गडगडा किल्ला

नाशिकपासून साधारणपणे १८ किलोमीटर अंतरावर ‘गडगड सांगवी’ हे एक गाव आहे. या गावाच्या मागे ‘अंबोली पर्वत’ नावाने प्रसिद्ध असणारी डोंगररांग आहे. या पर्वतरांगेत तीन शिखरांनी डोके वर काढलेले दिसते. उजवीकडील शिखर ‘अंबोली‘ व डावीकडील शिखर ‘अघोरी’ या नावाने ओळखले जात असून या दोन शिखरांमध्ये ‘गडगडा किल्ला’ आहे. हा किल्ला टेहळणीसाठी बांधला असावा, असे दिसते.

‘गडगड सांगवी’ गावामागून या किल्ल्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने गेल्यावर पायर्या असलेली विहीर मिळते. विहिरीजवळ शिवलींग व नंदी आहे. या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून सरळ जाणारी वाट किल्ल्याकडे जाते. उजवीकडेील वाट हनुमान मंदिराकडे जाते. या मंदिरात मुक्काम करता येतो. या किल्यावलवर चालत जाताना दगडात खोदलेली ३ फुटी उंचीची गुहा पहायला मिळते. ही मानवनिर्मित गुहा असून आत रांगत जावे लागते. स्थानिक लोक याला भुयार म्हणतात.

किल्ल्याच्या माथ्यावर उद्ध्वस्त प्रवेशद्वार व देवड्या पहायला मिळतात. येथून दगडात कोरलेल्या पायर्या खाली उतरताना दिसतात. प्रवेशद्वार पाहून पुढे गेल्यावर कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. या ५ टाक्या असून आत उतरण्यासाठी पायर्या आहेत. या टाक्यांतील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून पुढे गेल्यावर उध्वस्त वास्तू दिसतात. या गडावरुन आजूबाजूचा विस्तीर्ण प्रदेश दिसतो. गडगड सांगवी गावात एसटी जात नाही. वाडीव्हीरेला उतरुन ४ किमी चालत गडगड सांगवी गावात जावे लागते. खासगी वाहनाने गडगड सांगवी गावापर्यंत जाता येते.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
22,656 वेळा पाहिलं