थंड पेयांचा व्यवसाय

भारतात सरबत, फळांचा रस, सोडा, गार पाणी यासारख्या पेयपदार्थ विक्रीच्या क्षेत्रात अलिकडच्या वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. ही पेये अल्कोहोल नसणारी आहेत. फळे, काजू, मुळे, औषधी वनस्पतींच्या इतर स्त्रोतांपासून नैसर्गिक ‘फ्लेवर’ तयार केले जातात. भारतातील लोकप्रिय पेयांमध्ये ‘बिस्लेरी’, ‘माझा’, ‘स्प्राइट’ आणि ‘फ्रुटी’ यांचा समावेश आहे. भारताची लोकसंख्या, अर्थव्यवस्थाही वाढत असून परिणामी खाद्यपदार्थ-पेयांचीही गरज भासू लागली आहे. भारतातील पेय उद्योगात वाढ होण्याची मोठी क्षमता आहे. या व्यवसायात सामील होणे हा एक फलदायी उपक्रम आहे.
सर्वात आधी बाजारपेठेची पाहणी करणे आवश्यक असते. बाजाराची गरज ओळखून नंतर आपण बनवू इच्छित असलेल्या विशिष्ट उत्पादनावर निर्णय घ्या. व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च लागू शकतो, याचा अंदाज बांधावा. भोवतालच्या थंड पेय विक्रेत्यांशी संपर्क साधून उत्पादनासाठी बाजारपेठ आणि विपणन योजना विकसित करा. भारतात थंड पेयनिर्मितीचा कारखाना सुरू करण्यासाठी एकूण रु. 30 लाख ते 1 कोटी इतकी गुंतवणूक आवश्यक असेल. थंड पेयाच्या प्रकारानुसार, पेय तयार करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते. कारखान्यात शुद्ध पाण्याचा पुरेसा पुरवठा असावा लागतो. साखर, संरक्षक, कार्बोनेटेड पाणी आणि कृत्रिम फ्लेवर यासारख्या कच्च्या घटकांची आवश्यकता असते. म्हणून ताज्या फळांचा पुरवठा होण्यासाठी फळांच्या बागा सुविधेजवळ असणे आवश्यक आहे.
पेय उत्पादन सुविधा स्थापित करताना योग्य जागा निवडणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाला धोका होऊ नये यासाठी बहुतेक कारखाने शहरांच्या बाहेरील बाजूस असतात. या व्यवसायात यंत्रसामग्रीच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नये. उच्च-गुणवत्तेची यंत्रे, अत्याधुनिक साधने आणि उपकरणे कारखान्यांमध्ये वापरली जातात. पेय कंपनीच्या यशासाठी योग्य जाहिरात आणि युक्तीचा वापर महत्त्वपूर्ण आहे. यासाठी आकर्षक ‘लोगो’ वापरला पाहिजे. आपल्याकडे उत्तम विक्री कौशल्य असायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पादनाची किंमत योग्य असणे फार गरजेचे आहे. उत्पादन आणि विक्रीच्या किंमतीमध्ये तफावत असणे महत्त्वाचे आहे.