सह्याद्री मराठी वाहिनी

Author: सह्याद्री मराठी वृत्त

  • मुलांना जबाबदार बनवा

    मुलांना जबाबदार बनवा

    लहान मुले निरागस असतात. लहानपणापासूनच मुलांना चांगली उदाहरणे देऊन जबाबदारी घेण्यास शिकवले तर ते मोठे होईपर्यंत निर्भय आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगू शकतील. पण अशा कोणत्या चुका होतात ज्यामुळे ते मूल सुधारू शकत नाही, याचा अभ्यास करावा. काही सोप्या युक्त्या अवलंबून आपण आपल्या मुलाला जबाबदार आणि सक्षम बनवू शकता. आपण करीत असलेल्या चुकीच्या गोष्टी आपणच सुधारल्या पाहिजेत, या अपेक्षेने आणि कल्पनेने मुलाला वाढवा. मुलाला जबाबदारी शिकवण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असू शकते. मुलाला स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय लावा. ब्रशपासून सुरुवात करा. प्रथम त्यांना स्वतःला ब्रश करण्यास सांगा. ते पूर्ण झाल्यावर, तुम्ही त्याने ते व्यवस्थित केले का, याची खात्री करण्यासाठी एकदा तपासा.

    हळूहळू मुलांना कपड्यांची घडी घालण्यास शिकवा. कपडे कपाटात ठेवायला शिकवा. अशा लहानसहान सवयींमुळे ते वयानुसार मोठी कामे करायला शिकतील आणि आपली सर्व कामे जबाबदारीने करू लागतील. योग्य वेळी मुलांची स्तुती करा. जेव्हा ते न बोलता स्वतःहून एखादे छोटेसे काम करतात तेव्हा त्यांचे कौतुक करा. स्तुतीमुळे मुलांचे नुकसान होते असा विचार करणे चुकीचे आहे. उलट, स्तुतीमुळे मुले अधिक जबाबदाऱ्या घेण्यास प्रवृत्त होतात. त्यांच्यामध्ये अधिक सक्षम होण्याची इच्छा निर्माण होते.

    एकाच वेळी अनेक कामे देऊ नका. जेव्हा तुम्ही अनेक कामांची जबाबदारी मुलावर लादण्याचा प्रयत्न करता, आणि मग त्याच्याकडून सर्व काही चांगले होईल अशी अपेक्षा करता, तेव्हा ही आपली अवाजवी अपेक्षा असते. आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवा. त्यांना छोटी-छोटी कामे करायला द्या आणि त्यांच्या लहान-मोठ्या सर्व प्रयत्नांचे कौतुक करा. त्यांना एकाच वेळी अनेक कामांचा कंटाळा येऊ शकतो, ज्यामुळे त्यांची जबाबदारी कमी होते. स्वयंपाकघरात गेल्यावर त्यांना भाज्या मोजायला सांगा. भाजीपाला धुण्याचे काम देता येईल. बेडशीट बदलण्यासाठी त्यांची मदत घ्या. त्यांना रोपांना पाणी देण्यास सांगा. अशा प्रकारे, त्यांना आपल्यासोबत काम करायला लावल्याने मुले जबाबदार होतील. तुम्हाला नेहमीच मदत करतील. काही वेळा मुले जिद्दीने पालकांचे ऐकत नाहीत. प्रत्येक कामात निष्काळजी असतात. आपल्या मुलाने निष्काळजी व्हावे असे कोणत्याही पालकांना वाटत नाही. ते आपल्या पाल्याला जबाबदार बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. या काही गोष्टी आहेत, ज्या मुलांना जबाबदारीचे भान देतील. हे करीत असताना त्याच्या अभ्यासाकडे आणि छंदाकडे मात्र अजिबात दुर्लक्ष करु नका.

  • डोळ्यांचे सौंदर्य

    डोळ्यांचे सौंदर्य

    डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, डोळ्यांना सूज येणे हे अलीकडे सर्वसामान्य झाले आहे. केवळ जागरणांमुळेच अशी समस्या उद्भवते, असे नाही. तर बदलत्या जीवनशैलीचेदेखील हे परिणाम आहेत. फोन आणि लॅपटॉपचा सतत वापर करणे, याबरोबरच शरीरातील पोषणाची कमतरता यामुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. डोळे थकलेले दिसतात. काही वेळा डोळ्यांतून पाणीही येत राहते. जेव्हा बाहेर कुठे जावे लागते, तेव्हा मनात न्यूनगंड निर्माण होतो. यावर काही घरगुती उपाय आहेत. त्यांचा अवलंब केल्यास फायदा होऊ शकतो. मात्र, हे उपाय करण्यापूर्वी आपल्या ब्युटीशियनचा सल्ला घ्यावा.

    डोळ्यांच्या या समस्या दूर करण्यासाठी बटाटा हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. बटाट्यामध्ये असणारे तुरट घटक डोळ्यांचा थकवा दूर करतात. त्यांना आराम देतात. बटाट्यामध्ये सौम्य ब्लीचिंग गुणधर्म देखील असतात. त्यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या दूर होते. त्याकरिता बटाटे किसून घ्यावेत एका सुती कपड्यात ठेवून त्याची पुरचुंडी बनवावी. ही पुरचुंडी किमान 15 मिनिटे डोळ्यांवर ठेवावी. हिरव्या चहाच्या पिशव्या (ग्रीन टी बॅग) मुळे काळ्या वर्तुळांसह सूज येण्याची समस्याही दूर होते. यासाठी या चहाच्या पिशव्या हलक्या पाण्यात बुडवून थंड होण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवाव्यात. त्यानंतर 10-15 मिनिटे डोळ्यांखाली ठेवाव्यात. त्याच्या थंडपणामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो.

    गुलाबपाण्यामध्ये जीवनसत्व सी, जीवनसत्व ए आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. यामुळे खाज आणि जळजळ होण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी कापूस गुलाबपाण्यात भिजवून काही वेळ डोळ्यांवर ठेवावा. यानेही डोळ्यांना आराम मिळतो. थंड दुधानेही आपण डोळ्यांना आराम देऊ शकता. दुधामध्ये असणारे दोन घटक डोळ्यांशी संबंधित समस्यांवर प्रभावी आहेत. त्यातील लॅक्टिक ॲसिड थकवा दूर करते. दुसरे अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सुरकुत्या कमी करते. यासाठी फक्त एक कापसाचा गोळा थंड दुधात बुडवून डोळ्यांखाली 10-15 मिनिटांसाठी ठेवावा.

  • भोपळ्याच्या बिया आरोग्यवर्धक

    भोपळ्याच्या बिया आरोग्यवर्धक

    भोपळा किंवा सीताफळ आपण अनेकवेळा खाल्ले असेल. पण त्यात असलेल्या बियांकडे कधी लक्ष दिले आहे का ? या बियांमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या बिया निरुपयोगी समजून आपण फेकून देता. या बियांमध्ये फायबर, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आणि लोह यासारख्या गोष्टी असतात. त्यांचे सेवन स्त्री आणि पुरुष दोघांसाठी खूप फायदेशीर आहे. भोपळ्याच्या बियांचे सेवन पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये शुक्राणूंची गुणवत्ता वाढवणारे गुणधर्म असतात. भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी निरोगी राहते. त्यांच्या सेवनाने पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही कमी होतो, असा दावाही अनेक अभ्यासांमध्ये करण्यात आला आहे.

    तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठीही या बिया खूप उपयुक्त आहेत. अशा परिस्थितीत निरोगी त्वचा आणि केस हवे असतील तर या बिया खाणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यासाठी या बिया सुकवून वेगवेगळ्या प्रकारे आहारात समाविष्ट करू शकता. मॅग्नेशिअमने समृद्ध असलेल्या या बिया रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात. याच्या सेवनाने मधुमेहाचा धोकाही टाळू शकता. हे इन्सुलिनची संवेदनशीलता देखील सुधारते. जर आपण याच्या बिया आहाराचा भाग बनवलात तर ते हृदयविकाराचा धोका कमी करते.

    भोपळ्याच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असल्याने ते खाल्ल्याने नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढते. आपला रक्तप्रवाह सुधारतो. सकाळच्या नाश्त्यात, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात या बियांचा समावेश करू शकता. न्याहारीसाठी या बिया खाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. या बिया भाजून किंवा ओट्समध्ये घालूनही खाऊ शकता. दररोज या बिया मूठभर खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे होतील.

  • नाचणीच्या पिठाचे लाडू

    नाचणीच्या पिठाचे लाडू

    साहित्य : नाचणी ४ वाट्या धुवून घ्यावी. स्वच्छ कापडावर पसरुन वाळवावी. त्याचे पीठ करुन घ्यावे. वेलचीपूड दीड चमचा, ३ वाट्या पिठीसाखर, कणीक १ वाटी, साजूक तूप १ ते दीड वाटी

    कृती : प्रथम नाचणीचे पीठ आणि कणीक घ्यावी. तूप पातेल्यात घालून मंद आचेवर खरपूस (तांबूस) भाजून घ्यावे. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलचीपूड घालून लाडू वळावेत. हे लाडू उन्हाळ्यातसुद्धा खाणे चांगले. नाचणीमध्ये कॅल्शियम असते. लाडूचे पीठ चांगले भाजले तर खमंग होतील. मधुमेह असलेल्यांनी हे लाडू खाऊ नयेत.

  • महाराष्ट्रात काश्मिरी केशराचे उत्पादन

    केशराचे पीक मुख्यतः काश्मीर राज्यामध्येच मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने त्याला जगभरातून चांगली मागणी देखील आहे. मात्र कश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशराचे यशस्वी उत्पादन घेण्याचा प्रयोग पुण्यात करण्यात आला आहे.

    आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शैलेश मोडक या तरुणाने भन्नाट प्रयोग केला आहे. आणखी विशेष म्हणजे ही केशराची शेती कंटेनरमध्ये केली आहे. त्याला ‘कंटेनर फारमिंग’ असेही म्हणतात. शैलेश हे मूळचे नाशिकचे राहणारे असून त्यांनी हा प्रयोग पुण्यात यशस्वी करून दाखवला आहे. शैलेशच्या या आगळ्या वेगळ्या शेतीची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. हा प्रयोग राज्यातला पहिलाच प्रयोग असून या केशर शेतीसाठी मातीची आवश्यकता भासत नाही.
    केशर हे फार दुर्मिळ आणि अत्यंत महाग असते. प्रतिग्रॅम 300 ते 1500 रुपयांपर्यंत याची विक्री केली जाते. काश्मीर, हिमाचल प्रदेश आदी थंड आणि बर्फाळ प्रदेशात केशरचे उत्पादन केले जाते. त्यामुळे केवळ मागणीच्या फक्त 3 ते 4 टक्केच उत्पादन भारतात घेतले जाते. या सर्व गोष्टींचा विचार करून शैलेश मोडक यांनी हा कंटेनर फार्मिंगचा प्रयोग पुण्यात राबवला असून तो यशस्वी देखील केला आहे.

    एअरपोनिक पद्धत वापरून हा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. 320 वर्गफूटाच्या कंटेनरमध्ये केशराची लागवड करून त्यासोबत इतर भाज्यांचे पीक घेतले आहे. यात वेगवेगळ्या औषधी वनस्पती, परदेशी भाज्या, मसाले या पिकांना पर्याय शोधत शैलेश मोडक यांनी केशर हे पीक घेण्याचे ठरविले.

    काही दिवस काश्मीरमध्ये राहून केशर पिकाच्या लागवडीची पद्धत समजून घेतली. त्यानंतर सुरुवातीला कंटेनरमध्ये केशर लावण्याचा निर्णय शैलेशने घेतला. त्यानुसार कंटेनरमध्ये केशर लावले. तसेच काश्मीरप्रमाणे कंटेनरमध्ये तापमान नियंत्रित करण्याकरता एअर सर्क्युलेटर, चिलर, एसी, डीह्युमिडिफायर, आद्रता कमी – जास्त करण्याकरता चारकोलवर आधारित तंत्र अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर शेलेशने या कंटेनरमध्ये तयार करण्यात आला. तसेच कृत्रिम प्रकाश संश्लेषणाकरता त्याच्या अवस्थेनुसार लाल, पांढरा आणि निळ्या रंगाचा प्रकाशही याठिकाणी पुरविला जातो. सध्या शैलेश यांनी पुण्यातील वारजे परिसरात हा कंटेनर तयार केला असून एका ट्रेमध्ये आकारानुसार 400 ते 600 कंद बसवले जातात.

    ही शेती पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येत आहे. हा कंटेनर फार्मिंगचा आगळा वेगळा प्रयोग सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरत आहे. आजच्या युवा शेतकऱ्याने देखील आधुनिक शेतीकडे उतरावे आणि शेतीचे वेगळे प्रयोग करून आधुनिक शेती करावी, अशी अपेक्षा शैलेश मोडकने व्यक्त केली आहे.

  • कापडी पिशव्यांची निर्मिती

    कापडी पिशव्यांची निर्मिती

    प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यसाठी जगभरात ‘प्लास्टिक बंदी’ मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. प्लास्टिकचे निसर्गात विघटन होत नाही, त्याचा पुनर्वापरही जास्त दिवस करता येत नाही आणि प्लास्टिकचा पुनर्निर्मिती प्रकल्प उभारणेही खर्चिक असल्याने त्या वाटेला जाणाऱ्या उद्योजकांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे ‘कापडी पिशव्यां’ची निर्मिती उद्योग.

    प्लॅस्टिक बंदी झाल्यानंतर कापडी पिशव्यांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. कापडी पिशव्या या धुता येतात आणि त्यांचा पुनर्वापरही शक्य आहे. त्यामुळे कापडी पिशव्यांच्या निर्मिती उद्योगास चालना मिळाली. बऱ्याचदा या उद्योगाचे स्वरुप हे लघुउद्योगाचे असते. अनेक महिला हा उद्योग त्यांच्या घरातून चालवतात. या लघुउद्योगाला विशेष कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसते. पण जर तुम्ही हा उद्योग लघुउद्योग आणि जी एस टी परवान्यासाठी नोंदणीकृत केलात, तर तुम्ही बनवलेल्या पिशव्या जगभरात निर्यात होऊ शकतात. हा उद्योग तुम्ही ऑनलाइन आणि प्रत्यक्ष विक्री या दोन्ही माध्यमांत सुरू करू शकतात.

    तुम्ही घाऊक बाजारातून पिशव्यांच्या उद्योगासाठी आवश्यक कापड, पिशव्या शिवण्यासाठी दोरे विकत घेऊ शकतात. शिलाई यंत्र तर अनिवार्य आहेच. बऱ्याचदा जर तुमचा कपडा व्यावसायिक ठरला असेल, तर तो तुमच्या उद्योगाला माल पुरवताना कापड हे तुम्ही सांगितलेल्या आकारात कापून देतो. जेणेकरून तुमचे फक्त शिवायचे काम बाकी राहते.

    एक महिला दिवसाला किमान दोन ते तीन डझन कापडी पिशव्या तयार शकते. कापडी पिशव्यांच्या वेगवेगळ्या आकाराप्रमाणे त्यांचे भाव ठरलेले असतात. छोट्या कापडी पिशव्या अंदाजे ६० रुपये डझन, तर मोठ्या कापडी पिशव्या व्यावसायिक १४० रुपये डझनाने खरेदी करतात. महिलांना एक कापडी पिशवी शिवायला येणारा खर्च हा ५ रुपये असतो. ती कापडी पिशवी बाजारात किमान २० ते कमाल ३५० रुपयांपर्यंत विकली जाते. त्यामुळे या उद्योगातून दरदिवशी मिळणारा नफा हा किमान ३५० रुपये आहे.

  • स्टेपलपिन निर्मिती

    स्टेपलपिन निर्मिती

    कार्यालयीन कामासाठी स्टेपलपिनचा वापर केला जातो; परंतु बदलती जीवनशैली आणि सुशिक्षित लोकांच्या उपस्थितीमुळे आजकाल प्रत्येक घरात गरजेनुसार कामासाठी स्टेपलपिनचा वापर केला जातो. या कारणास्तव, या उत्पादित मालासाठी बाजारपेठ नेहमीच उपलब्ध असते. वर्षभर कमी भांडवलात हा उद्योग सुरू ठेवता येऊ शकतो. नवीन उद्योजकांनी बाजाराचा अभ्यास करून तोट्याची शक्यता नसलेला हा व्यवसाय निवडला पाहिजे. स्टेपलपिन वेगवेगळ्या धातूपासून बनवल्या जातात. या पिना तांबे किंवा स्टेनलेस स्टीलच्या तारांपासून बनवलेल्या असतात.

    तांब्याच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या तारांपासून बनवलेल्या स्टेपलपिन यांना बाजारात चांगली मागणी आहे. स्टेपलपिन तयार करण्यासाठी स्टेपलपिन बनवणारी स्वयंचलित यंत्रसामग्री बहुतेक मोठ्या शहरांमध्ये यंत्रे विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. ज्या धातूपासून स्टेपलपिन तयार करायचे आहे, त्या धातूच्या वायरचे तुकडे स्वयंचलित यंत्रामध्ये टाकले जातात. तयार करायच्या स्टेपलपिनचा आकार स्वयंचलित मशीनवर निश्चित केला जातो. ठरलेल्या वेळेनुसार यंत्रात तारा पुढे सरकतात. तयार स्टेपल पिना यंत्राच्या ‘ग्लूइंग’ भागामध्ये पुढे सरकतात. तयार केलेल्या लहान तुकड्यांना तेथे गोंद लावला जातो, आणि तुकडे पॅकिंगसाठी तयार होतात.

    स्टेपलर आणि स्टेपलपिना बहुधा सर्व खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये वापरल्या जातात. प्रत्येक कार्यालय आणि कार्यालयासाठी पिना आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे, सर्व प्रकारच्या कार्यालयांमध्ये स्टेपलर आणि स्टेपलपिनाची आवश्यकता असते. एकाच संदर्भाशी संबंधित विविध कागदपत्रे एकत्र ठेवण्यासाठी कागदपत्रे स्टॅपल करून एकत्र ठेवली जातात. जर तुम्ही कागद फक्त साठवून ठेवलात तर पिन बाहेर येण्याची शक्यता असते. परंतु स्टेपल दाबल्यानंतर, पिना आपोआप लॉक होतात, त्यामुळे स्टेपलसह पिन केल्यावर कदाचित पेपर्स अव्यवस्थित होत नाहीत. त्याचप्रमाणे, स्टेपलर आणि पिना सर्वत्र वापरल्या जातात; कारण पिनिंग करणे खूप सोपे आणि सोयीस्कर आहे. एकदा स्टेपलर विकत घेतला की, तो पुन्हा-पुन्हा विकत न घेता वर्षानुवर्षे टिकतो. त्याला त्याच्या गरजेनुसारच पिना विकत घ्याव्या लागतात.

    अशा स्टेपलर पिनच्या बॉक्सची किंमतही केवळ दहा ते पंधरा रुपयांपर्यंत असते. स्टेपल पिनचा वापर विविध कार्यालयांमध्ये केला जातो, परंतु कंपन्या, कारखाने, सर्व प्रकारच्या उद्योगांची कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या व्यावसायिकांनाही स्टेपल पिनची गरज असते. या कारणास्तव, सर्वच भागात स्टेपल पिनला चांगली मागणी असल्याने, तुम्ही हा व्यवसाय छोट्या जागेत सुरू केला, आणि स्वतः मार्केटिंग केले तर तुम्हाला दुप्पट नफा मिळू शकतो.

    स्टेपलपिन बनविण्याचे प्रशिक्षण स्टेपलपिन यंत्रे विकणाऱ्या वितरकांद्वारे तसेच तत्सम यंत्रांच्या निर्मात्यांद्वारे दिले जाते. स्वयंचलित यंत्र असल्याने माल तयार करणे फारसे अवघड नाही. विक्री प्रतिनिधी किंवा यंत्र तंत्रज्ञ तुम्हाला पिन कशा तयार केल्या जातात याची माहिती देतात. अगदी थोडासा अनुभव घेऊनही तुम्ही उत्पादन कसे करायचे याचे ज्ञान मिळवू शकता. ज्यांना स्वतःचे विपणनाचे ज्ञान आहे, त्यांनी अशा उद्योगाच्या शोधात या व्यवसायाचा नक्कीच अभ्यास करावा.स्टेशनरी आणि कटलरीच्या व्यापाऱ्यांकडे स्टेपलपिनची सर्वाधिक विक्री होते. स्टेपल पिन विकणारे घाऊक विक्रेते आणि वितरक देखील आहेत. त्यांच्याकडून ऑर्डर घेऊन त्यांच्या गरजेनुसार त्या आकाराचा माल आपण तयार करू शकतो. त्यासोबतच व्यापारी संस्था, दुकानदार, कार्यालये, कंपन्या, कारखाने, बँका या ठिकाणी थेट विक्रीसाठी येणार आहेत. विक्री प्रतिनिधी नियुक्त करून घरोघरी विपणन करु शकता. यासाठी स्टेनलेस स्टील कोटेड वायर, कॉपर वायर, ग्लू, पॉलिशिंग टेबल., पॅकेजिंगसाठी कच्चा माल म्हणून लहान बॉक्स इ. साहित्य आवश्यक असेल.

  • बटाटा साठवणुकीचे प्राचीन तंत्र

    बटाटा साठवणुकीचे प्राचीन तंत्र

    महाराष्ट्रातील विदर्भासारख्या भागात बटाटा शेती केली जाते. बटाटा हे असे पीक आहे, ज्याची साठवणूक केल्यावर कोंब येऊन ते खाण्यायोग्य राहत नाहीत. काश्मीरमध्ये बटाटा साठवणुकीचे एक प्राचीन तंत्र असून ते तेथील शेतकऱ्यांनी आजपावेतो जपून ठेवले आहे. थंडीच्या दिवसांत काश्मीरचे ‘गुरेझ’ खोरे हे मुसळधार बर्फवृष्टीमुळे सहा महिने जगापासून तुटलेले असते. आताही हे खोरे बर्फाने गोठलेले आहे. सध्या येथील बटाटा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. याचे एक महत्त्वाचे कारण आहे. अनेक महिने भाजीपाला सुरक्षित ठेवण्याचे येथील शेतकऱ्यांचे एक खास तंत्र आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 8,000 फूट उंचीवर असलेल्या उत्तर काश्मीरच्या या भागात बटाट्यांची सुरक्षित साठवणूक चांगल्या पद्धतीने केली जाते. या पद्धतीविषयी येथील शेतकऱ्यांकडून माहिती मिळते. ते म्हणतात की, बटाटे खोदल्यानंतर आम्ही ते जमिनीत खोलवर गाडतो. आमचे पूर्वज हेच करायचे आणि आम्हीही तेच करतो. बटाटे जमिनीत गाडूनही ताजे आणि पौष्टिक राहतात. येथे राहणाऱ्या लोकांनी अनेक शतकांपासून या पद्धतीचा वापर चालू ठेवला आहे.

    बटाट्यांचे संरक्षण करण्याचे तंत्र टिकवून ठेवले आहे. त्यांच्या प्राचीन शेतीची ओळख आता जगाला होत आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना प्रतिसाद देण्यास हे तंत्र मदत करू शकते. शेकडो शेतकरी हिवाळ्याच्या महिन्यांत हे तंत्र वापरतात. अजूनही शेतीमध्ये पूर्वजांचे ज्ञान आणि परंपरा त्यांनी जिवंत ठेवली आहे. इथले शेतकरी हिवाळा येताच कामाला लागतात. जमिनी खोल खणतात. अनुकूल तापमान आणि आर्द्रता राखण्यासाठी बटाटे गवत किंवा पेंढ्याने झाकलेल्या या खड्ड्यात ठेवले जातात. कृषी विज्ञान केंद्र, गुरेझ येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बिलाल याविषयी सांगतात की, शेतकरी जमिनीत खोलवर बटाटे ठेवतात. त्यांना किती उत्पादन साठवायचे आहे यावर हे अवलंबून असते. भूमिगत जागेमध्ये कधी-कधी पाच हजार किलो बटाटेही असू शकतात. गोठलेल्या बर्फाखाली बटाटे टिकवून ठेवण्याची पद्धत ही एक उत्तम पद्धत आहे, जी गुरेझमधील लोकांना त्या भागातील हवामान परिस्थितीशी सामना करण्यास आणि हिवाळ्याच्या हंगामात ताजे बटाटे देण्यास मदत करते. शेतकरी बियाण्यासाठीही बटाटे जमिनीखाली ठेवतात.

    जमिनीखालील तापमान बाहेरच्या तुलनेत जास्त असते. ‘गुरेझ’ खोऱ्यातील पिकांचा हंगाम फक्त चार ते पाच महिन्यांचा असतो. बर्फवृष्टी संपल्यानंतर लोक पुन्हा पुढील पीक चक्रासाठी त्यांच्या शेतात बटाटे पेरतात. गुरेझ खोरे हे उच्च दर्जाच्या बटाट्यांसाठी ओळखले जाते. दरवर्षी 15,000 टन बटाट्याचे उत्पादन करते. येथील शेतकरी सेंद्रिय खत, जंगलातील कचरा आणि वनस्पतींचे अवशेष माती समृद्ध करण्यासाठी वापरतात. सध्या येथे सुमारे सहा महिने येथे जोरदार बर्फवृष्टी झाली. या प्रदेशामुळे घाटीकडे जाणारे उंच मार्ग आणि डोंगराळ रस्ते बंद होतात. येथे जे काही पिकवले जाते ते शक्य तितके टिकते. गुरेझमधील तापमान काहीवेळा तापमान उणे २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. भाज्या हिवाळ्यात ताज्या ठेवण्याचा ‘भूमिगत साठा’ हा एक प्रभावी मार्ग आहे. शेतकरी सांगतात की, बटाटे हे हिवाळ्यातील पोषणाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.

    गोठलेल्या जमिनीखाली बटाटे साठवणे म्हणजे केवळ ताजे ठेवणे नव्हे तर, आपल्या पूर्वजांच्या आठवणी जिवंत ठेवण्याचा हा एक मार्ग आहे. गुरेझ खोऱ्यातील सुमारे 40,000 लोक हिवाळ्यासाठी साठवलेल्या भाज्यांवर अवलंबून असतात. प्रत्येक घरातील बटाटे साठवले जातात. ती त्यांची जीवनवाहिनी असते. हे तंत्रज्ञान बटाटे नैसर्गिकरित्या जतन करतात. त्यांचा ताजेपणा आणि पौष्टिक मूल्य टिकवून ठेवतात. ते किफायतशीर असतात. स्थानिक पातळीवर उपलब्ध घटकांचा वापर करुन ऊर्जेचा वापर कमी करतात. ‘पेप्सिको’ सारख्या दिग्गज कंपनीने आपल्या ‘लेज चिप्स’ ब्रँडसाठी गुरेझमधील शेतकऱ्यांकडून थेट बटाटे खरेदी करण्याची योजना आखली आहे.

  • उस्मानाबादमधील सिद्धक्षेत्र कुंथलगिरी

    उस्मानाबादमधील सिद्धक्षेत्र कुंथलगिरी

    उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात सिद्धक्षेत्र कुंथलगिरी हे एक धार्मिक क्षेत्र आहे. कुंथलगिरी हे ठिकाण उस्मानाबाद येथून सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर ६० किमी अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी बस तसेच खासगी वाहनांची सोय आहे. हा परिसर कुलभूषण व देशभूषण या मुनिवरांचे मोक्षस्थान समजला जातो. याठिकाणी श्री शांतीसागर महाराजांची समाधी आहे. येथे असलेल्या छोट्या डोंगराच्या टेकडीवर ७ मंदिरे असून पायथ्याशी 4 मंदिरे आहेत. टेकडीवर कुलभूषण-देशभूषण मंदिर, शांतीनाथ मंदिर, बाहुबली मंदिर, आदिनाथ मंदिर, अजितनाथ मंदिर, चैत्य, नंदीश्वर जिनालय ही मंदिरे आहेत. पायथ्याशी नेमिनाथजी, महावीरस्वामी, रत्नत्रय, समवसरण मंदिरे आहेत. येथे गुरुकुल देखील आहे.

    दरवर्षी याठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेस वार्षिक जत्रा भरते. यावेळी भाविकांची प्रचंड गर्दी असते. हा एकूणच परिसर ऐतिहासिक आणि निसर्गरम्य आहे. येथे आलेले पर्यटक येथील अन्य ठिकाणांनाही भेटी देऊ शकतात. कुंथलगिरी येथून एक किलोमीटरवर रामकुंड हे गाव असून येथे रामाई देवीचे प्रसिध्द मंदिर आहे. येथून उस्मानाबाद लेणी 60 किमी. अंतरावर आहेत. तेर तीर्थक्षेत्र 60 किमी, पैठण – 140 किमी अंतरावर आहे. सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर कुंथलगिरीचा प्रसिध्द पेढा मिळतो. हे क्षेत्र बारा महिने सुरू असते. भाद्रपद शुद्ध पंचमी ते पौर्णिमा हा काळ ‘पर्यूषण पर्व’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी प्रथमाचार्य शांतिसागर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना वंदन केले जाते. हा परिसर मनमोहक व निसर्गरम्य आहे.

  • आश्वे-मांद्रे किनारे

    आश्वे-मांद्रे किनारे

    उत्तर गोव्यातील आश्वे आणि मांद्रे सागरकिनारे देशी-विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. आश्वे किनारा हा उत्तरेकडील समुद्रकिनाऱ्याचा एक मोठा भाग आहे. हा भाग मोरजी किनाऱ्यापासून पुढे सुरू होतो. आश्वे, मांद्रेनंतर पुढे हरमल किनाऱ्याकडे जातो. आश्वे हा एक सुंदर समुद्रकिनारा आहे. याच्या मागील बाजूस सुंदर पामची झाडे आहेत. समुद्रकिनाऱ्यावर अनेक शॅक आहेत. दुर्दैवाने, वाळूमुळे बरेच खडक वर आले आहेत. त्यामुळे तो पूर्वीसारखा सुंदर नाही; परंतु तरीही मनात भरतोच.

    इतर किनाऱ्यांपेक्षा येथे शांतता अनुभवता येते. शांत समुद्र, सर्वोत्कृष्ट फ्रूट सॅलड हवे असल्यास या किनाऱ्यावर जावे. मांद्रे किनाराही नितांतसुंदर आहे. येथे कासव संवर्धन मोहीम सुरू असल्याने फारसे शॅक्स नाहीत. तर हे दोन्ही किनारे पेडणे तालुक्यात आहेत. मनमोहकता व शांतता प्रदान करणाऱ्या या किनाऱ्यांवर जाण्यासाठी विमानमार्गे प्रवास केल्यास मोपा विमानतळ जवळ आहे. रेल्वेने प्रवास केल्यास पेडणे, थिवी रेल्वेस्थानकावर उतरावे लागेल. मोरजी किनारा इथून जवळच असून तेथे विदेशी पर्यटक जास्त असतात. आता आश्वे-मांद्रे किनाऱ्याच्या दिशेने पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.

  • अंतूरगड किल्ला

    अंतूरगड किल्ला

    उत्तुंग मजबूत गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या किल्ल्यांनी जवळपास अवघा महाराष्ट्र व्यापला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या रांगेवर अंतुरगड आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली हा किल्ला आहे. अंतूरच्या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. यातील एक मार्ग कन्नडकडून गौताळा अभयारण्यामधून जातो. दुसरा मार्ग जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामधून आहे. हे दोन्ही मार्ग अंतूरच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येतात.

    डोंगरउतारावर भरपूर झाडी आहे.मलीक अंबरच्या काळात येथे काही बांधकामे झाली. पुढे मोगली वावटळीत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. गडाचा समोरचा दरवाजा चटकन दिसत नाही. या दरवाजाबाहेर पहारेकऱ्यांच्या जागा आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत या दरवाजाला लाकडी दारे होती. ती आता दिसत नाहीत. या दारातून आत गेल्यावर आतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. पुढचा दरवाजा मात्र भव्य आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा आहे. दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूला अनेक शिल्पे पहायला मिळतात. येथे सजावटीसाठी तोफेचे चार गोळे वापरले आहेत. तिसऱ्या दारावर भव्य असा फारशी शिलालेख आहे.

    गड दक्षिणोत्तर पसरलेला असून तटबंदीने वेष्टित आहे. डावीकडे एक टेकडी असून टेकडीच्या दक्षिण बाजूला मोठा तलाव आहे. टेकडीच्या उतारावर भव्य इमारत आहे. टेकडीच्या माथ्यावर टेहळणीकरिता चौथरा बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी उत्तरेकडून पायऱ्या आहेत. या चौथऱ्यावरून संपूर्ण गडावर लक्ष ठेवता येते. या किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदाराने केली होती. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इतर किल्ल्याबरोबर याचाही ताबा मिळवला.

  • संजीवनी बेट

    संजीवनी बेट

    महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एक लोकप्रिय हिरवीगर्द टेकडी आहे. हे एक जैवसमृद्ध असे क्षेत्र आहे. ‘वडवळ नागनाथ’ गावाजवळ असलेली ही टेकडी तिच्या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे ‘संजीवनी बेट’ म्हणून ओळखली जाते. हे ठिकाण चाकूरपासून १६ किमी अंतरावर असून लातूर शहरापासून ३९ किमी अंतरावर आहे. संजीवनी बेटास ‘वडवळ नागनाथ बेट’ या नावानेही ओळखतात. हे बेट आयुर्वेदिक झाडे आणि वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ प्रजातींचे घर म्हणून ओळखले जाते. येथे जुलै ते सप्टेंबर या पावसाच्या महिन्यात अनेक दुर्मिळ वनस्पती वाढतात. अनेक ठिकाणचे आयुर्वेदिक अभ्यासक आणि संशोधक दुर्मिळ वनस्पतींच्या शोधात या ठिकाणास भेट देतात.

    जगात कुठेही न आढळणारे असे चुंबकीय क्षेत्र येथे आहे. जिथे १०० फुटांपेक्षा अधिक व्यास असलेल्या जागेत लोटांगण अवस्थेत २ मिनिटे शरीरासह मन स्थिर करून बाजूला तीन-चार गिरकी घेतल्या की तुमचा शरीरावरील ताबा सुटतो. शरीर आपोआप घरंगळत जाते. त्या व्यक्तीला जोपर्यंत अन्य कोणी थांबवत नाही, तोपर्यंत काही अंतरापर्यंत व्यक्ती घरंगळत जाते. महाराष्ट्र सरकार आयुर्वेदिक डॉक्टरांसाठी आणि प्राथमिक आरोग्य सेवेसाठी पारंपरिक उपायांचा वापर करणाऱ्या स्थानिक चिकित्सकांसाठी या परिसरात वैद्यसंमेलनाचे आयोजन करते.

    औषधी वनस्पतींच्या अभ्यासासाठी सरकारने संशोधन केंद्रही स्थापन केले आहे. येथे राहणाऱ्या स्थानिक जमातींशी पर्यटक संवाद साधू शकतात. त्यांच्याकडून संजीवनी बेटावरील वनस्पतींची माहिती मिळू शकते. ‘वडवळ नागनाथ बेट्टा’ येथे आणि आजूबाजूला अनेक आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचार रुग्णालये आणि वैद्यकीय दुकाने आहेत. तिथे आपण खरेदी करू शकता. येथील संशोधन केंद्र सकाळी ९.०० वाजता उघडते. त्यामुळे सकाळी ८.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळेत कधीही भेट देऊ शकता.

  • नातेवाईकांकडे जाताना..

    नातेवाईकांकडे जाताना..

    भारतीय विवाह एक किंवा दोन दिवसांत संपणारा सोहळा नसून अनेक दिवस चालणारा कार्यक्रम आहे. लग्नाआधी हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभ होतात. त्यानंतर विवाह व गाठीभेटींचा-शुभेच्छांचा सोहळा होतो. या सर्व समारंभापूर्वी वर आणि वधूला नवीन कुटुंबाशी चांगले नाते निर्माण करायचे असते. एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. तसेच अनेक नातेवाईकांकडे जावे लागते. असे एकमेकांच्या तसेच नातेवाईकांच्या घरी जाण्यापूर्वी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात.

    यातील बऱ्याच काही आपल्या वागण्याशी निगडीत असतात. लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदाच एखाद्या नातेवाईकाच्या घरी जात असाल तर तुमच्यासोबत काहीतरी घेऊन जा. रिकाम्या हाताने जाणे योग्य नाही. मिठाई हा सुरक्षित आणि सर्वोत्तम पर्याय असला तरी, आपण आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार त्यांना काहीतरी देऊ शकता. याचा अर्थ, जर घरी मुले असतील तर आपण त्यांना काहीतरी देऊ शकता. साहजिकच आहे की, कोणाच्या घरी गेल्यावर त्यांचे काम थोडे वाढते. अशा स्थितीत नुसते बोलण्यात गुंतून राहू नका. त्यांना त्यांच्या कामात मदतही करा. असे केल्याने केवळ काम जलद आणि सहजतेने पूर्ण करता येत नाही तर, तुमची प्रतिमाही सुधारते.

    खाण्यापिण्यात प्रत्येकाची स्वतःची पसंती असते, पण जर एखादी गोष्ट तुमच्या आवडीची नसेल तर जुळवून घ्या. दुसरा उत्तम पर्याय म्हणजे बाहेरून एखादी वस्तू मागवणे हा आहे. पण त्याबद्दल उगाचच गडबड करू नका. नाहीतर इथे तुमची प्रतिमा खराब होण्याची शक्यता वाढते. उगाचच फुशारक्या मारु नका. यावेळी आपपसात चर्चा होतात. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली जाते. लक्षात घ्या, कोणाबद्दल वाईट बोलू नका. इथेही गोष्टी चुकीच्या होऊ शकतात. या फंदातच पडू नका. गॉसिपिंगची सवय कधीतरी अडचणीत आणू शकते. गरजेचे बोला, चांगले बोला. सकारात्मक रहा. कोणतीही गोष्ट आवडत नसल्यास त्याकडे दुर्लक्ष करा; परंतु तोंड पाडून किंवा तोंड फुगवून बसू नका. आपली भेट नातेवाईकांसाठी संस्मरणीय असेल, अशा पद्धतीचे वर्तन कधीही चांगले !

  • महिलांमध्ये साड्यांची क्रेझ

    महिलांमध्ये साड्यांची क्रेझ

    देशभरात सध्या फक्त श्रीरामांचीच चर्चा होत आहे. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला भगवान श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. सगळी भारतीय जनता या संधीची आतुरतेने वाट पाहत आहे. महिलांमध्ये तर वेगळीच क्रेझ दिसून येत आहे. अयोध्येचा सोहळा साजरा करताना स्वत: राममय होण्यासाठी त्या रामाचे नाव, मंदिराचे व रामाचे छायाचित्र असणाऱ्या साड्या खरेदी करताना दिसत आहेत. विविध प्रकारच्या आकर्षक साड्या बाजारात आल्या असून या साड्या परिधान करुन नटूनथटून या सोहळ्याचा आनंद घेण्याचा त्यांचा मानस दिसत आहे. अशी वस्त्रे परिधान करुन रामभक्त आपले सौंदर्य अधिक खुलवणार आहेत, हे विशेष !

    समाजमाध्यमांवरच नव्हे तर बाजारातही लोकांचा उत्साह पहायला मिळत आहे. सध्या रामभक्तांना राम नाम असलेले शर्ट-टीशर्ट आणि साडी खरेदी करण्याची आस लागली आहे. हे कपडे बाजारात भरमसाठ दराने विकले जात आहेत. यावरून आपण रामभक्तांच्या उत्साहाची कल्पना करू शकतो. महिलांमध्ये अशा साड्या खरेदी करण्याची क्रेझ आहे. जे अयोध्येला जाऊ शकत नाहीत त्यांना त्यांच्या घरीच श्रीरामाचे स्वागत करायचे आहे. लोकांना रामनामात स्वतःला हरवून घ्यायचे आहे. लोक स्वत:च्या कपड्यांवर रामाचे नाव आणि चित्र छापून ते परिधान करणार आहेत.

    श्रीराम, अयोध्या मंदिर आणि त्यावर रामाचे नाव असलेल्या कपड्यांची खरेदी वाढलेली दिसत आहे. महत्त्वाचा सोहळा अधिक खास बनविण्यासाठी महिला रामजींचे चित्र आणि मंदिर असलेल्या साड्या खरेदी करीत आहेत, जेणेकरून प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्या परिधान करतील. सध्या या साड्यांची क्रेझ एवढी आहे की, या साड्यांची खास दुकाने थाटून विक्री केली जात आहे. पुरुषांमध्येही तोच उत्साह पहायला मिळत आहे. त्यांनाही त्यांच्या कपड्यांवर रामाचे नाव लिहिलेले पहायचे आहे. त्यामुळे ‘राम’ नावाचे शर्ट बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.

  • आरोग्यवर्धक प्राणायाम

    आरोग्यवर्धक प्राणायाम

    आरोग्य उत्तम राखणारी प्राणायाम ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करावे लागते. श्वासोच्छवासावर वेगवेगळ्या प्रकारे आणि ठराविक कालावधीसाठी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. प्राणायाम केल्याने अनेक फायदे मिळतात. या फायद्यांमुळे पाश्चिमात्य संस्कृतीही हळूहळू त्याचा अवलंब करीत आहे. रोज प्राणायाम करणे फायदेशीर ठरू शकते. आजच्या धावपळीच्या जीवनात शांतपणे झोपणे महत्वायचचे आहे. झोपेच्या अभावामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. याचे परिणाम भविष्यात भोगावे लागू शकतात. प्राणायामामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होते. प्राणायाम केल्याने शरीराला आराम मिळतो. चांगली झोप लागते. त्यामुळे रोज १० मिनिटे प्राणायाम करणे खूप फायदेशीर ठरते.

    प्राणायाम केल्याने फुफ्फुस मजबूत होण्यास खूप मदत होते. प्राणायाम करताना दीर्घ श्वास घ्यावा लागतो, ज्यामुळे फुफ्फुसातील प्रत्येक भागामध्ये ऑक्सिजन पोहोचतो. फुफ्फुसाचे स्नायू देखील मजबूत होतात. त्यामुळे प्राणायाम करणे निरोगी फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका असतो. उच्च रक्तदाबामुळे इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. या कारणास्तव, रक्तदाब नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. प्राणायाम केल्याने शरीराला आराम मिळतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते.
    जीवनशैलीच्या अनेक सवयींमुळे अनेकांना तणाव वाढण्याची समस्या भेडसावते.

    त्यामुळे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. तणाव कमी करण्यासाठी प्राणायाम खूप उपयुक्त आहे. त्याच्या मदतीने, मज्जासंस्था लक्षणीयरीत्या आरामशीर होते, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. प्राणायाम करताना सर्व लक्ष श्वासोच्छवासावर केंद्रित करावे लागते. त्यामुळे, या काळात श्वासोच्छवासाबद्दल अधिक जागरूकता निर्माण होते. मानसिक जाणिवा वाढण्यास मदत होते. मानसिक आरोग्य उत्तम राहते. हा ध्यान करण्याचा एक मार्ग असून मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

  • केरळचे ओलन

    केरळचे ओलन

    साहित्य : कोहळा- 1 मध्यम, भोपळ्याचे तुकडे – 1 कप, हिरव्या मिरच्या – 6, नारळाचे दूध – 1 कप, शिजवलेली लाल चवळी – पाव कप, वालाचे दाणे, कढीपत्ता, मीठ, खोबरेल तेल – 3 चमचे.

    कृती : लाल चवळीत मीठ घालून मऊ शिजवून घ्यावी. त्यात कोहळ्याचे तुकडे, वालाचे दाणे, भोपळ्याचे तुकडे आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. थोडे ढवळून त्यात पाणी घालावे. आता या भांड्यावर झाकण ठेवून पाच मिनिटांपर्यंत शिजू द्यावे. हे झाकण काढून हळुवार ढवळून त्यात मीठ आणि कढीपत्ता घालावा. एक उकळी आली की यात नारळाचे दूध घालून चांगले मिसळावे. थोडे तेल घालून पुन्हा ढवळावे. ‘ओलन’ खाण्यासाठी तयार आहे.

  • मुलांच्या खाण्याकडे लक्ष हवेच

    मुलांच्या खाण्याकडे लक्ष हवेच

    आपले मूल जेवत नाही, ही बऱ्याचजणींची तक्रार असते. त्यासाठी आई आपल्या शैलीने वेगवेगळे प्रयत्न करतानाही दिसते; परंतु प्रत्येक वेळी मूल खाण्यात आवड दाखवत नसल्यामुळे आईला त्रास होतो. यासाठी आधी मुले का जेवत नाहीत, याचा अभ्यास करायला हवा. ती दिवसभरात काय खातात याकडे लक्ष द्यायला हवे. खाण्याची अनिच्छा मुलांच्या विकासात अडथळा ठरते. अन्न नीट न खाल्ल्यामुळे मुलांमध्ये अनेक प्रकारच्या कमतरता निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्या वाढीसही आळा बसू शकतो. खुरटेपणाची समस्या निर्माण होऊ शकते. हे रोखण्यासाठी वेळीच प्रभावी उपाय योजणेची गरज असते; जेणेकरून आपले मूल निरोगी आणि तंदुरुस्त बनेल. शक्य असल्यास स्वतः स्वयंपाक करताना मुलांना स्वयंपाकात सहभागी करून घ्यावे. त्यांना अन्नाचे महत्त्व समजावून सांगावे. आपले मूल जर खूप गोड खात असेल, त्याच्या शरीरात लोहाची कमतरता असेल, जास्त फास्ट फूड खाल्ले असेल तर त्यांना सहजपणे भूक लागणार नाही. म्हणून मुलांना जीवनसत्व ‘सी’ व फायबरयुक्त पदार्थ खाण्यास द्यावेत. यासाठी आहारात लिंबू, टोमॅटो, संत्री आणि स्ट्रॉबेरीचा समावेश करू शकता. त्यामुळे त्यांची भूक वाढण्यास मदत होईल.

    तांदूळ, डाळी, संपूर्ण धान्य, पालक, ब्रोकोली, हरभरा आणि वाटाणे असा पौष्टिक आहार द्यावा. फास्ट फूड टाळावे. मुलांना बडीशेप खायला द्यावी. बडीशेप औषधासारखे काम करते. अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यास मदत करते. मुलांना त्यांचा आवडता पदार्थ सारखा आणि भरपूर देऊ नये. नाहीतर मुले एकच पदार्थ नेहमी खात राहतील. अन्नपदार्थ आकर्षकपणे सजवावे. उदाहरणार्थ, कोणत्याही खाद्यपदार्थाला त्यांच्या आवडत्या कार्टूनचा आकार द्यावा. त्यामुळे मुले जेवताना त्यांचे लक्ष टीव्ही किंवा मोबाईलवर जाणार नाही. ते फक्त खाण्यावर लक्ष केंद्रित करतील. दररोज वेळेवरच अन्न द्यावे. दर दोन-तीन तासांनी आरोग्यवर्धक अन्नपदार्थ थोडे-थोडे खाण्यास द्यावेत. दररोज काहीतरी नवीन बनवावे. ज्यामुळे मुलांना पदार्थ खावासा वाटेल.

  • यमाई देवी मंदिर

    यमाई देवी मंदिर

    साताऱ्यापासून ४४ किमी आणि पाचगणीपासून ६३ किमी अंतरावर, यमाई देवी मंदिर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील औंध येथे डोंगरमाथ्यावर वसलेले एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात खूप पूजनीय आहे आणि सातारा येथे भेट देण्याच्या शीर्षस्थानांपैकी एक आहे. यमाई देवी ही अनेक महाराष्ट्रीय कुटुंबांची कुलदैवत आहे. काळ्या पाषाणातील देवी महिषासुर मर्दिनीची मूर्ती आडवाटे बसलेल्या स्थितीत जवळपास २ मीटर उंच आहे. या मूर्तीला चार हात असून त्यात गडा, बाण, त्रिशूल आणि पान आहेहे शहर आणि मंदिर अनेक शतकांपासून पंत घराण्याशी जोडलेले आहे.

    या माजी सत्ताधारी कुटुंबाच्या विद्यमान प्रमुख गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी टेकडीवरील यमाई मंदिराच्या शिखरावर ७ किलोग्राम (१५ पौंड) घन सोन्याचा कलश किंवा मुकुट स्थापित केला आहे. देवी यमाईचे आणखी एक मंदिर गावात आहे; टेकडीवरील एक सोडून.टेकडीच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या पायऱ्या वापरून मंदिरापर्यंत पोहोचता येते. डोंगरमाथ्यापर्यंत थेट रस्ता देखील उपलब्ध आहे. मंदिर संकुलात औंधच्या महाराजांच्या खाजगी संग्रहातून स्थापित श्री भवानी संग्रहालय देखील आहे. संग्रहालयात एम.व्ही. धुरंधर, बाबूराव पेंटर, माधव सातवळेकर आणि राजा रवि वर्मा यासारख्या १९व्या आणि २०व्या शतकातील प्रसिद्ध भारतीय कलाकारांची चित्रे तसेच ब्रिटिश कलाकार हेन्री मूर यांच्या प्रसिद्ध मदर अँड चाइल्ड स्टोन स्ट्रक्चर्स आहेत.

    यमाई देवी मंदिराची वार्षिक यात्रा हजारो भाविकांना आकर्षित करते. यमाई देवी यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमा किंवा पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्रात पारंपारिक हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार साजरी केली जाते. या उत्सवाला मोठ्या प्रमाणात भाविक येतात.

  • बागा समुद्रकिनारा

    बागा समुद्रकिनारा

    बागा समुद्रकिनारा हा गोव्यातील सर्वात आनंददायक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे जलक्रीडा, उत्तम जेवणाची रेस्टॉरंट्स, बार आणि क्लब आढळतात. बागा किनारा हा कळंगुट आणि अंजुणा सागरकिनाऱ्यांच्या सीमेवर आहे. जलक्रीडा हे बागा किनाऱ्याचे प्रमुख आकर्षण आहे. पॅरासेलिंग, वेकबोर्डिंग, विंडसर्फिंग, काइट सर्फिंग, जेट स्कीइंग हे काही जलक्रीडा प्रकार आहेत. या समुद्रकिनाऱ्यावरून डॉल्फिन स्पॉटिंग टूरसाठी जाता येते. बागा किनाऱ्यावरील एक अनोखे आकर्षण म्हणजे येथील ‘इनडोअर स्नो पार्क’ होय. येथे खेळण्याची जागा, स्लेडिंग क्षेत्र आणि आइस बार तसेच तिबेटी मार्केट आहे. बागा किनारा हे निसर्गप्रेमींसाठी आवडते ठिकाण आहे. येथे निसर्गरम्य सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. पर्यटक येथून डॉल्फिन पाहण्यासाठी सहली काढू शकतात. बागा किनाऱ्यावरुन समुद्रातील डॉल्फिन पाहण्यासाठी आणि समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेल्या सुंदर बेटांचे साक्षीदार होण्यासाठी अनेक सहलींचे आयोजन केले जाते.

    बागा रोडवर तिबेटी मार्केट आहे. त्यानंतर जवळच प्रसिद्ध नाईट मार्केट आहे. बुधवारी येथे फ्ली मार्केट भरते. प्रसिद्ध टिटोज लेनमध्ये अनेक बार, कॅफे मॅम्बो, केपटाऊन कॅफे, कॉकटेल्स, ड्रीम्स आणि कावला यांसारखे क्लब आहेत. बागा किनारी भागातील प्रत्येक श्रेणीमध्ये उत्तम निवासाचे पर्याय आहेत. येथे आपण बजेट, मध्यम श्रेणी आणि लक्झरी अशा कोणत्याही प्रकारात आरक्षण करु शकता. बहुतेक हॉटेल्स समुद्रकिनाऱ्याच्या जवळ आहेत. काही खोल्यांच्या खिडक्यांमधून बागा किनाऱ्याचे मनोहारी दृश्य दिसते. बागा किनाऱ्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान असतो. त्यावेळेस हवामान आल्हाददायक असते. जवळपास रोज रात्री किनाऱ्यावर मेजवान्यांचे आयोजन होत असते. गोव्याची राजधानी पणजीपासून बागा सुमारे १७ किमी. अंतरावर आहे. पणजीहून बागा किनाऱ्यावर जाण्यासाठी टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा सहज उपलब्ध आहेत.

  • धारूर किल्ला

    धारूर किल्ला

    बीड जिल्ह्यातील धारूर येथे राष्ट्रकुटांच्या काळात शहराचे संरक्षण करण्यासाठी ‘महादुर्ग’ नावाचा किल्ला बांधण्यात आला. याला धारूर किल्ला असे नाव आहे. त्या किल्ल्यात भर घालून त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी या किल्ल्यात नवीन बांधकामे केली. त्यामुळे आजही किल्ला व त्यातील अवशेष बऱ्यापैकी शाबूत आहेत. येथे किल्ल्याबरोबरच अंबेजोगाईचे मंदिर, लेणी, धर्मापूरीचा किल्ला व प्राचीन केदारेश्वर मंदिर ही ऎतिहासिक ठिकाणे पाहता येतात.
    या भागावर वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रकुटांनी धारूर येथे किल्ला बांधला गेला. ‘महादुर्ग’ नावाने हा किल्ला त्यावेळी ओळखला जात असे. त्यावेळी साधे दगड एकमेकांवर रचून या गडाची तटबंदी बांधण्यात आली होती.

    धारूर गावातून गाडीने थेट किल्ल्यापर्यंत जाता येते. धारूर गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामुळे त्याला ‘भूईकोट’ म्हणत. या किल्ल्याच्या इतर तीन बाजूंनी खोल दरी आहे. त्यामुळे या तीन बाजूंनी किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण आहे. उरलेल्या चौथ्या बाजूने किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी ४.२ मीटर रूंद व ४.५ मीटर खोल खंदक खोदलेला आहे.या खंदकाच्या उत्तर भागात एक बांधीव तलाव असून त्याला ‘सोलापूर दिंडी किंवा खारी दिंडी’ म्हणतात. पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे.

    धारूर किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. किल्ल्यात शिरण्यापूर्वी डाव्या बाजूच्या खंदकात उतरून अष्टकोनी बुरुजाजवळ जावे लागते. या बुरुजाला ‘हाथी बुरुज’ म्हणतात. या बुरुजावर दोन शरभाची शिल्प व त्यांच्या मधोमध हत्तीचे शिल्प आहे. शरभाच्या मागे ढाल, तलवार घेतलेला योध्दा कोरलेला आहे. हा किल्ला प्रेक्षणीय आहे.

  • धाराशिव लेणीसमूह

    धाराशिव लेणीसमूह

    लेणी हा कोणत्याही भागाचा एक ऐतिहासिक ठेवा असतो. त्या लेण्या संबंधित भागातील सांस्कृतिक समृद्धी वाढवितात. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात आकर्षक एक प्राचीन लेणीसमूह आहे. येथील शैव लेणी धाराशिवपासून ५ कि.मी. अंतरावर असून त्यांना ‘चांभार लेणी’ असेही म्हणतात. या लेण्यांसमोर एक देखणे शिव मंदिर आहे. या लेण्यांकडे पायवाट तसेच पक्क्या मार्गानेही पोहोचता येऊ शकते. हातला देवी मंदिराकडून लेण्यांपर्यंत पोहोचणारी पायवाट मिळते. तर धाराशिव शहराजवळील बोंबल्या मारुती मंदिराकडून पक्क्या मार्गाने पोहोचता येते. या लेण्यांना भेट द्यायची झाल्यास हिवाळा ऋतू उत्तम असतो.उस्मानाबाद शहरापासून ६ ते ७ किमी अंतरावर धाराशिव लेण्या आहेत.

    धाराशीव लेण्या बालाघाट डोंगररांगेत कोरलेल्या आहेत. बौद्ध, हिंदू, जैन अशा लेण्या येथे आढळतात. हिंदू धर्मीयांच्या देव-देवतांच्या मूर्ती येथे कोरलेल्या आढळतात. धाराशिवपासून २० कि.मी अंतरावर सात जैन लेण्या आहेत. दुसऱ्या लेण्यामध्ये आठ स्तंभ आणि पाच प्रवेशद्वारे आहेत. गर्भगृहात भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर यांची भव्य प्रतिमा आहे. या लेण्यांमध्ये हरी नारायण नामक एका सत्पुरुष तपश्चर्या करीत होते, असे समजते. धाराशिवमध्ये या संप्रदायाचा एक मठ आहे. येथील बौद्ध लेण्या आकर्षक आहेत. या लेण्या वाकाटक शैलीतील आहे. तेथे बौद्ध भिख्खूंसाठी १४ निवारागृहे आहेत. गाभाऱ्यात पद्मासन अवस्थेतील बुद्ध मूर्ती आहे.

  • मिरची पावडर उद्योग

    मिरची पावडर उद्योग

    लाल मिरची पावडरचा हा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे. लाल तिखटला मसाल्यांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. लाल तिखट सर्व प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. भारतीय जेवणात लाल तिखटाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या देशात हा व्यवसाय करोडो रुपयांचा आहे. या व्यवसायातील नफा पाहता लाल मिरची पावडरचा व्यवसाय अनेक लहान-मोठ्या कंपन्या करीत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात अनेक लोक या मसाल्याच्या उद्योगात गुंतलेले आहेत. असे असूनही या व्यवसायातील स्पर्धा नाममात्र आहे. तुमच्या उत्पादनाचा दर्जा आणि दर योग्य असेल तर ते बाजारात यायला वेळ लागणार नाही.

    मसाले व्यवसायास ब्रँड नाव हवे. मसाल्यांच्या व्यवसायाच्या संधी, आवश्यक परवाने, ग्राइंडिंग मशीन गरजेचे असते. मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडरची मागणी सर्वाधिक आहे. लाल तिखटाचा वापर सर्व प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. भारतीय जेवणात लाल तिखटाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कच्च्या मालाच्या स्वरूपात लाल मिरची स्वतः खरेदी करा. मिरची बारीक करुन पूड वेष्टनबंद करावी. तुमची इच्छा असेल तर तुम्ही लाल तिखट विकत घेऊनही हा व्यवसाय करू शकता. यासाठी एखाद्या चांगल्या कंपनीकडून थेट पूड खरेदी करा. तुमचे ब्रँड नाव देऊन त्यांची विक्री करा. अशा प्रकारे व्यवसाय केल्याने कच्चा माल खरेदी करण्याचा, यंत्रसामग्रीवर होणारा खर्च आदींचा त्रास वाचतो.

    लाल मिरची पावडरला वर्षभर मागणी असते. ती वर्षातील 365 दिवस विकली जाते. खेड्यांपासून लहान-मोठ्या शहरांपर्यंत त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची वाढती मागणी पाहता हा व्यवसाय सुरू करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. लाल मिरची पावडर बनविण्याच्या व्यवसायातून होणारा नफा पाहता अनेक लहान-मोठ्या कंपन्या लाल तिखटाचा व्यवसाय करीत आहेत. अख्खी लाल मिरची आणून स्वतः दळून घ्यायची असेल तर कच्च्या मालामध्ये अख्खी लाल मिरची लागेल. कच्चा माल जितका चांगला तितका तुमच्या उत्पादनाचा दर्जा चांगला असतो. याशिवाय तिखट तयार करण्यासाठी ग्राइंडर मशीनची आवश्यकता असेल. मिरची पावडर उद्योग सुरू करण्यासाठी चांगल्या प्रतीची लाल मिरची असली पाहिजे. कच्च्या मालाची गुणवत्ता जितकी चांगली तितकी पावडर बनते. बाजारात त्याची विक्रीही अधिक आहे.

    बाजारात अनेक आकारांची लहान-मोठी मसाला ग्राइंडर मशीन उपलब्ध आहेत. तुम्हाला घरबसल्या छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर एक छोटे यंत्र खरेदी करा. मसाला ग्राइंडर मशीन व्यतिरिक्त तुम्हाला वेष्टनबंद करण्यासाठी तसे यंत्र खरेदी करावे लागेल. यासोबतच मसाल्यांचे वजन करण्यासाठी वजन यंत्र असणेही गरजेचे आहे. या सर्व छोट्या यंत्रांच्या मदतीने गृहोद्योग म्हणून लाल तिखटचा व्यवसाय सुरू करता येईल. मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू करण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित मशीन देखील घेऊ शकता. ज्यामध्ये ग्राइंडिंग, वजनमाप आणि पॅकिंग हे सर्व एकाच प्रक्रियेत आपोआप होते. मिरची पावडर बनविण्याच्या यंत्राची निवड युनिटच्या प्रमाणानुसार केली जाते. बाजारातून घाऊक दराने सुकी लाल मिरची खरेदी करा. छोट्या प्रमाणात व्यवसाय करायचा असेल तर शहरातील घाऊक बाजारातून लाल मिरची खरेदी करा. जवळच्या गावात उत्पादन केले तर तेथूनही विकत घेता येते.

    जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल, तर हंगामातच वस्तू खरेदी करा; जेणेकरून वर्षभर विक्री करता येईल. लाल मिरचीचे उत्पादन अधिक असलेल्या शहरातील घाऊक बाजारातून खरेदी करण्याऐवजी तेथे जाऊन थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करा. प्रथम लाल मिरच्या स्वच्छ करुन घ्या. जेणेकरून दळताना त्यात कचरा राहणार नाही. मिरचीची साफसफाई स्वहस्तेसुध्दा केली जाते. आजकाल मिरचीचे देठ साफ करण्याचे यंत्रही बाजारात आले आहे. यंत्राच्या सहाय्याने दोन ते चार क्विंटल मिरची एकाच वेळी कमी वेळात साफ करता येते. साफसफाई केल्यानंतर मिरच्या उन्हात चांगल्या वाळवाव्यात. बारीक केल्यानंतर पावडर वेष्टनबंद करावी. या व्यवसायासाठी फर्म नोंदणी, एमएसएमई नोंदणी, ट्रेडमार्क नोंदणी, जीएसटी नोंदणी, व्यापार परवाना लागेल.

    कोणत्याही व्यवसायासाठी परवाना, विपणन खूप महत्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही उत्पादनाचे विपणन करीत नाही, तोपर्यंत तुम्हाला व्यवसाय वाढवता येणार नाही. लाल मिरची पावडर व्यवसायाच्या विपणनासाठी सर्वप्रथम तुमचे शेजारी, नातेवाईक, मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींमध्ये तुमच्या व्यवसायाची प्रसिद्धी करावी. तुमच्या शहरातील किराणा दुकाने आणि मसाल्यांच्या दुकानांना त्याचा पुरवठा करावा. लाल तिखट विक्रीसाठी सुरुवातीला थोडी मेहनत करावी लागेल. सुरुवातीला व्यवसाय छोटा आणि नवीन असल्याने कमाईही कमी होते. जसजसा व्यवसाय वाढतो तसतसा कमाईचा आकडाही वाढत जातो.

  • यु ट्युब एक व्यवसायाचे माध्यम

    यु ट्युब एक व्यवसायाचे माध्यम

    यु ट्यूब हे व्यवसायाचे एक उत्तम माध्यम बनले आहे. यु ट्यूबवर दररोज लाखो लोक व्हिडिओ तयार करुन शेअर करण्यात गुंतलेले असतात. नवीन चॅनेल वाढवणे सोपे नाही, परंतु योग्य रणनीती आणि कठोर परिश्रम घेऊन आपण आपले यु ट्यूब चॅनेल विकसित करुन आर्थिक कमाई करु शकता. गेन यु ट्यूब हा एक नवीन डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जो वापरकर्ते व्हिडिओ शेअर करण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ब्राउझ करण्यासाठी वापरतात. गेन यु ट्यूब व्हिडिओवरुन आपण यु ट्यूब व्हिडिओ सहजपणे डाऊनलोड करू शकता. ते आपल्या डिव्हाइसवर सेव्ह करू शकता. याव्यतिरिक्त, गेन यूट्यूब व्हिडिओंना वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये रूपांतरित करण्याची परवानगी देते. आपण उच्च दर्जाचे एचडी, एमपी ४, ३ जीपी आणि इतर फॉरमॅटमध्ये व्हिडिओ डाउनलोड करू शकता.

    गेन यूट्यूब वापरणे खूप सोपे आहे. सर्व प्रथम, गेन यूट्यूब संकेतस्थळावर जावे. आता आपणांस डाउनलोड करायच्या असलेल्या यु ट्युब व्हिडिओची युआरएल लिंक कॉपी करा. यु ट्युब संकेतस्थळावर पेस्ट करा. त्यानंतर चाचणी बटणावर क्लिक करा. भिन्न व्हिडिओ स्वरूप रूपांतरित करण्यासाठी आपल्या आवडीचे स्वरूप निवडा. डाउनलोड बटणावर क्लिक करा, आणि व्हिडिओ आपल्या डिव्हाइसवर सेव्ह करा. यु ट्युब हा एक उत्तम व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये अनेक प्रमुख वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. गेन यु ट्युब आपल्याला व्हिडिओ अपडेट करण्याची सुविधा देते. आपल्याकडे जुन्या आवृत्त्या असल्यास आणि त्या नवीनतम आवृत्तीवर अपडेट करायच्या असल्यास, आपण त्या सहजपणे अपग्रेड करू शकता. आपले व्हिडिओ वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये रूपांतरित करू शकता. आपण उच्च दर्जाचे व्हिडिओ डाउनलोड करू शकता, जे सुंदर रंग, चित्र आणि गुणवत्ता प्रदान करतात. गेन यु ट्युब हा एक विनामूल्य व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये आपण व्हिडिओ शेअर करू शकता, पाहू शकता, आणि डाऊनलोड करू शकता.

    गेन यु ट्युब प्रिमीयम ही एक विशेष विपणन सेवा आहे, जी तुम्हाला जाहिरातमुक्त व्हिडिओ आणि इतर वैशिष्ट्यांचा आनंद घेऊ देते. हे आपण मासिक किंवा वार्षिक कालावधीसाठी घेऊ शकता. यामुळे जाहिरातींशिवाय तुमच्या आवडत्या व्हिडिओंचा आनंद घेण्यास मदत होते. ठराविक कालावधीसाठी ऑफलाइन मोडमध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची अनुमती असते. हे तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर व्हिडिओ सेव्ह करण्याची परवानगी देते, जेणेकरून तुम्ही ते इंटरनेटशिवाय देखील पाहू शकता. येथे वेगवेगळ्या विषयावरील व्हिडीओ बनवून आपण त्यांचा आनंद स्वत:सह इतरांनाही देऊ शकता.

  • हिवाळ्यात केळी पिकाची काळजी

    हिवाळ्यात केळी पिकाची काळजी

    महाराष्ट्रात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. विशेषत: खानदेशात केळीची लागवड महत्वपूर्ण असते. केळीच्या लागवडीसाठी 13 ते 40 अंश सेल्सिअस तापमान असणे आवश्यक असते. हिवाळ्याच्या काळात या पिकास फार जपावे लागते.

    जेव्हा किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाते, तेव्हा केळीच्या झाडातील द्रव पदार्थाचा प्रवाह थांबतो, त्यामुळे केळीच्या झाडाची वाढ खुंटते आणि अनेक रोग दिसू लागतात. कमी तापमानामुळे केळीचा घड बाहेर येण्यास प्रतिबंध होतो. कॅल्शियम आणि बोरॉनच्या कमतरतेमुळे देखील समान लक्षणे उद्भवू शकतात. याला स्थानिक भाषेत ‘गळा दाबणे’ असेही म्हणतात. केळीचा घड परिपक्व होण्यासाठी कधी-कधी ५-६ महिने लागतात. केळीच्या लागवडीमध्ये थंडीचा वनस्पतींच्या आरोग्यावर आणि उत्पादकतेवर लक्षणीय परिणाम होतो. केळी हे एक उष्णकटिबंधीय वनस्पती असल्याने कमी तापमानाच्या संपर्कात आल्यावर थंडीमुळे होणारे नुकसान होण्याची अधिक शक्यता असते. थंडीमुळे झाडांची वाढ, विकास आणि एकूण उत्पादनावर परिणाम होतो. केळीच्या शेतीतील थंड नुकसानीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी कारणे व लक्षणे समजून घेणे आणि सुधारात्मक उपायांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. केळीच्या लागवडीमध्ये थंडीचा वनस्पतींच्या आरोग्यावर आणि उत्पादकतेवर लक्षणीय परिणाम होतो. हे पिक थंडीमुळे होणारे नुकसान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानास संवेदनशील असते. केळीच्या झाडांना दव नुकसानकारक ठरतो. ज्यामुळे पाने आणि देठांवर परिणाम होतो.

    थंडीत झालेल्या नुकसानीची लक्षणे :
    पानांचा रंग मंदावणे : यात पाने पिवळी किंवा तपकिरी होतात.
    पेशींचे नुकसान : बर्फाच्या स्फटिकांच्या निर्मितीमुळे वनस्पती पेशींचे नुकसान होते.
    वाढ खुंटणे : थंडीमुळे झाडांची वाढ आणि विकास मंदावतो.

    शेतकऱ्यांनी काय करावे ?
    जागेची निवड : या मातीत हवा खेळती असायला हवी. चांगला निचरा असलेली जागा निवडावी .
    विंड ब्रेक : थंड वाऱ्याचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘विंड ब्रेक’ लावा.
    मल्चिंग : माती उबदार ठेवण्यासाठी झाडांच्या मुळावर सेंद्रिय खते वापरावीत.
    सिंचन : योग्य वेळी पुरेसे सिंचन करावे.
    योग्य छाटणी : झाडाच्या नवीन वाढीस चालना देण्यासाठी खराब झालेली किंवा मृत पाने काढून टाकत रहा. झाडांना मजबूत करण्यासाठी पोषक पातळी राखा. पाणी व्यवस्थापन : जास्त पाणी देणे टाळावे, कारण पाणी साचलेली माती दवामुळे होणारे नुकसान वाढवू शकते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की केळी हे एक असे पीक आहे ज्याला पुरेशा प्रमाणात पाण्याची गरज असते, संपूर्ण वर्षभर केळीच्या शेतातील माती नेहमी ओलसर राहणे महत्वाचे आहे. खराब झालेल्या ऊतींची छाटणी करावी. झाडांच्या वाढीस चालना देण्यासाठी पाने आणि देठांची छाटणी करावी. थंडीच्या काळात झाडांवर आच्छादने ठेवल्यास संरक्षण मिळू शकते. हीटर वापरल्याने थंडीपासून होणारी इजा टाळता येते.

    नियमितपणे झाडांचे निरीक्षण करीत रहा. पोषकतत्वे वाढवा. बरे होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पोटॅशियम आणि फॉस्फरस समृद्ध खत वापरा. हिवाळा सुरू होण्यापूर्वी केळीच्या लागवडीची हलकी नांगरणी आणि शिफारस केलेल्या खतांचा वापर केल्याने देखील या विकाराची तीव्रता लक्षणीयरीत्या कमी होते. वनस्पतींना नैसर्गिकरित्या बरे होण्यासाठी भरपूर वेळ द्या.
    वाढीव थंड-प्रतिरोधक केळीच्या जातींची लागवड करावी. उंच केळीच्या जाती बटू जातींपेक्षा थंडीला अधिक सहनशील असतात, असे म्हणतात.

  • नेपाळी आलू तारेको

    नेपाळी आलू तारेको

    साहित्य : 500 ग्रॅम बटाटे, पाव लहान चमचा मेथी दाणे ,४ सुक्या लाल मिरच्या, अर्धा लहान चमचा हळद पावडर, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट,अर्धा मोठा चमचा धणेपूड, 2 लहान चमचे लाल मिरची पावडर, 1 चिमूट मिरपूड, ३ मोठे चमचे तेल, मीठ चवीनुसार.

    पदार्थ बनवायला सुरुवात करण्यासाठी बटाटे सोलून धुवा आणि जाड काचऱ्यांमध्ये कापून घ्या. पाण्यात भिजवून बाजूला ठेवा. एका पॅनमध्ये 2 चमचे (शक्यतो) मोहरीचे तेल जास्त आचेवर गरम करा. आता आच कमी करून त्यात मेथी आणि सुक्या लाल मिरच्या टाकून तडतडू द्या. पाण्यातून निथळलेल्या बटाट्याच्या फोडी त्यात हळद, मीठ घालून चांगले ढवळून घ्या. हे बटाटे या फोडणीत वाफेवर शिजवा. आता शिजलेले बटाटे एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा. त्याच कढईत एक चमचा मोहरीचे तेल टाकून गरम करा. त्यात आले आणि लसूण पेस्ट घालून कच्चा वास निघेपर्यंत परतून घ्या. त्यावर धणेपूड, तिखट घालून चांगले परता. बटाटे पुन्हा पॅनमध्ये घाला आणि ते मसाले चांगले लागेपर्यंत नीट ढवळून घ्या. आता हे सारण 10 मिनिटे मंद आचेवर परता. ते कुरकुरीत होतात.