
शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत धान्याचा लाभ घेत असलेल्या रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही, तर त्यांचा मोफत धान्य मिळण्याचा हक्क रद्द केला जाईल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिला आहे.
राज्यातील अपात्र लाभार्थ्यांना योजनेपासून दूर ठेवण्यासाठी शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक तपासणीद्वारे लाभार्थ्यांची ओळख निश्चित केली जाते. या प्रणालीमुळे फक्त पात्र कुटुंबांनाच अनुदानित धान्य दिले जाणार आहे, ज्यामुळे लाभाचा गैरवापर टाळता येणार आहे.
नाशिक जिल्ह्यात अजूनही अनेक रेशन कार्डधारकांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांचे रेशन कार्ड ‘अपात्र’ ठरवले जाऊ शकते. अनेक गरीब आणि गरजू नागरिकांना याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांनी तत्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.
ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांनी जवळच्या शिधावाटप दुकानात जाऊन आधार क्रमांक आणि अंगठा स्कॅन करून आपली नोंदणी पूर्ण करावी लागते. याशिवाय, काही ठिकाणी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध आहेत. स्थानिक पुरवठा कार्यालयांमध्येही सहाय्यक कर्मचारी ई-केवायसीसाठी मदत करत आहेत.
प्रत्येक लाभार्थ्याने आपली शिधापत्रिका आणि ओळख दस्तऐवज घेऊन वेळेत ई-केवायसी पूर्ण करावी, अन्यथा योजनेचा लाभ पुढे मिळणार नाही. कोणतीही गैरसमज किंवा तांत्रिक अडचण टाळण्यासाठी शासनाच्या अधिकृत केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.