
महिला आणि बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सोलापूर येथे महिला व बालविकास भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भवनाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून, या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
सोलापूर शहरातील उत्तर सदर बाजार परिसरात तीन हजार तीनशे नव्वद चौरस मीटर क्षेत्रावर हे महिला व बालविकास भवन उभारण्यात येणार आहे. या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सचिव अनुपकुमार यादव, माजी आमदार दीपक साळुंखे, सहआयुक्त राहुल मोरे, सहसचिव वि.रा. ठाकूर, अवर सचिव सरदार तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सोलापूर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त उपस्थित होते.
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, या कामासाठी लागणारा आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला जाईल. या नव्या भवनात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालय, तीन नागरी प्रकल्प अधिकारी कार्यालये, महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय, बैठक कक्ष, हिरकणी कक्ष, महिला सहाय्यवाणी, बाल सहाय्यवाणी, अभिलेख कक्ष आणि विश्रामगृह यांचा समावेश असेल.
या वास्तूमुळे जिल्ह्यातील महिलांना आणि बालकांना विविध सेवा एकाच ठिकाणी मिळणार असून, प्रशासनिक कामकाज अधिक सुलभ आणि परिणामकारक होईल. मंत्री तटकरे यांनी जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या महिला व बालविकास भवनामुळे महिला आर्थिक विकास, स्वयंसहाय्यता गटांचे बळकटीकरण, कौशल्यविकास प्रशिक्षण आणि सल्ला–सेवा या उपक्रमांना नवी दिशा मिळेल. तसेच महिला व बालकांवरील अत्याचार, छळ आणि हिंसाचाराविरुद्ध तक्रारींचे निवारण करण्यासाठी महिला सहाय्यवाणी आणि बाल सहाय्यवाणी केंद्रे अधिक कार्यक्षमतेने कार्य करतील. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील महिला सबलीकरणाच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळणार आहे.