सेंट्रल पार्कची कामे गतीने आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करा

प्रशासकीय इमारतीच्या शेजारी उभारण्यात येणारे सेंट्रल पार्क ही वास्तू इंदापूर शहराच्या वैभवात भर पाडणारी ठरणार आहे. या उद्यानाचे काम केवळ गतीनेच नाही, तर ते गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि टिकाऊ स्वरूपाचे असावे, अशा कडक सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. उपमुख्यमंत्री पवार यांनी इंदापूर शहरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नका, असे स्पष्ट आदेश दिले.

अजित पवार यांनी इंदापूर रस्ता, बसस्थानक परिसर सुशोभीकरण, सेंट्रल पार्कसमोरील रिंगरोड, महापुरुषांचे पुतळे, जलतरण तलाव आणि गौतम बाग ते फडतरे वस्ती या चौपदरी रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला. सेंट्रल पार्कसमोरील रिंगरोडचे सुशोभीकरण तातडीने पूर्ण करावे. तसेच, प्रशासकीय इमारत आणि पार्क यांच्यातील संरक्षक भिंतीची उंची वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पावसाळ्यात पदपथावर पाणी साचणार नाही, याची तांत्रिक काळजी घेण्यास त्यांनी सांगितले. पुतळ्यांच्या मागील बाजूस आकर्षक ‘बॅकड्रॉप’ भिंत उभारण्यात यावी. पुतळ्यांची उंची ठरवताना नागरिकांना हार अर्पण करताना कोणतीही अडचण येणार नाही, याचा विचार प्रामुख्याने करावा. बसस्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याचा विचार करावा. तसेच, इंदापूर रस्त्यावरील अवजड वाहतूक लक्षात घेता, पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेने संयुक्तपणे नियोजित आराखडा तयार करावा. गौतम बाग ते फडतरे वस्ती या चौपदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. कालवा परिसरात उभारल्या जाणाऱ्या जलतरण तलावासाठी सर्वोत्तम दर्जाचे साहित्य वापरण्याचे निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्र्यांनी शहराच्या सौंदर्यीकरणावर विशेष लक्ष देण्यास सांगितले. कालवा परिसरातील गाळ्यांचे फलक एकसारखे असावेत, जेणेकरून शहराला सुटसुटीत रूप मिळेल. तसेच, शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शहरातील प्रत्येक विकासकाम हे जनतेच्या सोयीसाठी आहे. त्यामुळे प्रलंबित असलेली कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे अजित पवार यावेळी म्हणाले. या पाहणी दौऱ्यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.






14,251 वेळा पाहिलं