पेणजवळ सार्वजनिक – खासगी भागीदारीतून उभारणार देशातील पहिले विकास केंद्र
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर, रायगड जिल्ह्यातील पेण येथे एका भव्य विकास केंद्राची उभारणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत या ऐतिहासिक प्रकल्पाची घोषणा केली. यावेळी सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करारही स्वाक्षरी करण्यात आले आहेत.
मुंबईत वांद्रे – कुर्ला संकुल हे एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखले जाते, त्याच धर्तीवर रायगड-पेण विकास केंद्र उभारले जाईल. हे केंद्र सुमारे एक हजार एकर क्षेत्रावर पसरलेले असेल. सार्वजनिक – खासगी भागीदारीतून विकसित होणारे हे देशातील पहिलेच भव्य विकास केंद्र असेल. येथे कंपन्यांना काम सुरू करण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा तयार मिळतील, जेणेकरून ते तातडीने आपली ऑपरेशन्स सुरू करू शकतील. या घोषणेनंतर जगभरातील आघाडीच्या कंपन्यांनी या प्रकल्पात रस दाखवला आहे. दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, अमेरिका, फिनलँड आणि सिंगापूरमधील अनेक नामवंत कंपन्यांनी या केंद्रात गुंतवणूक करण्यासाठी सामंजस्य करार केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने फिनटेक हब, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आणि आधुनिक तंत्रज्ञान आधारित उद्योगांवर भर दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पेण – रायगड विकास केंद्र हे तिसऱ्या मुंबई प्रकल्पांतर्गत येणारे पहिले शहर असेल. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि आगामी नवी मुंबई विमानतळामुळे या क्षेत्राला जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. येथे काम करणाऱ्या लोकांसाठी निवास आणि कार्यालय एकाच परिसरात असेल अशा पद्धतीची रचना करण्यात येणार आहे, ज्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होईल. या एकाच प्रकल्पातून लाखो उच्च-गुणवत्तेच्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा अंदाज आहे. केवळ गुंतवणूकच नव्हे, तर आधुनिक शहरी नियोजनासाठी महाराष्ट्राने जागतिक संस्थांशी हातमिळवणी केली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले आणि म्युनिक तांत्रिक विद्यापीठ यांच्याशी तांत्रिक सहकार्याचे करार झाले आहेत. लंडनच्या अर्बन फ्यूचर्स कलेक्टिव्ह आणि सिंगापूरच्या सुरबाना जुरोंग यांसारख्या संस्थांच्या अनुभवाचा वापर पेणच्या नियोजनासाठी केला जाईल.