
गेल्या महिन्यापासून बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा अशा अनेक राज्यांत अवकाळी पाऊस पडला. त्यानंतर आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरावर आणि म्यानमारच्या किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. याचा सर्वाधिक धोका विशेषतः अंदमान व निकोबार या बेटांना आहे.
उत्तरेकडील अंदमान जवळच्या समुद्रात ताशी पंच्चावन्न किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. यामुळे सोसाट्याचा वारा अन् मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक धोका अंदमान आणि निकोबार बेटांना आहे. या भागात वादळी वाऱ्यासह तीव्र पावसाची शक्यता देखील वर्तवली गेली आहे.
या पार्श्वभूमिवर मच्छिमारांना आणि बेटवासियांना चार नोव्हेंबरपासून या भागातील समुद्री भागात जाणे टाळावे असे स्थानिक प्रशासनाने सुचवले आहे. मासेमारी किंवा नौकायन करताना अत्यंत सावध राहावे आणि सुरक्षितता बाळगावी. किनार्याजवळ किंवा समुद्री भागात असताना वेळोवेळी हवामानातील बदल तपासत राहावे. हवामान बदलांच्या संकेत मिळाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी तयार राहावे. अशा प्रकारच्या सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत.
पर्यटकांनी नेहमीप्रमाणे सुरक्षिततेचे उपाय अवलंबावेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अनेक पर्यटक हे अंदमान-निकोबारला भेट देतात. मात्र, यंदा याचकाळात चक्रीवादळाची परिस्थिती उद्भवल्यामुळे सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन पर्यटकांना करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय हवामान पूर्वसूचनेनुसार, अंदमान‐निकोबार द्वीपसमूहात पुढील सात दिवसांत तीव्र पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता सांगण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकले होते. यामुळे किनाऱ्यावर ऊंच लाटा पहायला मिळत होत्या. किनारी भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेली लावली होती. यात किनारी भागात काही प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य आणि केंद्र सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य की खबरदारी घेतली होती, त्यामुळे मोठे नुकसान टळले होते.