चीनने अमेरिकन वस्तूंवरील अतिरिक्त आयातशुल्क हटवले

चीनने अमेरिकन वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात दक्षिण कोरियात झालेल्या उच्च-स्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका इतर देशांवर अतिरिक्त आयात शुल्क आकारत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर ज्यादा आयात शुल्क आकारले. यानंतर अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर दीडशे टक्के आयात शुल्क आकारण्याची धमकी दिली. या व्यापार युद्धाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात दक्षिण कोरियात झालेल्या उच्च-स्तरीय बैठकीनंतर आता वर्षभरासाठी तरी पूर्णविराम लागला आहे.

चीनच्या राज्य परिषदेच्या शुल्क आयोगाने घोषणा केली आहे की, दहा नोव्हेंबरपासून अमेरिकेच्या विशिष्ट शेती उत्पादनांवरील पंधरा टक्क्यापर्यंतचे शुल्क हटवले जाईल. यामध्ये चिकन, गहू, मका, कापूस, ज्वारी, जलीय उत्पादने, फळे, भाज्या आणि दुग्धजन्य उत्पादने यांसारख्या मालाचा समावेश आहे. मात्र, अमेरिकेच्या सोयाबीन आयातीवर सध्याचे तेरा टक्के शुल्क कायम राहील. यामध्ये मूळ तीन टक्के मूलभूत शुल्काचा समावेश आहे. व्यापाऱ्यांच्या मते, या तेरा टक्के शुल्कामुळे ब्राझीलच्या पर्यायी सोयाबीनपेक्षा अमेरिकेचे सोयाबीन व्यावसायिक खरेदीदारांसाठी अजूनही खूप महाग राहील.

या निर्णयामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्धात तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही देशांच्या अध्यक्षांच्या भेटीनंतर आणि कर उठवल्याच्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. व्हाईट हाऊसने जाहीर केले की, चीनने 2025 च्या शेवटच्या दोन महिन्यांत किमान बारा दशलक्ष मेट्रिक टन आणि पुढील तीन वर्षांसाठी दरवर्षी किमान पंचवीस दशलक्ष मेट्रिक टन अमेरिकन सोयाबीन खरेदी करण्याचे वचन दिले आहे.

हे व्यापार युद्ध सुरू होण्यापूर्वी सोयाबीन हे चीनला होणारी अमेरिकेची सर्वात मोठी निर्यात होती. मात्र, चीनने यावर्षी अमेरिकेच्या पिकांची खरेदी मोठ्या प्रमाणात थांबवल्यामुळे अमेरिकेच्या शेतकऱ्यांना अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.






20,788 वेळा पाहिलं