सह्याद्री मराठी वाहिनी

Author: सह्याद्री मराठी वृत्त

  • मटकी चाट

    मटकी चाट

    साहित्य : अर्धा कप मटकी, 1 मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, 1 टोमॅटोचे छोटे तुकडे, १ बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाव चमचा हळद, पाव चमचा काळे मीठ, चवीनुसार मीठ , पाऊण लहान चमचा चाट मसाला, अर्धा लहान चमचा भाजलेले जिरे, 2 लहान चमचे हिरवी चटणी, लिंबू अर्धा, ओली कोथिंबीर -1 लहान चमचा, सजावटीसाठी बारीक शेव.

    कृती : मटकी चाट बनविण्यापूर्वी एक रात्र पाण्यात भिजवून ठेवा. भिजत घालताना पाण्याचे प्रमाण दुप्पट ठेवावे. सकाळी ती चांगली फुगून येते. मटकीला अंकुर येण्यासाठी दुसऱ्या दिवशी ते पाण्याबाहेर काढून स्वच्छ ओल्या कपड्यामध्ये गुंडाळून किंवा चाळणीत ठेवावी. चाट बनविण्यासाठी अंकुर आलेली मटकी मऊ शिजवून घ्यावी. यासाठी एका भांड्यात दोन वाट्या पाणी घेऊन त्यात मीठ आणि हळद घालून चांगले उकळावे. त्यात अंकुरलेली मटकी घालून पाच मिनिटे ऊब द्यावी. ५ मिनिटांनी गॅस बंद करावा. उकडलेली मटकी एका भांड्यात काढावी. बटाटा उकडून घ्यावा. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करावेत. चाट बनविण्यासाठी मटकीमध्ये काळे मीठ, चाट मसाला, मिरची, जिरेपूड, टोमॅटो आणि चिरलेला बटाटा घाला. वरून हिरवी कोथिंबीर आणि लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालून चमच्याने सर्व काही चांगले मिसळून घ्या. मटकी चाट तयार आहे.

  • आनंदी वैवाहिक जीवनासाठी

    आनंदी वैवाहिक जीवनासाठी

    विवाहबंधन गुंफणाऱ्या लोकांसाठी विवाह हा खूप मोठा निर्णय असतो. तो जीवनाला दिशा देतो. लग्न करतानाच तरुणांनी लक्षात घ्यायला हवे, की आयुष्यात जोडीदारासोबत काही जबाबदाऱ्याही येतात, अनेक तडजोडी कराव्या लागतात. कधी-कधी तुम्हाला आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. याची मानसिक तयारी करुन ठेवायला हवी. याचा अर्थ लग्नापासून घाबरवण्याचा नसून या नात्याला सुंदरता देण्यासाठी तयार करणे हा आहे. भारतात अलिकडे घटस्फोटाच्या घटना वाढत आहेत. ते लक्षात घेता या गोष्टींवर चर्चा होणे गरजेचे आहे. अलीकडेच हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल लग्नाच्या १२ वर्षानंतर पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली आहे. ईशा देओलने २९ जून २०१२ रोजी उद्योजक भरत तख्तानीसोबत लग्न केले. दोघांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. आपल्या दोन्ही मुलींना डोळ्यासमोर ठेवून तिने हे मोठे पाऊल उचलले आहे.

    या यादीत आमीर खान- किरण राव, मलायका अरोरा- अरबाज खान, हृतिक रोशन- सुझैन खान यांसारख्या अनेक नावांचा समावेश आहे. अनेक वर्षे एकत्र घालवून काहीजण वेगळे झाले. आपण एकत्र राहत असाल पण एकमेकांशी बोलत नसाल तर एकत्र राहण्यात काय अर्थ आहे ? हे काही काळ सहन केले जाऊ शकते, परंतु जास्त काळ नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मौन राखून तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याची चूक समजून देऊ शकता, तर तुम्ही चुकीचा विचार करीत आहात. या संवादाच्या अभावामुळे घटस्फोट नक्कीच होऊ शकतो. तसेच इगोचे आहे. इगो केवळ विवाहितच नाही तर इतर नातेसंबंधांमध्ये देखील कडवटपणाचे कारण बनू शकतो. अहंकारामुळे काय बरोबर आणि काय अयोग्य हे ओळखताही येत नाही. आपले वैवाहिक जीवन घटस्फोटापर्यंत पोहोचू नये असे वाटत असेल तर तुम्हाला तुमचा अहंकार बाजूला ठेवावा लागेल. जोडीदाराचा स्वभावही लग्नाला घटस्फोटापर्यंत नेऊ शकतो. प्रेम आणि वेडेपणा यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. अशा लोकांसोबत काही तास घालवणेही अवघड होऊन बसते. त्यामुळे सुसंवाद, निरपेक्ष प्रेम, एकमेकांना आहे तसे समजून घेणे फार महत्वाेचचे असते. तरच वैवाहिक जीवन समृद्ध व आनंदी राहते.

  • स्टायलिश दिसण्यासाठी

    स्टायलिश दिसण्यासाठी

    थंड वारे आणि कमी तापमानात उबदार कपडे वापरणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, बऱ्याच वेळा उबदार कपड्यांसह स्टायलिश कसे दिसावे हे समजत नाही. विशेषत्वाने आजकाल हवामान झपाट्याने बदलत आहे. कधी थंड वारे वाहतात, कधी पाऊस पडतो तर कधी अचानक तापमान वाढते. थंड वातावरणात ‘स्टायलिश’ दिसणे सोपे नाही. थंडीत टिकून राहणे कठीण काम आहे. आपणासही अशा हवामानात ‘काय घालावे’ यासारखे प्रश्न भेडसावत असतील.

    केवळ मुलेच नाही तर मुलीही हिवाळ्यात लेदर जॅकेट घालू शकतात. निळ्या जीन्स किंवा कोणत्याही स्कर्टसह तुम्ही लेदर जॅकेट घालू शकता. यासोबत स्कार्फही चांगला दिसतो. ज्यावेळी फारशी थंडी जाणवत नसेल, अशा वेळी आपण उंच कंबरेची जीन्स किंवा पँट आणि टॉपसह लांब कोट परिधान करु शकता. यामुळे आपण खूपच आकर्षक दिसाल. यासोबत आपण टाच किंवा घोट्याचे बूट घालू शकता. हिवाळ्यात मिनी स्कर्टचे नाव ऐकून आश्चर्यचकित होऊ नका. आपण फॅशनेबल पद्धतीने मिनी स्कर्ट देखील वापरु शकता. आपण लोकर किंवा सामान्य मिनी स्कर्टसह फ्लीस टाइट्स आणि लांब बूट घालू शकता.

    आजकाल ओव्हरसाईज कपड्यांचा ट्रेंड वाढला आहे. लोक स्टाईलपेक्षा आरामाला महत्त्व देत आहेत. त्यामुळे आरामात स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही ओव्हरसाईज टी-शर्ट आणि जीन्स देखील घालू शकता. स्पोर्ट्स शूज सोबत ठेवा. हातमोजे, स्कार्फ आणि टोपी यांसारख्या ॲक्सेसरीज आपले थंडीपासून संरक्षण तर करतीलच. पण आपला लूक अधिक स्टायलिश आणि ग्लॅमरस बनवतील.

  • आरोग्यवर्धक बीटरुट

    आरोग्यवर्धक बीटरुट

    मानवी आरोग्यासाठी बीटरूट खूप फायदेशीर आहे. हे कंदमुळ अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्व बी-6, जीवनसत्व ए, सी आणि के, फॉलिक ॲसिड, मँगनीज आणि कॉपर यांसारख्या पोषकतत्वांनी समृद्ध आहे. तसेच हळदीमध्ये ‘कर्क्यूमिन’ नावाचे पोषणतत्व आणि अँटी-ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. त्यामुळे शरीराच्या सर्व सांध्यातील वेदना कमी होण्यास मदत होते. गुडघेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. अशा परिस्थितीत, बीटरूट आणि हळद दोन्ही एकत्रितपणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. ते आपल्या शरीरातून जास्तीत जास्त विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे बीटरुटचा हळदयुक्त रस आरोग्यासाठी खूप चांगला ठरतो.

    बीटरूट शरीराला आतून मजबूत ठेवण्यास मदत करते. इतकेच नाही तर रक्त शुद्ध करण्यात आणि चेहरा चमकदार ठेवण्यासही खूप मदत करते. बीटरूट नायट्रेटनेदेखील समृद्ध आहे. बीटरुट शरीरातील रक्तदाब नियंत्रित करुन हृदय निरोगी राखण्यास मदत करते. बीटरूटमधील नायट्रेट अधिक प्रमाणात ऑक्सिजन प्रदान करण्यास मदत करते. त्याच वेळी, हळद आपल्या यकृताला ‘डिटॉक्स’ करण्याचे काम करते. अशा स्थितीत बीटरुटचा रस हळदीसोबत प्यायल्याने आरोग्याला दुहेरी फायदे मिळतात.

    बीटरूट व हळदीचा रस शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. हा रस शरीरातील ऊर्जा वाढविण्याचे काम करतो. बीटरूटचा रस रक्तवाहिन्यांना आराम देतो. रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. बीटरूट आणि हळद त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या दूर करण्यास मदत करते. बीटरूट आणि हळदीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देतात. पचनक्रिया मजबूत ठेवण्यास मदत होते. पोटात जळजळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. हे एक नैसर्गिक आरोग्य पेय आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. वापर करण्यापूर्वी आपल्या शरीरास अनुसरुन वैद्यकीय सल्ला घेणे केव्हाही चांगले !

  • उष्माघातापासून स्वतःला वाचवा

    उष्माघातापासून स्वतःला वाचवा

    वातावरण कमालीचे तप्त झाले आहे. तापमानात वाढ होत आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी उष्माघाताचा त्रास होऊन शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. एवढेच नव्हे, तर मृत्यू होण्याचाही संभव असतो. अशावेळी आपली काळजी आपणच घेतली पाहिजे.

    उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते. त्यावेळेस उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळावे. आपल्याजवळ आवर्जून पाण्याची बाटली ठेवावी. पाणी भरपूर प्यावे. तहान लागण्याची वाट बिलकुल पाहू नये. दररोज ८ ते १० ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, लिंबूपाणी तसेच ओआरएसची भुकटी पाण्यात मिसळून घ्यावी. आहारमध्ये काकडी, संत्री, कलिंगड, लिंबू, कांदा यांचा भरपूर वापर करावा. बाहेर जाणे अत्यावश्यक असल्यास पुरेशी काळजी घेऊनच जावे. शक्यतोवर रणरणत्या उन्हात कामासाठी बाहेर पडू नये. सकाळी-संध्याकाळी सौम्य सूर्यकिरणे असताना बाहेरच्या कामांना प्राधान्य द्यावे. सैल, सुती, सौम्य रंगांचे, अंगाला न चिकटणारे ढिले कपडे वापरावेत. जीन्स आणि भडक कपडे या दिवसात वापरणे टाळावे. डोक्यावर टोपी घालावी, कानाला आणि डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधावा, छत्रीचा वापर करावा.

    अनेक तास सतत कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर उष्मापात होतो. बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. ही जीवघेणी अवस्था आहे. प्रखर तापमानाला सामोरे गेल्यावर शरीरातील उष्णतेचे संतुलन करणारी संस्था निकामी होते. अतिउष्णतेने शरीरातील प्रथिनांवर दुष्परिणाम होतो. पेशींमधली जीवनप्रक्रिया थांबते. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. उपचाराभावी मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती बेशुद्ध होण्याची व दगावण्याची शक्यता असते. शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात. उष्माघात हा प्रामुख्याने नवजात बाळ, लहान मुले, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये आढळतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही सहज उष्माघात होऊ शकतो.

    मळमळ, चक्कर येणे, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे आणि स्नायूंना आकडी येणे अशी लक्षणे जाणवतात. घाम बाहेर पडत नाही त्यामुळे त्वचा गरम आणि कोरडी होते. नाडीची आणि श्वासाची गती वाढलेली असते. शरीरात ताठरता येते. हात आणि पाय आखडतात. मृत्यूसुद्धा ओढवू शकतो
    शरीरातील जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच यावर प्रथमोपचार आहे. सर्वप्रथम व्यक्तीला वातानुकूलित जागेत, सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे. शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्याच्या आजूबाजूला हवा खेळती ठेवावी. बर्फ उपलब्ध असल्यास व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत आणि मांडीच्या सांध्यात बर्फाने शेक देण्यास सुरुवात करावी. थंडाव्यामुळे शरीराचे उष्णतामान कमी व्हायला मदत होते. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. अंग ओल्या कापडाने पुसून घ्यावे. व्यक्तीवर पाण्याचा वर्षाव करावा. व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर त्यास पाणी पिण्यास द्यावे.

  • वानखेडे स्टेडियमवर रोज सचिन भेटणार

    वानखेडे स्टेडियमवर रोज सचिन भेटणार

    मुंबईमधील वानखेडे स्टेडियम आणि शतकवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यातील खास नात्याविषयी अधिक काही सांगायला नको ! त्याबाबत सगळेच परिचित आहेत. आपल्या शैलीने सचिनने हे स्टेडियम एके काळी गाजवले आहे. त्याचेच स्मरण म्हणून या स्टेडियमवर आता सचिनचे शिल्प साकारण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर, २०२३ ला या कलाकृतीचे अनावरण करण्यात येणार आहे.

    खेळाच्या कारकिर्दीत चौकार आणि षटकारांची आतीषबाजी करणाऱ्या सचिनची षटकार मारतानाची एक प्रसिद्ध पोझ या शिल्पाद्वारे कायमस्वरूपी वानखेडे स्टेडिअममध्ये पहायला मिळणार आहे. ही कलाकृती २२ फुटी आहे. नगरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी ती साकारली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या चेंडूवर सचिनने षटकार मारतानाची ही पोझ असल्याचे सांगण्यात येते.

    सचिनच्या पन्नासाव्या वाढदिवसावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनने सचिनचे शिल्प या स्टेडियममध्ये उभारण्याची घोषणा केली होती. हा पुतळा कांस्यपासून तयार करण्यात आलेला आहे. मुख्य मूर्तीची उंची १० फूट असून हातातील बॅट ४ फूट असे चौदा फूट उंचीचे हे शिल्प आहे. त्याखाली जगाचे चिन्ह म्हणून क्रिकेटचा चेंडू साकारण्यात आला आहे. ‘सचिन रमेश तेंडुलकर’ असे पूर्ण नाव त्यावर कोरण्यात आले आहे. चेंडूच्या पॅनेलवर सचिनचे विविध विक्रम नमूद करण्यात आले आहेत. हे शिल्प एकूण २२ फूट उंचीचे झाले आहे.

    प्रमोद कांबळे यांनी हे शिल्प साकारले. त्यावेळी त्यांच्याकडे अयोध्येच्या राम मंदिरातील काम सुरू होते. त्यांना सचिनचे शिल्प साकारण्यासाठी त्यांचे बंधू अजित तेंडुलकर यांची मदत झाली. त्यामुळे सचिनच्या मूर्तीतील बारकावे साकारता आले. त्यांनी त्यांच्या नगरच्या स्टुडिओमध्ये सुमारे आठ महिने यावर काम केले. अजित तेंडुलकर यांनी त्यांना जुनी छायाचित्रे दाखविली. त्यातील षटकार मारतानाची एक पोझ निश्चित झाली. शिल्प साकारताना सचिनची नजर, हेल्मेटवरील लोगो यासह सर्व बारकाव्यांवर त्यांनी खूप मेहनत घेतली. उत्तम कलाकृती साकारण्यासाठी क्ले आणि काही साहित्य त्यांनी जपानहून मागविले आहे. आता या शिल्पाचे अनावरण केल्यानंतर क्रिकेटप्रेमींना तसेच स्टेडियमवर जाणाऱ्यांना रोज सचिनला पाहता येणार आहे. शिवाय, अर्थातच, येथे हे शिल्प पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी होणार आहे, हे निश्चित !

  • तेल उद्योग

    तेल उद्योग

    भारतीय जीवनशैलीत केसांची योग्य काळजी घेण्यासाठी प्राचीन काळापासून विविध प्रकारच्या आयुर्वेदिक तेलांचा वापर केला जात आहे. साधारणपणे केसांसाठी डोक्याला शुद्ध खोबरेल तेल लावले जाते. केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी आणि केसांना राखाडी होण्यापासून रोखण्यासाठी औषधी वनस्पतींचे सार असलेल्या तेलांचा वापर केला जातो. अशी अनेक आयुर्वेदिक तेले तयार केली जातात. सुगंधी आयुर्वेदिक तेल हे अनेक सुगंधी पदार्थ मिसळून बनवले जाते. केस गळती आणि टक्कल पडणे थांबविण्यासाठी मका, आवळा, भृंगराज आणि अशा आयुर्वेदिक वनस्पतींचे रस तेलात मिसळून तयार केलेली सुगंधी तेले बाजारात आणली जातात. तथापि, पाश्चात्य देशांमध्ये केसांना तेल लावण्याची प्रथा खूपच कमी आहे. पण भारतीय लोकांचे केस काळे आणि मऊ असतात. बहुतेक भारतीय त्यांच्या केसांचा रंग काळा राहील, आणि केस लवकर राखाडी होणार नाहीत याची काळजी घेतात. केसांना तेल लावण्यासाठी एरंडेल तेल, तिळाचे तेल, खोबरा तेल, शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल वापरले जाते. या तेलांमध्ये ग्लिसराइड आणि ओलिक लिनोलिक असल्यामुळे ही सर्व तेले केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. कच्च्या वनस्पती तेलांना एक प्रकारचा सुगंध असतो. त्यांचा मूळ एक रंग असतो. त्यामुळे हे तेल शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे शुद्ध केले जाते.

    शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे तेलांचा रंग आणि सुगंध काढून टाकला जातो. कच्चे तेल काही दिवसात खराब होते. त्यामुळे अशी मान्यताप्राप्त रसायने त्यात मिसळली जातात. अशी रसायने मिसळल्याने ते तेल जास्त काळ टिकते. वनस्पती तेल खराब होऊ नये म्हणून त्यात बेंझोइक नावाचे रसायन मिसळले जाते. अशा शुद्ध तेलांचा वापर नंतर सुगंधी नैसर्गिक वनस्पतिजन्य पदार्थांसोबत सुगंधी तेल बनवण्यासाठी केला जातो. जर व्यावसायिक उत्पादन करायचे असेल, तर आवश्यकतेनुसार नैसर्गिक सुगंधी पदार्थ मिसळून तेल तयार केले जाते. तेल गरम करताना त्यात आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि सुगंधी वनस्पती टाकल्या जातात. त्यानंतर औषधी वनस्पतींचा रस त्याच तेलात काही दिवस ठेवला जातो. साधारणपणे पंधरा दिवसांनी या तेलातून या औषधी वनस्पतींचे भाग काढले जातात. त्यानंतर कापडातून किंवा फिल्टरच्या सहाय्याने गाळून तेल पूर्णपणे स्वच्छ करून शुद्ध केले जाते. तेलामध्ये आयुर्वेदिक वनस्पती आणि सुगंधी पदार्थ मिसळताना मागणीनुसार त्या तेलाचा रंग तयार करण्यासाठी ओळखले जाणारे रंग वापरले जातात. चमेली, गुलाब, मोगरा, हिबिस्कस, रातराणी अशा फुलांचे सुगंधही बाजारात उपलब्ध आहेत.

    उत्पादनाच्या मागणीनुसार अशा प्रकारचे परफ्यूम त्या तेलात मिसळून सुगंधी तेल बनवले जाते. ते काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बंद केले जातात, लेबल लावले जातात. स्वतःचे ब्रँड बाजारात विक्रीसाठी आणले जातात. अत्यावश्यक तेलांच्या अनेक जाहिराती टीव्हीसारख्या माध्यमातून प्रसारित केल्या जातात. या कारणास्तव, अशा जाहिरातींचा सामान्य जनतेवर मोठा प्रभाव पडत असल्याने, बाजारात काही विशिष्ट ब्रँडची विक्री अधिक होते. तेल उत्पादन आणि विक्रीमध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. या कारणास्तव, आपल्या उत्पादनासह बाजारात प्रवेश करताना, त्या उत्पादनाचा दर्जा उत्कृष्ट असावा. तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्रँड तयार करून जाहिरातीचा आधार घ्यावा लागेल. आयुर्वेदिक तेल विकणारे घाऊक विक्रेते वजनानुसार त्यांना आवश्यक किंमती देऊ शकतात. विक्री प्रतिनिधी नेमून घरोघरी विपणन करून मालाची चांगली विक्रीही केली जाते. यासाठी तेलशुद्धीकरणाची यंत्रसामग्री, मिक्सर, पॅकिंग मशीन इत्यादींचा संच आवश्यक असतो.

  • रंगकाम

    रंगकाम

    वाढती लोकसंख्या व नोकऱ्यांची कमतरता यामुळे अलीकडे अनेक तरुण-तरुणी स्वत:चा व्यवसाय करण्यास पहिली पसंती देतात. आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल रंगकाम करणे हासुद्धा एक चांगला व्यवसाय आहे. घर, कार्यालयाच्या नुतनीकरणात भिंतींचे रंगकाम हा एक मुख्य टप्पा आहे. या व्यवसायासाठी रंग, ब्रश, शिडी, हे साहित्य नेण्यासाठी वाहन याची गरज असते. रंगकाम करण्यासाठी आधी या कामाचे ज्ञान मिळविणे फार गरजेचे आहे. रंगांचे ज्ञान असायला हवे. अलीकडे भिंतींवर आकर्षक नक्षीकाम करुन रंग अधिक उठावदार केला जातो. त्यामुळे या व्यवसायातील नवनवे तंत्रज्ञान वेळीच आत्मसात करायला हवे. रंगांचे प्रकार अर्थात रंगांचे ज्ञान आपण शिकायला हवे. रंगकाम सुरू करण्यात मोठा अडथळा येत नाही. रंगकाम करणाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी फार काळ घालवावा लागत नाही. याचा अर्थ आपल्याला जेव्हा जेव्हा कारागिरांची आवश्यकता लागेल तेव्हा असे रंगकाम करणारे सहज मिळू शकतात.

    घरांच्या रंगकामाची बारीकसारीक कौशल्ये काम करता-करताही आपण शिकवू शकता. रंगकाम व्यवसाय सुरू करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्याची लवचिकता हे आहे. म्हणजे, आपण आपली एखाददुसरी लहानशी नोकरी करुनही हे काम करु शकता. आपण हे काम हंगामानुसार करु शकता. पावसाळ्यात रंगकाम नसते. उन्हाळ्यात व हिवाळ्यात ही कामे बहुतांशी असतात. रंगकाम व्यवसाय करण्यासाठी इतर क्षेत्रांपेक्षा कमी खर्चिक उपकरणे देखील लागतात. पॉवरटूल्स, वेल्डिंग उपकरणे, प्लंबिंग पुरवठा किंवा इतर ओव्हरहेड-जड साहित्याऐवजी गरजेपुरते सामान वापरून आपण व्यवसायाला सुरुवात करू शकता. इतर उपकरणे, जसे की मचान, पेंट स्प्रेअर ही उपकरणे व्यवसायात जम बसू लागल्यावर घेऊ शकता.

    सुतारकाम आणि प्लंबिंग यांसारख्या इतर व्यवसायांप्रमाणे घरे कशी रंगवायची हे शिकण्यासाठी जास्त वेळ घालवावा लागत नाही. अधिक कुशल कामगार लागणार नाहीत. त्यामुळे कामगारांवर तेवढा खर्च करावा लागणार नाही. प्रत्येक बाजारासाठी हे खरे असू शकत नाही. तरीही अनेकदृष्ट्या लागू पडते. रंगकाम या व्यवसायाला फार चांगले दिवस आहेत. आधुनिकतेच्या या काळात नवनवीन सिमेंट-काँक्रीटच्या इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींना रंगकाम करण्यासाठी चांगल्या कारागिराच्या शोधात माणसे असतात. त्यामुळे हा व्यवसाय फायद्यातच आहे. उंच-उंच इमारती रंगविणे तेवढेच जोखमीचे काम आहे. अलीकडे रंगकामासाठी यंत्रसामग्री बाजारात उपलब्ध आहे. जसजसा व्यवसायात जम बसू लागेल तसा अशा यंत्रसामग्रीचा वापर करुन आपण आपला व्यवसाय अधिक उत्तम बनवू शकता.

  • गुलाब शेती

    गुलाब शेती

    गुलाबाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सणसमारंभाच्या दिवसांत चांगला नफा मिळतो. लग्नसराईच्या हंगामात गुलाबांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढते; परंतु गुलाबाच्या झाडांना हिवाळ्याच्या हंगामात विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. थंड आणि ओलसर परिस्थिती विविध रोगांसाठी अनुकूल वातावरण तयार करते. या शेतीच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपायांची आवश्यकता असते. पावडर बुरशी हा एक बुरशीजन्य रोग आहे, जो थंड व कोरड्या परिस्थितीत वाढतो. हिवाळ्यात आर्द्रतेच्या पातळीत चढ-उतार झाल्यामुळे ही समस्या वाढते. पावडर बुरशीचे व्यवस्थापन करण्यासाठी रोपाच्या संक्रमित भागांची छाटणी करुन ते जाळून टाकावेत. यानंतर, 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात विरघळणारे गंधक किंवा कडुनिंबाच्या तेलाचे बुरशीनाशक 5 मिली प्रति लिटर पाण्यात विरघळवून त्याची 10 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी केल्यास हा रोग आटोक्यात आणता येतो. हवेच्या चांगल्या अभिसरणासाठी झाडांमध्ये योग्य अंतर ठेवावे.

    ‘डिप्लोकार्पॉन रोझे’ बुरशीमुळे होणारा ‘काळे डाग’ हा गुलाबाचा एक रोग आहे, जो थंड, ओलसर वातावरणात विकसित होतो. याकरिता हिवाळ्यातील जीवाणू कमी करण्यासाठी झाडाची गळलेली पाने काढून टाकावीत. पानांची आर्द्रता कमी करण्यासाठी झाडांच्या मुळांना चांगले पाणी द्यावे. ‘बोट्रिटिस सिनेरिया’ या बुरशीमुळे होणारा ‘बोट्रिटिस ब्लाइट’ हिवाळ्यात अधिक त्रासदायक बनतो. यासाठी हे उपाय प्रभावी आहेत. रोपांची छाटणी करुन मृत किंवा संक्रमित वनस्पती काढून टाकाव्यात. रोपांची छाटणी आणि योग्य अंतरामुळे हवा चांगल्या प्रकारे खेळती राहते. अति पाणी देणे टाळावे. रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पानांना कमीत कमी पाणी द्यावे. थंड तापमानामुळे हिवाळ्यात इजा होऊ शकते. गुलाबांच्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो.

    गुलाबाच्या मुळांवरती माती भुसभुशीत ठेवावी. रोपाला सुप्तावस्थेतून बाहेर येण्यास मदत करण्यासाठी शरद ऋतूमध्ये हळूहळू पाणी कमी करावे. थंड तापमानास प्रतिरोधक असलेल्या गुलाबाच्या जाती निवडाव्यात. ‘सर्कोस्पोरा’ आणि ‘नेक्ट्रिया कॅंकर’ सारख्या ‘कॅंकर’ रोगांचा हिवाळ्यात गुलाबांवर परिणाम होऊ शकतो. बाधित भाग व संक्रमित फांद्या काढाव्यात. कडुलिंबाचे तेल किंवा कीटकनाशक वापरावे. या उपायांनी गुलाबाच्या रोपांना रोगांपासून वाचविणे शक्य आहे. याबाबत आपल्या गावातील कृषिसेवकांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपाय करावेत.

  • भद्र मारुती मंदिर

    भद्र मारुती मंदिर

    छत्रपती संभाजीनगरजवळील खुल्ताबाद येथे भद्र मारुती हे एक प्राचीन मंदिर आहे. वेरुळ लेण्यांपासून चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. येथील मारूती नवसाला पावणारा असून हे अत्यंत जागृत स्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्ती शयनावस्थेत आहे. प्रयागराज येथील मंदिर आणि मध्य प्रदेशातील ‘जाम सवाली’ येथील मंदिरात अशी मूर्ती दिसते. हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा, रोजचा सूर्योदय व राम नवमीला येथे भाविकांची गर्दी असते.

    या मंदिराबाबत एक कथा सांगितली जाते. भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची रामावर विशेष प्रीती होती. तो नेहमी रामाची गाणी गात असे. एकदा हनुमान आकाशातून जात असतांना त्यांच्या कानावर ही गाणी पडली. ते उतरले. गाणी ऐकण्यात तल्लीन झाले. तेथेच त्यांना ‘भाव समाधी’ लागली, असे सांगतात. राजा भद्रसेनांचे गाणे सपल्यावर त्यांनी पाहिले असता त्यांना मंत्रमुग्ध झालेले हनुमान दिसले. त्यांनी दंडवत घातला. भक्तांना दर्शन व आशीर्वाद देण्यासाठी तेथेच राहण्याची विनंती केली. त्याप्रमाणे हनुमान कायमचे तेथेच राहिले, असे सांगतात.

    हे मंदिर प्रसन्नता प्रदान करणारे आहे. औरंगाबादमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम स्थळांपैकी एक आहे, येथे सकाळी 5 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत प्रवेश दिला जातो. अनेक पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणी आवर्जून भेट देतात. हे मंदिर, मूर्ती पाहून हरखून जातात.

  • वागातोर समुद्रकिनारा

    वागातोर समुद्रकिनारा

    वागातोर हा एक गोव्यातील गजबजलेला किनारी भाग आहे. हा समुद्रकिनारा त्याच्या सुंदरतेसाठी ओळखला जातो. हा किनारा मेजवान्यांसाठी प्रसिद्ध आहे. तरुण लोक या मेजवान्यांना हजेरी लावतात. येथील ‘सी व्ह्यू बार’ आणि क्लबमधून सूर्यास्त पाहण्यासाठी लोक येथे उपस्थित राहतात. येथील रेस्टॉरंटमध्ये जगभरातील पाककृती आढळतात.
    वागातोर किनाऱ्यावर अनेक क्रियाकलाप होताना दिसतात. येथे अनेक खाद्यपदार्थ आणि पेये, क्रिकेटचा खेळ सुरू आहे. विक्रेते ताजेतवाने नारळाचे पाणी विकतात. हा समुद्रकिनारा एका बाजूने टेकडीने नटलेला आहे.

    उत्तर गोव्यात वसलेला हा किनारा कांदोळी, कलंगुट, बागा आणि अंजुणे किनाऱ्याच्या शेवटी वसलेले आहे. शापोरा नदीने या किनाऱ्यास मोरजीपासून वेगळे केले आहे. वागातोर समुद्रकिनारा ‘मोठे वागातोर’ व ‘लहान वागातोर’ या दोन भागांमध्ये विभागलेला आहे.

    आपल्या सुट्ट्यांमध्ये गोव्यातील या समुद्रकिनाऱ्याला भेट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा गोव्यातील सर्वात जास्त छायाचित्रीत केलेला समुद्रकिनारा आहे. येथे विविध प्रकारचे जलक्रीडा प्रकार देखील पाहू शकता.

  • कुंजरगड किल्ला

    कुंजरगड किल्ला

    बालाघाट डोंगररांगेवर ‘कुंजरगड’ हा एक किल्ला आहे. पायथ्याशी असलेल्या गावातून हा गड हत्तीसारखा प्रचंड दिसतो. या किल्याशीचे दुसरे नाव ‘कोंबडगड’ असेही आहे. पावसाळ्यात या भागात मुसळधार पाऊस पडतो. पावसाळा ऐन भरात असताना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडसारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत. सकाळी लवकर कुंजरगडाच्या पायथ्याला पोहोचुन कुंजरगड पाहुन घ्यावा. कुंजरगड – भैरवगड हे दोन किल्ले एका दिवसात पाहून पाचनई गावी मुक्कामाला जावे. पाचनईला जेवणाची आणि मुक्कामाची सोय होते.

    कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत. त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्यामधून जाणार्या वाटेने गडावर पोहोचण्यास कमी वेळ लागतो. गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात. गडाला वळसा घालून जाताना वाटेत दाट झाडीत उघड्यावर ठेवलेल्या दोन मूर्ती पहायला मिळतात. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून दुसर्या मुर्तीला काळोबा म्हणतात.

    किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. अर्ध्या पायर्या चढल्यावर डोंगराच्या आरपार खोदलेली एक गुहा आहे. ही गुहा पाहून पायऱ्यांच्या मार्गाने उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर पोहोचता येते. समोर उद्ध्वस्त वास्तुचे अवशेष दिसतात. उजव्या बाजूला पाण्याची सुकलेली २ टाकी दिसतात. पुढे एका मोठ्या वाड्याचे अवशेष दिसतात.या वाड्यामागे दगडात कोरलेल्या टाक्यांचा समुह आहे. कुंजरगडाच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर चढून नैसर्गिक गुहा पाहून किल्ल्यावर जाता येते. या गडावर राहण्याची सोय नाही. विहिर गावातील शाळेत राहण्याची सोय होऊ शकते.

  • छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

    छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

    छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे एक उल्लेखनीय ठिकाण आहे. मुख्य आकर्षणांपैकी हे एक स्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयापासून नेहरू बाल उद्यान जवळ आहे. हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे.

    मराठा साम्राज्यातील शासकांची शस्त्रे आणि इतर पुरातन वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये 500 वर्षे जुना युद्धाचा पोशाख, 400 वर्षांची जुनी पैठणी साडी, औरंगजेबाने स्वत:च्या हाताने लिहिलेली कुराणाची प्रत येथे पहायला मिळते. अनेक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण गोष्टी येथे पहायला मिळतात. जुनी शस्त्रे, प्राचीन रायफल, तलवारी, ढाली आणि मुघलांना पराभूत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कलाकृती येथे पहायला मिळतात. शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या आणि त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांची अनेक जुनी चित्रे येथे आहेत.

    हे संग्रहालय आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 10.30 वाजल्यापासून संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत खुले असते. येथे जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक व विमानतळ जवळ आहे. औरंगाबाद महानगरपालिकेने या संग्रहालयाची स्थापना केली. या इमारतीत एकूण 6 प्रदर्शन सभागृह आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील हिमायत बाग येथे हे संग्रहालय आहे. औरंगाबादमधील महत्व्मपूर्ण पर्यटनस्थळांपैकी हे एक ठिकाण आहे. मात्र आज जाण्यासाठी माफक प्रवेश शुल्क आकारले जाते.

  • साबुदाण्याची खीर

    साबुदाण्याची खीर

    साहित्य : १ वाटी साबुदाणा, १ लिटर दूध, दीड कप साखर किंवा गूळ, ४ वेलची.

    कृती : साबुदाणा शिजवण्यापूर्वी सुमारे 15 मिनिटे पाण्यात भिजवा. कढईत दूध उकळत ठेवा. एक उकळी आल्यावर त्यात साखर आणि वेलचीपूड घाला. यानंतर त्यात भिजवलेला साबुदाणा घालून सुमारे 5-10 मिनिटे उकळू द्या. याने साबुदाणा दूध शोषून घेईल आणि फुगेल. मग यात साधारण १ कप पाणी घालून एक उकळी आणा. चविष्ट साबुदाणा खीर तयार आहे.

  • नकारात्मकता सोडावी

    नकारात्मकता सोडावी

    काही माणसे कोणतेही काम सुरू करण्याचा विचार करतात, त्यावेळेस जगभरातील नकारात्मक गोष्टी त्यांच्या हृदयावर आणि मनावर अधिराज्य गाजवतात. मग कितीही प्रयत्न केले तरी आपण एकाग्र होऊन काम करू शकत नाही. शेवटी अपयश आल्यावर स्वत:च्या नशिबाला शिव्या देतात. सत्य हे आहे की, आपल्या विचारांमुळे आपण आपली सुरळीत असलेलीही अनेक कामे बिघडवतो. यासाठी आपण आपल्या नकारात्मक भावनांवर सहज नियंत्रण ठेवायला हवे. त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधही उत्तम राहतात.

    मी आधी सुरुवात का केली नाही, असा प्रश्न विचारण्याऐवजी आपण आपले भूतकाळातील जीवन बदलू शकत नाही, त्यामुळे कोणतेही चांगले काम सुरू करण्यासाठी आजच्यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही, असे मनावर बिंबवा. स्वत:ला प्रत्येक गोष्टीत दोष देत बसण्यापेक्षा प्रत्येक दिवसाला आपला शेवटचा दिवस मानून प्रत्येक दिवसाचा सदुपयोग करेन, असा विचार करा. कोणतेही काम अगदी मनापासून करा. त्यात अयशस्वी झालात, तरी किमान आपण सर्वोत्तम प्रयत्न केल्याचे, चांगला अनुभव मिळाल्याचे समाधान मिळते.

    हे खूप कठीण आहे, मी हे कसे करू शकतो, असे प्रश्न विचारु नका. कठोर परिश्रमानंतरच यश मिळते, हे लक्षात घ्या. मला शून्यापासून सुरुवात करायची आहे, असे माना. इतर लोकांकडे जास्त पैसा आहे, ते खूप भाग्यवान आहेत, अशी तुलना करु नका. त्याऐवजी प्रत्येकाचा जीवन प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाच्या उणीवाही वेगळ्या असतात, असा विाचर करा. कदाचित आपल्याकडे असलेले ज्ञान कोणत्याही श्रीमंत व्यक्तीपाशी नसेल. छोट्या गोष्टींसाठी मोठी पावले उचलणे थांबवू नका. जेव्हा आपल्या मनात काही नकारात्मकता येते, तेव्हा लगेच काही सकारात्मक काम करून ते वळवण्याचा प्रयत्न करा. चांगले संगीत ऐका, एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी बोला, पुरेशी झोपही घ्या, आणि नव्या मनाने स्वत:ला पुन्हा तयार करा.

  • परफ्यूम डेचा आनंद घ्या

    परफ्यूम डेचा आनंद घ्या

    ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या सप्ताहात ‘व्हॅलेंटाईन डे’ नंतर तिसऱ्या दिवशी ‘परफ्यूम डे’ साजरा केला जातो. यावर्षी आज हा दिवस साजरा होत आहे. हा दिवस जुन्या नात्यांमधून बाहेर पडण्याचा आणि स्वतःसाठी नवीन संधी शोधण्याचा आहे. तसेच हा दिवस स्वत:साठी असतो. म्हणून, यादिवशी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकता. यादिवशी स्वतःसाठी आवडता परफ्यूम भेट घेऊ शकता. आपल्या आवडत्या सुगंधात हरवून जाऊ शकता; परंतु हा केवळ परफ्यूमचा दिवस नाही. ‘परफ्यूम डे’ चा कोणताही स्पष्ट इतिहास नसला, तरी हा दिवस स्वत:ला खास बनविण्याचा संदेश देतो, असे मानले जाते. परफ्यूम ही एक अशी वस्तू आहे जी कधी-कधी जुन्या आठवणींना ताज्या करून देते.

    परफ्यूमचा सुगंध आपल्या भूतकाळाशी संबंधित कोणाची तरी आठवण करून देतो. तसे असेल तर यादिवशी असा कोणताही परफ्यूम वापरु नये. यादिवशी स्वत:च्या आवडीचा परफ्यूम स्वतःलाच भेट द्या. संपूर्ण व्हॅलेंटाईन सप्ताहामध्ये एकटे वाटत असेल तर हा दिवस स्वत:साठी आहे. यादिवशी स्वतःवर प्रेम करा. स्वतःचे लाड करा. परफ्यूमच्या दिवशी स्वतःला आत्मविश्वास देण्यासाठी स्वतःचे लाड करायला विसरू नका. ‘परफ्यूम डे’च्या दिवशी आपण आपल्या आवडत्या सुगंधित मेणबत्तीच्या मदतीने आपले घर सुगंधित करू शकता. असे केल्याने आपला मूड चांगला राहील. आपण दिवसभराचा क्षीण, सर्व थकवा विसरून आराम करू शकाल. आपण आपले आवडते संगीत लावून त्याचा आनंद घेऊ शकता.

  • घामोळ्या त्रास

    घामोळ्या त्रास

    उन्हाचा तापमान वाढला कि त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात, सर्वात सामान्य समस्या म्हणजे जळजळ होण्याची समस्या. घामोळ्या, उष्मा पुरळ किंवा घाम पुरळ असेही म्हणतात. मान, पाठ, छाती, लहान लाल पुरळ, खाज सुटणे, जळजळ यासारख्या शरीराच्या अनेक भागांवर. जास्त घाम येणे, त्वचा स्वच्छ न राहणे यामुळे मुरुमांची समस्या होते. ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त होते त्या ठिकाणी जास्त घाम आल्याने घामोळ्यांचा त्रास होतो. तसे, ही समस्या फार गंभीर नाही. फार काळ राहत नाही.

    तथापि, बरेच लोक त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी अँटी-फंगल, अँटी-इन्फेक्टीव्ह वापरतात. जर तुम्हाला चिंता दूर करायची असेल तर तुम्ही काही उपाय करू शकता. मुलतानीमध्ये थंडीचा प्रभाव असतो, माती जळते, खाज कमी होते. या सोबतच मुलतानी मातीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म देखील असतात, जे त्वचेशी संबंधित समस्या जसे की बुरशीजन्य संसर्ग थांबवतात. एलोवेरा जेल त्वचेसाठी सर्वोत्तम आहे. ते त्वचा मऊ करते. तुम्ही रात्री सर्वात आधी कोरफड जेल लावू शकता आणि सकाळी थंड पाण्याने तुमची त्वचा धुवा.आराम वाटेल.

    घामोळ्यांचा त्रास जास्तच होत असेल तर तेथे क्यूब पॅक चा उपयोग करू शकता. त्याच्यासाठी 5-6 बर्फाचे तुकडे कापडात बांधून घामोळ्यांचा जागी फिरवा. जळजळ, खाज सुटणे, लाल पुरळ या सर्व समस्या हळूहळू कमी होतील. कडुलिंबाच्या पानांचा उपयोग देखील घामोळ्यांवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. तुमच्या घराभोवती असलेले कडुलिंबाचे झाड १५-२० पानांनी स्वच्छ करा. एका भांड्यात अर्धा लिटर पाणी घाला कडुलिंबाची पाने त्यात चांगली उकळा आणि नंतर पाणी थंड झाल्यावर ते स्वच्छ करा. थोडी जळजळ होईल, खाज कमी होईल

  • आंबा फळ प्रक्रिया

    आंबा फळ प्रक्रिया

    आंबा फळ प्रक्रिया उद्योग हा विशेषत: कोकणातील एक उद्योग आहे. येथे या उद्योगाचे प्रमाण जास्त नाही; परंतु या उत्पादनांना मोठी मागणी आहे. हे फळ ठराविक हंगामातच येत असल्यामुळे त्याची बाजारामधील उपलब्धता एकाच वेळी अधिक प्रमाणात वाढते. अशा वेळी त्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. शिवाय, ही फळे नाशिवंत असल्यामुळे ती अधिक काळ टिकू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून आंब्याची चटणी, कैरीचे पन्हे, आंब्याचा जॅम, आमचूर, आंब्यांचा सिरप इत्यादी पदार्थ बनविले जातात. महाराष्ट्रातील कोकण विभागात हापूस आंबा हे महत्त्वाचे फळपीक आहे. आंब्याची मधुरता, विशिष्ट असा स्वाद, रंग, चव व टिकाऊपणा यामुळे या आंब्याला देशासह जगभरातही मोठी मागणी आहे. आंब्याची वाहतूक करताना, आंबा तोडताना, साठवणूक करताना आंब्याचे बरेच नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आंब्याचा गर काढून त्याला कॅनिंग व पॅकेजिंग करता येते.

    आंबा तोडणी किंवा साठवणीनंतर प्रक्रिया करण्यापूर्वी फळे स्वच्छ धुणे व त्यांचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते. याकरिता यंत्राद्वारे फळे धुतली जातात. फळांवरुन नोझलच्या सहाय्याने पाण्याची फवारणी केली जाते. त्यामुळे फळावरील धूळ, डाग, रासायनिक अवशेष निघून जातात. फळे स्वच्छ करणारे यंत्र संपूर्णपणे स्टेनलेस स्टिलचे असते. यंत्राचे वजन हे ९०-११० किलो असून यंत्रांमध्ये ३०० लीटर पाणी साठवता येते. या यंत्राची क्षमता ही १०० किलो फळ प्रति तास इतकी आहे. या यंत्राला २४० व्होल्ट विजेची आवश्यकता असते. त्याला १ अश्वशक्ती विद्यूत मोटर जोडलेली असते. यंत्राचा आकार हा ५ फूट बाय २ फूट एवढा असतो. या यंत्राला चाके असल्याने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहजतेने नेता येते. धुतलेले व स्वच्छ केलेले आंबे कटींग टेबलपर्यंत नेता येतात. या यंत्राचा वापर अन्य फळांच्या स्वच्छतेसाठीही होऊ शकतो.

    कटिंग टेबलवर चाकूने आंबा कापला जातो. अर्थात हा आंबा कच्चा असतो. याला कैरी असेही म्हणतात. कैरीची साल व कोय (फळातील बी) वेगळी करून तुकडे केले जातात. स्टेनलेस स्टिलपासून बनवलेल्या टेबलच्या वरील बाजूला फूड ग्रेड स्टीलचे कोटींग असते. या टेबलवर एका वेळेला ४ कामगार काम करू शकतात. या टेबलची किंमत अंदाजे २५ ते ३० हजार रूपये आहे. पिकलेल्या आंब्याचा रस काढण्यासाठी फळातून घट्ट रस काढण्याचे यंत्र (पल्पर) बाजारात उपलब्ध आहे. या यंत्राचा उपयोग आंब्याचा घट्ट रस काढण्यासाठी केला जातो. तुकडे केलेले आंबे या यंत्रामध्ये टाकले जातात. यंत्रामध्ये आवश्यक द्रव्य आणि इच्छित पदार्थाचे प्रमाण यानुसार जाळी लावलेली असते. त्यातून रस निघाल्यानंतर उर्वरित चोथा बाहेर टाकला जातो. आंब्याचा रस हा कंटेनरमध्ये साठवला जातो.

    आंब्याच्या गराला बाजारात खूप मागणी असते. वेगवेगळे मिठाई उद्योग, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ उद्योग, बेकरी व चॉकलेट उद्योग, औषध उद्योगामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. रसवंती गृह, आइस्क्रीम सेंटर येथेही नैसर्गिक स्वादासाठी आंबा गर वापरला जातो. आंबा गर काढण्यासाठी विविध यंत्रे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पूर्णपणे स्टेनलेस स्टीलच्या बनवलेल्या या यंत्राचे वजन ७० किलो आहे. यंत्राला ०.५ अश्वशक्तीची विद्युत मोटर जोडलेली असते. या यंत्रामध्ये प्रति तास ५० किलो रस तयार होतो. हे विद्युत यंत्र वापरायला सोपे आहे. भारतातून होणाऱ्या एकूण फळांच्या आणि फळप्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्यातीत आंब्याचा वाटा ६० टक्के इतका आहे. आंब्यापासूनच्या पदार्थ निर्यातीला भरपूर वाव आहे.

  • लिफाफे निर्मिती

    लिफाफे निर्मिती

    लिफाफे बनविणे हा अतिशय स्वस्त व्यवसाय आहे. हे लिफाफे कागदांपासून किंवा कार्ड बोर्ड इत्यादींपासून बनविले जातात. हे मुख्यतः याचा उपयोग कागदपत्रे, ग्रीटिंग कार्ड इत्यादी वस्तू वेष्टनबंद करण्यासाठी केला जातो. या व्यवसायात दर महिन्याला कमाई करता येते. तुम्ही घरातून हा व्यवसाय सुरू केला तर 10 हजार ते 30 हजार रुपये गुंतवावे लागतील. जर यंत्राद्वारे लिफाफे बनवायचे झाल्यास तर 2 लाख ते 5 लाख रुपये गुंतवावे लागतील. अल्प पैशाने हा व्यवसाय सुरू करणे शक्य आहे. यासाठी जास्त कौशल्य आवश्यक नाही. आपल्याला फक्त लिफाफे कसे तयार करावेत, याची प्रक्रिया माहित असणे आवश्यक आहे. या लिफाफ्याचा शैक्षणिक संस्था, कार्यालये तसेच घरांमध्येदेखील वापरला जातो.

    हे लिफाफे सामान्य किंवा फॅन्सी असू शकतात. सामान्य लिफाफे पोस्ट ऑफिस सेवा किंवा कुरिअर सेवेद्वारे कागदपत्रे पाठविण्यासाठी वापरले जातात. ग्रीटिंग्ज कार्ड, नवीन वर्षाचे कार्ड, गिफ्ट कार्ड्स आणि इतर पाठविण्यासाठी फॅन्सी प्रकारचा लिफाफा वापरला जातो. लिफाफे बाजारात वेगवेगळ्या आकारात आणि रंगात उपलब्ध असतात. काही कागदाच्या लिफाफ्यांना प्लास्टिकचा पातळ थर दिला जातो. लिफाफा बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या व्यवसायाच्या फायद्यांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. लिफाफा ही एक आवश्यक स्टेशनरी वस्तू आहे. स्थानिक बाजारात या वस्तूला मागणी आहे. लिफाफे कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे पाठविण्यासाठी वापरतात. लिफाफा बनविण्याचा व्यवसाय आपल्या घरातही आरामात सुरू केला जाऊ शकतो. त्यास अशा कोणत्याही पायाभूत सुविधांची आवश्यकता नाही.

    त्याशिवाय जिथे पायाभूत सुविधांच्या किंमतींचा समावेश नसतो, तेथे अल्प गुंतवणूकीसह व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. म्हणूनच, या व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अशी कोणतीही गुंतवणूक नाही. व्यवसायाचा आकार कितीही मोठा असो, आपल्याला लिफाफे बनवण्याची योग्य प्रक्रिया माहित असणे महत्वाचे आहे. वेगवान तंत्रे जाणून घेतल्यास आपण कमी वेळात अधिक लिफाफे तयार करू शकाल. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजारपेठ संशोधन हे एक महत्त्वपूर्ण घटक मानले जाते. आवश्यकतेनुसार, आपण आपले ध्येय निश्चित करण्यात सक्षम असाल तर आपली विक्री हळूहळू वाढवू शकेल. आपल्या भागात मोठ्या संख्येने कार्यालये असतील तर आपल्याला आपली विक्री वाढविण्याची संधी मिळेल. परंतु आपल्याकडे सर्व प्रकारचे लिफाफे उपलब्ध करावेत. बाजाराची गरज जाणून घेतल्यास उद्योजकाची विक्री वाढण्यास मदत होते. तथापि, आपण ऑनलाइन लिफाफे विक्रीस प्रारंभ केल्यास आपल्याला चांगला लाभ होवू शकतो. आपल्याला कदाचित वित्तीय संस्था किंवा बँकांकडून कर्ज घ्यावे लागेल. प्रभावी व्यवसाय योजनांमुळे नफा मिळण्यास आणि व्यवसायात चांगली कमाई करण्यास मदत होईल. आपल्या व्यवसायात नफा मिळविण्यासाठी, धोरणात्मक योजना असणे महत्वाचे आहे.

    लिफाफा व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जास्त गुंतवणुकीची आवश्यकता नाही. व्यावसायिकाकडे कच्चा माल आणि यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे असले पाहिजेत. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी वित्त व्यवस्था करणे आवश्यक आहे. आर्थिक मदतीसाठी आपण बँक, वित्तीय संस्था किंवा इतर वित्त कंपन्यांना विचारू शकता. हा लिफाफा बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी फारच कमी पैशांची गरज आहे. या प्रकारच्या व्यवसायासाठी जास्त जागा किंवा मजुरीची आवश्यकता नाही. जर घरात काही रिक्त खोल्या असतील तर आपण त्या खोलीतच व्यवसाय सुरू करू शकता. याव्यतिरिक्त, सुरुवातीच्या काळात स्वस्त जागा भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू करणे देखील शक्य आहे. व्यवसाय चालविण्यासाठी आपल्याला आवश्यक कच्चा माल आणि यंत्रसामग्री मिळवावी लागेल. आपण वापरलेल्या कच्च्या मालाच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये. याव्यतिरिक्त, आपल्याला डिंक आणि इतर वस्तू देखील खरेदी कराव्या लागतील. आपण यंत्राशिवाय लिफाफेदेखील बनविण्याचा प्रयत्न करू शकता. उत्पादकता वाढविण्यासाठी बराच वेळ लागेल. म्हणून, सुरुवातीच्या काळात, लिफाफे तयार करण्यासाठी लहान आकाराचे यंत्र विकत घेणे चांगले. घर, कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दोन्ही ठिकाणी लिफाफा वापरला जातो. म्हणूनच, आपण लिफाफा बनवण्याचा व्यवसाय सुरू केला असेल तर स्थानिक दुकानदारांशी, कार्यालयांशी संपर्क साधावा. याव्यतिरिक्त आपण संकेतस्थळ किंवा ऑनलाइन पोर्टल तयार करुन ऑनलाईन विक्री करुन देखील लिफाफे विकू शकता.

  • प्राचीन भारतातील शेती

    प्राचीन भारतातील शेती

    श्रीरामांचे युग त्रेतायुग म्हणून ओळखले जाते. भारतातील शेती ही अत्यंत प्रगत होती. त्रेतायुगातील शेतकरी अन्नधान्यापासून कडधान्य, भरडधान्य, फळे, तेलबिया इत्यादींचे उत्पन्न घ्यायचे. त्या काळी केवळ शेतीच नाही तर पशूपालनही करीत. त्यात गाय हा प्राणी फार महत्त्वाचा असे. रामराज्यात पिकांवर रोग वा किडींचा प्रादुर्भाव नव्हता, असे मानले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक उत्पादन मिळायचे. सध्या सर्वत्र श्रीरामांची चर्चा सुरू आहे. रामाशिवाय भारतीय संस्कृतीची कल्पना करणे अर्थहीन आहे. भारतात रामराज्य असताना शेती कशी होती, त्यावेळच्या शेतकऱ्यांनी ती कशा पद्धतीने केली, असे पश्न विचारले जातात. भारत हा अनादी काळापासून कृषीप्रधान देश आहे. भारतात भगवान राम आणि कृष्णाच्या काळातही शेतकरी शेती करीत होते. याचे पुरावे पौराणिक संदर्भांत आढळतात. भारतात राम आणि कृष्ण युगापूर्वीही शेती होत होती. उपनिषदे, पुराणांमध्ये, वेदांमध्ये शेतीचा, गाईगुरांचा उल्लेख आढळतो. त्यानुसार त्या काळी लोक शेत नांगरीत. जमिनीत धान्य व भाजीपाला पिकवीत. गुरे पाळत व शेळीपालन करीत.

    जगातील प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्ये शेतीचा उल्लेख आढळतो. अश्विन देवतांनी राजा मनूला नांगरणी करायला शिकवल्याचा उल्लेख यात आहे. ऋग्वेदातील एका ठिकाणी अत्री यांच्याकडे शेताच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली असल्याचे आढळते. अथर्ववेदात राजा पृथुवेन्याने शेती सुरू केली होती, असे आढळते. तसेच बैलांच्या जोडीने नांगरणी केल्याचेसुद्धा वर्णन आहे. यजुर्वेदात ‘महाब्राही’, ‘कृष्णवराही’, ‘शुक्लारुही’, ‘आशुधन्य’ आणि ‘हयान’ या तांदळाच्या प्रमुख जाती होत्या. वैदिक काळातही भाताची लागवड केली जात असे. रामायण काळात राजा जनक यांना शेतात नांगरताना माता सीता सापडली. राजा जमीन नांगरत होते, यावरुन शेतीला किती महत्व होते, हे दिसून येते. महाभारतात बलरामजींच्या खादं्यावर नेहमी नांबर दिसतो. यावरून त्या काळीही शेती खूप प्रगत होती, हे समजते. सिंधू संस्कृती अतिशय प्रगत आणि सुसंस्कृत मानली जाते.

    सिंधू संस्कृती ही पूर्णपणे स्वावलंबी होती. सिंधू संस्कृतीच्या अवशेषांवरून असे दिसून येते की त्या काळातील लोकांना कृषी, पशुसंवर्धन याची खूप चांगली समज होती. या काळात जहाज, रथ, बैलगाडी इत्यादी वाहतुकीची साधने लोक चांगल्या प्रकारे वापरायला शिकले होते. सिंधू संस्कृतीतील लोकांनी शेतीसोबतच गायपालन, शेळीपालनही उत्कृष्ट केले. भारतात किमान 7000 ते 13000 वर्षांपूर्वी शेतीचा विकास झाला होता. तेव्हापासून शेतीमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. नवाश्मयुगात माणसाने कंद, मुळे, फळे आणि स्वत: पिकवलेले धान्य वापरण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी हळूहळू शेती आणि अन्न उत्पादन सुरू केले. मनुष्याला पाषाणयुगापूर्वीपासून शेतीची ओळख होती. नांगरात बैलांचा वापर करून नांगरणी केल्याचा पुरावा इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीतही सापडतो. भारतातील शेती प्रगत अवस्थेत होती. त्या काळात लोक धान्याच्या रूपात महसूल भरत. सिंधू संस्कृतीमध्ये गहू आणि बार्लीचाही उल्लेख आढळतो. ज्वारी, बाजरी, कोंडो, कुटकी, इत्यादी भरडधान्ये भारतात पिकवीत.

    ‘पराशर’ नावाचे ऋषी भारतात होऊन गेले. त्यांनी ‘पराशर तंत्र’, ‘कृषिसंग्रह’, ‘कृषी पराशर’ हे ग्रंथ लिहिले. ‘कृषी पराशर’ मध्ये ग्रह-नक्षत्रांचा शेतीवर होणारा परिणाम, ढग आणि त्यांच्या प्रजाती, पावसाचे मोजमाप, पावसाचा अंदाज, वेगवेगळ्या काळातील पावसाचा परिणाम, शेतीची काळजी, बैलांची सुरक्षितता, शेणखत, नांगरणी यांची माहिती दिली आहे. पराशर ऋषींना शेतीबद्दल नितांत प्रेम होते. बियाणे केव्हा आणि कसे जतन करावे, पराशर ऋषींच्या ग्रंथात ढगांचे प्रकार आणि विविध ऋतूंमध्ये होणारा पाऊस यांचीही माहिती दिली आहे. गोठ्याची स्वच्छता, प्राणी, शुद्ध आणि जतन केलेले बियाणे योग्य वेळी पेरण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. जलसंधारणाचीही माहिती त्यांनी दिली आहे. भारतात, शेती आणि पशुपालन हा लोकांच्या राहणीमानाचा प्रमुख भाग आहे. भारत नेहमीच धान्यांनी भरलेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या काळातही भारतात दूध मुबलक होते. त्याकाळातही शेती आणि पशूपालन जीवनाचा प्रमुख आधार होते

  • दाक्षायणी देवीचे मंदिर

    दाक्षायणी देवीचे मंदिर

    औरंगाबादमध्ये दाक्षायणी देवीचे सुंदर मंदिर आहे. हे मंदिर लासूर गावात ‘शिवना’ नदीच्या काठावर असून निसर्गरम्य आहे. दाक्षायणी देवी लासुर गावचे आराध्य दैवत व वैजापुर तालुक्याचे ग्रामदैवत आहे. डोक्यावर चांदीचा मुकूट आणि अंगभर दागिने परिधान केलेली देवीची मूर्ती प्रसन्न आहे. देवीच्या मंदिरासमोर मोठा सभामंडप आहे. देवीच्या मूर्तीसमोर वाघाची मूर्ती असून ती एका अंखड दगडी शिळेत कोरलेली आहे. बाजूला कासवाची मूर्तीही आहे. वर्षातून दोन वेळा गावात मोठा उत्सव पार पडतो. एप्रिल-मे महिन्यात मोठी यात्रा आणि नवरात्रीत नऊ दिवस मंदिर भक्तांनी गजबजलेले असते. दाक्षायणी देवी ही दक्ष राजाची कन्या आहे. या देवीच्या लासुर गावात प्रकट होण्याची कथा सांगितली जाते. दाक्षायणी देवीचा आई-वडिलांकडून अपमान झाल्यावर तिने पुत्रकामेष्टी यज्ञात उडी घेतली. त्यानंतर शंकराने जटा आपटून तांडव केले.

    लोकांच्या नवसाला पावणारी देवी अशी भक्तांमध्ये ओळख आहे. नववधू या देवीचा आशीर्वाद घेऊन सुखी संसाराला सुरुवात करतात. मंदिराचे बांधकाम पूर्वी हेमाडपंथी होते. देवीच्या मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. त्यावर कोरलेल्या वाघाच्या मूर्ती लक्षवेधक आहेत. मंदिराच्या मध्यभागी छतावर कोरलेले सुंदर कमळ आहे. मंदिरावरील नक्षीकाम देखणे आहे. या मंदिराला एक मुख्य कळस आणि तीन उपकळस आहेत. मंदिराच्या रस्त्यावर अनेक दुकाने आहेत. या मंदिराची गावकरीच देखभाल करतात. लासूर गावी औरंगाबादहून रेल्वे, बस व खासगी वाहनाने जाता येते. हे क्षेत्र औरंगाबादहून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे.

  • बेनाळी समुद्रकिनारा

    बेनाळी समुद्रकिनारा

    बेनाळी हा गोव्यातील एक सुंदर समुद्रकिनारा आहे. हा किनारा खूप शांत आणि नयनरम्य असा आहे. संध्याकाळच्या वेळी येथे गर्दी असते. पर्यटक सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी येथे आवर्जून भेट देतात. या किनाऱ्यावर गोव्यातील इतर समुद्रकिनाऱ्यांइतके पर्यटक नसतात. तरीही विविध प्रकारच्या जलक्रीडा पाहण्याची संधी येथे मिळते. या किनाऱ्यावर स्थानिक मच्छीमार पहायला मिळतात. हा मंत्रमुग्ध करणारा समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावर चंदेरी वाळू पहायला मिळते. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेला हा किनारा आराम करण्यासाठी, उत्साह निर्माण करण्यासाठी एक योग्य ठिकाण आहे.

    एकंदरीत, आनंद घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी या बेनोळी किनाऱ्याला भेट द्यावी. येथील सूर्यास्ताचे निरीक्षण करावे. जलक्रीडांचा आनंद घ्यावा. रात्रीच्या वेळी हा समुद्रकिनारा खूप सुंदर दिसतो. विविध प्रकारच्या बीच, शॅक्स आणि रेस्टॉरंट्सनी भरलेला आहे. येथे संगीत आणि नृत्याने आपण आपली रात्र मनोरंजक बनवू शकता. मोठ्या आवाजातील संगीताचा आनंद घेऊ शकता, मेजवान्या करु शकता. जर तुम्ही गोव्याची राजधानी पणजी येथे असाल, तर या किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेऊ शकता. या प्रवासासाठी तुम्हाला 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. विमानाने जात असाल, तर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टॅक्सी भाड्याने घ्यावी. हे अंतर फक्त 31 किलोमीटर आहे.

  • इंद्राई किल्ला

    इंद्राई किल्ला

    नाशिक जिल्ह्यात अजंठा-सातमाळ रांगेत चांदवड तालुक्यात राजधेर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड हे चार किल्ले आहेत. इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव राजधेरवाडी आहे. या गावात २ दिवस थांबून राजधेर व इंद्राई हे किल्ले पाहता येतात. किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत. या किल्ल्यावर बारमाही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.

    इंद्राई गडाच्या प्रवेशद्वाराचे अवशेष तेवढे शिल्लक आहेत. राजधेरवाडीमार्गे गेल्यावर कातळभिंती मिळतात. या कातळकड्यापाशी कातळात खोदलेल्या २ गुहा आहेत. यापैकी एका गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. येथून गडावर जाण्याचा मार्ग बनविलेला आहे. या मार्गाने ५० पायर्या चढून गेल्यावर वाट काटकोनात वळते. या मार्गाने अंदाजे १०० पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूच्या कातळात कोरलेला फारसीतील शिलालेख आढळतो. प्रवेशद्वारातून पुन्हा थोडे चढल्यावर कातळात खोदलेल्या गुहा दिसतात.

    हे पाहून परत मागे फिरल्यावर पुन्हा दुसरी वर जाणारी वाट पकडावी. थोडे चढून गेल्यावर बुजलेले पाण्याचे टाक आणि वास्तुचे अवशेष दिसतात. येथून सरळ पुढे जाणारी वाट माथ्‌यावर जाते. येथे कातळात खोदलेले महादेवाचे मंदिर मिळते. मंदिरासमोर दगडात बांधून काढलेला तलाव आहे. महादेवाचे दर्शन घेऊन गुहेच्या वर गेल्यावर एक मोठा तलाव आहे. तलावात उतरण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या गडावर कातळात खोदलेल्या १८ ते २० गुहा दिसतात. डोंगराच्या मागे नाशिक – धुळे महामार्ग दिसतो. इंद्राई किल्ला पाहण्यासाठी २ तास लागतात

  • हिमायत बाग

    हिमायत बाग

    छत्रपती संभाजीनगरच्या रौजा बाग परिसरात दिल्ली गेटजवळ हिमायत बाग हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. ही बाग १७ व्या शतकातील असून 300 एकर परिसरात पसरलेली आहे. येथे आता फळ संशोधन केंद्र आणि रोपवाटिका असून ती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचा एक भाग आहे. पूर्वी या बागेची ओळख ‘मुघल गार्डन’ अशी केली जाई. औरंगजेबाच्या दरबारातील एका अधिकाऱ्याने हिमायत बाग विकसित केली. या बागेत विविध जातींची अनेक फळझाडे होती.

    हिमायत बागेत इवाझ खानने उभारलेली बारा दरी देखील आहे. येथे आच्छादित जलवाहिनी एका इमारतीवरून जाते. हे पाणी खाली अनेक कारंजे असलेल्या आयताकृती कुंडात उतरते. हे अभियांत्रिकीचे एक अद्भुत उदाहरण आहे. बारा दरीमध्ये आता फळसंशोधन केंद्राचे कार्यालय आहे. येथील ‘समर पॅलेस’ हा राजवाडा दुर्मिळ असून अर्धा भूमिगत आहे. या अष्टकोनी महालाच्या सर्व बाजूंनी वाहणारे पाणी बाहेरील तापमानापेक्षा किमान 5 अंश थंड ठेवते.
    हिमायत बाग ही पर्यटकांसाठीचे आकर्षण आहे. पर्यटक येथे विविध झाडे पाहू शकतात. या बागेत पर्यटक विविध प्रकारची कलमी रोपे खरेदी करु शकतात. येथे चिंच, आंबा अशी अनेक वनस्पतींची रोपे मिळतात. पर्यटक या बागेस आवर्जून भेट देतात.

  • डाळ तडका

    डाळ तडका

    साहित्य : तूरडाळ – १ कप, मध्यम आकाराचे टोमॅटो – 2, तूप – 1 लहान चमचा, हिरवी मिरची – २ नग, आले – 1 इंच तुकडा, धणे पावडर – 1 लहान चमचा, जिरे – अर्धा लहान चमचा, हळद पावडर – पाव लहान चमचा, लाल मिरचीपूड – पाव लहान चमचा, हिंग – 1 चिमूटभर, हिरवी कोथिंबीर – 1 चमचा, मीठ – चवीनुसार.

    कृती : सर्वप्रथम तूरडाळ स्वच्छ धुवून घ्या. आता ती ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यानंतर टोमॅटो, हिरवी मिरची आणि आले मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. भिजवलेली डाळ कुकरमध्ये घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि २ छोटे ग्लास पाणी घालून मध्यम आचेवर शिजवा. कुकरची एक शिट्टी झाल्यावर गॅस मंद करा. यानंतर डाळ आणखी ४-५ मिनिटे शिजू द्या. नंतर गॅस बंद करा. कुकरमधून डाळ काढण्यापूर्वी एका कढईत फोडणी तयार करा. यासाठी कढईत तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे व हिंग घालून थोडे परतून घ्या. यानंतर हळद आणि धणेपूड घालून हलके परतून घ्या. मसाले भाजून झाल्यावर त्यामध्ये टोमॅटोचे वाटण आणि लाल मिरची घालून तूप सुटेपर्यंत परतून घ्या. यानंतर गॅस बंद करून कुकरचे झाकण उघडा. या फोडणीत डाळ तसेच चिरलेली हिरवी कोथिंबीर घाला.

    बरं, तुमची अरहर डाळ बनवण्याची पद्धत पूर्ण झाली आहे. आता तुमची स्वादिष्ट अरहर डाळ / तूर डाळ तयार आहे. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून रोटी आणि भातासोबत मजा घ्या. आमची लोकप्रिय अरहर दाल तडका, संपूर्ण मसूर डाळ, पंचमेल डाळ, तांदळाची इडली, मुघलाई व्हेज बिर्याणी रेसिपी वापरून पहा. ही रेसिपी देखील तुम्हाला नक्कीच आवडेल.