कोथिंबीर शेती

कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यात केली जाते. कोथिंबीरीला देशभरात वर्षभर मागणी असते. कोथिंबीरीची लागवड कोणत्याही हवामानात करता येते. अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येते. उन्हाळयात तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास कोथिंबीरीची वाढ कमी होते. कोथिंबीरीच्या पिकासाठी मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन निवडावी लागते. सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा भारी जमिनीत कोथिंबीरीचे पीक चांगले येते.
कोथिंबीरीच्या लागवडीसाठी शेत उभे-आडवे नांगरुन घेऊन 3×2 मीटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्यावे लागतात. प्रत्येक वाफ्यात 8 ते 10 किलो शेणखत मिसळावे लागते. वाफे सपाट करुन बी सारखे पडेल अशा पद्धतीने पेरावे. उन्हाळी हंगामात पेरणीपूर्वी वाफे भिजवून घेणे आवश्यक आहे. वाफसा आल्यावर बियाणे पेरावे. कोथिंबीरीच्या लागवडीसाठी हेक्टरी 60 ते 80 किलो बी लागते.
पेरणीपूर्वी धने फोडून बिया वेगळया कराव्यात यासाठी धने चपलेने अथवा लाकडी फळीने रगडून बी वेगळे करावे. पेरणीपूर्वी ते 12 तास पाण्यात उबदार जागी ठेवावे आणि नंतर लागवडीसाठी वापरावे. कोथिंबीरीच्या नंबर 65, टी 5365, एनपीजे 16, व्ही 1, व्ही 2, आणि को-1, डी-92, डी-94, जे 214, के 45 या स्थानिक आणि सुधारित जाती जाती आहेत.
बी उगवून आल्यावर 20 ते 25 दिवसांनी हेक्टरी 40 किलो नत्र आणि कोथिंबीरीचा खोडवा घ्यायच्या असल्यास कापणीनंतर हेक्टरी 40 किलो नत्र देणे आवश्यक आहे. कोथिंबीरीला नियमित पाणी द्यावे. कोथिंबीरीवर फारसे रोग आणि किडी दिसून येत नाही. काही वेळा मर रोगाचा प्रार्दुभाव होतो. यासाठी पाण्यात विरघळणारे गंधक वापरावे. पेरणीपासून दोन महिन्यांनी कोथिंबीरीला फुले येण्यास सुरुवात होते. हिरवीगार आणि कोवळी असताना कोथिंबीरीची काढणी करावी आणि कोथिंबीरीच्या जुड्या बांधून बाजारात विक्रीसाठी पाठवावी.