महाराष्ट्रात थंडीची लाट – गोंदियात सर्वात कमी तापमानाची नोंद

सध्या महाराष्ट्रात थंडीची लाटसदृश स्थिती असून, उत्तरेकडील थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे किमान तापमानाचा पारा अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या खाली आला आहे. राज्यात सध्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये थंडीचा कडाका सर्वाधिक जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली किंवा त्याजवळ नोंदवले गेले आहे.

भारतीय हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ या भागांमध्ये थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड येथे थंडीची लाट आहे. या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच अंशांनी कमी राहण्याचा अंदाज आहे.

याआदी जळगावमध्ये सर्वात कमी तापमानाची म्हणजेच नऊ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. त्यानंतर गोंदिया हे सर्वात थंड ठिकाण ठरलं आहे. राज्यात गोंदियामध्ये सर्वात कमी नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. पुण्यात दहा पूर्णांक सहा, नाशिकमध्ये दहा पूर्णांक एक, अहिल्यानगरमध्ये दहा पूर्णांक तीन, यवतमाळ नागपूरमध्ये दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर थंडीचा कडाका मध्य महाराष्ट्र किंवा विदर्भाएवढा नसला तरी, तापमानात घट झाली आहे. किमान तापमान सुमारे अठरा अंश सेल्सिअस ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. दिवसा हवामान स्वच्छ, पण रात्री आणि पहाटे गारवा जाणवत आहे. किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस ते एकोणवीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून, थंडी वाढू लागली आहे.

सध्याचे कोरडे हवामान आणि उत्तरेकडील शीतलहरी कायम असल्याने, पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा जोर असाच टिकून राहण्याची शक्यता आहे. काही हवामान तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबरच्या तिसऱ्या पश्चिमी झंझावात सक्रिय होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून, त्यानंतर किमान तापमानात काहीशी वाढ होऊन थंडीचा कडाका किंचित कमी होण्याची शक्यता आहे. नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.






11,470 वेळा पाहिलं