पुण्यातील बालाजी मंदिर

दक्षिणेकडील तिरुमला, तिरुपती येथील प्रसिद्ध असलेले श्री बालाजी मंदिर प्रतिकृती पुण्यात आहे. नारायणपूरजवळ केतकवळे येथे हे मंदिर आहे. हे गाव पुरंदर किल्ल्याच्या परिसरात वसलेले असून निसर्गरम्य क्षेत्रात आहे. येथे जाणारा मार्ग हिरव्यागर्द शेतांतून जातो. नदीनाले आणि अनेक लहान-मोठ्या धबधब्यांचे यावेळी दर्शन होते. लोक याला ‘प्रति बालाजी मंदिर’ आणि ‘मिनी बालाजी मंदिर’ असेही म्हणतात. पुणे-बेंगळुरु महामार्गाच्या बाजूला नारायणपूर जवळ हे मंदिर आहे. पुणे रेल्वेस्थानक आणि बसस्थानकापासून सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. या मंदिराचा परिसर सुमारे २३ एकराचा आहे.

या मंदिरात शुध्दी आणि एकांतसेवा विधी दररोज होतात. दर शुक्रवारी मंदिरात अभिषेक आणि उंजल-सेवा केली जाते. येथे भाविक अन्नदान, मिठाई खरेदी करुन देवाला अर्पण करू शकतात. मोफत महाप्रसादाचा आनंद देखील घेऊ शकतात. वेंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्टने सन 1996 ते सन 2003 या काळात हे मंदिर बांधले. या मंदिराच्या बांधकामासाठी 27 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या बालाजी मंदिरातील सर्व पूजा आणि सेवा तिरुपती बालाजी मंदिरातील पुजारी करतात. भाविकांना प्रसाद म्हणून लाडू मिळतात. या मंदिरात रामनवमी, विजया दशमी आणि दीपावली सारखे सण देखील साजरे केले जातात. वैकुंठ एकादशी, कानू पोंगल आणि गुढीपाडवा देखील येथे साजरा केला जातो.

एप्रिल आणि मे हे या प्रदेशातील सर्वात उष्ण महिने आहेत. जेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. येथे हिवाळा कडक असतो. रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते. पुणे जंक्शन हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. येथून मंदिरात टॅक्सीने जाता येऊ शकते. पुण्यापासून बालाजी मंदिरात जाण्यासाठी अनेक प्रकारची खासगी वाहने उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे बसनेही प्रवास करून सहज पोहोचता येते. विमानाने प्रवास करीत असल्यास सर्वात जवळचे पुणे विमानतळ आहे.







13,962