नागपूरातील ॲग्रो व्हिजन प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांची भेट

मध्य भारतातील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या ‘ॲग्रो व्हिजन–दोन हजार पंचवीस’ या कृषी प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रदर्शनाला शेतकरी, उद्योजक आणि कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटीदरम्यान विविध दालने पाहून शेतीस उपयुक्त अशा तंत्रज्ञानात्मक साधनांची आणि कृषी उत्पादनांची माहिती घेतली. शेतीतील नवनवीन बदल, आधुनिक यंत्रसामग्री तसेच पूरक उद्योगांबाबत प्रदर्शकांशी संवाद साधत त्यांनी कृषी क्षेत्रातील बदलत्या घडामोडी जाणून घेतल्या.

प्रदर्शनाच्या कार्यालयात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी ‘ॲग्रो व्हिजन’चे प्रणेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, बारामती कृषी विकास ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार, अॅग्रो व्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर तसेच सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी हे उपस्थित होते. ‘ॲग्रो व्हिजन’चे हे सोळावे वर्ष असून फाऊंडेशनच्या दशकपूर्ती निमित्त तयार करण्यात आलेल्या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदर्शनीतील विविध संस्था, संशोधन केंद्रे आणि कृषी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या दालनांना भेट दिली. प्रत्येक दालनात त्यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या आधुनिक उपाययोजना, संशोधन आधारित उत्पादने आणि नव्या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली.

मुख्यमंत्री फडणवीस यांची ही भेट प्रदर्शनाच्या आयोजकांसाठी तसेच शेतकरी समुदायासाठी प्रेरणादायी ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि अशा उपक्रमांमुळे शेती अधिक सक्षम, उत्पादनक्षम आणि स्पर्धात्मक होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.






997 वेळा पाहिलं