अपघात रोखण्यासाठी समृद्धी महामार्गावर सीसीटीव्ही बसवणार

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहनांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावरील वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. जवळपास एक हजार पाचशे कॅमेरे समृद्धी महामार्गावर लावण्यात येणार आहेत. सध्या या सातशे एक किलोमीटरच्या महामार्गावर सुविधा निर्माण करण्यासाठी काम केले जात आहे.

प्रत्येक एक किलोमीटरच्या अंतरावर एक सीसीटीव्ही कॅमेरा लावला जात आहे. प्रत्येक कॅमेऱ्याची रेंज अंदाजे पाचशे मीटर पर्यंत असेल. वाहनांची वेग मर्यादा ओलांडणाऱ्या बेशिस्त चालकांना लगाम घालणे. अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि महामार्गावर सुरक्षितता वाढवणे. अपघात झाल्यास तातडीने अचूक लोकेशन नियंत्रण कक्षाला देणे, जेणेकरून मदत वेळेवर पोहोचू शकेल. यासाठी हे कॅमेरे बसवण्यात येत आहेत.

समृद्धी महामार्गावरील दीड हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा हा याआधी अनेक महामार्गांवर यशस्वी झालेल्या उपक्रमांवर आधारित आहे. या कॅमेऱ्यांमध्ये प्रखर भेदन क्षमता आहे, ज्यामुळे ते वेगात असलेल्या वाहनांचे क्रमांक अचूकपणे टिपू शकतात. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाईन माध्यमातून ई-चलन पाठवले जाईल. या सीसीटीव्ही प्रणालीच्या नियंत्रणासाठी ठाणे येथे एक विशेष नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. यामुळे या महामार्गावरील व्यवस्थापन सुधारले जाईल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल. अपघाताचा शक्यता कमी होईल आणि सुरक्षिततेची भावना वाढेल. या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात सुरक्षित आणि तंत्रज्ञान-आधारित महामार्गांपैकी एक बनण्याची अपेक्षा आहे.

हा सर्व उपक्रम आधुनिक तंत्रज्ञान-आधारित प्रणाली भाग असून, समृद्धी महामार्गाला अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञान-आधारित बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.






21,810 वेळा पाहिलं