
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली असून, एकोणवीस किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर तब्बल एकशे अकरा रुपयांनी वाढले आहेत. ही दरवाढ आजपासूनच लागू झाली आहे.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या गॅसचे दर सुधारित करतात. १ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या नवीन दरांनुसार, व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या सिलिंडरच्या किमतीत एकशे अकरा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरलेले मूल्य ही या दरवाढीमागची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. या दरवाढीनंतर देशातील मोठ्या शहरांमध्ये एकोणवीस किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर दिल्लीत एक हजार नऊशे एक रुपयांना झाले आहेत. मुंबईत हा दर एक हजार नऊशे पासष्ट रुपयांवर पोहोचला आहे. कोलकात्यात सर्वाधिक फटका बसला असून किंमत दोन हजार दहा रुपयांपर्यंत गेला आहे. चेन्नईमध्ये नवीन दर दोन हजार एकस्ष्ट रुपयांच्या आसपास राहतील.
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत झालेल्या या भरमसाठ वाढीचा थेट परिणाम खाद्य उद्योगावर होणार आहे. रेस्टॉरंट, ढाबे आणि कॅन्टीनमध्ये गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. इंधन खर्च वाढल्यामुळे हॉटेल चालक खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. विशेषतः थाळी, नाश्ता आणि स्ट्रीट फूडच्या किमती पाच ते दहा रुपयांनी वाढू शकतात. लग्नसराईचे दिवस असल्याने केटरिंग सेवांच्या दरातही वाढ होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडणार आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली असली, तरी सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे चौदा पूर्णांक दोन किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवल्यामुळे गृहिणींच्या बजेटवर सध्या तरी कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही. मात्र, व्यावसायिक दरातील वाढीमुळे अप्रत्यक्ष महागाई वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. व्यावसायिक गॅस महागल्यामुळे केवळ हॉटेलच नव्हे, तर बेकरी उत्पादने, मिठाई आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे उत्पादन खर्चही वाढणार आहेत. यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बाजारात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.