देवगडच्या हापूसला बदलत्या हवामानाचा फटका – बागायतदार चिंतेत

कोकण किनारपट्टीवर यंदा हवामानातील अनिश्चितता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. कडाक्याची थंडी पडण्याऐवजी वातावरणात वारंवार होणारे बदल, ढगाळ वातावरण आणि अनपेक्षित उष्णता यामुळे आंब्यावर परिणाम झाला आहे. देवगड हापूसच्या बागांमध्ये यंदा मोहोर चांगल्या प्रमाणात आलेला असूनही त्याचे फळात रूपांतर होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. आंब्याला पोषक अशी थंडी यंदा वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पडली नाही. दिवसा कडाक्याचे ऊन आणि रात्री अचानक वाढणारा गारवा यामुळे मोहोराची गळ झाली आहे. यामुळे हे आंब्यावर परिणाम झालेला असल्याचे मत हवामान तज्ज्ञ आणि अनुभवी बागायतदारांनी मांडले आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर तुडतुडे आणि भूरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रतिकूल हवामानामुळे कीटकनाशकांच्या अनेक फवारण्या करूनही रोगांवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे, ज्याचा परिणाम फळधारणेवर झाला आहे.

देवगड हापूस हा जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, फळधारणा कमी झाल्यामुळे यंदा उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यांची घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वारंवार कराव्या लागणाऱ्या औषध फवारण्यांमुळे बागायतदारांचा उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्जे काढून बागा जोपासल्या आहेत. उत्पादन कमी झाल्यास कर्जफेडीचा प्रश्न गंभीर होणार आहे.

सद्यस्थिती कठीण असली तरी बागायतदारांनी खचून न जाता शास्त्रीय व्यवस्थापनावर भर द्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. फळधारणेच्या काळात झाडांना योग्य प्रमाणात पाणी आणि फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेलीच औषधे वापरावीत, जेणेकरून झाडांचे आरोग्य टिकून राहील. पुढील टप्प्यातील फळधारणा टिकवण्यासाठी खत आणि पाण्याचे चोख नियोजन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. हवामान बदलाचा फटका दरवर्षी बसू लागल्याने, आता आंबा पिकासाठी नवीन संशोधन होण्याची गरज बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी पायाभूत सुविधा आणि शासनाकडून ठोस आर्थिक मदतीची अपेक्षा कोकणातील शेतकरी करत आहेत.






24,822 वेळा पाहिलं