
देशातील संरक्षण आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत भारत सरकारने ड्रोन उत्पादनात चीनमधून आयात केलेले भाग वापरण्यावर बंदी घालण्याची तयारी केली आहे. यासाठी लवकरच नवीन नियमावली तयार करण्यात येणार आहे.
रक्षा, अंतर्गत सुरक्षा, तसेच नागरी वापरासाठी वापरले जाणारे ड्रोन हे देशाच्या सुरक्षेशी थेट संबंधित असल्याने, अशा ड्रोनमध्ये परकीय विशेषतः चीनसारख्या राष्ट्रांतून येणारे तांत्रिक भाग वापरणे धोकादायक ठरू शकते, असे सरकारचे स्पष्ट मत आहे.
ड्रोन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आता त्यांच्या वापरलेल्या प्रत्येक भागाचे मूळ उत्पादन केंद्र कोणते आहे, हे स्पष्ट करणे बंधनकारक असेल. विशेषतः जी यंत्रणा सुरक्षेसाठी वापरली जाते, ती पूर्णतः देशात तयार झालेली किंवा विश्वसनीय देशांतून आयात केलेली असावी, असा नियम केला जाणार आहे.
यामुळे देशातील ड्रोन निर्मिती क्षेत्राला अधिक स्वावलंबी बनवण्यास चालना मिळणार असून, देशांतर्गत उत्पादकांना प्राधान्य मिळेल. याशिवाय चीनसारख्या शत्रुराष्ट्रांकडून होणाऱ्या संभाव्य माहिती गळतीला रोखता येईल.
सध्या काही खासगी कंपन्या आणि सरकारी यंत्रणा चीनमधून आयात केलेले यंत्रांचे भाग वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने सरकारने या गोष्टीवर तात्काळ नियंत्रण आणण्याचे पाऊल उचलले आहे.
लवकरच या संदर्भातील सुरक्षा तपासणी, तांत्रिक निकष, आणि मान्यता प्रक्रियेचे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. हे नियम सर्व सरकारी खरेदी प्रक्रियांमध्ये बंधनकारक करण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे.