सह्याद्री मराठी वाहिनी

Author: सह्याद्री मराठी वृत्त

  • स्वत:कडे दुर्लक्ष नको

    स्वत:कडे दुर्लक्ष नको

    आपणांस इतरांच्या मदतीस जाण्यातून आनंद मिळत असेल तर यापेक्षा दुसरे चांगले काहीही असू शकत नाही. इतरांच्या आनंदाची काळजी घेण्यात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वत:ला मागे ठेवण्याची सवय अनेक प्रकारे हानिकारक आहे. एक काळ असा येतो, जेव्हा व्यक्तीला एकटेपणा जाणवतो, उदासीन वाटू लागते. जेव्हा तो स्वतः काही समस्येत असतो, आणि त्याला मदत करण्यासाठी तेथे कोणीही नसते. त्याच्या मनात इतरांविरुद्धच्या तक्रारी जमा होऊ लागतात. या सगळ्याचा विचार करून तो काळजीत पडतो. ही प्रवृत्ती मानसिक आरोग्यासाठीसुद्धा अत्यंत घातक आहे. मी इतरांसाठी खूप काही करतो, पण मला कोणी मदत करीत नाही. सगळ्या जबाबदाऱ्या मला एकट्यालाच पेलाव्या लागतात. असे नकारात्मक विचार मनात येतात. या विचारांपासून दूर राहण्यासाठी प्रथम परिस्थिती ओळखण्याचा प्रयत्न करावा.

    या विचारांमुळे मनात असंतोषाची भावना निर्माण होऊ शकते. मनात तणाव निर्माण होतो. तेव्हा जाणीवपूर्वक त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. इतरांना मदत करताना सुरुवातीपासूनच स्वतःकडेही तेवढेच लक्ष द्या. अन्यथा कठोर वृत्ती अंगीकारली म्हणजे स्वत:चा विचार करणे सोडून दिले, तर अचानक बदल घडवून आणणे अशक्य असते. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्व प्रयत्न करूनही समस्येवर तोडगा निघत नसेल, तर विश्वासू मित्राशी बोलण्यास अजिबात संकोच करू नका. तरीही बदल होत नसेल तर समुपदेशकाचा सल्ला घ्या.

    आपल्या मनात प्रबळ इच्छाशक्ती असल्यास प्रत्येक समस्येवर उपाय शक्य आहे. कधी आपले मन अस्वस्थ असेल तर काही चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा. कधी कोणी आपली प्रशंसा केली असेल, कधी आपल्याला पुरस्कार मिळाला असेल, आपल्या मदतीसाठी कोणी आले असेल तर ते लक्षात ठेवा. अशा सकारात्मक गोष्टींमुळे आपणांस आपले महत्त्व कळून खूप छान वाटेल. कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचारांपासून अंतर ठेवा. स्वत:च्या आनंदाशी तडजोड करू नका. इतरांना माफ करायला शिका. जीवनातील कटू अनुभव विसरा. चांगल्या कामासाठी स्वतःची प्रशंसा करा.

  • मजबूत केसांसाठी

    मजबूत केसांसाठी

    मजबूत आणि निरोगी केस सर्वांनाच हवे असतात. अलिकडच्या काळात जीवनशैलीतील बदलांमुळे महिला तसेच पुरुष सर्वांनाच केसांशी संबंधित समस्या भेडसावू लागल्या आहेत. हिवाळ्यात तर केस गळणे, केसांचा रुक्षपणा आणि केसातील कोंडा यासारख्या समस्या सामान्य असतात. शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेचा थेट परिणाम आपल्या केसांच्या आरोग्यावर होतो. आहारात असे खाद्यपदार्थ असावेत जे अप्रत्यक्षपणे केसांची वाढ करण्यास कारणीभूत ठरतील. त्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास चे केस गळणे कमी होऊन केसांची वाढही होईल. भाजीपाला खाणे हा उत्तम उपाय आहे. हिरव्या पालेभाज्या तर अनेक पोषकतत्वांची कमतरता भरून काढतात, केसगळती रोखण्यासाठी त्या बऱ्याच प्रमाणात प्रभावी आहेत. यामध्ये आयर्न, बीटा कॅरोटीन, जीवनसत्व ‘सी’ आणि फोलेट असते. ते केस मजबूत बनवण्यास मदत करतात. याशिवाय, या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व ‘ए’ देखील आढळते. त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते.

    आवळा हा केस गळतीमध्ये जीवनसत्व ‘सी’ची कमतरता भरुन काढतो. आवळ्यामध्ये हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते. आवळा खाणे, आवळा रस पिणे यासोबतच त्याचा रस थेट टाळूवरही लावू शकता. आवळा नुसता सेवन जरी केला, तरी केसांसाठी तो टॉनिकपेक्षा कमी नाही, हे लक्षात घ्या. आवळा आपण मुरंबा, कँडी किंवा चटणीच्या रूपातही सेवन करु शकता. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे मेथी दाणे केसांचे आरोग्य सुधारतात. या दाण्यांच्या सेवनाबरोबरच आपण ते भिजवून त्याची पेसट केसांनाही लावू शकता. यासाठी १-२ चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवावेत. सकाळी बारीक वाटून केसांच्या मुळांना लावावेत. 1 तासानंतर केस धुवावेत. आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावल्याने केस गळणे थांबते. असे केल्याने टाळूला आणि केसांना पोषण मिळते. जीवनसत्व ‘सी’, जीवनसत्व ‘ए’, कॅल्शियम, पोटॅशियम यासह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा मुबलक स्त्रोत असलेले पदार्थ खाल्ल्याने केसांच्या समस्या कमी होतात.

  • जीवनसत्व बी 12

    जीवनसत्व बी 12

    जीवनसत्व ‘बी 12’ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषकतत्व आहे. त्याच्या कमतरतेमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याच्या कमतरतेमुळे थकवा, चक्कर येणे, हाता-पायांमध्ये मुंग्या येणे, अंधुक दिसणे, स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याचा आपल्या मज्जासंस्थेवरही तसेच एकूणच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, जीवनसत्व ‘बी 12’ च्या कमतरतेकडे दुर्लक्ष करणे देखील घातक ठरू शकते. ‘बी 12’ ची कमतरता दूर करण्यासाठी काही खाद्यपदार्थ उपयुक्त ठरू शकतात. त्यांचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

    अंड्यांमध्ये जीवनसत्व ‘बी 12’ आढळते. म्हणून, आपल्या आहारात याचा समावेश केल्याने त्याची कमतरता दूर करण्यात खूप मदत होते. विशेषतः अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये ते आढळते. दूध हा जीवनसत्व ‘बी 12’ चा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. काही कंपन्या दुधाला फोर्टिफाइडदेखील करतात, ज्यामुळे त्यातील पोषक घटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे दुधाचा आहारात समावेश करा. डोमा मासा हा ओमेगा-३ फॅटी ॲसिड व जीवनसत्व ‘बी 12’ चाही चांगला स्रोत आहे. म्हणून, आपल्या आहारात या माशाचा समावेश करावा. त्यामुळे जीवनसत्व ‘बी 12’ ची कमतरता दूर होण्यास मदत होते. चिकन आणि टर्की यामध्येही जीवनसत्व ‘बी 12’ आढळते. पालक या भाजीमध्ये जीवनसत्व ‘बी 12’ आढळते. यासोबतच यामध्ये लोह आणि इतर पोषक घटक देखील आढळतात, जे आरोग्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे पालक या पालेभाजीला स्वतःच्या आहाराचा भाग बनवा

  • शीतगृह आणि गोदाम

    शीतगृह आणि गोदाम

    “शेतकऱ्यांनी आपला कांदा होळीत जाळला”, ही बातमी पाहिल्यावर अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला असेल. त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने आणि तो शेतात ठेवून तसाही सडूनच जाणार आहे, म्हणून त्यांनी हा मेहनतीने पिकवलेला कांदा होळीत जाळला. यावर्षी ही बातमी झळकली पण अशा बातम्या गेली काही वर्षे आपण सातत्याने बघत आलो आहोत. कधी टोमेटो, तर कधी भाजी रस्त्यावर फेकली जाते. आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळेपर्यंत शेतकऱ्याला आपल्या पिकात दुसरं काही पिकवताही येत नाही. त्यामुळे त्यांना वाट पहावी लागते. अशावेळी ते कोल्ड स्टोरेज म्हणजे शीतगृह आणि गोडाऊन म्हणजे गोदामांचा वापर करू शकतात. लवकर नाशिवंत होणाऱ्या भाज्या आणि फळे ते शीतगृहांमध्ये, तर धान्य गोदामांमध्ये ठेऊ शकतात. काही खेडेगावांमध्ये शीतगृह आणि गोदामांच्या सोई उपलब्ध नसल्यामुळे ते आपल्या घरात किंवा खळ्यातच त्याची साठवण करतात. त्यामुळे अन्नधान्याला उंदीर, घुशी लागून अन्नधान्याचा नाश होऊ शकतो. यासाठी शेतकरी स्वत: शीतगृह किंवा गोदाम बांधू शकतात, ज्यात ते स्वत:च्या पिकांसोबत अन्य शेतकऱ्यांच्या पिकांची साठवण करू शकतात.

    शेतकऱ्यांनी इतर व्यवसायही करावेत असे आता सर्व स्तरावरून म्हटले जात आहे. यात प्रक्रिया उद्योग करणाऱ्यांना वर्षभर कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी शीतगृह आवश्यक असते. समजा तुमचा मसाला उद्योग असेल, तर त्यासाठी आवश्यक मिरच्या तुम्हाला मोठ्या प्रमाणावर विकत घेऊन ठेवाव्या लागतात. ह्या मिरच्या गोडाऊनमध्ये ठेवता येतात. याशिवाय तुमचा डाळ मिलचा व्यवसाय असेल, तर त्यासाठी आवश्यक असणारा हरभरा पावसाळा सुरु होण्याआधी योग्य पद्धतीने साठवण आवश्यक असते. हा हरभरा ओला असेल, तर शीतगृहात आणि कोरडा असेल, तर गोडाऊनमध्ये ठेवता येतो. तुमचा द्राक्ष प्रक्रियेचा व्यवसाय असेल, तर द्राक्ष प्री कुलिंग शीतगृहात आणि त्यापासून तयार झालेले मनुके साध्या शीतगृहात ठेवू शकता. प्री कुलिंग शीतगृहांमध्ये आर्द्रता कमी असते. ज्यामुळे बागेतून काढलेल्या अवस्थेतच ही द्राक्ष सहा महिने टिकतात. २०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारीमध्ये द्राक्षांची म्हणावी तशी विक्री झाली नाही. त्यामुळे ही द्राक्ष साठवून पुढे विक्रीयोग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर अनेक शेतकऱ्यांनी आपली द्राक्ष विकली. म्हणजे ही शीतगृह त्यांच्यासाठी वरदानच ठरली आहेत!

    शीतगृह उभारणीसाठी किमान अर्धा एकर जागा आवश्यक आहे. ज्यात साठवण आणि ने-आण करणाऱ्या गाड्यांच्या पार्किंगची सोय असणे बंधनकारक आहे. शीतगृहाच्या क्षमतेप्रमाणे कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. म्हणजेच तुम्ही हे शीतगृह बांधून रोजगार निर्माण करतात. या शीतगृहाचा आत्मा आहे, तो म्हणजे वीज पुरवठा. गोडाऊनला विजेची गरज नाही, मात्र शीतगृहाची वीज 24 तास सुरु असणे आवशयक असते. यासाठी आपल्याकडे असलेल्या कुलिंग मशीनसह एक अतिरिक्त कुलिंग मशीन आणि 60 एच पी वीज जनरेटर असल्याशिवाय या शीतगृहाला परवानगी मिळत नाही.

    या योजनेतील अर्थसहाय्य : रु. 8000 प्रती मे.टन हा सर्व साधारण मापदंड आहे. याप्रमाणे भांडवली प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल रु. 140 लाख अर्थ सहाय्य मिळू शकते. डोंगराळ आणि अधिसूचित क्षेत्रासाठी साठवण क्षमता विचारात घेऊन प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 200 लाखापर्यंत अर्थ सहाय्य मिळू शकते.
    प्रती लाभार्थी जास्तीत जास्त 5000 मे.टन क्षमते पर्यंतच्या शीतगृहासाठी अनुदान मिळते.
    पात्र लाभार्थी : अ. वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी बँकेच्या नियमाप्रमाणे सबसिडी ग्राह्य धरून अर्थ सहाय्य मिळते.
    ब. राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या या संस्था/कंपन्यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वतः उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही. मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखा परिक्षण केलेल्या मागिल 3 वर्षाचे पुरावे सादर करावे लागतात.
    कोणत्याही तालुका कृषी अधिकारी कार्यालयात यासाठी अर्ज करता येतो.

    गोदाम योजनेचे फायदे :
    मालाची शास्त्रोक्त पध्दतीने साठवणूक.
    मालाच्या ग्रेडींगमुळे किंमत जास्त मिळते.
    मालावर औषधांची फवारणी, किटकनाशके यांचा आवश्यकतेनुसार वापर होत असल्याने माल किड, उंदीर, किटके यांच्यापासून संरक्षित राहतो.
    या शेतमालावर धान्य कर्ज तारण योजनेअंतर्गत प्रचलित भावाच्या 75 टक्के पर्यत कर्ज मिळू शकते.
    http://maha-cmegp.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्यासाठी पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड, जन्म दाखला/डोमिसीयल सर्टिफिकेट, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, हमीपत्र (वेबसाईटवर मेनूमध्ये मिळेल), प्रकल्प अहवाल, जातीचे प्रमाणपत्र (अ जा /अ ज असेल तर), विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र (माजी सैनिक, अपंग), कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र, पार्टनरशिप उद्योग असेल तर रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  • खनिज संपत्तीचे उद्योगातील योगदान

    अवजड उद्योगामध्ये योगदान देणारी खनिजसंपत्ती
    महाराष्ट्रातील उदयोग क्षेत्रात खनिजसंपत्तीचे फार मोठे योगदान आहे.

    महाराष्ट्रातील सर्वसाधारण बारा जिल्ह्यांमध्ये लहानमोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती सापडते. यामुळे देशाच्या औद्योगिक प्रगतीस मोठा हातभार लागत आहे. पूर्व विदर्भ, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र या क्षेत्रात प्रामुख्याने महाराष्ट्राची खनिज संपत्ती केंद्रित झालेली आहे. पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया व यवतमाळ हे खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र आहे. कोकण व दक्षिण महाराष्ट्रात रत्नागिरी, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग व कोल्हापूर हे जिल्हे खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र आहेत. महाराष्ट्रात मॅगनीज, लोहखनिज, बॉक्साइट, डोलोमाईट, क्रोमाइट, कायनाईट, सिलिमनाईट, चुनखडी व इतर खनिजे प्रामुख्याने आढळतात.

    मॅगनीज
    मॅगनीजचे प्रमुख साठे भंडारा,नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आहेत. भारतात आढळणाऱ्या एकूण मॅंगनीज साठ्यापैकी ४० टक्के साठा एकट्या महाराष्ट्रात आहे. मॅगनीजचा पट्टा नागपूर जिल्ह्यातील ‘सावनेर’ तालुक्यात ‘खापा’ या गावापासून सुरु होतो. हा पट्टा मध्यप्रदेशात पुढे जातो. सावनेर-रामटेक हा वैशिष्ट्यपूर्ण मॅगनीजचा पट्टा आहे. खापा, पारशिवनी, कांद्री, रामडोंगरी, गुमगाव, मनसळ, कोदेगाव या भागातील मॅगनीजचे साठे नागपूर जिल्ह्यात आहेत. कन्हान व तुमसर येथे फेरो – मॅगनीज बनविण्याची संयंत्रे उभारण्यात आली आहेत. निम्न प्रतीचे मॅगनीज भिलाई पोलाद कारखान्यात वापरतात. उच्च प्रतीच्या मॅगनीजचा थोडा भाग निर्यात केला जातो.भंडारा जिल्ह्यातील प्रमुख साठे ‘तुमसर’ तालुक्यात आहेत. भंडारा जिल्ह्यातील मॅगनीजचे साठे हे भारतातील मोठ्या साठ्यापैकी एक आहेत. भंडारा जिल्ह्यातील मॅगनीजचा साठा हा ‘गोंडाइटमाले’ च्या खडकाशी निगडित आहे. त्यामध्ये ‘सिलोमिलोन’ हे मुख्य खनिज आढळते. कोकणात आढळणारे मॅंगनीज खनिज मात्र जांभा प्रकारच्या खडकांमध्ये असलेले दिसून येते. जांभा खडकांमध्ये विखुरलेल्या धोंड्यांच्या स्वरूपात हे मॅंगनीज आढळते. पूर्व विदर्भामध्ये आढळणारे मॅंगनीज हे कोकणात आढळणाऱ्या मॅंगनीजपेक्षा उच्च प्रतीचे आहे.

    लोहखनिज
    लोहखनिजाचा साठा भारतात अंदाजे १,३४६ कोटी टन आहे.महाराष्ट्रामध्ये यातील २० टक्के साठे आढळतात. ‘धारवाडी’ संघाच्या खडकाशी निगडीत उत्तम प्रकारचे लोहखनिज असते. यातील महत्वाचे खनिज ‘हेमेटाइट’ आहे. ही खनिजे उघड्या खाणीतून काढली जातात. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, सिंधुदुर्ग, नागपूर इत्यादी ठिकाणी लोहखनिजाचा महत्त्वाचा साठा आहे. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर येथे ‘टॅकोनाईट’ खडकामध्ये लोहखनिज आढळते. रायगड, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांभा खडकात लोहखनिज आढळते.औद्योगिक विकासासाठी लागणारे पोलाद बनविण्यासाठी लोहखनिज महत्त्वाचे आहे. लोह-पोलादमध्ये ‘हेमेटाइट’ हे महत्त्वाचे खनिज आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ‘सुरजागड’ येथे चांगल्या प्रतीचे लोहखनिजाचे साठे आढळतात.

    बॉक्साईट
    बॉक्साईट हे प्रामुख्याने दक्षिण महाराष्ट्रातील कोकण भागांमध्ये आढळणारे प्रमुख खनिज आहे. बॉक्साईट हे खनिज जांभ्या खडकामध्ये आढळते. बॉक्साईटचा वापर प्रामुख्याने ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. भारतात आढळणाऱ्या एकूण बॉक्साईट साठ्यापैकी २१ टक्के बॉक्साईटचे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील बॉक्साईट हे उच्च प्रतीचे असून त्याचे राज्यात सुमारे ६८ दशलक्ष साठे आहेत. बॉक्साईटचे साठे हे महाराष्ट्रामधील रायगड,कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि पालघर या जिल्ह्यामध्ये आहेत. बॉक्साईटचे साठे हे उष्ण-दमट, आणि भरपूर पर्जन्य हवामान असणाऱ्या जांभा खडकात आढळतात. बॉक्साईटचे साठे हे रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने श्रीवर्धन, रोहा व मुरुड या तालुक्यात केंद्रीत झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, चंदगड व शाहूवाडी तालुक्यात आहेत. बॉक्साईटचा उपयोग कोल्हापूर जिल्ह्यात ॲल्युमिनियम कंपनीमध्ये व बेळगाव येथील कारखान्यात धातू निर्मितीकरिता करतात.

    डोलोमाईट
    डोलोमाईटच्या उत्पादनातील ९० टक्के उत्पादन लोह पोलादनिर्मितीसाठी वापरतात. उरलेले खत कारखान्यात वापरले जाते. गडचिरोली, यवतमाळ, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात डोलोमाईटचे साठे आढळतात.

    क्रोमाईट
    भारतात क्रोमाईटच्या साठ्यापैकी एकूण दहा टक्के साठा महाराष्ट्रात आहे. ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा-गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहेत. क्रोमाईटचा उपयोग हा धातू उद्योग व किंमती खड्यांवर प्रक्रिया करण्यासाठी व रसायन उद्योगात उपयोग करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, जानवली व बांदा, भंडारा या जिल्ह्यात मौनी व नागपूर जिल्ह्यात टाका येथे क्रोमाईटचे साठे आहेत.

    कायनाईट व सिलिमनाईट
    भारतात कायनाईटच्या उत्पादनातील एकूण १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. कायनाईटचे साठे हे महाराष्ट्रात भंडारा, गोंदिया जिल्ह्यात आहेत. भंडारा जिल्ह्यात ‘साकोली’ तालुक्यातील ‘दहेगाव’ येथे कायनाईटचे साठे आहेत. भंडारा तालुक्यातील ‘ गार्काभोंगा’ येथे कायनाईट व सिलिमनाईटचे साठे आहेत.

    चुनखडी
    महाराष्ट्रात भारताच्या चुनखडीचा साठा नऊ टक्के व उत्पादन फक्त दोन टक्के आहे. महाराष्ट्रात चुनखडीचे साठेही अनेक ठिकाणी आढळून येतात. चुनखडक हा चुन्याचा मूलभूत पदार्थ आहे. बांधकामात लागणारा चुना हा भाजून तयार केलेला चुनखडक असतो. माती व चुनखडक योग्य प्रमाणात मिसळून पोर्टलॅड सिमेंट तयार केले जाते.चुनखडक हा जास्त प्रमाणात विखुरलेल्या मातीत चुनखडीच्या रूपात असलेल्या कंकरापासून उपलब्ध होतो. चुनखडीचे साठे हे महाराष्ट्रात चार हजार दशलक्ष टन आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, पुणे, धुळे, नांदेड, नंदुरबार, नागपूर येथे चुनखडी व कंकर आढळतो. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात चुनखडीचे साठे विंध्ययन खडकात आहेत.नांदेड, पुणे आणि सांगली या जिल्ह्यात कनिष्ठ दर्जाचे व चुनखडकाचे साठे आहेत.याचा उपयोग चुनाभट्टीत होतो.

  • जाळीचा देव

    जाळीचा देव

    जालना जिल्ह्यात अजिंठ्यापासून २८ किलोमीटर आणि बुलढाण्यापासून २५ किलोमीटरवर महानुभावपंथीयांचे ‘जाळीचा देव’ हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथामधील भाविकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. येथे श्री चक्रधरस्वामी ही काळ वास्तव्यास होते. औरंगाबादपासून जाळीचादेव अंतर १२१ किमी आहे. जळगावपासून जाळीचा देव अंतर ९३ किमी आहे. जालनापासून हे अंतर १३२ किमी. आहे. जाळीचा देव येथे जाण्यासाठी एस.टी.च्या बसेस मिळतात. हे स्थान सह्याद्री पर्वतावर उत्तर सोंडेवर पूर्वाभिमुख मंदिरात आहे.

    महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रभ्रमण करीत असताना येथे आले. ते गंगातीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, चांगदेव, हरताळा येथे पोहोचले. हरताळा येथून स्वामी सावळदबारा येथे आले. वालसावंगी येथे जाताना वाटेत त्यांना अरण्य लागले. करवंदाच्या जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी थांबले असताना त्याठिकाणी त्यांना दोन वाघिणीची पिल्ले दिसली. ते पिल्लांना मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्याठिकाणी येऊन गर्जना करू लागली . स्वामींनी तिच्याकडे पाहताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे वागू लागली. ही गोष्ट वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली. म्हणूनच या तीर्थक्षेत्राला ‘जाळीचा देव’ हे नाव पडले. येथे जाळीच्या वेलांखाली दगडमातीचा ओटा बांधला होता. येथील सावळदेवा गावचे वृद्ध गुराखी सांगतात, की पौर्णिमेचा दिवस असल्यावर येथील गुराखी या स्थानावर आवर्जून जात. या स्थानावर तुरळक भक्तांनी अर्पण केलेले नारळ असत.. साधारण चार ते पाच नारळ मिळायचे. सर्व गुराखी एकत्र येऊन हे नारळ फोडून खात.

    वाघोदा-जळगाव येथील भक्त कै. लक्ष्मणराव पाटील आपला कुष्ठरोग चांगला होण्यासाठी येथे आले होते. त्यांनी एकवीस दिवस उपवास करून नामस्मरण केले. एकविसाव्या दिवशी पहाटे त्यांना एक साधू स्वप्नात दिसले. त्यांनी आशीर्वाद दिला. त्यानंतर थोड्याच दिवसात श्री. पाटील निरोगी झाले. त्यानंतर त्यांनी या स्थानाभोवतीची झाडेझुडुपे काढून सन १९३८ मध्ये मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. सन १९४२ मध्ये सभामंडपाचे काम पूर्ण होऊन कलशारोहण समारंभ थाटात झाला. याठिकाणी भक्ताचा शारीरिक, मानसिक थकवा दूर होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

  • कोर्लई बीच

    कोर्लई बीच

    कोर्लई बीच हे मुंबईच्या लपलेल्या रत्नांपैकी एक आहे. अलिबाग शहरापासून थोड्या अंतरावर कोर्लईच्या लहान मच्छीमार गावात मुख्य समुद्रकिनारा आहे. महाराष्ट्राच्या नेहमीच्या वाळूच्या किनाऱ्याच्या उलट, पावसाळ्यात हिरव्या-पिवळ्या तणांनी, गुलाबी ऑक्सॅलिस फुलांनी आणि गवताळ कुरणांनी भरलेला हा किनारा. गरम उन्हाळ्यात आणि अत्यंत हिवाळ्यात, तथापि, मखमली आवरणाशिवाय समुद्रकिनारा निर्जन आणि खडकाळ बनतो. गावात मच्छीमारांची वस्ती आहे आणि म्हणूनच, समुद्रकिनारा बहुतेक व्यापार आणि व्यावसायिक कारणांसाठी वापरला जातो.

    कोर्लई समुद्रकिनार्यावर थोडेसे पर्यटन आहे कारण ते अनेकांना माहीत नाही, ज्यामुळे ते एक आदर्श वीकेंड गेटवे स्पॉट बनते. एका बाजूला निळ्याशार समुद्राची सुंदर दृश्ये आणि दुसरीकडे पाचूच्या गवताळ रंगांसोबतच, समुद्रकिनाऱ्यावर एक जुना किल्ला आणि दीपगृह देखील आहे. लहान रंगीबेरंगी घरे आणि अरुंद गल्ल्यांसह परिसरातील गावात जुने जगाचे आकर्षण आहे. गावापासून फार दूरवर एक जुने चर्च आहे जे सध्या बंद करण्यात आले आहे परंतु आता विंटेज फोटोग्राफी आणि शोधासाठी वापरले जाते. एकंदरीत, समुद्रकिनारा हा एक दिवस मित्रांसह, कुटुंबियांसोबत किंवा फक्त एकट्याने घालवण्यासाठी एक योग्य ठिकाण आहे.

  • प्रबळगड किल्ला

    प्रबळगड किल्ला

    प्रबळगड किल्ला महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात असे आणखी दुर्गम किल्ले आहेत. जिथे कथा पर्यटकांना रोमांचित करतात. हा किल्ला माथेरान आणि पनवेल दरम्यान आहे. त्याच्या संरचनेमुळे आणि उंचीमुळे, याला भारतातील सर्वात उंच आणि सर्वात धोकादायक किल्ला म्हटले जाते. जुने किल्ले आणि वास्तू पाहणाऱ्या लोकांमध्ये हा किल्ला नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. रायगड जिल्ह्यात असलेल्या या किल्ल्यावरून आजूबाजूच्या परिसराची विलोभनीय आणि नयनरम्य दृश्ये पाहता येतात.

    या किल्ल्यावरून पर्यटक सूर्यास्तापूर्वीच परततात. कारण संध्याकाळ झाली तर येथून परतणे कठीण होते. याशिवाय पर्यटकांना राहण्यासाठी या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. येथे पर्यटकांना वीज किंवा पाणी मिळणार नाही. त्यामुळे या किल्ल्यावरून पर्यटक संध्याकाळ होण्यापूर्वीच उतरतात. कारण संध्याकाळ झाली आणि जिने उतरताना थोडीशी चूक झाली तर जीवितहानी होऊ शकते.

    प्रबळगड किल्ला 2300 फूट उंचीवर आहे. इथून पर्यटक इर्शालगड किल्ला आणि कल्याण किल्ला पाहू शकतात. या किल्ल्याभोवती असलेली हिरवाई आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. या गडावर जाणाऱ्या पायऱ्यांना रेलिंग नसल्याने ते अधिक धोकादायक बनले आहे. हा किल्ला पूर्वी टेहळणी बुरूज होता आणि त्याचे नाव मुरंजन किल्ला होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्याचे नाव बदलून प्रबळगड करण्यात आले. पावसाळ्यात आणि पावसात येथे जाणे पर्यटक टाळतात कारण यावेळी निसरडा होऊन जीव धोक्यात येऊ शकतो. साहसी उपक्रमांमध्ये भाग घेणारे पर्यटक येथे जाऊन ट्रेकिंग करू शकतात.

  • लवासा

    लवासा

    महाराष्ट्रात स्थित, लवासा हे भारतातील नवीन हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. हे शहर पोर्टोफिनो या इटालियन शहरावर आधारित एक सुंदर प्रकल्प आहे. लवासा 7 टेकड्यांवर पसरलेले आहे आणि 25000 एकर क्षेत्र व्यापलेले आहे. लवासा हे सौंदर्य आणि पायाभूत सुविधांचे एक आदर्श मिश्रण आहे जे पर्यटकांना निसर्गरम्य दृश्यांपासून हॉटेल्स, रिसॉर्ट्स, शैक्षणिक संस्था, आयटी कंपन्या, मॉल्स, निवासी मालमत्ता इत्यादींसह अतिशय विकसित पायाभूत सुविधा प्रदान करते.

    लवासा हे महाराष्ट्रातील पुण्याजवळ वसलेले खाजगी नियोजित डोंगरी शहर आहे. हे आधुनिक काळातील हिल स्टेशन सर्व अभ्यागतांसाठी एक आनंददायक माघार आहे आणि शहराच्या धकाधकीच्या जीवनातून एक छोटीशी सहल शोधत असलेल्या लोकांसाठी हे एक नवीन हँगआउट बनत आहे. हिरवाईने नटलेल्या टेकड्यांच्या मध्यभागी वसलेले हे निवांत सुट्टीचे ठिकाण आहे. लवासा शहर हे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात वसलेले आहे आणि त्याच्या मंत्रमुग्ध करण्याच्या दृश्यांसह मनमोहक करते. हे पुण्याजवळील मोसे व्हॅलीमध्ये 65 किमी अंतरावर, सुमारे एक तासाच्या अंतरावर आहे आणि मुंबईपासून ते अंदाजे 200 किमी अंतरावर आहे. 25,000 एकर जमिनीवर पसरलेले, ते 65Km लेकफ्रंट व्यापते जे संपूर्ण शहराला एक मोहक रूप देते.

  • गारमेंट उद्योग

    गारमेंट उद्योग

    गारमेंट व्यवसाय हा सर्वात जुना आणि सर्वात फायदेशीर व्यवसायांपैकी एक आहे. अन्नासह कपडे हा जगण्याचा एक आवश्यक भाग आहे, जेथे लोक जास्त खर्च करतात. फॅशन आणि ट्रेंड दररोज बदलत असल्याने या व्यवसायाला उत्तम दिवस आले आहेत. उद्योजकाला अंगीकारता येतील अशा विविध कल्पना राबविता येतात. गारमेंट उत्पादन हे सहसा भांडवल केंद्रित असते, आणि त्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. वस्त्र उत्पादनाची सुरुवात विणकाम यांसारख्या प्रक्रियेपासून होते. त्यानंतर डाईंग केले जाते. या सर्व प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल, पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाची आवश्यकता असते.

    कपडे बनविण्यासाठी कपडे निर्माते नियमितपणे बाजारातून विविध प्रकारचे कापड खरेदी करतात. तथापि, ऑर्डरनुसार फॅब्रिकचा प्रकार आणि प्रमाण बदलू शकते. म्हणून, बहुतेक कपडे निर्माते फॅब्रिक व्यापाऱ्याकडून खरेदी करतात. फॅब्रिक ट्रेडिंग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांचे फॅब्रिक उत्पादकांशी चांगले संबंध असणे आवश्यक आहे. एकदा फॅब्रिक तयार झाल्यानंतर ते विविध शैलींवर आधारित कपडे बनविण्यासाठी फॅशन डिझायनर आणि कपडे निर्माते एक प्रमुख भूमिका बजावतात.

    फॅशन डिझायनर बनू इच्छिणाऱ्यांकडे मजबूत फॅशन कौशल्ये असणे आवश्यक आहे. कपडे बनवू इच्छिणाऱ्यांना ग्राहक किंवा डिझायनरच्या गरजेनुसार कपड्यांसाठी ऑर्डर देण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. कपड्यांच्या व्यवसायातील हा शेवटचा टप्पा आहे, जिथे कपडे ग्राहकांना किरकोळ विकले जातात. विविध ठिकाणी आणि विविध माध्यमांद्वारे कपड्यांची विक्री नेटवर्कद्वारे ऑनलाइन किंवा ऑफलाइन केली जाऊ शकते. गारमेंट रिटेलिंग व्यवसाय सुरू करू इच्छिणारे ऑनलाइन किंवा ऑफलाइन रिटेलिंग यापैकी एक निवडू शकतात. ऑनलाइन रिटेलिंगमध्ये वेबसाइट डेव्हलपमेंट, मार्केटिंग, एसइओ आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यासारख्या विविध पैलूंचा समावेश होतो. दुसरीकडे ऑफलाइन किरकोळ विक्रीमध्ये पायाभूत सुविधा व्यवस्थापन, विपणन आणि जाहिरात यांचा समावेश असेल.

    व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, बाजार संशोधन करणे महत्त्वाचे आहे. बाजार संशोधनामध्ये उद्योजकाने प्रथम ज्या उत्पादनाची किंवा सेवेची मागणी करत असेल ते शोधले पाहिजे. त्यानंतर इतर विविध घटकांचा विचार करून व्यवसायाची पद्धत, स्थान आणि क्षेत्रफळ निश्चित केले पाहिजे. वस्त्र व्यवसायासाठी सर्वात लोकप्रिय प्रकारचे घटक म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि एलएलपी होय. एलएलपी नोंदणी केवळ लहान व्यवसायांसाठी किंवा फॅशन डिझायनर्ससाठी आदर्श आहे, ज्यांची वार्षिक एकूण उलाढाल रु. 40 लाखांपेक्षा जास्त नसेल. इतर सर्वांसाठी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही व्यावसायिक घटकाची सर्वोत्तम निवड असेल.

  • ॲल्युमिनीयम वर्क्स

    ॲल्युमिनीयम वर्क्स

    पूर्वी घरांना, आस्थापनांना उघडझाप करायचे लाकडी दरवाजे असायचे. आता त्याऐवजी ॲल्युमिनीयमचे सरकते दरवाजे आले आहेत. हे दरवाजे एका साध्या आणि प्रभावी यंत्रणेवर चालतात. यात दोन किंवा अधिक ॲल्युमिनीयमचे ट्रॅक असून त्यावरुन काचेच्या खिडक्या सरकवल्या जातात. सरकते दरवाजे गंजत नाहीत. ते कारागिराकडून काढून घेऊन स्वच्छ करुन पुन्हा बसविता येतात. त्यांची अखंड कार्यक्षमता आणि नैसर्गिक प्रकाशाने खोली व्यापून टकण्याची क्षमता यामुळे या खिडक्या लोकप्रिय बनल्या आहेत. या खिडक्यांमुळे घरातील हवा खेळती राहते. सरकते दरवाजे हा घराचे नूतनीकरण करण्याचा एक कार्यक्षम आणि सहज मार्ग लोकांना मिळाला आहे. त्यामुळे हा व्यवसाय चांगला लोकप्रिय झाला आहे. सरकते स्लायडिंगचे दरवाजे फायदेशीर असतात. घरमालकांना खोलीत फर्निचर कसे व्यवस्थित करावे, आणि ते त्याची जागा कशी वापरतात याविषयी अधिक स्वातंत्र्य असते.

    सरकत्या दारांमध्ये काचेची तावदाने बसविली जातात. ते नैसर्गिक प्रकाश वाढवण्यास आणि घरात मोकळेपणा ठेवण्यात मदत करतात. सरकते दरवाजे सोयीस्कर आहेत. त्यांना उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी कमीतकमी प्रयत्न करावे लागतात. सरकणारे दरवाजे, खिडक्या सहज सुरेखपणा देतात. त्यांची रचना सर्व वापरकर्त्यांना समजणारी असते. सरकत्या दरवाजांचे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी नियमित देखभाल आवश्यक आहे. सरकत्या दारांची काळजी घेणे हे एक जलद आणि सोपे काम आहे. ट्रॅक्स आणि रोलर्स नियमितपणे साबण आणि पाण्याने स्वच्छ केल्याने दरवाजे सुरळीतपणे सरकण्यास मदत होते. ही साधी देखभाल आणि निगा खिडक्या आणि दरवाज्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास आणि त्यांचे शोभिवंत स्वरूप टिकवून ठेवण्यास मदत करते.

    या व्यवसायासाठी नवीनतम पिढीचे लॉक, हँडल, आकर्षक दरवाजे, जाळ्या, ट्रॅक, विविध प्रकारच्या काचा आवश्यक असतात. शहरांमध्ये हा कच्चा माल पुरविणारी दुकाने असतात. या खिडक्या बनविण्यासाठी चांगल्या कारागिराकडे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. या कामासाठी गणितातील फूट, मीटर अर्थात मोजमाप उत्तम जमणे आवश्यक असते. तसेच हे काम साहसाचे, जोखमीचे आणि शारीरिक श्रमाचेही आहे. बहुमजली इमारतींच्या खिडक्या लावताना साहस गरजेचे असते. काचा असल्याने फार काळजीपूर्वक काम करावे लागते. माप घेताना त्यात अचूकता असायला हवी. अन्यथा संपूर्ण काम बिघडून जाते. पहिले माप चुकल्यास त्या मापात कापलेल्या काचा त्याच कामासाठी पुन्हा वापरता येत नाहीत. त्यामुळे मोठे नुकसान होते. या व्यवसायात दोन माणसांची गरज असते. त्यात निदान एक कारागीर आणि एक मदतनीस आवश्यकच असतो. अलीकडे अनेक तरुण हा व्यवसाय करु लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही रोजगार मिळू लागला आहे. या व्यवसायातही यंत्रांची गरज असते. व्यवसायात जम बसू लागला की या यंत्रांची खरेदी करु शकता; परंतु जास्तकरुन हा व्यवसाय आजही मनुष्यबळावरच अवलंबून आहे. यंत्रे फक्त साहित्य कापण्यासाठी, जोडण्यासाठी वापरली जातात. त्यामुळे या व्यवसायात अनेकजणांना रोजगार मिळतो.

  • घरच्या घरी भाजीपाला

    घरच्या घरी भाजीपाला

    शेती करण्यासाठी शेतजमीनच हवी, हे सत्य आहे ; परंतु अपार्टमेंटमध्ये राहणे किंवा अंगण नसणे हा भाजीपाला पिकवण्यात सर्वात मोठा अडथळा आहे असे वाटणे, ही चुकीची बाब आहे. अगदी लहान घरातही आपण भाजीपाला पिकवू शकतो. आपल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करू शकतो. आपण घरच्या घरी पालक, टोमॅटो, हिरवी मिरची, भेंडी, गाजर, हिरवे कांदे, कोथिंबीर किंवा पुदिना उगवू शकतो. यासाठी सर्वप्रथम, एक मोठे व खोल असे प्लास्टिकचे भांडे शोधावे. ज्यात आपल्या रोपांची मुळे वाढू शकेल असे ते असावे. पाणी काढून टाकण्यासाठी तळाशी या भांड्याला एक छिद्र असावे. यासाठी आपण जुन्या प्लास्टिकच्या बादल्या, बरण्या वापरू शकतो. छिद्र काढण्यासाठी गॅसवर चाकूचे टोक चांगले गरम करून घ्यावे. ते जेथे छिद्र हवे आहे, तेथे लावावे. आपल्याला हे भांडे डिश, बशी किंवा एखाद्या ट्रेवर ठेवावा लागेल; जेणेकरून रोपांच्या मुळाशी ओलावा कायम राहील.

    आता या भांड्यात माती भरुन त्यावर बिया पेराव्यात, अथवा रोपे लावावीत. एकदा आपली रोपे तयार झाली की ती सूर्यप्रकाशात ठेवावी. घरामध्ये भाजीपाला वाढवण्याचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे प्रकाशाचा अभाव हे असते. म्हणूनच शक्य तितक्या जास्त वेळ सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवावीत. छत असेल तर उत्तम, पण नसेल तर बाल्कनी किंवा स्वयंपाकघराच्या खिडकीवर ठेवू शकता. खिडकीच्या प्रकाशाचा वापर करूनही लहान भाज्या सहज पिकवता येतात. यामध्ये धणे, मिरची आणि पालक यांचा सहज समावेश होतो. भाज्यांना दररोज किमान चार ते सहा तास सूर्यप्रकाश लागतो, तर फळांना दररोज आठ ते दहा तास सूर्यप्रकाश लागतो.

    आता एका गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ते म्हणजे किती आणि केव्हा पाणी द्यावे ? जर माती ओलसर किंवा कोरडी असेल तर हंगामानुसार पाणी द्यावे. उन्हाळ्यात आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी नियमितपणे पाणी द्यावे लागेल; परंतु हिवाळ्यात हे आवश्यक नसते. एकतर स्प्रे बाटलीचा वापर करून त्यांना दररोज पाण्याचा फवारा द्या. काही झाडे मात्र कमी सूर्यप्रकाशातही चमत्कार करतात. धणे किंवा पालक कमी सूर्यप्रकाशातही वाढताना दिसतात. घरातील भाज्या वर्षभर पिकवता येतात. गाजरांना त्यांच्या आजूबाजूला जास्त जागा लागत नाही, परंतु त्यांना इतर भाज्यांपेक्षा खोल मातीची गरज असते. ते सुमारे 60 अंश फॅरेनहाइटवर वाढतात. त्यामुळे दिवसातील किमान 8 ते 12 तास भरपूर प्रकाश मिळेल याची खात्री करुन घ्या. हिरवा कांदा घरामध्ये चांगला वाढतो; कारण त्याची काळजी घेणे सोपे असते. आणि त्याला इतर भाज्यांप्रमाणे सूर्यप्रकाशाची गरज नसते. तुम्ही एकतर बिया वापरू शकता किंवा तुम्ही हिरव्या कांद्याच्या मुळाच्या टोकाची पुनर्लावणी करू शकता.

    मिरचीची झाडे बारमाही असतात. ती उबदार हवामानात आणि पूर्ण सूर्यप्रकाशात वाढतात. परंतु ते स्व-परागकण करीत असल्यामुळे घरामध्येही चांगली वाढू शकतात. त्यांना प्रकाशाची आवश्यकता असते. ही रोपे किमान आठ इंच उंच असलेल्या कंटेनरमध्ये असावीत. टोमॅटो ही उष्ण हवामानातील वनस्पती आहे. म्हणून त्यांना दिवसाचे 14 ते 20 तास भरपूर प्रकाशाची आवश्यकता असते. त्याच्या लहान जाती कंटेनरमध्ये चांगल्या प्रकारे वाढतात.अशा काही भाज्या आहेत ज्या बियांशिवाय, भाजीपाला कापून पिकवू शकता. आले हा असाच एक प्रकार आहे. अशा प्रकारे आपण घरच्या घरी भाजीपाला तयार करू शकता.

  • चटपटीत सॅलड

    चटपटीत सॅलड

    साहित्य – 1 कप हरभरा, १ कप मूग, २ हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो

    १ कांदा, 1 काकडी, अर्धा चिरलेला लिंबू, चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा काळे मीठ. गरजेनुसार ओली कोथिंबीर.
    कृती – सर्वप्रथम दोन पातेल्यांमध्ये पाणी घेऊन त्यात हरभरे आणि मूग वेगवेगळे घालून रात्रभर भिजत ठेवावेत . सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून गाळून घ्यावेत. त्यानंतर स्वच्छ सुती कापडात गुंडाळून एक किंवा दोन दिवस तसेच राहू द्यावे . ज्यादिवशी सॅलड बनवायचे आहे, त्यादिवशी टोमॅटो, कांदा, काकडी, हिरवी मिरची, ओली कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. आता सर्व अंकुरलेले धान्य एकदा हळुवार धुवावे आणि चांगले गाळून घ्यावे. मग सर्व चिरलेल्या भाज्यांमध्ये ते मिसळावे. नंतर अर्ध्या लिंबाचा रस, काळे मीठ आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिसळावे चटपटीत सॅलड तयार आहे.

  • मुलांच्या सवयींकडे लक्ष हवे

    मुलांच्या सवयींकडे लक्ष हवे

    प्रत्येक आई-वडिलांसाठी त्यांची मुले खूप खास असतात. आपल्या मुलांना चांगले आयुष्य आणि भविष्य देण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. पालक आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्या मुलांसाठी वेचतात. तथापि, बऱ्याच वेळा आपल्या मुलांची काळजी घेण्याच्या आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात पालक बऱ्याचदा अशा काही गोष्टी करू लागतात, ज्यामुळे मुले मजबूत होण्यापासून दुरावतात. जर आपणांस आपल्या मुलाला शारिरीक व मानसिकदृष्ट्या सशक्त बनवायचे असेल, तर लहानपणी आपल्या मुलांच्या काही सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल. बालपणातील चांगल्या सवयी आयुष्य सार्थकी लावतात. पालक म्हणून मुलाचे रक्षण करण्यासाठी आपण त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्याला मार्गदर्शन करा. मुलांना कोणी काही प्रश्न विचारले तर त्यांना उत्तर देण्याची संधी द्या. गरज असेल तेव्हा मुलांना मदत करण्यात काही नुकसान नाही, पण गरजेपेक्षा जास्त मदत केल्याने त्यांच्या शरीराबरोबरच मानसिक हानीही होऊ शकते. अशामुळे मुले प्रत्येक कामासाठी तुमच्यावर अवलंबून असतात. म्हणून, त्यांना स्वतःहून जीवनातील अडचणींना सामोरे जाऊ द्या. आवश्यक असेल तेथे हात द्या.

    प्रत्येक गोष्टीसाठी मुलांना भेटवस्तू दिल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. यासाठी त्यांना विनाकारण कोणतीही भेटवस्तू न देण्याचा प्रयत्न करा. मुलांसाठी सर्वोत्तम भेट म्हणजे पालकांचा वेळ असतो. त्यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवा. मुलांना त्यांच्या अडचणींना सामोरे जाण्याची संधी द्या. समस्या सोडविण्यासाठी त्यांना त्यांच्या मेंदूचा वापर करू द्या. त्यांना आधार द्या. जर ते मानसिक तणावाखाली असतील तर त्यांना नक्कीच मदत करा. मुलांना संकटाशी दोन हात करण्यासाठी तयार करा. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत ती डगमगणार नाहीत, याची काळजी घ्या. मुलांना वाढवणे म्हणजे केवळ त्यांचे पोषण करणे एवढेच नसून त्यांचा मानसिक, भावनिक विकास होणेही फार महत्त्वाचे आहे. याचा विचार पालकांनी मुलांना वाढवताना करायला पाहिजे. यामुळे मुलांचे भविष्य सुखकर होईल.

  • गौरवर्णाच्या नादात त्वचेला हानी नको

    गौरवर्णाच्या नादात त्वचेला हानी नको

    गोरेपान असावे, असे सर्वांनाच वाटत असते; परंतु गोरा वर्ण करण्याच्या प्रक्रियेत आपण आपली त्वचा खराब करू नये. आपण नियमितपणे फेअरनेस क्रीम वापरत असाल, तर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. वास्तविक, फेअरनेस क्रीममध्ये रेटिन-ऑइल असते. हे त्वचा पांढरी करतेच पण ती पातळ देखील करते, ज्यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो, खाज सुटते किंवा इतर अनेक समस्या निर्माण होतात.

    वात, पित्त किंवा कफ याप्रमाणे प्रत्येकाच्या त्वचेचा पोतही वेगळा असतो. आपण आपल्या त्वचेचा पोत जाणून न घेता त्वचेसाठी कोणतेही उत्पादन वापरल्यास ते नुकसानकारक होऊ शकते. लग्न किंवा कोणत्याही कार्यक्रमात फेशिअल करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर नंतर पुरळ उठतात. यामुळे पुढचा संपूर्ण कार्यक्रम बिघडतो. याचे कारण क्रीम बनावट किंवा खराब असते असे नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, फेशियल करण्यापूर्वी आपल्या त्वचेचे स्वरूप ब्युटिशियनला समजत नाही. प्रत्येकाला एकसारखा फेशियल मास्क दिला जातो. इथे हे सगळे आणखी बिघडते.

    आता नववधूचे फेशियल देखील आयुर्वेदावर आधारित होऊ लागले आहे. साधारणपणे हिवाळ्यात बहुतेक लोकांची त्वचा कोरडी होते, जर कोणाची त्वचा उन्हाळ्यातही कोरडी राहिली, विशेषत: चेहरा धुतल्यानंतर, तर ती वात प्रकृतीची आहे. अशा स्थितीत त्याने खाण्यापासून ते लावण्यापर्यंत तेलाचा वापर वाढवावा. पित्त स्वभावाच्या लोकांची त्वचा अतिशय संवेदनशील असते. त्यांचा रंग पूर्वीपेक्षा अधिक गोरा असल्यास त्यांनी त्वचेवर अशी सौंदर्यप्रसाधने जास्त वापरू नयेत. उन्हाळ्यात गुलाबपूडचा वापर करू शकतात. कफ स्वभावाच्या लोकांची त्वचा सहनशील असते.

  • पोषक पदार्थच गरजेचे

    पोषक पदार्थच गरजेचे

    प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण निरोगी रहावे. कोणताही आजार आपल्याभोवती फिरू नये. यासाठी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करतात. शरीराला जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे यासारख्या पोषकतत्वांची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी आपण अनेक आरोग्यदायी पदार्थ आणि पेये घेतो.

    बाजारात असे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत, जे आपल्यासाठी पौष्टिक असल्याचे भासवतात, प्रत्यक्षात मात्र नसतात. अशा पदार्थांपासून आपण शक्य तितके दूर रहावे. ‘डायजेस्टिव’ बिस्किटे तुमच्यासाठी आरोग्यदायी असतील असे नावावरून समजू नका. वास्तविक, या बिस्किटांमध्ये मैदा आणि साखर असते. यामध्ये भरपूर कॅलरीज असतात. जर तुम्ही त्यांचे रोज सेवन केले तर तुमचे वजन अगदी सहज वाढू शकते. आजकाल ‘डाएट’ खाकरा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. लोक संध्याकाळच्या चहासोबत ते मोठ्या उत्साहाने खातात. पण डाएट खाखरामध्ये असे काही नाही. हे तळलेले स्नॅक्स भरपूर कॅलरीजनी भरलेले असतात.

    बहुतेक लोक दुधात पावडर घालून मुलांना देतात; जेणेकरून मुलाने दूध प्यावे. जीवनसत्त्वे आणि डीएचए असलेली ही आरोग्यदायी पावडर अतिशय हानिकारक आणि साखरेने भरलेली असते. सकाळच्या नाश्यािासाठी ‘ब्रेकफास्ट सीरिअल्स’ चे सेवन करतात. खरे तर ती खूप अस्वास्थ्यकर असतात. यामध्ये फक्त साखर भरलेली असते. असाच ‘ब्राउन ब्रेड’ सुद्धा पांढऱ्या ब्रेडसारखाच हानिकारक आहे, कारण त्यात रंग वापरला जातो. पोषक घटकांचा नाही. त्यामुळे हे पदार्थ सेवन करणे शक्यतो टाळावे.

  • केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती

    केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती

    केंद्रीय राखीव पोलीस दलात अर्थात ‘सीआरएफ’ मध्ये देशातील सर्वात मोठी भरती होत आहे. सीआरपीएफमध्ये ‘कॉन्स्टेबल’ची दीड लाख पदे भरण्यात येणार असून केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली आहे. मात्र, अर्ज सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.केंद्रीय राखीव पोलीस दलातील ही पदे थेट भरतीद्वारे भरली जातील. केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून 1,29,929 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. यात 1,25,262 पुरुष उमेदवारांची तसेच 4667 महिला उमदेवारांची भरती केली जाणार आहे. या जागा महिलांसाठीच राखीव आहेत. त्यामुळे सीआरपीएफमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी सीआरपीएफच्या crpf.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करणे अपेक्षित आहे.

    कॉन्स्टेबल पदासाठी दर महिन्याला रु. 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळणार आहे. केवळ भारतीय नागरिकांनाच उमेदवारीसाठी अर्ज करता येणार आहे. वय वर्षे 18 ते 23 अशी वयोमर्यादा आहे. याच वयातील उमेदवार अर्ज करू शकतात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील तरुणांच्या वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या वयोमर्यादेत तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे.

    कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही बोर्डाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा त्या समकक्ष शैक्षणिक पात्रता असायला हवी. तरुणांना शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागणार आहे. कॉन्स्टेबल पदासाठी शारीरिक पात्रता चाचणी व लेखी परीक्षाही द्यावी लागणार आहे. माजी अग्नीवीर जर नोकरीसाठी अर्ज करीत असेल तर त्यालाही शारीरिक पात्रता चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच केंद्रातील रिक्त पदे भरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही भरतीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरु ठेवावा.

  • एक गाव-एक गणपती

    गणेशोत्सव म्हणजे एक आनंदी सोहळा असतो. काही ठिकाणचे गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतात. अनेक ठिकाणी आजही सामूहिकरित्या श्री गणेश पूजन केले जाते. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आसनगावमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना राबविली जाते. येथील ग्रामस्थ असा सामूहिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. आसनगाव येथील सूर्यवंशी क्षत्रिय समाज गणेशोत्सव मंडळाने गेल्या ८३ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे.
    सन १९४० साली येथील ग्रामस्थांनी या मंडळाची स्थापना केली. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. केवळ दीड दिवसांच्या गणेशाचे पूजन करण्यात आले होते. त्यानंतर सन १९७८ साली ग्रामस्थांनी मिळून एक सभागृह बांधले. आता गौरी आणि गणपती यांना येथून एकत्र निरोप देण्यात येतो. या गावामध्ये सध्या ५२ कुटुंबे आहेत. २५० ते ३०० ची लोकवस्ती आहे. आजही येथील ग्रामस्थ एकाच ठिकाणी जमा होऊन उत्सव साजरा करतात.
    नोकरीधंद्यानिमित्त अन्य ठिकाणी गेलेले ग्रामस्थ गणेशोत्सवाला गावी येतात. मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांसाठी स्पर्धा व वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांमध्ये सर्वांचा सक्रीय सहभाग असतो. सर्व आबालवृद्ध या सोहळ्यात आनंदाने सहभागी होऊन गणेशोत्सवाची मजा लुटतात. आरती, भजन, नैवेद्य या साऱ्या गोष्टी एकत्रितपणे करताना त्यांना मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.

  • स्टेशनरी साहित्य निर्मिती उद्योग

    स्टेशनरी साहित्य निर्मिती उद्योग

    भारतात हजारो वर्षांपासून बारा बलुतेदारी पद्धत अस्तित्वात आहे. लोहाराच्या मुलाला लोहारकाम शिकवावे लागत नाही. सुताराच्या मुलाला सुतारकाम शिकावे लागत नाही. घराघरात परंपरेने पाळले जाणारे असे व्यवसायही पुढची पिढी शिकते. व्यावसायिकांची पुढची पिढी देखील जवळजवळ व्यावसायिकच बनते. आज जग आणि काळ बदलला आहे. पारंपरिक नाही तर दैनंदिन गरजा पूर्ण करणारे अनेक व्यवसाय आज निर्माण झाले आहेत. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन बाजारातील मागणीनुसार आवश्यक उत्पादने बनवली, तर कमी खर्चात उत्पादन घेऊ शकता.

    चीन, कोरिया, जपान व इंडोनेशियासारख्या देशांनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गृहोद्योग आणि कुटीर उद्योगाच्या रूपात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे छोटे सुटे भाग बनवून खूप मदत केली आहे. तुमच्याकडे गुंतवणूक कमी असेल, कमी पैसे असतील तरीही करता येऊ शकतील, असे आधुनिक उत्पादने बनविण्याचे व्यवसाय करता येऊ शकतात. स्टेशनरी साहित्य निर्मिती हा असाच एक छोटा उद्योग आहे. शालेय मुलांसाठी लागणाऱ्या वह्या, रजिस्टर्स, पेपर्स, छापील स्टेशनरी अशा अनेक गोष्टी स्टेशनरी साहित्यात समाविष्ट असतात.

    स्टेशनरी उत्पादनातून कोणते उत्पादन बनवायचे ते प्रथम ठरवावे. स्टेशनरी म्हणजे वह्या, पुस्तके, पेन-पेंसिल, इत्यादी यांना वर्षभर बाजारात मागणी असते. वह्या तयार करण्यासाठी कमी प्रशिक्षण आवश्यक आहे. अशा कंपनीत काही दिवस काम करून तुम्ही अनुभव मिळवू शकता. स्टेशनरी उत्पादन व्यावसायिकांचे मार्गदर्शन घेऊ शकता. रुलिंग मशीन, स्टिचिंग मशीन, कॉपी बनविण्यासाठी हायड्रोलिक प्रेस मशीन बाजारातून खरेदी कराव्या लागतील. पुस्तके किंवा छापील वस्तू छापून स्टेशनरी तयार करणार असाल तर प्रिंटिंग मशीनची गरज आहे.

    प्रती तयार करण्यासाठी कागदाच्या घाऊक विक्रेत्यांकडून एक-रेघ, दु-रेघी, चार-रेघी असणाऱ्या छापील कागदांचे बंडल खरेदी करू शकता. स्टिचिंग, कटिंग, बाइंडिंग इत्यादी प्रक्रिया करून कॉपी तयार करू शकता. तुम्ही साधा कोरा कागद आणू शकता. ‘लाइन प्रिंटिंग’, ‘कव्हर पेज प्रिंटिंग’ करून स्वतः कॉपी बनवू शकता. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित हा व्यवसाय असल्याने छपाई व बंधनकारक विषयांचे मार्गदर्शन करणारी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास करावा. सर्वाधिक प्रती विद्यार्थी वापरतात. विद्यार्थ्यांच्या प्रती आणि स्टेशनरी इत्यादी त्यांचे पालक स्टेशनरी दुकानातून खरेदी करतात. घरोघरी जाऊन कॉपी विकणाऱ्या विक्रेत्यांच्या माध्यमातून ‘डोअर मार्केटिंग’ही करता येते.

    स्वतःचे उत्पादन थेट ग्राहकाला विकल्यास, ते थोड्या स्वस्त दरात विकू शकता. ज्यामुळे इतर प्रतिस्पर्धी उत्पादकांच्या तुलनेत जास्त विक्री होऊ शकते. स्टेशनरीच्या दुकानांबरोबरच संस्था, कार्यालये, कंपन्या, कार्यालये, बँका, व्यापारी, उद्योजक यांना आवश्यक असलेली स्टेशनरी त्यांच्याकडून मिळवून ती तयार करून देता येऊ शकते. या उद्योगासाठी पांढरे किंवा रेषा असलेले ड्रॉईंग पेपर्स, ग्रे बोर्ड शीट्स, काळ्या रंगाची शाई, शिलाई धागा, कव्हर शीट, बांधणीचे कापड इत्यादींची आवश्यकता असेल. रूलिंग मशीन, स्टिचिंग मशीन, हायड्रोलिक प्रेस, पेपर कटिंग मशीन, गमिंग मशीन अशी यंत्रसामग्री आवश्यक असेल. रोजगाराच्या शोधात असणारे तरुण-तरुणी हा व्यवसाय करु शकतात.

  • जनरल स्टोअर

    जनरल स्टोअर

    प्रत्येक गाव तसेच शहरात जनरल स्टोअर असतातच. जनरल स्टोअर म्हणजे माणसाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणारे दुकान होय. यालाच ‘किराणा दुकान’, ‘भुसारी दुकान’ असेही म्हणतात. घरात रोजच्या वापरासाठी लागणारी धान्ये, तेल, तूप, साबण, दंतमंजन, इ. वस्तू मिळते. या दुकानांचा व्याप, आकार हा त्या व्यक्तीने केलेल्या गुंतवणुकीवर, त्याच्या ग्राहकांच्या संख्येवर अवलंबून असतो. किराणा दुकानाचा व्यवसाय भारतात काही शतकांपासून चालत आला असून आजही त्याचे अस्तित्व टिकवून आहे. भारताच्या लहान मोठ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये कोट्यवधींच्या संख्येत अशी छोटी-मोठी दुकाने आहेत. ग्राहकांना आवश्यक सामान आणि दैनिक गरजेच्या वस्तू या दुकानात उपलब्ध करुन दिल्या जातात.

    काही ठिकाणी दुकानांमध्ये उधारीवर वाणसामान देण्याची सोय असते. अलिकडे काही दुकानदार मोफत घरपोच सेवा देतात. काहीजणांकडे डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन खरेदीची सुविधा असते. परंतु या व्यवसायासाठीसुद्धा ठोस नियोजन हवे. अन्यथा, कुठलाही व्यवसाय बुडायला वेळ लागणार नाही. किराणा मालाच्या दुकानातून वीस ते साठ हजार रुपये महिना कमाई होऊ शकते. आपल्याला असे दुकान सुरु करावयाचे असल्यास जिथे व्यवसाय करायचा आहे, तेथील ग्राहकांचा अभ्यास करा. त्यानुसार आपल्या दुकानात सामान ठेवा. ते कोणत्या गोष्टी खरेदी करु शकतील, अशाच वस्तू ठेवा. या व्यवसायासाठी काही परवाने गरजेचे असतात. त्यात दुकाने आणि संस्था नोंदणीचा दाखला, अन्न परवाना, व्यवसायधारकाचा परवाना घ्या.

    आपले दुकान एखाद्या शाळा, महाविद्यालयाजवळ असेल तर स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने, खाद्यपदार्थ दुकानात ठेवणे योग्य असेल. गावातील दुकानात महागड्या वस्तू ठेवणे फायद्याचे ठरणार नाही. आपले दुकान डिजिटल करण्याचा प्रयत्न करा. घरपोच व तात्काळ सेवा द्या. आपल्या दुकानातील वस्तू आपण ऑनलाईनदेखील विकू शकता. आपल्या व्यवसायाची जीएसटी अतंर्गत नोंदणी केल्यास आपल्याला विविध करांवर सवलती मिळू शकतात. आपली वार्षिक व्यावसायिक उलाढाल 20 लाखांपेक्षा जास्त असेल तर आपल्याला जीएसटी क्रमांक अनिवार्य आहे. दुकान चालू ठेवण्याची वेळ ठरवून घ्या. बरेच ग्राहक आठवडी सुट्टीच्या दिवशी खरेदी करणे पसंत करतात. त्यामुळे आठवडी सुट्टीच्या किंवा सणावारांच्या दिवशी दुकान चालू ठेवल्यास ते आपल्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करणे कठीण नाही. फक्त आपली नकारात्मक भूमिका दूर करायला हवी. प्रामाणिक प्रयत्न, उत्तम संवाद हातोटी, सेवाभावी वृत्ती, दर्जेदार माल, घरपोच व तात्काळ सेवा, कष्ट करण्याची तयारी ही कौशल्ये अंगी असल्यास या व्यवसायात भरभराट नक्कीच आहे.

  • मटारची लागवड

    मटारची लागवड

    हिरवे वाटाणे अर्थात कच्चे वाटाणे ज्याला ‘मटार’ देखील म्हणतात. मटार सगळ्यांनाच आवडतात. मटारची शेती करताना नियमित पाणीपुरवठा करणे व वेळेवर कीटकनाशक फवारणी होणे गरजेचे असते. या पिकास अनेक रोगांना तोंड द्यावे लागते. हिवाळ्यात पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होतो. यशस्वी शेतीसाठी या रोगांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. रब्बी पिकांमध्ये मटारमुळे शेतकऱ्यांना भरपूर नफा मिळतो, ज्याचा देशांतर्गत वापर आणि निर्यात दोन्हीमध्ये मोठा वाटा असतो. तथापि, या शेतीचे यश विविध रोगांपासूनच्या संरक्षणावर अवलंबून असते. या रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि मटारच्या निरोगी पिकाची खात्री करण्यासाठी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

    मटारला ‘मिल्ड्यू’ रोगाची लागण होते. या रोगात पानांवर पांढरे पावडर ठिपके पडतात. वाढ खुंटते. त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रतिरोधक वाणांचा वापर करावा. रोपांच्या मुळांशी हवा खेळती राहण्यासाठी रोपांमध्ये योग्य अंतर ठेवावे. सल्फर बुरशीनाशके वापरावीत. ‘डाऊनी मिल्ड्यू’ हा आणखी एक रोग आहे. यात पानांच्या वरच्या पृष्ठभागावर पिवळसरपणा आणि खालच्या पृष्ठभागावर जांभळा रंग दिसून येतो. या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतिरोधक वाण लावावे. सिंचनाच्या योग्य पद्धतींचा अवलंब करावा. आवश्यक असल्यास बुरशीनाशकांचा वापर करावा. आणखी एका रोगात रोपांच्या पानांवर काळे चट्टे पडतात. त्यामुळे पानगळती होते. या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी पीक फेरपालट, बीजप्रक्रिया आणि बुरशीनाशकांचा वापर करावा.

    ‘फ्युझेरियम विल्ट’ हा आणखी एक रोग आहे. या रोगामुळे पाने कोमेजतात. खालची पाने पिवळी पडतात. ‘रूट रॉट’ रोगामध्ये झाडे कोमेजतात. त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा असणाऱ्या मातीत शेती करावी. आवश्यक असल्यास बुरशीनाशके वापरावीत. ॲफिडचा प्रादुर्भाव झाल्यास पाने खुरटी होतात, वाढ खुंटते. त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कीटकनाशक वापरा. या रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी विषाणूमुक्त बियाणे वापरावे. ॲफिड वाहक नियंत्रित करावे. संक्रमित झाडे ताबडतोब काढून टाकावीत. परिसरात प्रचलित असलेल्या सामान्य रोगांना प्रतिरोधक वाण निवडावे. जमिनीत पिकांमध्ये फेरपालट करावा. हवा खेळती राहण्यासाठी रोपांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे. मातीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी लागवडीपूर्वी बियाण्यांवर बुरशीनाशक घालावे.

  • श्री क्षेत्र कपिलधार

    श्री क्षेत्र कपिलधार

    बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र कपिलधार हे एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. कपीलधार येथे मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी आहे. या समाधीला 459 वर्षे पूर्ण झाली आहेत. हे क्षेत्र वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान आहे.
    येथील धबधबा पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. हा धबधबा ‘कपिलधार धबधबा’ म्हणूनच ओळखला जातो. तुलसीविवाहाच्या वेळी येथे पाच दिवस यात्रा भरते. बीड शहरापासून १९ किलोमीटर अंतरावर मांजरसुंभा हे गाव आहे.

    पावसाळ्याच्या दिवसात कपिलधार धबधब्यावर पर्यटक तसेच भाविकांची मोठी गर्दी असते. कार्तिकी पौर्णिमेला येथे महोत्सव असतो. माघ शुद्ध पंचमीला स्वामींचा जन्मोत्सव व फाल्गुन चतुर्थीला समाधीस्थ झालेला दिवस असतो. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी येथे मोठी यात्रा असते.

    या पर्यटनक्षेत्राला पर्यटन विभागाचा ‘ब’ दर्जा मिळाला आहे. मन्मथस्वामी यांनी मानूर मठ येथे बसवराज शिवाचार्य महाराज यांच्याकडे विद्याभ्यास पूर्ण केला. त्यांनी वीरशैव धर्माचा प्रचार महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक अशा राज्यात केला.
    हे मंदिर सकाळी 5 ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. सकाळी महापूजा करताना महाभोगात श्रीफळ, भात अशा प्रसाद असतो. दुपारी आरती होते. भाविकांना प्रसाद म्हणून भात दिला जातो. संध्याकाळी शिव भजन होऊन रात्री दहा वाजता मंदिर बंद केले जाते. मुंबईहून हे स्थळ 470 किलोमीटर व पुण्याहून 320 किलोमीटरवर आहे.

  • कोलवा किनारा

    कोलवा किनारा

    कोलवा हे गोव्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील एक किनारपट्टीचे गाव आहे. हा किनारा साधारणपणे सुमारे 2.5 किमी आहे.या गावात आज पोर्तुगीजकालीन उच्चभ्रू घरे आणि आधुनिक व्हिला आहेत. येथे 300 वर्षांहून अधिक काळातील अनेक अवशेष पहायला मिळतात. आठवड्याच्या शेवटी येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. जगभरातील तसेच भारतीय सूर्यास्त आणि विविध क्रियाकलापांचा येथे आनंद घेतात. हा समुद्रकिनारा विशेषतः ऑक्टोबरमध्ये व्यस्त असत. त्यावेळेस येथे धार्मिक यात्रेकरूंचे जथे येतात. कोलवा चर्चला भेट देतात. या चर्चला ‘इग्रेजा दे नोसा सेन्होरा दास मर्सेस’ म्हणजेच ‘चर्च ऑफ अवर लेडी ऑफ मर्सी’ असे म्हणतात. या चर्चची स्थापना इसवी सन 1630 मध्ये रोइझ कुटुंबाने केली होती.

    येथील स्थानिक लोकांमध्ये कामगार वर्ग आजही आहे. यात प्रामुख्याने 16 व्या शतकाच्या मध्यापासून बहुसंख्य मच्छीमार आहेत. इतर कामगारांमध्ये सुतार, नारळ तोडणारे (पाडेकर), शेतात लागवड करणारे मजूर, इत्यादी होते. यामध्ये धर्मांतरित तसेच विविध पोर्तुगीज प्रदेशातील स्थलांतरितांचा समावेश होता. यात भारतीय उपखंड, अंगोला, मोझांबिक, ब्राझील येथील परदेशीची आजची विविधता मिसळली; हा किनारा पांढऱ्या वाळूचा आहे. किनाऱ्यावर नारळाची झाडे आहेत. उत्तरेला बोगमाळो किनारा आणि दक्षिण गोव्यातील ‘काबो दे रामा’ किनारा आहे.

    कोलवा आता एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हा समुद्रकिनाऱ्यामुळे आनंद लुटला जातो. येथे अनेक पर्यटन उद्योग आहेत. त्यात बजेट हॉटेल्स, गेस्ट हाऊस, बीच शॅक्स, फूड स्टॉल्स, छोटी रेस्टॉरंट्स आणि पब आणि बार विकसित झाले आहेत. जीवरक्षक आणि समुद्रकिनाऱ्यांद्वारे सतत निरीक्षण केले जाते. जलतरण क्षेत्र रंगीत ध्वजांसह ध्वजांकित केलेले आहे. गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक किनारा असल्याने वर्षातील बहुतेक वेळा खूप गजबजलेला असतो. बहुतेक पर्यटक स्थानिक भारतीय असल्याने हा समुद्रकिनारा परदेशी लोकांपासून दुर्लक्षित आहे.

  • गडगडा किल्ला

    गडगडा किल्ला

    नाशिकपासून साधारणपणे १८ किलोमीटर अंतरावर ‘गडगड सांगवी’ हे एक गाव आहे. या गावाच्या मागे ‘अंबोली पर्वत’ नावाने प्रसिद्ध असणारी डोंगररांग आहे. या पर्वतरांगेत तीन शिखरांनी डोके वर काढलेले दिसते. उजवीकडील शिखर ‘अंबोली‘ व डावीकडील शिखर ‘अघोरी’ या नावाने ओळखले जात असून या दोन शिखरांमध्ये ‘गडगडा किल्ला’ आहे. हा किल्ला टेहळणीसाठी बांधला असावा, असे दिसते.

    ‘गडगड सांगवी’ गावामागून या किल्ल्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने गेल्यावर पायर्या असलेली विहीर मिळते. विहिरीजवळ शिवलींग व नंदी आहे. या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून सरळ जाणारी वाट किल्ल्याकडे जाते. उजवीकडेील वाट हनुमान मंदिराकडे जाते. या मंदिरात मुक्काम करता येतो. या किल्यावलवर चालत जाताना दगडात खोदलेली ३ फुटी उंचीची गुहा पहायला मिळते. ही मानवनिर्मित गुहा असून आत रांगत जावे लागते. स्थानिक लोक याला भुयार म्हणतात.

    किल्ल्याच्या माथ्यावर उद्ध्वस्त प्रवेशद्वार व देवड्या पहायला मिळतात. येथून दगडात कोरलेल्या पायर्या खाली उतरताना दिसतात. प्रवेशद्वार पाहून पुढे गेल्यावर कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. या ५ टाक्या असून आत उतरण्यासाठी पायर्या आहेत. या टाक्यांतील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून पुढे गेल्यावर उध्वस्त वास्तू दिसतात. या गडावरुन आजूबाजूचा विस्तीर्ण प्रदेश दिसतो. गडगड सांगवी गावात एसटी जात नाही. वाडीव्हीरेला उतरुन ४ किमी चालत गडगड सांगवी गावात जावे लागते. खासगी वाहनाने गडगड सांगवी गावापर्यंत जाता येते.

  • आजा पर्वत

    आजा पर्वत

    बालाघाट रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध ‘आजा पर्वत’ उर्फ ‘आजोबाचा डोंगर’ आहे. ठाणे जिल्ह्यातील हा गड हरिशचंद्र अभयारण्याचा भाग आहे. येथे घनदाट अरण्याचे दर्शन घडते. येथे वाल्मिकी आश्रम असल्यामुळे या भागाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. गडाच्या नावाला एक इतिहास आहे. असे म्हणतात की, या गडावर बसून वाल्मिकींनी ‘रामायण’ हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला.
    लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना ‘आजोबा’ म्हणत असत. म्हणूनच या गडाचे नाव ‘आजोबाचा गड’ असे पडले, असे सांगतात. गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम व त्यांची समाधी आहे. देहेणे येथून वाल्मिकी आश्रमाच्या अलिकडे दोन किलोमीटरपर्यंत पक्का रस्ता आहे. तेथपर्यंत वाहनाने जाता येते. पुढे कच्च्या रस्त्याने वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी पोहोचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो.


    येथे वाल्मिकी ऋषी, कालभैरव व शंकराची मंदिरे आहेत. येथे भक्त निवास आणि ध्यान कक्ष आहे. आश्रमासमोर असलेल्या काही पायर्या उतरल्यावर वर्षभर पाणी असणारी दोन पाण्याची टाके आहेत. या आश्रमामागून गेल्यावर डाव्या बाजूला वर एक गुहा आहे. येथे सध्या लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीवरुन गुहेत चढून गेल्यावर लव-कुशच्या पादुका खडकात कोरलेल्या दिसतात. तेथेच लव कुशचा पाळणा लावलेला आहे.
    देहेणेहून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. गडावर सापांचे दर्शन होत असल्याने सावध असणे गरजेचे आहे. कल्याण – मुरबाडमार्गे देहेणे गावी जाता येते.गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.