
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात असलेल्या बन्नी गवताळ प्रदेशात चित्त्यांचे पुनर्वसन करण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. वनविभागाने येथे आवश्यक असलेली सर्व रचना उभारली असून, येत्या काही महिन्यांत दहा चित्त्यांना या भागात सोडण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रामध्ये संरक्षण भिंती, तात्पुरते निवास, क्वारंटाईन पिंजरे, आणि अन्नसाखळी विकसित केली आहे. चिंकारा, काळवीट, सांबर यांसारख्या शिकार प्रजातींची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत, जेणेकरून चित्त्यांना नैसर्गिक अन्नस्रोत सहज उपलब्ध होईल.
पूर्वी बन्नी भागात चित्त्यांचे अस्तित्व होते, मात्र १९४०च्या दशकात मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचे पूर्णपणे उच्चाटन झाले. आता ‘प्रोजेक्ट चित्ता’ अंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली या भागात चित्त्यांना पुन्हा वस्ती करण्याची संधी दिली जात आहे. हे भारतातील दुसरे अधिकृत चित्तापुनर्वसन क्षेत्र ठरणार आहे.
प्राथमिक टप्प्यात पाच नर आणि पाच मादी चित्त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे, असे वन विभागाने स्पष्ट केले. पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प आणखी पण 2 हेक्टर क्षेत्रात विस्तारण्याची योजना आहे. चित्त्यांच्या हालचाली, आरोग्य आणि परिसरातील जैवविविधता यावर सतत देखरेख ठेवली जाणार आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक मालधारी समाजालाही रोजगार आणि इको-पर्यटनाच्या माध्यमातून फायदा होणार आहे. मात्र काही पर्यावरणतज्ज्ञांनी पाण्याचा साठा, हवामान आणि शिकार प्रजातींची साखळी पुरेशी आहे का? यावर चिंता व्यक्त केली असून, चित्त्यांच्या सुरळीत पुनर्वसनासाठी वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षणाची गरज असल्याचे मत मांडले आहे.