स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सुविधा केंद्रांचा प्रभावी पुढाकार

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला राज्यभरात नवी दिशा मिळत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार या अभियानाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. स्वच्छता वाढवणे, जनसहभाग वाढवणे आणि स्थानिक पातळीवर ठोस बदल घडवण्याच्या उद्देशाने विविध संस्था या उपक्रमात सहभागी होत आहेत. जनतेच्या सहभागातून स्वच्छतेची चळवळ भक्कम करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे.

मुंबईसारख्या महापालिकेच्या क्षेत्रात ‘सुविधा केंद्र’ ही कल्पना आदर्श मानली जात असून, अशा केंद्रांमुळे झोपडपट्टी भागांसह वंचित वस्त्यांमधील स्वच्छतेची परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत झाली आहे. सामाजिक उत्तरदायित्वातून उभारण्यात आलेल्या या केंद्रांमुळे स्वच्छता, पाणी- बचत आणि आरोग्यविषयक जनजागृती यांना बळ मिळाले आहे. शहरी स्वच्छतेसाठी हे मॉडेल राज्यातही अनुकरणीय ठरत आहे.

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू झालेल्या या उपक्रमाने अत्यंत कमी कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या मुंबईत तेवीस केंद्रे कार्यरत आहेत, तर चोवीसावे केंद्र लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय आणखी दोन केंद्रांचे काम सुरू असून सात केंद्रांचे प्रस्ताव प्रगतीत आहेत. महानगरपालिका, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचएसबीसी आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन यांच्या सहभागामुळे या योजनेचा विस्तार आगामी वर्षांत अधिक वेगाने होण्याची अपेक्षा आहे.

या सुविधा केंद्रांचा मुख्य हेतू म्हणजे झोपडपट्टी तसेच गरीब वस्त्यांतील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणाऱ्या स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणे. आतापर्यंत पाच लाख पन्नास हजार पेक्षा जास्त नागरिकांना या सुविधांचा थेट लाभ झाला आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारण्यात या केंद्रांचा झालेला सकारात्मक परिणाम आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येतो. स्वच्छतेची सवय, पाणी वापरातील काटेकोरता आणि आरोग्याविषयीचे भान वाढवण्यात ही केंद्रे महत्त्वाची ठरत आहेत.

मुंबईसारख्या दाटीवाटीच्या महानगरात स्वच्छता ही केवळ सुविधांची नव्हे तर सन्मानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ‘सुविधा केंद्र’ ही संकल्पना सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या यशस्वीतेचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ स्वच्छता नव्हे, तर नागरिकांचा सहभाग, वर्तनातील सकारात्मक बदल, पर्यावरणीय टिकाव आणि कार्यक्षम व्यवस्थापन या सर्व निकषांवर ही केंद्रे आदर्श ठरत असल्याचे त्यांनी म्हटले. आगामी काळात महानगर क्षेत्रात अशा आणखी केंद्रांची उभारणी व्हावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.






17,589 वेळा पाहिलं