मध्य भारतात थंडीची लाट – मध्य प्रदेश गारठला

भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या हवामान अंदाजानुसार, मध्य भारत आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. विशेषतः छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागांत पुढील दोन दिवसांसाठी तीव्र थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने मध्य प्रदेशातील पश्चिम व पूर्व भागांसाठी तीव्र थंडीच्या लाटेचाइशारा दिला आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे या भागांतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तरेकडील थंड आणि कोरडे वारे मध्य भारताकडे वाहत असल्यामुळे तापमानात ही मोठी घट नोंदवली गेली आहे. या काळात लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दुर्बळ आरोग्य असलेल्या नागरिकांनी पुरेसे उबदार कपडे परिधान करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

छत्तीसगडच्या काही भागांतही याच कालावधीत थंडीची लाट कायम राहील, ज्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बिहारमध्येही किमान तापमान हंगामातील सामान्य पातळीपेक्षा खाली आले आहे. ते बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस ते सोळा अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दाट थंडी आणि धुक्याची स्थिती अनुभवायला मिळू शकते. पुढील दोन ते तीन दिवस उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील प्रांतांच्या काही भागांत सौम्य ते मध्यम धुक्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राजधानी दिल्ली आणि आसपासच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये हवेची गुणवत्ता अजूनही वाईट श्रेणीतच आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजेपर्यंत येथील सरासरी हवेची गुणवत्ता ही चारशे एक होती. ज्यामुळे हवा अजूनही अति-गंभीर श्रेणीत असल्याचे सूचित होते आणि नागरिकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

थंडीची लाट आणि घटलेले तापमान यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि अनेक आजार बळावतात. विशेषत: लहान मुले, वृद्ध लोक आणि आधीपासूनच काही आरोग्य समस्या असणाऱ्या व्यक्तींनी या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.






9,935 वेळा पाहिलं