दापोलीचे दत्तमंदिर

दापोली तालुक्यात हर्णे-मुरुड-कर्दे असा प्रवास करत बुरोंडी-कोळथरेच्या दिशेने निघालो , वाटेत किनाऱ्यापाशी लागणारे गाव म्हणजे ‘लाडघर’. किनाऱ्यावरील मातीत असलेल्या विविध धातूंच्या गुणधर्मामुळे इथल्या पाण्याला तांबूस रंग आहे. त्यामुळे या पाण्याला ‘तामसतीर्थ’ असे म्हणतात. हा भाग पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. कर्दे गावातून समुद्राला लागून असलेल्या मार्गाने लाडघर गावाचे उत्तर टोक गाठायचे. तिथे रस्त्याला उतार लागण्याआधी उजवीकडे दत्त मंदिर परिसर दिसतो. तिथे दत्ताची सुबक संगमरवरी मूर्ती आहे, तसेच इथली दगडी दीपमाळ ही आकर्षणाचा विषय आहे. या दीपमाळेचा आकार खूपच आकर्षक आहे. एप्रिल २०२२ मध्ये मंदिराची डागडुजी आणि दीपमाळेच्या रंगरंगोटीचे कामही करण्यात आले आहे.

या मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारासमोरच श्री गणेशाचे मंदिर आहे, गणपतीचे दर्शन घेऊन, मंदिर परिसरात थोडे निवांत बसायचे आणि मग नंतर कौलारू दत्तमंदिरात प्रवेश करायचा. ऐकीव माहितीप्रमाणे हे मंदिर १८८० ते १८९० मध्ये पांडुरंग संभाजी मोरे यांनी दृष्टांत झाल्यावर बांधण्यात आले. मंदिराच्या आत दरवाज्यावर केलेल्या नोंदीप्रमाणे मंदिराची स्थापना १७६८ साली झाली आहे. मंदिरात ‘नारदमुनी विरचित दत्तस्तोत्र’ देवळाच्या एका भिंतीवर लिहिलेले आहे. देवळात दत्तजयंतीसाठी वापरली जाणारी पालखी आहे आणि मूर्तीसमोर पादुकांची पूजा केली जाते.

दत्तमंदिर परिसरात दक्षिण टोकाला एक पायवाट आपल्याला लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाते. जांभा दगडात पायऱ्या बांधल्या असल्याने हा उतार आपण अगदी सहजपणे उतरून खाली येतो. गाडी असेल, तर पर्यायी डांबरी रस्त्याने खाली गावात उतरावे लागते. या टेकडीच्या मागे समुद्रकिनाऱ्यापाशी एक खडकाळ मंच आहे. तिथे पर्यटक, कोळी बांधव, ग्रामस्थ मुले असे सायंकाळी एकत्र जमतात. त्यामुळे तिथे चैतन्यमय वातावरण निर्माण होते. हे मंदिर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असल्याने सूर्यनारायण आपले तेज समुद्रात अर्पण करतानाचे मनमोहक दृश्य खूपच विलोभनीय वाटते.
दत्तगुरूंचे दर्शन, तसेच समुद्राच्या लाटांची लयबद्ध आवर्तने आणि त्यांच्यात उतरलेली सोनसळी किरणे हा अनुभव घेण्यासाठी लाडघर येतील दत्त मंदिराला नक्की भेट द्या !







20,305