हवामानातील बदल आणि शहरीकरणाने पक्ष्यांचे अधिवास धोक्यात
दरवर्षी हिवाळ्याच्या सुरूवातीला सायबेरिया, युरोप आणि आफ्रिकेतील विविध देशांमधून स्थलांतरित पक्ष्यांचे थवे ठाणे आणि कल्याण परिसरात येत असतात. भोपर, कोपर, सातपूल आणि उंबार्ली टेकडी परिसर हे या पक्ष्यांचे पारंपरिक अधिवास ठरले आहेत. मात्र, यंदा हवामानातील बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे या भागात पक्ष्यांची उपस्थिती लक्षणीयरीत्या घटली आहे.
पक्षी निरीक्षकांच्या माहितीनुसार, दरवर्षी दिसणारे तलवार बदक, थापट्या, काष्ठ तुतवार, चक्रांग, मोठ्या ठिपक्यांचा गरुड अशा अनेक प्रजातींचे पक्षी या हंगामात फारच मोजक्या संख्येने आढळले आहेत. सतत बदलणारे हवामान, उशिरा पडणारा पाऊस आणि उबदार हिवाळा हे या घटते प्रमाणाचे प्रमुख कारण ठरत आहेत. थंडीचा जोर कमी असल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन उशिरा होत असून, त्यांचा मुक्कामही कमी कालावधीसाठी राहतो आहे.
हवामान बदलाबरोबरच नागरीकरणाचा झपाट्याने वाढणारा वेगही या समस्येचे आणखी एक कारण ठरले आहे. ठाणे आणि कल्याण परिसरातील भोपर, सातपूल आणि आसपासच्या नैसर्गिक जलक्षेत्रांमध्ये बांधकामे वाढल्याने पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. पाणथळ जागा कमी झाल्याने या स्थलांतरित पक्ष्यांना खाद्य आणि विश्रांतीसाठी जागा उपलब्ध राहिलेली नाही.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, हवामानातील असंतुलन आणि वाढती शहरीकरण ही जैवविविधतेसाठी गंभीर इशारा आहे. स्थलांतरित पक्ष्यांची संख्या घटणे म्हणजे पर्यावरणातील असंतुलनाची सुरूवात आहे. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जलक्षेत्रांचे संरक्षण, झाडांचे जतन आणि बांधकामांवर नियंत्रण आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
स्थानिक नागरिक, संशोधक आणि पर्यावरण संस्थांनीही या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे. या पक्ष्यांच्या परतीच्या प्रवासात बदल होऊ नये म्हणून त्यांच्या अधिवासांचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. अन्यथा, ठाणे आणि परिसरातील हे निसर्गरम्य पक्षीआगमनाचे दृश्य भविष्यात फक्त आठवणीपुरतेच राहण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.