चीनकडून जर्मनीच्या विमानावर लेझर हल्ला

लाल समुद्राच्या आकाशात गस्त घालणाऱ्या जर्मनीच्या एक निगराणी विमानावर चीनच्या युद्धनौकेकडून लेझर किरणांचा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे लाल समुद्र परिसरात तणाव निर्माण झाला असून जर्मनीने चीनच्या राजदूतास तातडीने समन्स पाठवून अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

लाल समुद्र परिसरात युरोपियन संघटनेच्या संरक्षण मोहिमेअंतर्गत जर्मन विमान गस्त घालत होते. याचवेळी चिनी युद्धनौकेने विमानाच्या दिशेने तेजस्वी लेझर किरण सोडले, ज्यामुळे वैमानिकांची दृश्यक्षमता धोक्यात आली आणि विमानाचे नियंत्रण काही काळासाठी अडचणीत आले. नंतर पायलटने विमानाची दिशा वळवून डिजिबोती येथील हवाई तळावर सुरक्षितपणे उतरण्याचे पाऊल उचलले. सुदैवाने यामध्ये कोणतीही शारीरिक हानी झाली नाही. मात्र हल्ल्याच्या स्वरूपामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा तीव्र निषेध करताना म्हटले, “ही कृती पूर्णतः अस्वीकार्य असून जबाबदारीची अपेक्षा असलेल्या देशाने अशा प्रकारे वागणे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे.” त्यामुळे चीनच्या राजदूताला बोलावून जर्मन सरकारने आपली तक्रार स्पष्ट शब्दांत मांडली आहे. लाल समुद्र परिसरात हूथी बंडखोरांच्या वाढत्या हालचाली आणि समुद्री वाहतुकीवरील हल्ले यामुळे यापूर्वीच तणावाचे वातावरण होते. त्यात आता चीनच्या नौदलाने केलेल्या या कृतीमुळे स्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

पूर्वीही अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांच्यावर अशाच प्रकारच्या लेझर हल्ल्यांचे आरोप चीनवर झाले होते. त्यावेळी चीनने हे आरोप फेटाळले होते. मात्र यावेळी घटनेचा दृढ पुरावा आणि जर्मनीचा अधिकृत निषेध आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेमुळे चीन व युरोपियन देशांमधील संबंधांवर तणाव निर्माण होण्याची शक्यता असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर वैमानिक सुरक्षेबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर्मनीने घेतलेली ठाम भूमिका आणि चीनची प्रतिक्रिया काय असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.






19,743 वेळा पाहिलं