शेतकरी कर्जमाफीसाठी चक्का जाम आंदोलन जाहीर

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

बच्चू कडू यांनी याआधी अमरावती येथे उपोषण केले होते. त्या वेळी सरकारने त्यांना लेखी आश्वासन दिले होते की पंधरा दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती स्थापन करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, यानंतरही ठोस निर्णय न घेतल्याने त्यांचा संताप उफाळून आला असून त्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

या आंदोलनाला मनोज जरांगे, राजू शेट्टी, रोहित पवार यांसारख्या नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. शेतकरी कर्जमाफी ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असून, फक्त योजना जाहीर करून वेळकाढूपणा केला जात आहे, अशी टीका या नेत्यांकडून झाली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

बच्चू कडू म्हणाले की, “जर २४ जुलैपूर्वी सरकारने स्पष्ट निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन पुढे २ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवले जाईल.” त्यांनी स्पष्ट केलं की, फक्त घोषणा आणि लेखी आश्वासन चालणार नाही, तर कृती अपेक्षित आहे. शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात आहेत आणि त्यांना तातडीची मदत गरजेची आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसेल, तर राज्यात शांतता बिघडण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला. आता सर्वांचे लक्ष २४ जुलै रोजी होणाऱ्या या चक्का जाम आंदोलनाकडे लागले आहे. हे आंदोलन शांततेने पार पडेल, पण त्यातून सरकारला ठोस संदेश जाईल, असे कडू यांनी स्पष्ट केले.






197 वेळा पाहिलं