कोल्हापूरमधील गगनगड

महाराष्ट्राचे ‘चेरापूंजी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘गगनबावडा’ गावात ‘गगनगड’ उभा आहे. दक्षिण कोकणातील बंदरांमध्ये उतरलेला माल कोकणातील कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाट मार्गे देशावर जात असे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी १२ व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला. नाथपंथीय गैबीनाथांचे हे मूळ स्थान आहे. १९ व्या शतकात गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्धीस आले. ‘गगनगिरी महाराजां’च्या मठामुळे आजही गडावर लोकांचा राबता आहे.

गगनगड कोल्हापूरहून ५५ किमी वर आहे. कोल्हापूरहून येथे येण्यासाठी नियमित बससेवा आहे. याशिवाय कोकणातील वैभववाडी, कणकवली येथून गगनबावडा ५० किमी अंतरावर आहे. कोकणातून कोल्हापूरला जाणार्‍या बस गगनबावडा स्थानकात थांबतात. तिथून २ किमी.चा डांबरी रस्ता गगनगडापर्यंत जातो. गगनगडाच्या जवळजवळ अर्ध्या उंचीपर्यंत गाडीने जाता येते. गाडी तळापासून पायर्‍यांनी गडावर जाण्यास साधारण अर्धा तास लागतो.

पायर्‍यांच्या सुरुवातीला ‘म्हसोबा मंदिर’ आहे. त्यात रेड्याची प्रतिमा आहे. पायर्‍या चढून वर गेल्यावर डाव्या हाताला समोरच दगडातील एक प्रशस्त नैसर्गिक गुहा आहे. गगनगिरी महाराजांचे या गडावर वास्तव्य होते, त्यांनी याच गुहेत तपसाधना केली होती. त्यामुळे या गुहेत त्यांचे मंदिर बनवण्यात आले आहे. गुहेच्या बाहेर कातळात कोरलेली भव्य हनुमंताची प्रतिमा आहे. त्याच्या बाजूला राम, लक्ष्मण, सीता आणि शंकराची प्रतिमा आहे. गुहेपासून पायर्‍यांच्या मार्गाने वर चढत गेल्यावर भक्तनिवास आणि नवग्रह मंदिर आहे. मंदिराजवळील बुरुजावर २ तोफा आहेत. भक्तनिवासापासून वर चढत गेल्यावर आपण मोकळ्या पठारावर प्रवेश करतो.

पठारावर डाव्या बाजूस संगमरवरी देऊळ (ध्यानमंदिर) आहे. उजव्या बाजूस शंकराचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरासमोर उभे राहिले की, किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर (बालेकिल्ल्यावर) मशिदीसारखी इमारत दिसते. ती आहे गैबी पिराची कबर किंवा गैबीनाथाची समाधी. गगनगडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी शंकर मंदिराजवळून खोदीव पायर्‍यांचा मार्ग आहे. या मार्गाने आपण १० मिनिटांत समाधीपाशी पोहोचतो. तेथून जवळच विठ्ठलाई देवीचे मंदिर आणि पाण्याची विहिर आहे. याशिवाय बालेकिल्ल्याच्या खालच्या बाजूस जुन्या घरांचे चौथरे आणि तटबंदीचे अवशेष दिसतात.

गडावर राहण्याची सोय भक्त निवासात होऊ शकते. गडावर जेवणाची सोय (प्रसादाचे जेवण) आहे. तसेच गडावर पाण्याची सोय मोठे हौद बांधून करण्यात आली आहे. गगनगडाचे दरवाजे रात्री 9 ते सकाळी 5 बंद असतात.






11,897 वेळा पाहिलं