गोरेटी वादळामुळे ब्रिटनमध्ये हजारो घरं अंधारात – जनजीवन विस्कळीत

ब्रिटनच्या अनेक भागांमध्ये गोरेटी या चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यानंतर आता बर्फवृष्टी, पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

गोरेटी वादळामुळे ब्रिटनच्या विविध भागांत ताशी नव्वद मैल वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली आहे. या वादळाने किनारपट्टीच्या भागांत मोठे नुकसान केले असून, आता त्याचे रूपांतर तीव्र थंडी आणि बर्फवृष्टीत होत आहे. हवामान विभागाने स्कॉटलंड, उत्तर इंग्लंड आणि वेल्सच्या काही भागांसाठी यलो वॉर्निंग जाहीर केली आहे. अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. विशेषतः डोंगराळ भागातील रस्ते निसरडे झाल्यामुळे अपघात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे आणि विमान वाहतुकीवरही याचा परिणाम झाला असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घेण्याची आणि प्रवासाचे नियोजन तपासून पाहण्याची सूचना करण्यात आली आहे.

पाऊस आणि पुराचा धोका बर्फवृष्टीसोबतच काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुराचा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरण संस्थेने अनेक ठिकाणी पुराचे इशारे जारी केले आहेत. सकल भागातील घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाने बचाव पथकांना सज्ज ठेवले आहे. जोरदार वारे आणि बर्फामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्या आहेत. यामुळे हजारो घरे अंधारात आहेत. गोरेटी वादळाच्या प्रभावामुळे वीज कंपन्यांना दुरुस्तीच्या कामात अडचणी येत आहेत. टेलिफोन आणि इंटरनेट सेवाही काही भागांत विस्कळीत झाली आहे. तीव्र थंडीमुळे आरोग्य विभागाकडून विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, बर्फावर घसरून पडल्यामुळे होणाऱ्या दुखापतींचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

हवामान विभागाचा अंदाज हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तापमान उणे अंशात जाण्याची शक्यता असल्याने रस्त्यावर साचलेला पारदर्शक बर्फ तयार होऊन रस्ते अधिक धोकादायक बनू शकतात. वारा आणि पावसाचा जोर कमी झाला तरी थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.






22,766 वेळा पाहिलं