
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. हा भूकंप सहा पूर्णांक तीन रिश्टर स्केल तीव्रतेचा आहे. या भूकंपात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
अफगाणिस्तानच्या उत्तर भागात सहा पूर्णांक तीन तीव्रतेचा मोठा भूकंप आला आहे. यामध्ये अनेक घरांची पडझड झाली असून दीडशेहून अधिक नागरिक यामध्ये जखमी झाले आहेत. तर आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील खोल्म या प्रदेशापासून सुमारे बावीस किलोमीटर पश्चिम-नैऋत्येस होते आणि त्याची खोली अठ्ठावीस किलोमीटर इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाचा परिणाम मुख्यतः मातीच्या घरांवर, काही इमारतींवर आणि दुर्गम भागातील सर्वसाधारण बांधकामांवर झाला आहे. या भागातील भूपट अत्यंत अस्थिर आहे. पूर्वी देखील या भागात भूकंपाची वारंवार नोंद आहे, त्यामुळे हा भाग भूकंप प्रविण क्षेत्र म्हणून समजला जातो.
सोमवारी स्थानिक वेळेनुसार बारा वाजून एकोणसाठी वाजता भूकंपाचे झटके जाणवले. त्याआधी जर्मन जिओसायन्स रिसर्च सेंटरने अहवाल दिला होता की, हिंदूकुश प्रदेशात सुमारे दहा किलोमीटर खोलीवर सहा पूर्णांक तीन तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरनुसार, शनिवारी रात्री उशिरा याच भागात चार पूर्णांक नऊ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. अफगाणिस्तानची राजधानी काबूलपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले. तर मजार-ए-शरीफ शहरामध्ये घरे कोसळतील, या भीतीने अनेक लोक मध्यरात्री घर सोडून रस्त्यावर धावताना दिसले. सध्या नागरिकांना वाचवण्याचे काम सुरु आहे. घरांचे नुकसान झाल्याने या भागात आर्थिक नुकसानही बरेच झाले आहे.