शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा – कर्जमाफीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कर्जमाफीच्या दृष्टीने एक समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती एप्रिलपर्यंत शिफारसी सादर करेल. त्या शिफारसींच्या आधारे पुढील प्रक्रिया पूर्ण करून पुढील तीन महिन्यांत म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल.” या बैठकीत शेतकरी संघटनांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली असून, सर्व संबंधित नेत्यांनी या निर्णयाला सहमती दर्शवली आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणं आवश्यक आहे, कारण त्यांच्या खात्यात निधी न आल्यास रब्बी पेरणी करता येणार नाही. त्यामुळे आता बत्तीस हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचे वितरण हे सरकारचे प्राधान्य आहे.”

फडणवीस यांनी सांगितले की, या बत्तीस हजार कोटी रुपयांच्या पॅकेजअंतर्गत आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या आठवड्याअखेर अठरा हजार पाचशे कोटी रुपयांचे वितरण पूर्ण केले जाईल. तसेच पंधरा दिवसांच्या आत नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीची रक्कम पोहोचेल, अशी खात्री त्यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ही कर्जमाफी ही तात्कालिक मदत असली तरी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींचा कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी समितीच्या शिफारसीनुसार पुढील धोरण ठरवले जाईल. तसेच इतर संबंधित विषयांवर पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.






17,943 वेळा पाहिलं