दक्षिण आफ्रिकेत महापूर – हजारो लोक विस्थापित

दक्षिण आफ्रिकेतील काही भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि भीषण महापुरामुळे जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत हजारो लोक बेघर झाले आहेत. या संकटात नागरी वस्तीत शिरलेल्या मगरींची भर पडली आहे. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा आणि मगरींपासून सावध राहण्याचा गंभीर इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दक्षिण आफ्रिकेतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. लिम्पोपो आणि एमपुमालांगा या प्रांतांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. नद्यांचे पाणी शहरांमध्ये आणि गावांमध्ये शिरल्याने रस्ते, पूल आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक गावे बाह्यजगापासून पूर्णपणे तुटली असून तिथे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अन्नपुरवठा केला जात आहे. पुराच्या पाण्यामुळे नद्यांच्या पात्राबाहेर मगरींचा वावर वाढला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे मगरी रहिवासी भागातील रस्ते, घरांची अंगणे आणि शेतात शिरल्या आहेत. पुराचे पाणी ओसरताना अनेक मगरी विहिरी किंवा खड्ड्यांमध्ये अडकून पडल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. साचलेल्या पाण्यातून चालताना किंवा मासेमारी करताना अत्यंत काळजी घ्यावी. पाणी गढूळ असल्याने मगरी ओळखणे कठीण आहे, त्यामुळे कोणत्याही जलाशयाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन वन्यजीव विभागाने केले आहे.

दक्षिण आफ्रिकेसह शेजारील मोझांबिक आणि झिम्बाब्वेमध्येही या वादळाचा परिणाम जाणवत आहे. हजारो कुटुंबांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला आहे. काढणीला आलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. साचलेल्या पाण्यामुळे कॉलरा आणि मलेरिया सारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकन नॅशनल डिफेन्स फोर्स आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथके युद्धपातळीवर बचावकार्य राबवत आहेत. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. तसेच, जखमी झालेल्या मगरींना पकडून पुन्हा सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी मगरींच्या तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. हवामान बदलाचा परिणाम पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, दक्षिण आफ्रिकेतील या अनपेक्षित आणि तीव्र पर्जन्यवृष्टीला हवामान बदल जबाबदार आहे. हिंदी महासागरातील तापमानात होणाऱ्या बदलांमुळे या भागात चक्रीवादळांची आणि अतिवृष्टीची तीव्रता वाढत आहे.






1,187 वेळा पाहिलं