छठ पूजेला जागतिक दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार सज्ज

बिहारच्या संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचं प्रतीक असलेला छठ महापर्व आता जागतिक मान्यतेच्या उंबरठ्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील प्रचारसभेत बोलताना, छठ पूजेला युनेस्कोच्या “अमूर्त सांस्कृतिक वारसा” दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “छठ पूजा हा केवळ धार्मिक सण नसून, तो मातृशक्तीचा सन्मान आणि निसर्गाशी असलेलं भारतीय समाजाचं घट्ट नातं दर्शवणारा उत्सव आहे. सूर्यदेवतेची आणि जलतत्त्वाची उपासना करणारा हा उत्सव भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं अद्भुत दर्शन घडवतो. त्यामुळे या परंपरेला जागतिक स्तरावर सन्मान मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

छठ पूजेला बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि नेपाळ सीमावर्ती प्रदेशात अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो. चार दिवस चालणाऱ्या या पर्वात महिलांचा कठोर उपवास, निसर्गपूजा आणि सामूहिक श्रद्धा व्यक्त करणाऱ्या विधीमुळे भारतीय संस्कृतीची एकात्मता अधोरेखित होते.

केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे केवळ छठ पूजेलाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय संस्कृती, लोकपरंपरा आणि स्त्रीशक्तीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या घोषणेनंतर बिहारसह देशभरातील भाविकांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.






18,497 वेळा पाहिलं