गडचिरोलीत चार पदरी महामार्गाला मंजुरी – खनिज वाहतूक अधिक सुरक्षित होणार

गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

पायाभूत सुविधांचे प्रकल्प रेंगाळल्यास त्याचा आर्थिक बोजा सरकारी तिजोरीवर पडतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या. प्रकल्प प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी भूसंपादन आणि आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक व पर्यावरणविषयक परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्षांच्या आत हा महामार्ग पूर्ण झालाच पाहिजे. कार्यादेश देतानाच कंत्राटदारावर ही अट घालण्यात यावी. प्रकल्प वेळेत किंवा वेळेपूर्वी पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना प्रोत्साहन मूल्य देण्यात यावे. मात्र, विहित कालावधीपेक्षा जास्त वेळ लागल्यास दंडाची कडक तरतूद असलेली यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत.

या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ रस्ता नसून तो एक उद्योग कॉरिडॉर म्हणून विकसित केला जात आहे. भविष्यात सुरजागडपर्यंत गॅस वाहिनी नेण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे महामार्गाचे काम करतानाच रस्त्याच्या बाजूला गॅस वाहिनीसाठी आवश्यक जागेची तरतूद आतापासूनच करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात पुन्हा रस्ता खोदण्याची वेळ येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. याच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नागपूर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांचाही आढावा घेतला. समृद्धी महामार्गाचे हे जाळे गडचिरोलीपर्यंत पोहोचल्यास या भागातील औद्योगिक उत्पादने थेट मुंबई बंदरापर्यंत जलद गतीने पोहोचू शकतील.

सुरजागड लोहखनिज प्रकल्पातून होणारी अवजड वाहतूक सध्याच्या अरुंद रस्त्यांमुळे धोकादायक ठरत आहे. चार पदरी महामार्गामुळे ही वाहतूक जलद आणि सुरक्षित होईल. महामार्गामुळे या भागात नवीन उद्योग येतील, ज्याचा थेट फायदा स्थानिक तरुणांना रोजगाराच्या स्वरूपात होईल. दुर्गम भागातील नागरिकांसाठी जिल्हा मुख्यालय आणि नागपूरशी संपर्क साधणे अधिक सोपे होईल.






11,654 वेळा पाहिलं