चीनचा रेल्वे क्षेत्रात जागतिक विक्रम

चीनने हाय-स्पीड वाहतूक तंत्रज्ञानात एक नवा अध्याय लिहिला आहे. चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी एका अशा ट्रेनची चाचणी केली आहे, जिने वेग आणि गतीचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या प्रायोगिक ट्रेनने अवघ्या दोन सेकंदात सातशे किमी प्रतितास इतका प्रचंड वेग गाठून जगाला थक्क केले आहे.

मॅग्लेव्ह हे मॅग्नेटिक लेव्हिटेशनचे संक्षिप्त रूप आहे. या तंत्रज्ञानामध्ये ट्रेन आणि रूळ यांच्यात कोणताही प्रत्यक्ष संपर्क नसतो. ही ट्रेन चाकांवर चालण्याऐवजी शक्तिशाली चुंबकीय शक्तीच्या साहाय्याने रुळांपासून काही सेंटीमीटर वर तरंगते. रुळांशी संपर्क नसल्यामुळे घर्षण पूर्णपणे नाहीसे होते, ज्यामुळे ट्रेनला अतिशय वेगाने धावणे शक्य होते. या चाचणीत चीनने सुपरकंडक्टिंग इलेक्ट्रिक मॅग्लेव्ह प्रणालीचा वापर केला आहे. ही ऐतिहासिक चाचणी चारशे मीटर लांबीच्या विशेष मॅग्नेटिक ट्रॅकवर घेण्यात आली. ट्रेनने अवघ्या दोन सेकंदात सातशे किमी प्रतितास वेग गाठला. हा वेग डोळ्यांच्या पापण्या लवते ना लवते तोच गाठला गेल्याने ती केवळ एका प्रकाशाच्या झोतातून गेल्यासारखी वाटली. ही चाचणी सुमारे एक टन वजनाच्या प्रायोगिक वाहनावर करण्यात आली. इतक्या प्रचंड वेगाने धावल्यानंतर हे वाहन सुरक्षितपणे थांबवण्यातही शास्त्रज्ञांना यश आले आहे, जे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

हे यश मिळवण्यासाठी चिनी शास्त्रज्ञांनी गेल्या दहा वर्षांपासून सातत्यपूर्ण संशोधन केले आहे. साधारणपणे व्यावसायिक विमानांचा वेग आठशे ते नऊशे किलोमीटर प्रतितास असतो. चीनच्या या नव्या तंत्रज्ञानाने रेल्वेचा वेग आता विमानांच्या वेगाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर करून दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार आहे. तासनतासांचा प्रवास काही मिनिटांवर येईल. चीनमध्ये आधीच जगातील सर्वात मोठे हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क आहे. शांघायमध्ये सध्या कार्यरत असलेली मॅग्लेव्ह ट्रेन चारशे तीस किमी प्रतितास वेगाने धावते. मात्र, आता सातशे किमी प्रतितास वेगाची ही चाचणी चीनला या क्षेत्रात जागतिक स्तरावर अजिंक्य बनवत आहे. चीनच्या या प्रयोगामुळे हायपरलूप आणि व्हॅक्युम ट्यूब ट्रान्सपोर्टच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाँच तंत्रज्ञानाचा वापर केवळ रेल्वेसाठीच नाही, तर भविष्यात रॉकेट लाँच करण्यासाठीही होऊ शकतो. यामुळे अंतराळ मोहिमांसाठी लागणारे इंधन आणि खर्च कमी होण्यास मदत होईल.






13,630 वेळा पाहिलं