पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी नोकरीत शंभर टक्के प्राधान्य

पुणे आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. या प्रकल्पासाठी जमिनीचा जास्तीत जास्त मोबदला देण्यात येईल आणि प्रकल्पबाधितांच्या वारसांना शंभर टक्के नोकरीत प्राधान्य दिले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या बाधित सात गावांतील ग्रामस्थांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, महसूल व उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, पुरंदर विमानतळ हे केवळ प्रवाशांसाठी नसून ते एक मोठे कार्गो हब असेल. यामुळे शेतीमाल आणि नाशवंत वस्तूंच्या निर्यातीला मोठी चालना मिळेल. या प्रकल्पामुळे पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात किमान दोन टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. नवी मुंबई विमानतळामुळे ज्याप्रमाणे त्या भागाचा कायापालट झाला, तसाच फायदा पुरंदर परिसरातील शेती, उद्योग आणि व्यापाराला होणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या सवलती जाहीर केल्या आहेत. रेडिरेकनरनुसार दर न ठरवता, वाटाघाटीद्वारे मूळ दरापेक्षा कितीतरी जास्त मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सिडको प्रकल्पात दिलेला साडेबावीस टक्क्यांचा लाभ पुरंदरमध्ये त्याहून अधिक देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भूसंपादनाचा मोबदला देण्यासोबतच पर्यायी जमीन देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. पूर्वी संपादित केलेल्या अतिरिक्त जमिनींवरील शिक्के काढले जातील, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

केवळ आर्थिक मोबदलाच नाही, तर प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या भविष्यासाठीही सरकारने मोठी पावले उचलली आहेत. बाधित भागातील तरुणांसाठी खास कौशल्य विकास केंद्र सुरू केले जाईल, जेणेकरून त्यांना विमानतळ आणि संलग्न उद्योगांमधील नोकऱ्यांसाठी प्रशिक्षित केले जाईल. घरांच्या पुनर्वसनावेळी सज्ञान मुलांसाठी अतिरिक्त जागा दिली जाईल. तसेच कुटुंबातील भगिनींच्या हिश्शाबाबतही न्याय्य मार्ग काढला जाईल. बाधितांना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिले जाईल, ज्याचा उपयोग शासकीय नोकरीत होईल. प्रकल्पाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पुरंदरच्या ऐतिहासिक वारशाचा मान राखण्यासाठी विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यामुळे या विमानतळाला एक वेगळी ओळख प्राप्त होईल.






12,023 वेळा पाहिलं