्षक वस्तू विकणारी दुकाने असतात. हा समुद्रकिनारा स्वत:ला ताजेतवाने ठेवण्यासाठी, चालत फिरण्यासाठी फार सुंदर आहे. या किनाऱ्यावर एखादी बोट भाड्याने घेऊन पर्यटक आगोंद किनाऱ्यापासून जवळच्या ‘बटरफ्लाय’ आणि ‘हनिमून’ किनाऱ्यांना भेट देण्यासाठी जाऊ शकतात. आगोंदमध्ये अनेक स्वस्त तसेच महाग रेस्टॉरंट्स, बार आणि कॅफे आहेत. येथे स्वादिष्ट अन्न आणि पेये उपलब्ध असतात. या किनाऱ्यावर आरामदायी कॉटेज, जंगलातील हॉटेल्स आणि वेलनेस रिट्रीट्स अशा प्रकारची राहण्याची सोय आहे. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा आहे. यावेळी हवामान स्वच्छ असते. पाऊस नसतो. गोव्यात गेल्यावर या किनाऱ्याला आवर्जून भेट द्यायलाच हवी. विमानाने गेल्यास येथे जाण्यासाठी वास्को विमानतळावर उतरावे लागते. तेथून अनेक वाहने उपलब्ध असतात.

  • औसा किल्ला

    औसा किल्ला

    महाराष्ट्रातील गडकिल्ले हे राज्याचे वैभव आहे. असाच एक भुईकोट किल्ला लातूरमध्ये औसा शहराच्या बाजूला आहे. हा किल्ला औसा किल्ला म्हणून ओळखला जातो. बहामनी राजवटीत इ.स.१४६६ मध्ये महमूद गवान याने वजीर असताना हा किल्ला बांधला. अगदी जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसत नाही. किल्ल्यातील काही वास्तू व तटबंदीच्या काही भागावर तुर्क व युरोपियन स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसतो.

    औसा येथे भुईकोट किल्ला असून त्याचे क्षेत्रफळ २४ एकर ३० गुंठे आहे. या किल्ल्याभोवती एक खंदक असून सध्याही चांगल्या स्थितीत आहे. या खंदकात अनेक विहिरी आहेत. खंदकाला लागून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मोठा दरवाजा आहे. या दरवाजाला ‘लोह्बंदी’ दरवाजा म्हणतात. लोह्बंदी दरवाजा हे पूर्वाभिमुख आहे. या दरवाजातून आत गेल्यावर ‘अह्शमा’ नावाचा दरवाजा मिळतो. या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव दरवाजा आहे. किल्यायाच्या आत राणीमहाल, लालमहाल, पाणीमहाल इत्यादी अनेक इमारती आहेत. किल्ल्यात ‘परिबावडी’, ‘कटोराबावडी’ व ‘चांदबावडी’ या तीन महत्त्वाच्या विहिरी आहेत.

    शहरातील किल्ल्याला ऐतिहासिक काळात राजकीय महत्त्व होते. या शहराला यादवपूर्व काळापासून महत्त्व होते. मराठ्याच्या स्वातंत्र्ययुद्धात धनाजी जाधव आणि मोगल सेनापती झुल्फिकार खान यांच्यात अनेक चकमकी झाल्या होत्या. औसा किल्ला पहायला जाणारे पर्यटक येथील नंगेबाबांची समाधी, औसेकर महाराज, पडद्याप्पा मठ, कौकाडी बाबांचा मठ, गोसायाचा मठ, अशा अनेक ऐतिहासिक वास्तू पाहून येऊ शकतात. औसा भुईकोट किल्ला लातूरपासून २० किलोमीटरवर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था होऊ शकते.

  • हत्ती बेट

    हत्ती बेट

    ‘हत्ती बेट’ नावाचे निसर्गरम्य ठिकाण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आहे. प्राचीन काळापासून या स्थळाला महत्त्व प्राप्त झाले आहे. उदगीर या प्रसिद्ध शहरापासून साधारण पंधरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावर आहे. हत्ती बेटावर पुरातन मंदिरे, गुहा व कोरीव शिल्पे मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. या बेटास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या स्थळाला प्रादेशिक पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम सुरू असताना स्वातंत्र्यसैनिकांनी रझाकारांविरुद्ध युद्ध करून शेवटपर्यंत हत्ती बेट रझाकारांना जिंकू दिले नव्हते, असे सांगितले जाते.

    हत्ती बेटावर दत्तगुरुंचे मंदिर तसेच गंगाराम महाराजांची समाधी आहे. आसपासच्या गावांसह तसेच शेजारच्या राज्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक येथे भेट देत असतात. पौर्णिमेला येथे भजन, कीर्तन आणि प्रवचनाचे कार्यक्रम होतात. दत्तजयंतीला हत्तीबेटावर मोठी यात्रा भरते. यासह दर महिन्याच्या एकादशीस कीर्तन व भजनाची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. शिवाय दर पौर्णिमेला आरती, जप व महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. यावेळी हजारो भक्तगण हत्तीबेटावर येत असतात.

    हणमंतवाडी, धर्मापुरी, करवंदी आणि देवर्जन या गावांच्या सीमेलगत हे क्षेत्र आहे. सुमारे ४१ हेक्टर क्षेत्रावर हे पसरले आहे. पूर्वी हत्ती बेट म्हणजे उजाड डोंगर होता. येथील जमीन सकस नसल्याने पूर्वी डोंगर झाडांविना उजाड होता. नंतर अलिकडे सर्व लोकांनी प्रशासनाला सहकार्य करुन उजाड डोंगरावर अनेक झाडे लावून हे बेट हिरवेगर्द केले आहे. या बेटावर वर्षभर पर्यटक व भाविकांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणाजवळ पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद हे आहे. रेल्वेने गेल्यास रेल्वे स्थानक लातूर रेल्वे स्टेशन, लातूर रोड रेल्वे स्टेशन येथे उतरावे.