कुंभमेळ्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे व्यापक नियोजन

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणी काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून कोट्यवधी भाविक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षित व सुलभ वाहतूक, निवास, भोजन, आरोग्यसेवा आणि गर्दीचे नियोजन यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.

या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, तसेच प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना डॉ. गेडाम यांनी सांगितले की, प्रमुख पर्वणीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांची संख्या अत्यंत मोठी असणार आहे. त्यामुळे रेल्वे, हवाई मार्ग, राज्य परिवहन बस, खाजगी वाहनं आणि पायी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर नियोजनाचा अभ्यास करून, स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक बदल करत अंमलबजावणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाविकांच्या सुविधेसाठी गर्दीचे व्यवस्थापन टप्प्याटप्याने करावे, असेही डॉ. गेडाम म्हणाले. भाविकांसाठी पिण्याचे पाणी, भोजन, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे, विश्रांती केंद्रे आणि वाहतूक मार्ग यांची प्रभावी व्यवस्था करणे हे प्रशासनाचे प्राधान्य असले पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.

या बैठकीत प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यातील नियोजनाचा नमुना सादर करण्यात आला. त्यानुसार नाशिक महानगरपालिकेने पर्वणी काळातील अंदाजित नियोजनाचे सादरीकरण केले. पोलिस, महानगरपालिका आणि विविध विभागांनी आपल्या तयारीची माहिती दिली. तसेच सर्व अधिकारी व विभाग प्रमुखांनी नियोजनाबाबत आपल्या सूचनाही मांडल्या.






10,020 वेळा पाहिलं