उत्तर भारतात थंडीची लाट – हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतातील राज्यांसाठी पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचे इशारे आणि सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांना आणि प्रशासनाला सतर्क राहणे आवश्यक आहे.

भारतीय हवामान विभागाने सांगितले की, वायव्य भारतासह अनेक भागांमध्ये किमान तापमानाचा पारा खूप खाली घसरला आहे. उत्तर आणि मध्य भारतात सध्या थंडीची लाट जाणवत आहे. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे, ज्यामुळे लोकांना थंडीचा तीव्र अनुभव येत आहे. या थंडीच्या लाटेचा सर्वाधिक परिणाम पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागांवर झाला आहे. या ठिकाणी नऊ ते दहा नोव्हेंबरदरम्यान शीतलहर कायम राहील, असा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पारा दहा अंश सेल्सियसच्या खाली गेला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये तर किमान तापमान सामान्यपेक्षा चार ते सात अंश सेल्सिअसने कमी नोंदवले गेले आहे.

दिल्ली-एनसीआर, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर प्रदेश यासारख्या लगतच्या प्रदेशांमध्येही रात्रीचे तापमान सामान्य तापमानापेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. हवामान विभागाने अंदाजित केले आहे की, वायव्य आणि त्याला लागून असलेल्या मध्य भारतामध्ये पुढील सहा ते सात दिवस रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा कमीच राहील. यामुळे मैदानी प्रदेशात हिवाळ्याची चाहूल लवकर लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

जयपूर, उदयपूर, ग्वाल्हेर आणि भोपाळ या शहरांमधील नागरिकांनी या आठवड्यात सकाळची वेळ नेहमीपेक्षा अधिक थंड जाणवल्याचे सांगितले. आकाश निरभ्र असल्यामुळे आणि कोरड्या वाऱ्यांमुळे रात्रीच्या वेळी तापमान वेगाने कमी होत आहे. पुढील दोन दिवसांत विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये किमान तापमान सुमारे दोन अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे, तर पूर्व भारतात पुढील चार दिवसांत तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची मोठी घट दिसू शकते. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हवामान तज्ञांनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून पूर्णपणे माघार घेतल्यामुळे या भागात कोरडे वारे वाहत आहेत.  हे देखील तापमान कमी होण्याचे मुख्य कारण आहे. निरभ्र आकाशामुळे दिवसा मिळालेली उष्णता रात्रीच्या वेळी लवकर नाहीशी होते, ज्यामुळे तापमान वेगाने खाली येते.






4,535 वेळा पाहिलं