अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्रात येणार

राज्यात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पिके, घरे, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारकडून सात सदस्यीय उच्चस्तरीय पथक महाराष्ट्रात दाखल होत आहे. हे पथक राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहे.

या पथकात कृषी, जलशक्ती, वित्त आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. पथकाचे नेतृत्व ए. एल. वाघमारे – कृषी विभाग संचालक करत असून, त्यांच्यासोबत व्ही. पटेल, सत्येंद्र प्रताप सिंह, विशाल पांडे, अभिषेक कुमार करण सरीन आणि डॉ. एस. व्ही. एस. पी. शर्मा हे अधिकारी आहेत. हे अधिकारी चार नोव्हेंबरपासून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देणार असून, तेथील नुकसानाचे प्राथमिक व सविस्तर अहवाल तयार करतील.

अतिवृष्टीमुळे विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. नद्यांचे प्रवाह बदलले, अनेक गावांमध्ये पाणी शिरले आणि हजारो एकरांवरील शेती पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांचे हंगामी पिके जसे की कापूस, सोयाबीन, ज्वारी आणि बाजरी पूर्णपणे नष्ट झाली आहेत. यासोबतच रस्ते, पूल, वीजपुरवठा, शाळा आणि आरोग्य केंद्रांनाही मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली आहे.

राज्य प्रशासनाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करून केंद्राला सादर केला आहे. त्यानंतर केंद्राने या पथकाची नियुक्ती करून सखोल सर्वेक्षणाची तयारी केली आहे. पथक प्रत्यक्ष पाहणी करून किती नुकसान झाले, किती शेतकरी बाधित आहेत आणि कोणत्या प्रकारची मदत आवश्यक आहे, याचे मूल्यांकन करणार आहे.

राज्य सरकारकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, या पाहणीनंतर केंद्र शासन लवकरच आर्थिक मदतीची घोषणा करेल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि पुनर्वसनाच्या कामांना गती देण्यासाठी हे पथक महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातही या दौऱ्याबद्दल आशा निर्माण झाली असून, नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.






19,346 वेळा पाहिलं