कोल्हापूरचा चिन्मय गणाधीश

पुणे-बंगळुरू महामार्गावर महाराष्ट्रात कोल्हापूरपासून 14 किलोमीटर अंतरावर ‘चिन्मय गणाधीश’ ही श्री गणेशाची संपूर्ण जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. सन 2001 मध्ये ही मूर्ती दर्शनासाठी खुली झाली. ‘चिन्मय संदीपन्य’ आश्रमात ही मूर्ती आहे. ही गणेशाची संपूर्ण जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. संपूर्ण रचनेत 24 फूट उंच अशा ध्यानमंदिरावर विराजमान असलेली 61 फूट उंचीची गणपती मूर्ती आहे. ध्यानमंदिराची वास्तू वर्तुळाकार आहे. मंदिराचा व्यास सुमारे 60 फूट आहे.

सिमेंट काँक्रीटची मंदिरासह 85 फूट उंच गणेशमूर्ती भाविकांचे श्रद्धास्थान आणि आकर्षण झाले आहे. एकूण 24 खांब गणेशमूर्तीला आधार देतात. शिमोगा-कर्नाटक येथून खास पाचारण करण्यात आलेल्या पन्नास कुशल कामगारांनी ही संरचना पूर्ण करण्यासाठी सुमारे एक वर्ष कठोर परिश्रम घेतले.

दिनांक 19 नोव्हेंबर 2001 रोजी स्वामी तेजोमयानंद यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र-गुजरात-गोवाचे प्रादेशिक प्रमुख स्वामी पुरुषोत्तमानंद यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय सेवा ट्रस्ट, महाराष्ट्राने हे काम पूर्ण केले. ‘चिन्मय गणाधीश’ हे आता तीर्थक्षेत्र बनले आहे. संकष्टी चतुर्थीला हजारो लोक याठिकाणी भेट देतात. दररोज सकाळी वैदिक मंत्रोच्चारासह भगवानाची पूजा केली जाते. संध्याकाळी आरती केली जाते.






292 वेळा पाहिलं