पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर

पुण्यातील अनेक धार्मिक वास्तू प्राचीन असून प्रेक्षणीय आहेत. त्या पाहण्यासाठी येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. असेच एक टेकडीवर विसावलेले चतु:श्रृंगी देवीचे मंदिर आहे. पुणे शहरातील श्री चतु:श्रृंगी देवी ही पार्वतीचा अवतार असलेल्या श्री दुर्गादेवीचे रुप मानले जाते. हे मंदिर पुण्यातील सेनापती बापट मार्गावर आहे. चतु:श्रृंगी याचा अर्थ चार शिखरे असलेला डोंगर किंवा पर्वतावर विराजमान झालेली असा होतो. हे देवीचे मंदिर अशाच एका टेकडीवर असून वर जाण्यासाठी सुमारे १७० पायऱ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे मंदिर बांधले गेले, असे मानले जाते. मंदिराची उंची अंदाजे 90 फूट आणि रुंदी अंदाजे 125 फूट आहे.

या मंदिराबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते. त्यानुसार धुर्लबशेठ पितांबरदास महाजन नावाचे एक व्यापारी होते. ते वाणी येथील श्री सप्तश्रृंगी देवीचे निस्सीम भक्त होते. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ते वणीला दर्शनासाठी जात असत. पुढे वृद्धापकाळामुळे त्यांना मंदिरात जाता येणे अशक्य होऊ लागले. आपल्या आवडत्या देवीचे दर्शन होत नसल्याने ते व्यथीत होते. ते नित्यनेमाने श्री दुर्गादेवीची प्रार्थना करीत. एके दिवशी, श्री दुर्गादेवीने त्यांना स्वप्नात येऊन सांगितले, की ती स्वतऱ् येऊन त्यांना दर्शन् देईल. पुण्याच्या उत्तर-पश्चिम बाजूस तिने एक जागा दाखवून तिथ आपण असल्याचे सांगितले. स्वप्नातून जागे आल्यावर या व्यापाऱ्याने त्याठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली. जमिनीत उत्खनन केले असता त्यांना तिथे श्री दुर्गादेवीची स्वयंभू मूर्ती मिळाली.

त्याच टेकडीवर या व्यापाऱ्याने देवीचे मंदिर बांधले. तेच हे मेदिर, असे भाविक सांगतात. देवीच्या मुख्य गाभार्यात श्री दुर्गा देवीच्या .एक सोनेरी रंगाची आणि दुसरी चांदीची अशा दोन मूर्ती आहेत. येथे श्री गणेशाचे गर्भगृह देखील आहे. याशिवाय अष्टविनायकाच्याही लघु मूर्ती आहेत. मुख्य गाभाऱ्यातील देवीला चतु:श्रृंगी आणि श्री अंबरेश्वरी असेही म्हणतात. तिला श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वतीचे रूप मानले जाते.

या मंदिरात नवरात्री तसेच देवीशी संबंधित सर्व सण भक्तिभावाने साजरे केले जातात. मंदिराच्या पायथ्याशी जत्रा भरवली जाते. विजयादशमीच्या दिवशी चांदीच्या मूर्तीची चांदीच्या रथावरुन मिरवणूक काढली जाते. दिवाळी, होळी आणि गणेश चतुर्थी हे मंदिरात साजरे होणारे इतर सण आहेत. वटपौर्णिमेच्या वेळी महिला मंदिराच्या आवारात असलेल्या वटवृक्षाची पूजा करतात. या मंदिराचा कारभार चतु:श्रृंगी मंदिर ट्रस्टद्वारे केला जातो. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुले असते. पुणे शहरातून लोकल बस, तसेच रिक्षाने या मंदिरापर्यंत सहज जाता येते.