हत्ती बेट

‘हत्ती बेट’ नावाचे निसर्गरम्य ठिकाण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आहे. प्राचीन काळापासून या स्थळाला महत्त्व प्राप्त झाले आहे. उदगीर या प्रसिद्ध शहरापासून साधारण पंधरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावर आहे. हत्ती बेटावर पुरातन मंदिरे, गुहा व कोरीव शिल्पे मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. या बेटास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या स्थळाला प्रादेशिक पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम सुरू असताना स्वातंत्र्यसैनिकांनी रझाकारांविरुद्ध युद्ध करून शेवटपर्यंत हत्ती बेट रझाकारांना जिंकू दिले नव्हते, असे सांगितले जाते.

हत्ती बेटावर दत्तगुरुंचे मंदिर तसेच गंगाराम महाराजांची समाधी आहे. आसपासच्या गावांसह तसेच शेजारच्या राज्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक येथे भेट देत असतात. पौर्णिमेला येथे भजन, कीर्तन आणि प्रवचनाचे कार्यक्रम होतात. दत्तजयंतीला हत्तीबेटावर मोठी यात्रा भरते. यासह दर महिन्याच्या एकादशीस कीर्तन व भजनाची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. शिवाय दर पौर्णिमेला आरती, जप व महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. यावेळी हजारो भक्तगण हत्तीबेटावर येत असतात.

हणमंतवाडी, धर्मापुरी, करवंदी आणि देवर्जन या गावांच्या सीमेलगत हे क्षेत्र आहे. सुमारे ४१ हेक्टर क्षेत्रावर हे पसरले आहे. पूर्वी हत्ती बेट म्हणजे उजाड डोंगर होता. येथील जमीन सकस नसल्याने पूर्वी डोंगर झाडांविना उजाड होता. नंतर अलिकडे सर्व लोकांनी प्रशासनाला सहकार्य करुन उजाड डोंगरावर अनेक झाडे लावून हे बेट हिरवेगर्द केले आहे. या बेटावर वर्षभर पर्यटक व भाविकांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणाजवळ पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद हे आहे. रेल्वेने गेल्यास रेल्वे स्थानक लातूर रेल्वे स्टेशन, लातूर रोड रेल्वे स्टेशन येथे उतरावे.